‘सांभर’मधील पक्ष्यांच्या मृत्यूंच्या कारणाबाबत मतभेद

‘सांभर’मधील पक्ष्यांच्या मृत्यूंच्या कारणाबाबत मतभेद

मृत शरीरे पुरण्याची अधिकाऱ्यांची कल्पनाही अनेक तज्ज्ञांना मान्य नाही. त्यांच्या मते, पुरण्याऐवजी ही शरीरे जाळून टाकली पाहिजेत.

समुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान
गा विहंगांनो….
स्थलांतरित पक्ष्यांचा सांभर तलावात गूढ मृत्यू

सांभर तलावात गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने पक्षी मृत्युमुखी पडत आहेत आणि अजूनही त्याचे कारण कुणालाही समजलेले नाही. भारतातील या सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या भोवतीने गेल्या ८-१० दिवसात १०,००० पेक्षा जास्त पक्षी मृत झाले आहेत.

एवियन बोट्युलिझम हा आजार याला कारणीभूत असावा असे बऱ्याच जणांचे म्हणणे असले तरी गेल्याच आठवड्यात भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी डिसीजेस या संस्थेतून आलेल्या चाचणी अहवालाने ही शक्यता फेटाळली आहे. इतर स्पष्टीकरणांमध्येत्या भागातीलमिठाच्या कारखान्यांमधून बाहेर टाकली जाणारी रसायने,मिठाचे बेकायदेशीर खनन, अती प्रमाणात भूजलाचा उपसा आणि पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात झालेली उपासमार समाविष्ट आहेत.

प्रदूषित जलसाठा

सांभर तलाव जयपूरच्या पश्चिमेला ८० किमीवर आहे. सरकारने जवळजवळ तीन दशकांपूर्वी त्याला रामसर साईट म्हणून घोषित केले आहे. रामसर साईट म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेली पाणथळ जागा. मात्र सरकारने या साईटची योग्य देखभाल केलेली नाही.

मोठ्या प्रमाणात पक्षी या तलावात आणि काठांवर येतात, घरटी करतात, अन्न शोधतात, आणि लोकबाजूच्या सांभर शहरात शाकंभरी देवीच्या देवळात येतात. हे देऊळ तलावाच्या मध्यात आहे. देवळापर्यंतच्या तलावाला सांभर म्हणतात व त्यानंतरच्या भागाला नवा. या दोन्ही तलावांमध्ये पक्षी मरताना दिसत आहेत, मात्र सांभर बाजूला जास्त आहेत.

प्राथमिक अहवालांमधून एवियन बोट्यूलिझम नावाचा जीवाणूजन्य आजार या मृत्यूंना कारणीभूत असल्याचे म्हटले होते, कारण शरीरांवर पक्षाघाताच्या खुणा होत्या जे या आजाराचे लक्षण आहे. हा आजार क्लोस्ट्रिडियम बोट्यूलिनम नावाच्या जीवाणूंमुळे होतो, जो विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या प्रदूषित पाण्यामध्ये आढळतो.

तलाव दिसायला प्रदूषित दिसत नसला तरी रासायनिक विश्लेषणांचे निष्कर्ष भयंकर आहेत. उदा. हिंदुस्तान टाईम्स मधील बातमीनुसार, “सुमारे १६% पाणथळ जागेवर आक्रमक सजीव आहेत”; पाण्याची जैविक ऑक्सिजन मागणी “७८ ते २०३ मिग्रॅ प्रति लिटर असल्याचे आढळले…स्वीकारार्ह मर्यादेच्या १३ ते ३४ पट जास्त”; आणि “पाण्याची क्षारता ४० ग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त आढळली.”

बोट्यूलिझम हा प्राणघातक आजार या मृत्यूंना कारणीभूत असावा. मात्र द प्रिंटच्या बातमीनुसार, एवियन बोट्यूलिझमच्या अनुमानाचे समर्थन करणाऱ्या एका तज्ञाच्या मते भारतातील प्रयोगशाळांमध्ये त्यासाठीची चाचणी करण्याकरिता योग्य सुविधा असतीलच असे नाही.

IUCN या वन्यजीव आरोग्य तज्ञांच्या समूहाचे एक सदस्य दाऊ लाल बोहरा यांना आजारपणाचे अनुमान मान्य नाही. त्यांच्या मते पक्ष्यांमध्ये आजारपणाची विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत. तसेच पक्षी संपूर्ण सांभर तलावात मरून पडलेले आढळले नाहीत, तर काही विशिष्ट ठिकाणीच आढळले. तसेच इतर भागांमधील पक्ष्यांमध्ये आजारपणाची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत.

बोहरा यांच्या मते पंख आणि पायांच्या स्नायूंमधील अशक्तपणाची दोन संभाव्य कारणे असतात. एक तर विषाणूजन्य आजार आणि दुसरे म्हणजे अचानक बसलेला विजेचा धक्का. पाण्यावर वीज पडते तेव्हा हे अनेकदा दिसून येते.

खाली पडलेल्या विजेच्या तारा

मोठ्या विद्युत धारेचा आभाळातून पडलेली वीज हा एकच स्रोत नसतो. या भागात राहणाऱ्या लोकांच्या मते संपूर्ण तलावभर मिठाचे पाणी बाहेर काढण्यासाठी हजारो बोअरवेल कनेक्शन आहेत, काही तलावाच्या पाण्यात बुडलेलीही आहेत. त्यांचा आरोप आहे की या विहिरींच्या विद्युत तारा खराब झालेल्या आढळल्या होत्या, व कदाचित त्यामुळे पक्ष्यांना विजेचा धक्का बसला असावा.

“अती उष्णतेमुळे उन्हाळ्यात विजेच्या तारा तुटतात,” नवा तालुक्यातील राजस गावातील रहिवाश्याने द वायरला सांगितले. “मिठाच्या कारखान्यांमधले कामगार स्वतःच त्यांची दुरुस्ती करतात, कधीकधी फक्त लाकडाच्या काठीने बांधून ठेवतात. हे धोकादायक असू शकते.”

वर्षाच्या काही काळात तलावातील पाणी नेहमीपेक्षा जास्त खारट होते, त्यामुळे स्थानिक मीठ खनन करणाऱ्या उद्योगाला ते फायद्याचे असते. बाकी बराचसा काळ तलाव जवळजवळ पूर्णपणे कोरडा असतो.

खाणींमधून फक्त उन्हाळ्यातच मीठ काढता येते. पावसाळ्यात पाऊस पडला तर काढता येत नाही. नोव्हेंबरमध्ये बहुतांश पाण्याचे बाष्पीभवन होते. मात्र या वर्षी सांभरमध्ये दिवाळीनंतर (२७-२८ ऑक्टोबर) दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, आणि तलाव कोरडा असायला हवा तेव्हा तो थोडा भरलेला होता. मात्र तो खाणींच्या हंगामाचा शेवट असल्यामुळे कामगारांनी बोअरवेलमधून खारट पाणी बाहेर काढणे चालू ठेवले. अगदी १७ नोव्हेंबरच्या रविवारपर्यंत हे काम चालू होते. पक्षी मरत असल्याची बातमी आल्यानंतर आता मीठ उत्पादकांनी त्यांच्या विहिरी बंद केल्या आहेत.

पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण काहीही असले – सूक्ष्म जीव, वीज किंवा इतर काही – तरीही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी पक्ष्यांची मृत शरीरे तलावात किंवा मातीत पुरण्याचा घेतलेला निर्णय तज्ञांना मान्य नाही. “जर प्राथमिक निष्कर्ष एवियन बोट्यूलिझमचा आहे, तर अधिकारी जिवाणू मातीत पुरण्याची अशी जोखीम कशी घेतात?” बोहरा विचारतात. अशाने आजार असेलच तर तो सर्वत्र पसरेल. “मृत शरीरे जाळलीच पाहिजेत,” असे त्यांचे मत आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0