संबित पात्रांवर काँग्रेसच्या २ फिर्यादी दाखल

संबित पात्रांवर काँग्रेसच्या २ फिर्यादी दाखल

नवी दिल्ली : भारताचे दोन माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व राजीव गांधी यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर लिहिल्याप्रकरणात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात छत्तीसगड व महाराष्ट्रात दोन फिर्यादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून दाखल झाल्या आहेत.

पात्रा यांनी १० मे रोजी ट्विटरवरून माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु व राजीव गांधी यांच्यावर काश्मीर समस्या व १९८४मध्ये शीख दंगली व बोफोर्स घोटाळ्यासंदर्भात आरोप केले. या आरोपानंतर पात्रा यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी परत ट्विटवरून, “नेहरु व राजीव यांना भ्रष्ट म्हटल्याने काँग्रेसवाल्यांनी तक्रारी केल्या. नेहरुंनी काश्मीर समस्या जन्मास घातली, ते नसते तर काश्मीर समस्या निर्माण झाली नसती. राजीव गांधी यांनी बोफोर्स घोटाळा केला व ३ हजार शीखांचे हत्याकांड घडवून आणले, आता माझ्यावर तक्रारी दाखल करा,” असे आव्हान त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले.

पात्रा एवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी १० मेला पुन्हा एक ट्विट करून, “खरंच घोर कलियुग आले असून चोरांना चोर म्हटलं तर पोलिसात तक्रार केली जाते, आता काँग्रेस नेत्यांनी आपल्या शिक्षकांकडे जाऊन रडत रडत तक्रार करा,” असे पुन्हा आव्हान दिले. पात्रा यांनी आपले ट्विट मोठ्या प्रमाणात रिट्विट करण्याचे आवाहन समर्थकांना केले. हे ट्विट घराघरात पोहचले पाहिजे असेही ते म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार व दंगलीबाबत दोन्ही माजी पंतप्रधानांना कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवले नव्हते. आता देश कोरोना महासाथीशी मुकाबला करत असताना असे ट्विट करून देशातील विभिन्न धर्मांमध्ये, वर्गामध्ये, समाजामध्ये द्वेष पसरवला जात असून तो देशाच्या स्वास्थ्याकरता केवळ हानीकारक नव्हे तर देशातील शांतताही बिघडवणारा आहे, असे आरोप पात्रा यांच्यावर केले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS