सरदार पटेल स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव

सरदार पटेल स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव

नवी दिल्ली: अहमदाबाद येथील सरदार पटेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे नामकरण आता नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. अहमदाबादमधील मोतेरा भागातील सरदार पटेल स्टेडियमचे नूतनीकरण केल्यानंतर बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये चाललेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामनाही बुधवारी या स्टेडियमवर सुरू झाला. या मालिकेतील चौथा व अखेरचा सामनाही याच स्टेडियमवर चार मार्चपासून सुरू होणार आहे.

हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम आहे असे सांगितले जात आहे. या अत्याधुनिक आस्थापनामध्ये १लाख३२ हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.

स्टेडियमला पंतप्रधानांचे नाव देण्यात आले आहे, तर खेळपट्टीच्या (पीच) दोन एण्ड्सपैकी एकाला अदानी, तर दुसऱ्याला रिलायन्सचे नाव आहे. पंतप्रधानांच्या निकट असलेल्या उद्योगसमूहांची नावे दोन्ही एण्ड्सना देण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सरदार पटेल यांचे नाव बदलून स्टेडियमला मोदी यांचे नाव देण्यात आल्याचे दिसत असले तरी अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने एक विशाल स्पोर्ट्स एनक्लेव उभारले जाणार आहे आणि नरेंद्र मोदी स्टेडियम हा त्याचा एक भाग असेल, असे समजते.

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन झाले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री किरेन रिज्जू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी या स्टेडियमची संकल्पना मांडली होती. त्यावेळी ते गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही होते,” असे कोविंद यांनी उद्घाटनानंतरच्या भाषणात नमूद केले.

६३ एकर जागेत पसरलेल्या या स्टेडियमच्या उभारणीसाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च आला. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील क्रिकेट स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ९०,००० आहे व आत्तापर्यंत ते सर्वांत मोठे स्टेडियम समजले जात असे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये याहून अधिक म्हणजे १,३२,००० प्रेक्षक सामावण्याची क्षमता आहे.

२०१५ सालापासून सरदार पटेल स्टेडियम नूतनीकरणासाठी बंद ठेवण्यात आले होते. हे स्टेडियम भारतीय क्रिकेटमधील काही अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार होते. सुनील गावसकर यांनी १९८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात १०,००० कसोटी धावांचा विक्रम या स्टेडियमवरच प्रस्थापित केला होता. कपिल देव यांनी रिचर्ड हॅडलीचा सर्वाधिक कसोटी विकेट्सचा विक्रम याच मैदानावर मोडला होता. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमची रचना करणाऱ्या ऑस्ट्रेलियातील पॉप्युलस या आर्किटेक्ट फर्मनेच हे नवीन स्टेडियम बांधले आहे. या स्टेडियममध्ये लाल व काळ्या मातीपासून तयार केलेली ११ पिचेस असून, प्रत्यक्ष सामन्यासाठी व सरावासाठी समान पिचेस देणारे हे जगातील एकमेव स्टेडियम आहे.

जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम भारतात असावे असे स्वप्न लहानपणी आम्ही बघायचो आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आल्यामुळे क्रीडामंत्री म्हणून माझ्या आनंदाला सीमाच नाही,” असे क्रीडामंत्री किरेन रिज्जू म्हणाले.

मूळ वृत्त

COMMENTS