संमतीची जाणीव- नेणीव

संमतीची जाणीव- नेणीव

नातेसंबंध आणि लैंगिकता - सर्व लिंगभावांच्या आपणा सर्वाना, हे ‘होय, नाही, कदाचित, बहुतेक’ वाटणे, म्हणणे आणि ऐकणे शिकणे गरजेचे आहे, कारण हा सर्व जाणीवपूर्वक करण्याचा मामला आहे. याशिवाय आपल्या व आपल्या जोडीदाराच्या शारीरिक, मानसिक व लैंगिक स्वास्थ्याची कदर करणे हेदेखील विचारशीलतेचे लक्षण आहे.

प्रजनन हे सजीव जीवनाचं मूळ आहे. पण तो एक साधासरळ जीवशास्त्रीय मुद्दा आहे, असं म्हणून त्याच्याकडे पाहणं अवघड जातं. प्रेम, मत्सर, स्पर्धा, लैंगिकता, सुख या साऱ्याचा हा जीवशास्त्रीय धागा जणू तुटून गेल्याप्रमाणे आपण त्याच्याकडे पाहात राहातो. परंतु आपल्या शरीर व मनाच्या रचनेत तो भक्कम आहे. (प्रजनन नको असलेल्या किंवा शक्य नसलेल्या समलिंगी वा भिन्नलिंगी नातेसंबंधांमध्ये देखील!) मात्र आपली सामाजिक जडणघडण सातत्याने आपल्याला आपल्या भावनांना आवर कसा घालावा, आपल्या वृत्तींवर ताबा कसा ठेवावा याविषयी  ऐकवत असते! हे बरोबर आणि हे चूक अशा संकल्पना आपल्यावर लादत राहते. का असे विचारावे तर प्रश्न विचारणेही गैरच ठरते.

(आत्ता तिचा जोडीदार नसलेल्या) एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीस लैंगिक संबंध ठेवण्याविषयी विचारले तर तिला काय वाटेल? बहुतकरून स्वतःचा अपमान वाटेल, राग येईल? भीती वाटेल? कदाचित लैंगिक अत्याचारही वाटेल.

दुसर्‍या बाजूने बघाल तर: (आत्ता त्याची जोडीदार नसलेल्या) एखाद्या स्त्रीने पुरुषास लैंगिक संबंध ठेवण्याविषयी विचारले तर?

आश्चर्य? उत्तेजना? मनातून अथवा उघडपणे आनंद? त्या स्त्रीच्या चारित्र्याबद्दल शंका?

अगदी तटस्थपणे, जीवशास्त्रीय दृष्टीने बघता, लैंगिक संबंध ठेवणे ही कुठल्याही प्रकारे गैर कृती आहे का?

ती अपमानास्पद कृती आहे का? ती करणे हा गुन्हा आहे का?

मग  विचारल्याबद्दल या वेगवेगळ्या प्रतिक्रिया का?

पुरुषप्रधान व्यवस्थेत, स्त्रिया आणि पुरुष या दोघांच्याही  लैंगिकतेवर वेगवेगळे नियंत्रण ठेवणारे सामाजिक संदर्भ हेच यामागचे कारण आहे.

लैंगिक संबंध ठेवण्यासाठी विचारणा करण्यात चुकीचे काही नाही.

परवानगी मागणे व ती न दिली गेल्यास ते साधेपणाने स्वीकारणे, यातही अपमान वा अत्याचार कुठेच नाही.

खरे तर ही संमती, हा त्या दोन किंवा अधिक लोकांमधल्या कुठल्याही लैंगिक कृतीस सुरुवात करण्यापूर्वीचा आवश्यक करारच होय.

हा करार करताना तो कोणत्याही दबावाखाली केला गेलेला नसावा, किंवा कुणी चलाखीने करून घेतलेला नसावा आणि अर्थातच मद्य किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेखाली केलेला नसावा. ही संमती ती स्वेच्छेने, स्वखुशीने दिलेली असावी. स्वखुशीने आणि उत्साहाने दिलेली संमती यातच त्या लैंगिक कृतीमध्ये सहभागी होण्याची स्वतःची इच्छा आहे असे गृहीत आहे. एखादी व्यक्ती जेंव्हा त्या कृतीचा अर्थ व परिणाम जाणत असता व मोकळेपणाने नाही म्हणणे शक्य असूनही स्वेच्छेने हो म्हणते; तेंव्हाच त्या संमतीला खरा अर्थ प्राप्त होतो.

संमती सर्वांसाठीच महत्वाची आहे, मग तुमचा लिंगभाव कोणताही असो किंवा लैंगिक कल कुठलाही असो. पुरुषाची संमती असणारच असे गृहीत धरणे म्हणजे देखील ती लादणेच.

लैंगिकतेविषयी दुहेरी अर्थाने बोलण्यासाठी आपल्याकडे शब्दच शब्द आहेत. मराठी भाषेत जवळजवळ प्रत्येक क्रियापदाचा द्वयर्थी वापर करता येतो असे म्हणतात, परंतु एक न एकच अर्थ जाऊ शकेल अशी, ‘होय. धन्यवाद.’ किंवा ‘नको. धन्यवाद.’ इतकी साधी उत्तरे देण्यास मात्र आपल्याला जमत नाही, मग अनर्थाला पर्याय रहात नाही.

विचारावे कसे माहीत नाही, प्रश्नाला उत्तर कसे द्यायचे ठाऊक नाही आणि नकार स्वीकारायचा कसा त्याचेही ज्ञान नाही. ‘संमती’ हा विषय बुचकळ्यात टाकणारा भासतो, त्यामागची खरी अडचण ही आहे.

जसे विचारणे हा अपमान नव्हे तसेच नकार देणे हा देखील नव्हे. विचारण्याइतकाच तोही एक व्यक्तिगत निर्णय आहे. नकार न समजणे, न स्वीकारता येणे आणि पुन्हा पुन्हा विचारणे, हा मात्र नक्कीच लैंगिक त्रास देण्याचाच  प्रकार आहे.

नकार देणे, हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि तसे का अशा प्रश्नाचे उत्तर, ती व्यक्ती कुणालाही देऊ लागत नाही. त्या व्यक्तीचा तसा निर्णय असल्यास, त्या निर्णयाचा आदर केलाच पाहिजे.

आपल्याकडे आग्रह करकरून खाऊ-पिऊ घालण्याची पद्धत आहे. वेळ-काळ न विचारता दुसऱ्याकडे हजेरी लावणे रूढ आहे. एकमेकांच्या फोनमध्येही आपण सर्रास डोकावतो. हातात पडलीच तर खाजगी पत्रेही वाचण्यास कमी करत नाही. पालकांना मुलांच्या खोलीमध्ये प्रवेश करत असताना दार वाजवावेसे वाटत नाही.

इतके करूनही आपला दावा असा आहे, की आपले त्या व्यक्तीवर प्रेम आहे. आपल्याला तिची काळजी वाटते, आपुलकी वाटते म्हणूनच आपण असे वागतो.

एकीकडे तो जास्तीचा लाडू नको असताना, आपण आग्रहाला बळी पडतो आणि दुसरीकडे हो म्हणायचे असता आपण सरळ हो देखील म्हणू शकत नाही. चहा-पाणी विचारले असता हवे असूनही आपण ‘नाही-नाही’ करतो. आग्रहाची प्रथा चालूच ठेवतो.

खरे तर दुसऱ्याचे काही न बिघडवता आपल्याला हवा तसा आनंद प्राप्त करून घेणे, यामध्ये अपराधी वाटण्याजोगे काय आहे?

मनापासून भरपूर खाणे, निरुद्देश भटकणे, मोठ्मोठ्यांदा हसणे, रस्त्यावरच्या कोपऱ्यावर कंपू करून वेळ घालवणे, स्वतःसोबत अथवा इतरांसोबत पुढाकार घेऊन केलेली लैंगिक कृती, प्रमाणामध्ये प्यायलेले मद्य, कोणाच्याही सोबतीशिवाय करमणुकीच्या साधनांचा आस्वाद, हॉटेलांमध्ये जाऊन चहा मारणे, रस्त्यावरील बाकड्यांवर पाय पसरून बसणे, एकट्याने सार्वजनिक उद्यानात हिरवळीवर अंग झोकून देणे, समोरच्याला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला आकर्षक वाटणाऱ्या व्यक्तींना न्याहाळणे.

बहुतेक पुरुषांना विचारले तर त्यांना या सर्व कृती आनंद देणाऱ्याच वाटतात. स्त्रियांना विचारले तर त्यातल्या बहुतांश स्त्रिया ते आवडतच नाही, असे म्हणतात आणि उरलेल्यातील बहुतेक आवडेल, पण बरे दिसणार नाही म्हणून करत नाही असे सांगतील. प्रत्यक्षात स्त्रिया तसे तुलनेने फारच क्वचित करताना दिसतात कारण करताना दिसल्याच, तर नाराजीची सूक्ष्मशी आठी उमटलेले कोणी ना कोणी त्या परिसरात आढळल्याशिवायही राहाणार नाही.

स्त्रियांच्या सुखोपभागाला थिल्लर समजणे, हा देखील सामाजिक नियंत्रणाचाच एक प्रकार आहे.

या सगळ्या गोंधळात प्रश्न पडतच राहातो की मला नक्की हवे काय न नको काय?

आपल्याला लैंगिकता शिकवण्याचा मक्ता घेतलेले – आणि आपण आनंदाने तो मक्ता दिलेले जवळजवळ सर्व चित्रपट सांगतात की पुरुषानेच विचारायचे, पुरुषानेच सांभाळायचे, पुरुषानेच पेलायचे. मग स्त्री म्हणेल, किसी और तरह से कहते, थोडा घुमा फिराके कहते तो अच्छा होता. स्त्री म्हटल्यावर ती आधी नाहीच म्हणेल आणि शेवटी हो! तशीही तिच्या म्हणण्याला फारशी किंमत देण्याचा विचार नाहीच.

मात्र सर्व लिंगभावांच्या आपणा सर्वाना, हे ‘होय, नाही, कदाचित, बहुतेक’ वाटणे, म्हणणे आणि ऐकणे शिकणे गरजेचे आहे, कारण हा सर्व जाणीवपूर्वक करण्याचा मामला आहे. याशिवाय आपल्या व आपल्या जोडीदाराच्या शारीरिक, मानसिक व लैंगिक स्वास्थ्याची कदर करणे हेदेखील विचारशीलतेचे लक्षण आहे.

संमतीविना केलेले लैंगिक संबंध म्हणजे मात्र लैंगिक हिंसा. संमती कुठल्याही क्षणी काढूनही घेता येते. ज्या क्षणी संमती काढून घेतली जाईल, त्या क्षणी ती लैंगिक कृती थांबलीच पाहिजे. त्यानंतर इतर कुठली कृती सुरु करण्यापूर्वी देखील पुन्हा विचारणे आवश्यक आहे. जिथे कुठे इच्छा व संमती याविषयी संदिग्धता आहे की काय अशी शंका असेल तिथे लैंगिक हिंसा टाळण्यासाठी स्पष्ट शब्दांत संवाद साधायलाच हवा.

नाही म्हणजे नाहीच, या नाण्याची दुसरी बाजू होय म्हणायचे असता ते स्पष्ट शब्दांत किंवा हावभावांद्वारे थेटपणे व्यक्त झालेले असणे ही आहे. एखाद्या व्यक्तीचा पेहराव, तिचे दारू पिणे किंवा स्मितहास्य वा घरी एकटे असताना येण्यासाठी दिलेला होकार अशा कुठल्याही प्रतिसादाचा अर्थ त्याशिवायच्या कुठल्याही कृतीसाठी संमती म्हणून घेतला जाण्याचे काहीही कारण नाही किंवा लग्न किंवा अनेक काळ एकत्र रहाणे याचाही अर्थ संमती असा नव्हे.

संमती कुणी द्यायची हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. ती समजण्याचे वय भारतामध्ये कायद्याने अठरा असे ठरवले आहे. अठरा वर्षाखालील कुणा व्यक्तीने – म्हणजे बालकाने प्रौढास लैंगिक कृती करण्यास परवानगी जरी दिली तरी ती समजून-उमजून असू शकत नाही, असे कायदा सांगतो.

फक्त लैंगिक संमतीच नव्हे तर त्या वयापूर्वी आपल्याला गाडी चालवणे, मतदान करणे, समाजमाध्यमांवर स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करणे अशा अनेक गोष्टी नाकारल्या जातात त्या याच कारणासाठी.

सत्ता, वय, सामाजिक स्थान अशा अनेक गोष्टींद्वारे प्रौढ व्यक्ती बालकांचा गैरफायदा घेऊ शकण्याची शक्यता असते. परंतु याचा अर्थ वयाच्या अठराव्या वयापर्यंत व्यक्तीस लैंगिक भावना नसतात असा घेणे बरोबर नाही. बालकांना प्रेमात पडण्याचा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लैंगिकतेचा अर्थ लावण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते नैसर्गिकच आहे इतकेच नव्हे, तर सज्ञान होण्यासाठी ते गरजेचे आहे. सज्ञान होणे ही काही अठराव्या वाढदिवशी  एका दिवसात घडणारी बाब नाही.

परंतु बालकांच्यासह कुठल्याही प्रकारे शोषण अथवा इच्छेविरुद्ध काही घडत नाही ना, त्यामध्ये प्रौढांचा सहभाग नाही ना याकडे पालकांनी, आजूबाजूच्या लोकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

लैंगिकता शिक्षण म्हणजे फक्त लैंगिकतेविषयीची शास्त्रीय माहिती देणे नव्हे. बालकांच्या कुतुहलास प्रोत्साहन देणे, त्यांना त्यांच्या वयाच्या मित्रमंडळींसोबत ते कुतूहल व्यक्त करता येणे, त्याविषयी त्यांच्याशी मोकळा संवाद करत राहणे व संमती ही फक्त लैंगिक कृतीशी जोडलेली गोष्ट नाही, त्यांना होय म्हणायचे तेव्हा होय म्हणता येते, नाही म्हणायचे तेव्हा नाही, गोंधळ व्यक्त करायचा तेव्हा तो गोंधळ व्यक्त करता येतो व तो आदर व प्रेमपूर्वक स्वीकारला जातो, हे आजूबाजूच्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीने आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून देणे हे सर्व सुदृढ लैंगिक शिक्षणात येते.

मुलांना मारहाण करणे, शारीरिक शिक्षा यादेखील त्यांच्या शारीरिक-मानसिक व पर्यायाने लैंगिक स्वायत्ततेस बाधा पोचवणाऱ्या, त्यांना संमतीच्या मुद्द्याविषयी गोंधळवून टाकणाऱ्या गोष्टी आहेत.

मुलांचे लैंगिक कुतूहल मारून आपण सुदृढ समाजाची नव्हे तर आजारी मनांची जोपासना करत असतो.

व्यक्ती-व्यक्तींमधील दुरावलेपणा, नात्यांमधील अस्वास्थ्य, मानसिक उपचार देणाऱ्या संस्थांची वाढती गरज यामागचे हे महत्वाचे कारण आहे.

‘परस्पर संमती असताना केलेली कृती म्हणजे नैतिकदृष्ट्या योग्य कृती. जबरदस्ती, बळजबरी म्हणजे अयोग्य कृती’. मुला-मुलींना नैतिकता शिकवत असता हा नैतिकतेचा पाया सांगणे गरजेचे आहे. वयाच्या अठराव्या वर्षाआधी मुलीने गरोदर राहणे हा कुठलाही नैतिक गुन्हा नाही. ते फक्त तिच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरू शकते हा त्यातील धोका आहे. म्हणून कायदेशीररीत्या गुन्हा आहे. त्यासाठी व लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार टाळण्यासाठीची योग्य माहिती मुलामुलींना देणे गरजेचे आहे.

मुलांच्या लैंगिक उर्मी मारून टाकण्याचा उद्योग जितका चालेल तितके लैंगिक गुन्हे, लैंगिक मत्सर वाढत राहील. जे मिळत नाही, ते ओरबाडून मिळवण्याची वृत्ती वाढेल आणि हिंसेचेच प्रमाण वाढताना दिसेल.

बालकांस लैंगिक संमती देण्या-घेण्याचा अधिकार जरी नसला तरीदेखील संमतीबद्दलची, आनंदाबद्दची, सुलभ संवादाबद्दलची, स्वतःच्या हक्कांबद्दलची जाणीव-नेणीव घडवण्याचे वय तेच आहे व सुदृढ नाती आणि सुरक्षित भोवताल घडवण्याचा मार्गदेखील.

(लेखाचे छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे)

या अभ्यासाशी संबधीत वेब सिरीज सेफ जर्नीज येथे पाहता येईल.

समाप्त

मैत्रेयी, तरुण मुलामुलींसमवेत त्यांच्या लैंगिक व मानसिक स्वास्थ्यासाठीचे काम करतात.

‘नातेसंबंध आणि लैंगिकता’, या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी मैत्रेयीअसा सर्च द्या, किंवा नावावर क्लिक करा.

(‘प्रयास आरोग्यगट’ या संस्थेद्वारे ‘युथ इन ट्रान्झिशन’ संशोधनाच्या अनुभवावर आधारित ‘नेस्ट्स’ (Non-judgemental, Empowering, Self-reflective, Technology-assistes Spaces) अशी मोफत व्यवस्था सुरु केलेली आहे, जेथे तरुणांना आपल्या प्रश्नांबद्दल बोलता येईल. हे बोलणे पूर्णपणे गोपनीय असेल व नेस्टर (संवेदनशीलपणे ऐकून घेणारी व्यक्ती) त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करेल, गरज पडल्यास त्यांना एखाद्या आरोग्यसेवेशी जोडून देता येईल. 7775004350 हा भेटीची वेळ ठरवण्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे.)

COMMENTS