प्रांजलीचा मित्र वुटवुट

प्रांजलीचा मित्र वुटवुट

दिवाभीत घुबड भारतीय हिमालय पर्वतीय प्रदेशात, काश्मीरमध्ये आढळते. भारताबाहेर ते, नेपाळ, श्रीलंका या ठिकाणीही आहे. पाकिस्तानातही यांचा अधिवास आहे. सहसा हे दिवसा दिसत नाही किंवा प्रकाशात बाहेर पडत नाही म्हणून याला दिवाभीत म्हणतात म्हणजे दिवसा घाबरणारे.

‘सांभर’मधील पक्ष्यांच्या मृत्यूंच्या कारणाबाबत मतभेद
समुद्रकिनाऱ्याचे रंग अन् गाणारं माळरान
गुपित महाधनेशाचे

आजीने मागचं दार लावलं आणि देवापुढे दिवा लावला. प्रांजली आणि तिचा चुलतभाऊ मोहित आजी शेजारी येऊन बसले. शेखर काकाही आज मुलांबरोबर देवघरात जाऊन बसला. शुभं करोति कल्याणम् .. मुलांनी श्लोक म्हणायला सुरूवात केली आणि प्रांजलीचा मित्रही कौलावर बसून श्लोक म्हणू लागला… वुटवुट… वुटवुट…. शेखर काका क्षणभर दचकलाच पण परत त्याने शुभंकरोति ऐकायला सुरुवात केली… माझा नमस्कार सर्व देवांपाशी… वुटवुट वुटवुट… या दोन्ही प्रार्थना ऐकताना शेखर काका भलताच गोंधळला आणि अचानक उठून घराबाहेर धावला… आणि ऐकतच राहिला…
“अरे असं तीनसांजा कुठे बाहेर पडतोस शेखर”, आजी म्हणाली.
“काकू मी पक्षी शोधत दर्‍याडोंगरात फिरणारा माणूस.. मला रात्र काय आणि दिवस काय…”
“ते ही खरंच बाबा. तुझे फोटो दाखवतो मला सुहास नेहमी.. आम्हाला काही कळत नाही त्यातल पण तुझं कौतुक मात्र अपार वाटतं हो मला.”
“असेच आशीर्वाद राहू देत काकू. बरं मला सांगा आत्ता कोणाचा आवाज ऐकू आला?” कुठल्या पक्ष्याचा?
“अरे तो तर पिंगळोबा रे” रोजच बोलतो. आपल्या प्रांजलचा मित्र आहे म्हणे तो”.
काका प्रांजलकडे गेला. ती आणि मोहित पाढे लिहीत होते बसून.
” प्रांजल, मगाशी कुठला पक्षी ओरडला ग?”
” अरे काका तू असा धावलास काय एकदम? आम्हाला वाटलं काय झालं तुला? “तो पक्षी ना तो म्हणजे माझा वुटवुट दोस्त. तो पण माझ्याबरोबर शुभं करोति म्हणतो रोज.”
“रोज म्हणजे?”

“अरे रोज म्हणजे रोज.”
“असे किती दिवस झाले हा आवाज ऐकू येतोय?”
मी सांगतो काका” आठ दहा दिवस झाले असतील. “मोहित म्हणाला.
“या आधी हा आवाज येत होता का?”
” ना… ही…” मुलं एकासुरात ओरडली.
“भावोजी अहो काय परीक्षा घेताय सगळ्यांची?” आई स्वयंपाकघरातून हात पुसत बाहेर येत म्हणाली.
सांगतो सांगतो वहिनी. थोडा वेळ द्या मला.
“तुमच्या या कोकणातल्या आडगावातही नेटवर्क आलय हे भारी आहे. हॅलो हॅलो प्रत्युष.,, ऐक…मी डिटेल्स आणि लोकेशन शेअर करतो आहे. उद्या सकाळी लवकरात लवकर निघा… हो हो कॅमेरा आणि कॉल रेकॉर्डिंग्जसाठी आपल्याला जे जे लागतं ते सगळं गाडीत टाकून आणा. इथे काहीही मिळत नाही. चार्जर, बॅटरी जरा extra ठेवा बरोबर. त्याच्यासाठी अडायला नको. इथे राहायची जेवायची सोय आहे. तिघेजण निघाच तातडीने उद्या. मोठे टॉर्च पण ठेवा रे बरोबर. मी राजापूरला येऊन थांबतोय. तिथे भेटू. बाय”
वहिनी जरा सॉरी बरं का! अचानक तीन भिडू राहायला बोलावले आहेत मी तुमच्या परवानगीशिवाय.
“अहो भावोजी काहीच हरकत नाही. पण झालंय काय ते समजेल का आम्हाला?”
“काका हा बघ माझा मित्र… कसला छोटु पिलू आहे ना! दिसतो भयंकर ना थोडा.. पण गोड आहे. मला आवडतो… त्यादिवशी ना मी आणि मोहित शाळेतून येताना झाडाच्या ढोलीत बसला होता आणि टुकटुक पहात होता.” प्रांजलने काढलेलं चित्र काकाला दाखवलं.
जेवताना आता पंगत रंगली ती शेखर काकाच्या बोलण्याने. “हा दिवाभीत आहे. म्हणजे स्कॉपस् आऊल. महाराष्ट्रात गेली १० वर्षे ही प्रजाती सापडलेली नाही. महाराष्ट्रातील वनाधिकार्‍यांच्या अहवालातही कुठे तशी नोंद मिळत नाही. त्यामुळे हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे अशी भीती पक्षीमित्रांच्या मनात आहे. त्यामुळे आम्ही सगळे याविषयी चिंतेत असतानाच अचानक आलेला हा आवाज ऐकून मला क्षणभर काही सुचेना. नंतर आवाजाची खात्री पटल्यामुळे मी बाहेर धावत सुटलो.”

सुचेना. नंतर आवाजाची खात्री पटल्यामुळे मी बाहेर धावत सुटलो.”
“म्हणजे तुम्ही माझ्या वुटवुटला पकडणार” !!!
” “अग वेडाबाई नाही. उलट त्याला नीट सांभाळणार.” त्याची काळजी घेणार. अग पक्षी हा त्याच्या अधिवासातच सुखरूप असतो. तुम्हाला कस आपल्या घरात सुरक्षित वाटतं तसंच पक्ष्यांच्या घराला अधिवास म्हणजे habitat म्हणतात. तिथेच तो अधिक सुरक्षित राहू शकतो.”
हे दिवाभीत घुबड भारतीय हिमालय पर्वतीय प्रदेशात, काश्मीरमध्ये आढळते. भारताबाहेर ते, नेपाळ, श्रीलंका या ठिकाणीही आहे. पाकिस्तानातही यांचा अधिवास आहे. सहसा हे दिवसा दिसत नाही किंवा प्रकाशात बाहेर पडत नाही म्हणून याला दिवाभीत म्हणतात म्हणजे दिवसा घाबरणारे. त्यामुळे प्रांजलीला ते शाळेतून येताना दिसलं ढोलीत याबद्दल मला उत्सुकता आहे. कोकणात आमराया असल्याने ते इथे दिसू शकतं आणि तुमच्या घराभोवती तर अनेक वर्ष हे जंगलच आहे. हा या पक्ष्यासाठी अतिशय सुरक्षित अधिवास आहे. हा पक्षी आता महाराष्ट्रात दुर्मिळ असल्याने मी माझ्या मित्रांना बोलावलय. आम्ही आता रात्री जंगलात मागे बसून त्यांचे calls record करणार. म्हणजे एकमेकांना मारलेल्या हाका. आपण बोलतो ना तसं पक्षीही बोलतात एकमेकांशी.”
“अय्या गंमतच की” मोहित म्हणाला. प्रांजलीसारखाच तिचा वुटवुट पण बडबड्या!”
“हा आवाज छोट्या पिलूचा आहे. ते अजून लहान आहे म्हणजेच त्याचे आई बाबाही आसपास असणारच. आई पिल्लाला काय खाऊ घालते हे पण आम्ही पाहण्याचा, फोटो काढण्याचा प्रयत्न करू. ते थोडं अवघड असतं पण कॉल तर नक्की टिपता येतील.”
“माझा मित्र काय खात असेल काका? आणि हे सगळं तुला कसं रे माहिती?”
“अग शेखर काका महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध पक्षीमित्र आहे. तो पक्ष्यांचा अभ्यास करतो.”
“काका, भारी आहेस तू.” प्रांजल म्हणाली… आता मला वुटवुट बद्दल माहिती मिळेल ना जास्त. पण ए प्लीज त्याला त्रास नका हं देऊ.”
प्रांजल तुझा मित्र दिसतो कसा ग?
काका ढरा काळपट राखाडी आणि थोडासा चॉकलेटी म्हणजे तपकिरी तोंड आहे. मला नक्की नाही सांगता येणार रंग इतके रंग आहेत आणि मी थोडाचवेळ पाहिला त्याला. डोळे थोडे केशरी आहेत. त्याचे कानही गोलसर उभे आहेत. काळपट आहेत.
“अग बरोबर निरीक्षण आहे तुझं अगदी. त्याचा आकार साधारण २२-२४से.मी असतो आणि पंखांचा विस्तार सुमारे १४३ ते १८५  मिलीमीटरच्या आसपास. मादी ही नरापेक्षा थोडी मोठी आणि जड असते. याचा आवाज बेडकासारखा भासतो आणि तो व्हट किंवा वुट असा ऐकू येतो.”
“काका हे एकदमच बरोब्बर. म्हणून तर मी त्याचं नाव वुटवुट ठेवलय. पण माझा मित्र आहे की मैत्रीण? आता तू सांगू शकशील ना?”
“अग नीट पहावं लागेल बाळा. माझे मित्र आले की कळेलच थोडा अभ्यास केल्यावर.
हे पिलू असल्याने मादी म्हणजे त्याची आई त्याला काय भरवते? ते काय खातं? हे पण पाहण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हालाही पहायला मिळेल मजा पण शांत बसून राहायचं रात्रभर. सहसा हे पक्षी नाकतोडे, कीटक असं खातात. छोटे उंदीर, पाली, सरडे हेही त्यांचं खाद्य आहे. मादी मध्यम उंचीवर झाडाच्या ढोलीत तीन ते चार अंडी घालते.”
दुसर्‍या दिवशी शेखर काकाची पक्षीमित्र टीम डेरेदाखल झाली. प्रांजली तर नुसती मज्जा पाहत होती. मोहित नीट निरीक्षण करत होता. शेखर काकाच्या मित्राने लांब तोफेसारखी नळी असलेला कॅमेरा तयार केला. एक मशीन होतं म्हणे त्यांच्याकडे ज्यात पक्ष्यांचे बारीक आवाजही टिपता येतात.
आईच्या हातचं कुळीथाचं पिठलं, लाल तांदळाचा भात, पोह्याचे पापड आणि दही यावर ताव मरून मित्रमंडळी घरामागच्या वहाळात तयार होऊन बसली. फोटो मिळाले नाहीत पण आई घुबडाचे आवाज मात्र छान मिळाले. रात्रभर जागूनही मोहित आणि प्रांजल एकदम फ्रेश होते बरं का! पहाटे प्रांजलने दाखवलेल्या झाडाच्या ढोलीत वुटवुट पिलू दिसलंच.. हुर्रै… भराभरा त्या मोठ्या तोफेतून क्लिकक्लिकाट… दिवाभीत मात्र चक्क धीटपणे फोटोला पोज द्यायला बसल्यासारखं बसलं आणि नंतर एका क्षणी ढोलीत गुडूप…..
रत्नागिरीला आता टीम निघाली. बाबांनी बोलून व्यवस्था केली होतीच आणि शेखर काकाचे मित्रमंडळही होतेच रत्नागिरीतले.
एका दोन मजली इमारतीत सगळी जमली. बाहेर प्रांजलने पाटी वाचली-पत्रकार भवन. एका हॉलमधे सगळे पोहोचले. तिथे बरेच लोक काही लिहून घेत होते. राजापूरातली मंडळी आणि वनाधिकारीही का कोण ते ही जमले होते.

“नमस्कार! गेली दहा वर्षे लपून राहिलेला आणि दृष्टीस न पडलेला Indian Scops Owl राजापूर जवळच्या एका छोट्या खेड्यातील परिसरात सापडला आहे. निसर्गामधे आपले महत्त्वपूर्ण स्थान बाळगून असलेले हे घुबड नामशेष झाल्याची भीती वाटत असतानाच हा आशेचा किरण दिसला आहे. आता परिसरातील सर्व शाळांमधे याविषयी सदीप व्याख्याने म्हणजे स्लाईड शो करून हा पक्षी सांभाळण्याबाबत स्थानिकांना आवाहन करूया. सहसा घुबड दिसले की त्याला अशुभ मानतात आणि दगड मारतात. पण घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे हे स्थानिकांच्या भाषेत समजावून सांगूयात. वनाधिकार्‍यांच्या मदतीने ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊया. आणि ही प्रजाती सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करूयात.”
“आणि ही आमची प्रांजल. तिला तिच्या वुटवुटने दर्शन दिले आणि तिनेही त्याचे हुबेहुब वर्णन करून आम्हाला सांगितलं.”
प्रांजल पळूनच गेली हे ऐकून बाहेर..
तिला आता घरी परत यायची घाई झाली होती. आजी संध्याकाळी दिवा लावेल.. मग मी आणि मोहित देवासमोर शुभं करोति म्हणणार आणि वुटवुट कौलावर बसून म्हणणार आणि मग मी वुटवुटला सांगणार की त्याच्याबद्दल सगळे काय काय बोलत आहेत… पण त्याला कळेल का हे सगळं!!???””।

डॉ. आर्या आशुतोष जोशी, यांनी संस्कृत या विषयात पीएचडी केली असून, त्या ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत. NatureNotes

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

लेखाची छायाचित्रे – सुभद्रा देवी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0