दैनिक पुढारीच्या स्थानिक बातमीदाराने ब्रम्हनाळ येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेला हा व्हिडिओ आहे. तो आम्ही त्यांच्या सौजन्याने इथे प्रदर्शित करीत आ
दैनिक पुढारीच्या स्थानिक बातमीदाराने ब्रम्हनाळ येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेला हा व्हिडिओ आहे. तो आम्ही त्यांच्या सौजन्याने इथे प्रदर्शित करीत आहोत. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्याने परिस्थितीचे वर्णन केले आहे. हा व्हिडिओ फारच भयावह असल्याने आम्ही तो संकलित केला आहे.
सांगली जिल्ह्यात गुरुवारीही पूरस्थिती अतिशय गंभीर होती. संपूर्ण सांगली शहर महापुराने वेढले असल्याने नागरिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अडथळे येत आहेत. त्यात पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत असताना बोट उलटल्याने बोटीतल्या १४ जणांना जलसमाधी मिळाली आहे. त्यापैकी ९ जणांचे मृतदेह मिळाले आहेत तर ७ बेपत्ता आहेत. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना चढवल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. बोटीत पुरेसे लाईफ जॅकेट्सही नसल्याची माहिती समोर येत आहे. बोटीचा पंखा झाडाझुडपात अडकल्याने बोट बुडाली. त्यामुळे बोटीतले सर्वजण पाण्यात पडले अशी माहिती आहे.
दरम्यान कृष्णा व वारणा नदीचे पात्र गुरुवारीही भरले होते. सांगली जिल्ह्यात सुमारे ३० ते ३५ हजार नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण सांगली शहर पाण्याखाली गेल्याने दूध, पाणी व भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी गर्दी झालेली दिसत होती.
COMMENTS