आम्ही म्हणू तीच संस्कृती, मग ती भुलथापांनी भरलेली पोतडी असली तरी चालेल. वैदिक संस्कृतीचा वर्चस्ववाद थोपत राहणे हाच खरा अजेंडा. नागरिकांना व्यर्थ भाकड चर्चांत अडकावून ठेवत, त्यांना आर्थिक दृष्ट्या हतबल करणारी धोरणे आखत वैदिक साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा हेच संघ आणि भाजपचे वास्तव आहे.
झुंडीने हल्ले होतात. माणसं ठेचून मारली जातात. त्याच्या बातम्या होतात. माध्यमांत व सोशल मीडियावर चर्चा रंगतात. झुंडशाहीचा असा सांस्कृतिक दहशतवाद उघड डोळ्यावर येतो. पण अत्यंत शांतपणे, पण दीर्घकाळासाठी सांस्कृतिक समतोल ढासळायला लावेल, सांस्कृतिक दमन होत एक आपल्याला अपेक्षित असलेली संस्कृती पुनरुज्जीवित होईल अशा घटना, छुपे प्रचार, नेमणुका आणि अंमलबजावण्या याकडे सहसा आपले लक्ष जातही नाही. पण हा सांस्कृतिक दमनाचा दहशतवादी मार्ग राष्ट्रीय समाजाला एकारला बनवण्याच्या दिशेने वेगाने घेऊन जातो आणि अंतत: एकूणातीलच संस्कृतीची अपरंपार हानी होते हे आपल्या लक्षात येत नाही.
भाजप सरकार संघप्रणित तत्त्वज्ञानावर चालते हे काही लपून राहिलेले नाही. गोहत्याबंदी त्यातलेच एक पाऊल. खरे म्हणजे घटनेचाच आधार घेत हा कायदा बनवण्यात आला कारण दुभत्या जनावरांच्या (पवित्र म्हणून फक्त गायींचा नव्हे) रक्षणासाठी, संवर्धनासाठी सरकार कायदे करू शकते. भाजप सरकारने या तरतुदीचा आधार घेत गायींपुरता हा कायदा बनवला.
खरे तर घटनेत अशी तरतूद असायला नको होती. कोणी काय खायचे आणि काय नाही यावरही बंधने या तरतुदीमुळे येऊ शकतात याचा विचार घटनाकारांनी केलेला दिसत नाही. गोरक्षक नावाची हिंस्त्र जमात या कायद्यामुळे उदयाला आली. अनेक हत्या झाल्या. होत आहेत. पण मुळात या कायद्यामुळे समाजसंस्कृतीवर जो विपरित परिणाम होत आहे तो या झुंडल्ल्यांच्या हैदोसापेक्षा भयंकर आहे. कारण आपल्या खाण्या-पिण्याच्या आवडी जपण्याचेच स्वातंत्र्य या कायद्याने हिरावून घेतले. शिवाय शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडल्याने त्याला एक प्रकारे आर्थिक दहशतवादाचेही स्वरूप आले. परिणामी शेतीसंस्कृतीवर विपरित संकट आले.
आपल्या संपत्तीवरच्या अधिकारावर केवळ एका विशिष्ट धर्म-संस्कृतीच्या उन्मादी गर्व बाळगणाऱ्यांमुळे गदा येऊ शकते हा विपरित भयकारी संदेश जनमानसाच्या मानसिकतेत रुजला. एक प्रकारे स्वातंत्र्य हिरावले गेले पण ज्याविरुद्ध आवाज उठायला हवा होता, ज्याची अधिक चिकित्सा होत आव्हान उभे केले जायला हवे होते तसे झालेले दिसत नाही. झुंडल्ल्यांची चर्चा वरकरणी आहे. त्यातून काही साध्य होण्याची शक्यता नाही.
संघप्रणित सांस्कृतिक दहशतवादाचे असंख्य मार्ग आहेत. चुकीची अथवा भेसळ करून तीच माहिती सत्य आहे असा आव आणत तिचेच सातत्याने प्रसारण करत हा समाज एकाच संस्कृतीने जन्माला घातला आहे, भाषाही त्यांनीच निर्माण केल्या आहेत, किंवा या देशात गतकाळात जेही काही होते-नव्हते त्याची निर्मिती त्यांनीच केली आहे अशा प्रकारच्या विज्ञान किंवा पुराव्यांवर न टिकणाऱ्या गोष्टी सातत्याने पसरवल्या जात आहेत. सत्तेवर आल्यापासून तो वेग कमालीचा वाढलेला आहे.
वेदनिर्माते वैदिक आर्य भारतातलेच, एवढेच नव्हे तर भारतातून ते युरोपपर्यंत पसरले व भाषा-संस्कृतीचा प्रसार केला हा प्रवाद वैदिकवादी संघाने अनेक वर्ष पसरवण्याचा प्रयत्न केला. घग्गर नदीला सरस्वती सिद्ध करण्याचे प्रयत्नही झाले. भाजप सरकार सत्तेवर येताच या सरस्वती नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा महाप्रकल्प या सरकारने हाती घेतला. त्यानुसार हरियाणातील भाजप सरकारने “हरयाना सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्ड’ स्थापन केले.
वरकरणी हे प्रकरण निरुपद्रवी वाटेल. एका नदीचे पुनरुज्जीवन होतेय ना? मग चांगलेच आहे की! तिला मग घग्गर म्हणा किंवा सरस्वती असा साळसूद प्रतिवाद केला जातो. पण या घटनेत केवढे सांस्कृतिक आक्रमण लपले आहे याची कल्पनाही जनसामान्यांना येत नाही.
मुळात घग्गर नदी ही ऋग्वेदात वर्णिलेली सरस्वती नाही. घग्गरला एकदाचे सरस्वती ठरवले की घग्गर नदीच्या काठावर सापडलेले सिंधू संस्कृतीचे अवशेष आपोआप वैदिकांचे होतात. तेच सिंधू संस्कृतीचे निर्माते ठरतात. किंबहुना घग्गरला वैदिक ठरवण्यामागे तोच डाव होता व आहे. आता त्याला “सरकार मान्यता’ मिळाल्याने सिंधू संस्कृतीच्या आकलनातच भेसळ करत वैदिक हेच भारतातील संस्कृतीचे जनक आणि निर्माते आहेत असा अप्रत्यक्ष दावा या प्रकरणातून केला गेला. या अवैज्ञानिक सिद्धांताला जेवढे आव्हान दिले जायला हवे होते ते दिले गेले नाही. “आपले महान पूर्वज’ एवढे शब्द कानी पडले तरी धन्य धन्य होणारे सामान्य हिंदू या वैदिक काव्याला कसे ओळखू शकतील?
हे येथेच थांबत नाही. सिनौली येथे अलीकडेच इ.स.पू. २०००च्या सुमारासच्या एका छकड्याचे अवशेष मिळाले. हे अवशेष बैलगाडीचे नसून वैदिक रथाचे आहेत, म्हणजेच वैदिकांचे आगमन उत्तर प्रदेशात इसवी सनपूर्व १२०० नाही तर त्याआधीच सात-आठशे वर्ष झाले होते असे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला.
ऋग्वेदात मिळणारे रथाचे वर्णन आणि या छकड्याचे अवशेष यात कसलेही साम्य नाही हे उघड आहे. हा अप्रत्यक्ष रुपाने, सत्याशी इमान न ठेवता केले जाणारे सांस्कृतिक विकृतीकरण आहे. हा सांस्कृतिक दहशतवादाचा भाग असतो आणि तो सध्या मन:पूत वापरला जातो आहे.
मदुराईजवळ संगम काळातील एका पुरातत्वीय स्थळावर उत्खनन सुरू झाले होते. इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकाच्या पूर्वीच तमिळनाडूमध्ये नागरी संस्कृती सुस्थापित झाली होती याचे पुरावे बाहेर येऊ लागताच आणि तिचा संबंध वैदिक संस्कृतीशी जोडता येणे अशक्य आहे हे लक्षात येताच उत्खननात अडथळे आणायला सुरुवात झाली. उत्खनन चालू असतांनाच पुरातत्वीय खात्याने अर्थपुरवठा थांबवला आणि २७ अधिकाऱ्यांची अचानक कोणतेही कारण न देता बदली करण्यात आली. द्रमुकच्या तत्कालीन खासदार कनिमोळींनी राज्यसभेतच आवाज उठवला. “तमिळ संस्कृतीचे स्वतंत्र अस्तित्व या सरकारला मान्य नाही.’ असे त्या म्हणाल्या. अर्थात पुढे काहीच झाले नाही. म्हणजे, प्रत्येक गोष्टीचा संबंध वैदिक संस्कृतीशी जोडायचा प्रयत्न करायचा आणि ते नाहीच जमले तर तिकडे सरळ दुर्लक्ष करायचे किंवा विपरित अर्थ लावत बसायचा हे उद्योग वाढले आहेत. तमिळनाडूने भाजपला का नाकारले याचे हे कारण आहे.
तमिळ लोक संस्कृतीबद्दल जागरुक आहेत. पण अन्यत्र अशी स्थिती नसल्याने संघाचे आणि म्हणूनच पर्यायाने भाजपचे फावत गेले. पण येथे प्रश्न केवळ सत्तेचा नसून संस्कृतीच्या विकृतीकरणाचा आहे आणि त्यातून सामाजिक काय अनर्थ घडतो आहे याचे भान विचारवंत आणि अभ्यासकांना नसल्याने त्यांचे फावले आणि जनमानस बिघडत गेले हे कोणाला समजणार?
हे येथेच थांबत नाही. खरे तर शेकड्याने उदाहरणे आहेत. पण येथे आता एकच देतो. तमिळनाडूत एके काळी जैन संस्कृतीही प्रबळ होती. जैनांशी निगडित किमान पाचशे पुरातत्वीय स्थाने व शिलालेख तमिळनाडूत आहेत. पूर्ण दुर्लक्षाअभावी त्यांची अवस्था दयनीय आहे आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अवैदिक संस्कृतीच्या इतिहासाकडे लक्षच द्यायचे नाही आणि परत वर त्यांना हिंदूच म्हणत राहायचे हा बुद्धीभेदी दुटप्पीपणा हे संघाचे अजून एक वैशिष्ट्य.
शेवटी पुद्दूचेरी येथील फ्रेंच इन्स्टिट्यूट पुढे आली आणि नुकतेच ४६४ जैन पुरातत्वीय स्थानांचे फोटोग्राफिक डाक्युमेंटेशन केले. पण उत्खनन करत पुरातत्वीय अभ्यास मात्र सुरू करायला भारत सरकार पुढे आले नाही.
थोडक्यात आम्ही म्हणू तीच संस्कृती. मग ती भुलथापांनी भरलेली पोतडी असली तरी चालेल. वैदिक संस्कृतीचा वर्चस्ववाद थोपत राहणे हाच खरा अजेंडा. नागरिकांना व्यर्थ भाकड चर्चांत अडकावून ठेवत, त्यांना आर्थिक दृष्ट्या हतबल करणारी धोरणे आखत वैदिक साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा हेच संघ आणि भाजपचे वास्तव आहे. वैदिक संस्कृतीचे वास्तव मग काहीही असो!
तशीही सत्याची चाड कोणाला आहे? जे विरोध करू पाहतील त्यांना भयग्रस्त करण्यासाठी झुंडल्ल्यांची फौज त्यांच्याकडे आहेच! यातून भारताचे बहुसांस्कृतिक सहिष्णू प्रारुप उध्वस्त होत एकारलेली, हिंसक…मग ती हिंसा शारीरीक असो की अवैचारिक, पुराणमतवादी आणि भ्रमांत राहणारी संस्कृती निर्माण होण्याकडे वेगवान वाटचाल सुरू आहे. यातून बाहेर पडण्यासाठी जेवढा मोठा वैचारिक फोर्स हवा तेवढा आज उपलब्ध नाही हे अधिकचे दुर्दैव आहे.
संजय सोनवणी, हे इतिहास अभ्यासक आणि साहित्यिक, विचारवंत आहेत.
COMMENTS