म. प्रदेश गृहमंत्र्याचा मंगळसूत्राच्या जाहिरातीवर आक्षेप

म. प्रदेश गृहमंत्र्याचा मंगळसूत्राच्या जाहिरातीवर आक्षेप

नवी दिल्ली: डाबरच्या करवा चौथच्या जाहिरातीवर उठवलेला वादंग ताजा असतानाच आता, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी रविवारी डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या मंगळसूत्रासह नव्या ज्युलरी कलेक्शनची जाहिरात मागे घेण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. ही जाहिरात सवंग आणि आक्षेपार्ह असल्याचा मिश्रा यांचा दावा आहे.

गेल्या आठवड्यात, डाबर इंडिया प्रा. लि. ने फेम क्रीम ब्लीचची जाहिरात मागे घेतली. या जाहिरातीत एक समलिंगी जोडपं करवा चौथ साजरे करत आणि एकमेकांकडे चाळणीतून पाहताना दिसत होते. मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. ही जाहिरात आक्षेपार्ह असल्याचे सांगत त्यांनी कंपनीवर या जाहिरातीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

सब्यसाची मुखर्जी यांची मंगळसूत्राची जाहिरात पाहिली असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ही जाहिरात खूप आक्षेपार्ह आहे. मंगळसूत्र हा पवित्र दागिना आहे. मंगळसूत्राचे सोनेरी मणी देवी पार्वतीचं रुप आहे, असं आम्ही मानतो. काळे मणी भगवान शंकराचं रुप आहे. जे स्त्रीचं आणि तिच्या पतीचं रक्षण करतात. पार्वतीच्या आशीर्वादानं वैवाहिक जीवन सुखी होतं.’

सब्यसाची यांच्या इन्स्टाग्राम पेजवर केवळ या नव्या कलेक्शनची माहिती देण्यात आली आहे. मिश्रा यांच्या आक्षेपावर सब्यसाची यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

मूळ बातमी

COMMENTS