सत्यशोधक डॉ. घोले – अब्राह्मणी चरित्र लेखनाचा नमुना

सत्यशोधक डॉ. घोले – अब्राह्मणी चरित्र लेखनाचा नमुना

एकोणिसावे शतक हे केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जागतिक इतिहासाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा काळ होय. मानवी जीवनाला कलाटणी देणाऱ्या युगप्रवर्तक गोष्ट

राष्ट्रपती भवनातील ११५ कुटुंबे विलिगीकरणात
कुलगुरुंच्या तक्रारीनंतर मशिदीवरच्या स्पीकरचा आवाज कमी
नदालः क्ले कोर्टवरचा अनभिषिक्त सम्राट

एकोणिसावे शतक हे केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जागतिक इतिहासाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा काळ होय. मानवी जीवनाला कलाटणी देणाऱ्या युगप्रवर्तक गोष्टी एकोणिसाव्या शतकात घडून आल्या. त्यापैकी एक आत्यंतिक महत्वाची बाब म्हणजे वसाहतवादाचा जवळपास जगभर झालेला विस्तार. युरोपीय राष्ट्रांमध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये भांडवलशाहीचा झालेला विकास वसाहतवादाच्या विस्तारास कारणीभूत ठरला. विकसित भांडवलशाहीच्या परिणामी जी प्रचंड उत्पादनवाढ घडून आली, त्या उत्पादनाच्या विक्रीसाठी नवनवीन बाजारपेठा धुंडाळणे भांडवलशाहीला आवश्यक बनले. या प्रक्रियेने वसाहतवादाला जन्माला घातले. लवकरच युरोपीय राष्ट्रांनी संपूर्ण जगाला आपली वसाहत बनविले. त्यात इंग्लंड आघाडीवर होते; त्याचे कारण इंग्लंडमध्येच सर्वात आधी औद्योगिक क्रांती झाली होती आणि तिचा सर्वात जास्त विकासही इंग्लंडमध्येच झाला होता. ब्रिटीश व्यापाऱ्यांनी वाढीव उत्पादन खपविण्यासाठी जो नवनवीन बाजारपेठांचा शोध चालू केला त्यातून ते भारतात येऊन पोहोचले. व्यापाराच्या हेतूने भारतात आलेल्या ब्रिटीश व्यापाऱ्यांनी लवकरच भारतावर राजकीय अंमल प्रस्थापित करून भारतास आपली वसाहत बनविले; आणि एकोणिसाव्या शतकात जगभर जी बदलाची प्रक्रिया घडून येत होती भारतही त्याचा भाग बनला.

ब्रिटीशांच्यापूर्वी भारतात शिक्षणाचा अधिकार ब्राह्मणादी उच्चजातींनी स्वतःपुरता राखीव करून घेतला होता. बहुजनांना जातिव्यवस्थेच्या धार्मिक नियमांनी शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता. ब्रिटिशांनी किमान औपचारिक पातळीवर शिक्षणाच्या संधी सर्वांना खुल्या केल्या. ब्रिटीशांचे अधिकृत धोरण शिक्षणाचा लाभ केवळ उच्चजातींनाच देण्याचा होता (Rao, 2020) परंतु काळाच्या ओघात भांडवली शासनपद्धतीमुळे काही बहुजन व्यक्ती शिक्षणाच्या प्रक्रियेत आल्या. त्यात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडलेली दिसून येते. बहुजनांपर्यंत शिक्षणाच्या संधी घेऊन जाण्यात सुरुवातीला ब्रिटीश सरकारएवढेच किंबहुना अधिक प्रयत्न मिशनऱ्यांनी केले. त्या प्रयत्नाचा आधुनिक काळातील सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे महात्मा फुले होत. स्कॉटीश मिशनरी शाळेत घेतलेले सुरुवातीचे शिक्षण महात्मा फुल्यांची जातीविरोधी मूस घडविण्यात परिणामकारक ठरले. पुढे फुल्यांनी भारतातील पहिल्या जात्यंतक चळवळीची म्हणजे सत्यशोधक समाजाची १८७३ मध्ये स्थापना केली. अनेक नामवंतांच्या मांदियाळीने सत्यशोधक समाजाच्या विचार-व्यवहाराच्या प्रसारामध्ये अभूतपूर्व योगदान दिले; त्यातील सर्वात आघाडीवरच्या नावांपैकी एक नाव होते. डॉ. विश्राम रामजी घोले यांचे. या डॉ. विश्राम रामजी घोले यांचे प्रतिमा परदेशी लिखित चरित्र समता प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे.

वर्चस्ववादी ज्ञान व्यवहाराला उत्तर

परदेशींनी लिहिलेल्या घोलेंच्या चरित्राला एक पार्श्वभूमी आहे, ती समजून घेतल्याशिवाय परदेशींच्या पुस्तकाचे महत्व आणि संदर्भ पूर्णांशाने समजू शकत नाही. परदेशींच्या आधी अरुणा ढेरे यांनी २००२ मध्ये घोलेंचे चरित्र लिहिले. त्यांच्या लिखाणाला घोले कुटुंबीय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने पूर्ण सहकार्य केले. ढेरेंसारख्या नावाजलेल्या लेखिकेकडून घोलेंच्या कार्यकर्तृत्वाला यथोचित न्याय त्यांच्या पुस्तकातून मिळेल अशी आशा घोले कुटुंबीय आणि समता प्रतिष्ठानला होती. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर सर्वांचीच पूर्ण निराशा झाली. ढेरे लिखित घोलेंचे चरित्र ब्राह्मणी ज्ञानव्यवहाराच्या वर्चस्ववादाचा उत्कृष्ट नमुना होय. एक तर ढेरेंनी त्यांच्या पुस्तकात घोलेंच्या चरित्राचा महत्वपूर्ण भाग असणाऱ्या अनेक बाबींकडे पूर्णतः डोळेझाक केलेली आढळते, उदा. घोलेंनी शेती प्रश्नाची केलेली मांडणी. घोलेंनी शेती प्रश्नावर महत्वपूर्ण चिंतन केलेले आहे. घोलेंनी अवर्षण, आधुनिक शेती आदि संदर्भात महत्वपूर्ण मांडणी केलेली आहे परंतु, ढेरेंनी त्यास आपल्या लिखाणात स्थान दिले नाही. दुसरे म्हणजे दोनशे पृष्ठांहून अधिक पृष्ठसंख्या असणाऱ्या पुस्तकात ढेरेंनी अर्ध्यापेक्षाही कमी जागा चरित्रनायक असणाऱ्या घोलेंना दिली आणि  चरित्रनायकापेक्षा अधिक जागा रघुनाथ खेडेकरांना दिली आहे. अशाप्रकारे एका चरित्रनायकाच्या चरित्रात दुसऱ्याच व्यक्तीच्या चरित्राला अधिक स्थान असा प्रकार केवळ मराठीच नव्हे एकूण साहित्यव्यवहारात विरळाच म्हणता येईल. सत्यशोधक विचार-व्यवहारावर निष्ठा असणाऱ्या घोलेंवर कोणत्याही खात्रीशीर पुराव्याशिवाय ते “व्यक्तिगत जीवनात हिंदू धर्मग्रंथांचे, विशेषतः भगवदगीतेचे वाचन-पठण करीत राहिले”, असे म्हणणे चरित्रनायक घोलेंवर अन्याय करणारे तर आहेच पण सत्यापलाप करणारे ठरते. महादेव गोविंद रानडे हे घोलेंपेक्षा नऊ वर्षांनी लहान असूनही ढेरे म्हणतात, ‘पुढे जवळजवळ दोन महिने विश्राम रामजी आपल्या त्या जेष्ठ मित्राची काळजी घेत होते’. आता प्रश्न उपस्थित होतो – कोणत्या निकषांवर रानडे घोलेंपेक्षा जेष्ठ आहेत ? ढेरेंचे विधान हे केवळ रानडेंचे जेष्ठत्व ठसवण्याचा प्रयत्न नाही तर ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा अधिकार ठसवण्याचा आहे. घोलेंच्या मित्रांची चर्चा करताना त्या अनेक ब्राह्मण मित्रांची सविस्तर वर्णने देतात; परंतु, फुलेंचा उल्लेख केवळ एका ओळीत केला आहे. ढेरेंचा  अधिकत्तर रोख हा घोले सत्यशोधक विचारांपासून वैदिक धर्माकडे वळले, त्यांच्यावर ब्राह्मण मित्रांचा प्रभाव होता हे दाखवण्यावर आहे. ढेरेंनी शाब्दिक-भाषिक उपयोजनातून केलेला ब्राह्मण वर्चस्वस्थापनेचा प्रयत्न हा तर एका स्वतंत्र दीर्घ लेखाचा विषय आहे.

अरुणा ढेरेंचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर सत्यशोधक विचारांशी तसेच सत्यान्वेषी इतिहास लेखनाशी बांधिलकी मानणाऱ्या वाचकांचा पुरता भ्रमनिरास झाला. घोलेंच्या चरित्राचा ढेरेंनी केलेला विपर्यास पाहून त्यांचे वंशज असणारे अजित घोले अतिशय अस्वस्थ झाले. (आज ते हयात नाहीत). ते पुण्यातील सत्यशोधकच्या कार्यालयात वारंवार येऊन ढेरेंनी केलेल्या घोलेंच्या चरित्राच्या विपर्यासाचे कथन करीत आणि तो दूर करण्यासाठी प्रतिमा परदेशींनी घोलेंचे चरित्र लिहिण्याचा आग्रह धरत. त्याचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे कारण मी त्यावेळी पुण्यात सत्यशोधकचे काम करीत असे. तसेच, सत्यशोधक चळवळीचा, त्यात सहभागी नेते, कार्यकर्त्यांचा इतिहास समोर आणण्यासाठी आग्रही असणारे समता प्रतिष्ठानचे बाबा आढाव यांनाही घोलेंच्या चरित्रावर झालेला अन्याय दूर करून त्यांचे सत्यवेधी चरित्र लिहिले जाणे आवश्यक वाटत होते. त्यातून परदेशींनी घोलेंचे हे चरित्र साकारले आहे. या प्रक्रियेमध्ये त्यांनी ढेरेकृत घोलेंच्या चरित्राची जी मोडतोड करण्यात आली आहे तिचा साधार प्रतिवाद केला आहे आणि ज्ञानव्यवहारातील ब्राह्मण वर्चस्ववाद प्रस्थापनेच्या ढेरेंच्या प्रयासाला उघड केलेले दिसून येते.

एकोणिसाव्या शतकाचा आरसा

आधुनिक भारताच्या जडणघडणीत एकोणिसाव्या शतकाचा काळ आत्यंतिक महत्वाचा मानला

प्रा. प्रतिमा परदेशी

प्रा. प्रतिमा परदेशी

जातो. आधुनिक भारताचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या सर्व ज्ञानशाखांच्या अभ्यासकांना एकोणिसाव्या शतकाचा अभ्यास करावा लागतो. या शतकात भारत ब्रिटीशांची वसाहत बनला. त्यातून अनेक बदलांची पायाभरणी केली गेली. ब्रिटिशांनी नोकरशाही उभारून प्रशासनाची पोलादी चौकट निर्माण केली. पोस्ट व टेलिग्राफ सेवांचे जाळे विणून कार्यक्षम संदेशवहन यंत्रणा उभारली. रस्ते बांधून, रेल्वेचा विस्तार करून कार्यक्षम व जलद दळणवळण यंत्रणा उभी केली. नवी शिक्षणव्यवस्था प्रस्थापित केली. मुद्रणकलेचा सार्वत्रिक आणि सर्वदूर वापरातून पाश्चिमात्य ज्ञान व संस्कृतीचा प्रसार केला (बगाडे, २०१०: १७). या सुधारणांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक असे सर्व क्षेत्रांना कवेत घेऊन त्यांना प्रभावित करणरे परिणाम घडून आले. परदेशी नेमक्या शब्दात या प्रक्रियांवर प्रकाश टाकतात. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर महाराष्टात विविध वैचारिक प्रवाह उदयाला आले. त्यांची समीक्षात्मक मांडणी परदेशी पहिल्या प्रकरणात करतात. त्यांच्या मते, या काळात उदयाला आलेल्या वैचारिक प्रवाहाचे चार गटात वर्गीकरण करता येते. १) ब्राह्मणी सनातनी २) ब्राह्मणी सुधारणावादी ३) अब्राह्मंणी सुधारणावादी ४) अब्राह्मणी क्रांतिकारक (परदेशी, २०२१: ४). या प्रवाहांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या भूमिकांचे विश्लेषण करत असताना त्या ब्राह्मणी व अब्राह्मणी या संकल्पांवरही प्रकाशझोत टाकतात. सनातनी ब्राह्मणी प्रवाह जातीव्यवस्था आणि स्त्रीदुय्यमत्व यांचे समर्थन करतो. या प्रवाहाने अब्राह्मणी विचाप्रवाह, त्यातील व्यक्ती यांच्यावर तर टीका केलीच पण त्यांनी स्वजातीय सुधारकांविरुद्ध टीकेची खालची पातळी गाठली. परदेशींच्या मते, या गटात टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वि. का. राजवाडे, चापेकर, न. चि. केळकर आदींचा त्यात समावेश होतो. ब्राह्मणी सुधारक प्रवाह स्वजातीय स्त्रियांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीची भूमिका घेतो. तो सतीप्रथा, विधवा केशवपन, विधवा पुनर्विवाह बंदी, स्त्रीशिक्षणास विरोध अशा प्रश्नांना हात घालून त्यांनी स्वजातीय स्त्री सुधारणा चळवळ सुरु केली. त्यांच्या सुधारणांचे स्वरूप प्रायः कौटुंबिक सुधारणेचे राहिले. लोकहितवादी, रानडे, आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले आदींचा त्यात समावेश होतो. तिसरा प्रवाह अब्राह्मणी सुधारणावाद्यांचा होता. परदेशींच्या मते, “अब्राह्मणी सुधारणावाद्यांना एतद्देशीय विषमतांची पुरेपूर जाणीव होती. जातीधर्मजन्य विषमतांना त्यांनी विरोध केला. बहुजन जातींच्या उत्थानासाठी त्यांनी विचार व कार्य केले. बहुजन जातींची पीछेहाट शिक्षण नसल्याने झाली याचे त्यांना भान होते. या अब्राह्मणी सुधारकांनी मुख्यतः ज्ञान प्रचाराचे, ब्राह्मण वर्चस्वाविरुद्ध लढा, स्त्री शिक्षण आणि प्रबोधनाचे कार्य केले. ब्राह्मणशाहीचा जाच त्यांना उमगला, परंतु त्याविरुद्धचा समग्रलढा व विश्लेषण व क्रांतीसुत्रे मांडलेले नाही” (उक्त : १३). या गटात त्या विश्राम रामजी घोले, पं. रमाबाई, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, वि. रा. शिंदे आदींचा समावेश करतात. अब्राह्मणी क्रांतिकारक प्रवाह “जातीवर्ग स्त्रीदास्याला केवळ विरोधच नाही तर या विषमता व शोषणाचा अंत करण्याचा विचार, विश्लेषण व क्रांतीसुत्र मांडताना दिसतात. सर्व प्रकारच्या विषमतांसह शोषण नष्ट करण्याची सूत्रे, बीज विचार आणि त्यानुसार व्यवहार-कृती कार्यक्रम त्यांनी दिलेला दिसतो. म. फुले, ताराबाई शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ. या प्रवाहाचे प्रवर्तक होते” असे त्या सांगतात (उक्त : १७).

या प्रवाहांची मांडणी करण्याबरोबरच त्या एकोणिसाव्या शतकात आपला ठसा उमटविलेल्या, जाती-पुरुषसत्तेच्या विरोधी विचार व्यवहार केलेल्या महत्वाच्या व्यक्तींचा साक्षेपी परिचयही करून देतात. त्यातून केवळ त्या व्यक्तीचा परिचय घडत नाही तर तत्कालीन समयी उद्भवलेले सामाजिक प्रश्न कोणते होते आणि त्यांना वरील व्यक्तींनी कसा प्रतिसाद दिला याचा प्रत्यय येतो. त्यामुळे हा व्यक्ती परिचय नुसता काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख न राहता ते त्या काळातील सामाजिक संघर्ष आणि बदलाचा इतिहास कथन ठरते. थोडक्यात, परदेशींनी एकोणिसाव्या शतकात घडून आलेल्या मन्वंतराचा नेमकेपणाने वेध घेतला आहे. त्यामुळेच तो सर्व ज्ञानशाखांच्या अभ्यासकांना तसेच कार्यकर्त्यांना एकोणिसावे शतक समजून घेण्यासाठी, तत्कालीन विचार प्रवाहांचे चिकित्सक आकलन करून घेण्यासाठी तसेच महत्वाच्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर व्यक्तींनी काळाला दिलेला प्रतिसाद समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो.

‘डॉक्टर’ विश्राम रामजी घोले

विश्राम रामजी घोलेंची ओळख डॉक्टर असण्याशी अभिन्नपणे जोडली गेली आहे. ते निष्णात शल्यविशारद होते. परदेशींनी त्यांच्या पुस्तकात स्वतंत्रपणे त्याच्या व्यक्तित्वाच्या या पैलूचा वेध घेतला आहे. त्या काळात घोलेंनी शेकडो शस्त्रक्रिया केल्याची माहिती लेखिका पुरविते. घोलेंचे डॉक्टर असणे हे जाती समाजात विशेष महत्वाचे ठरते. अस्पृश्यतेच्या चालीमुळे ब्राह्मण हे कनिष्ठ जातीयांना विशेषतः दलितांना शिवून घेत नसत. त्यामुळे बहुजन समाजात झाडपाला सारखे प्रकार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होते. परिणामी अकाली मृत्यूचे प्रमाणही त्यांच्यात खूप होते. ब्रिटीश आल्यानंतर त्यांनी येथे आधुनिक आरोग्य विज्ञानाचा पाया घातला. त्यांनी एका बाजूला मोठे दवाखाने बांधले तर दुसऱ्या बाजूला मेडिकल कॉलेजेस उभारली. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण बहुजनांना आधुनिक उपचार मिळू लागले. या पार्श्वभूमीवर बहुजनांमधून घोले सारखे डॉक्टर तयार होणे हे बहुजन युवा वर्गास डॉक्टर होण्यास प्रेरणा देणारे तर होतेच, पण त्यांना हक्काचा डॉक्टर मिळणेही होते. घोलेंची ख्याती पुण्यातील ‘सगळ्यांचे डॉक्टर’ अशी होती. त्यांनी जातीभेद न पाळता सर्वांना उपचार देऊ केले. त्यांनी महात्मा फुलेंवरती जसे उपचार केले तसे ब्राह्मण कृष्णशास्त्री चिपळूणकर व रानडेंवरही उपचार केले. त्यांनी उपचार करताना जसा जातीय भेद पाळला नाही तसा वर्गीय भेदही पाळला नाही. अनेक गरिबांसाठी त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर केला. प्रा. परदेशींनी घोलेंच्या डॉक्टर होण्याची कहाणी सांगताना आधुनिक वैद्यकशास्त्राचा भारतातील उगम, त्यामुळे झालेला बदल तसेच घोलेंचे समकालीन डॉक्टर यांचा तपशीलही दिलेला आहे.

शेतीप्रश्नाविषयीचे मंथन 

घोलेंच्या विचारमंथनामध्ये शेतीप्रश्नाला केंद्रवर्ती स्थान असलेले आढळून येते. तसेही सत्यशोधकांच्या विचारव्युहामध्ये शेतीप्रश्नाविषयीचे मंथन मध्यवर्ती राहिलेले दिसून येते. ब्रिटिशांनी महाराष्टात म्हणजे तत्कालीन मुंबई प्रांतात रयतवारी महसूल पद्धती लागू केली. त्यानुसार पूर्वीच्या शेतसारा जमा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक मुलभूत बदल करण्यात आले. पूर्वी शेतसारा संपूर्ण गावावर आकारला जाई. सारा जमा करण्याची जबाबदारी गावप्रमुख पाटलाची असे. प्रत्येक शेतकरी आपल्या वाट्याचा शेतसारा पाटलाकडे जमा करीत. एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या वाट्याचा शेतसारा भरणे शक्य झाले नाही तर इतर शेतकरी मिळून त्याचा शेतसारा भरत. अशाप्रकारे पूर्वीच्या महसूल पद्धतीमध्ये निहित सामुहिक जबाबदारीच्या तत्वामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना समुदायसत्तेचा आधार प्राप्त होत असे (Kumar, 1968: 24-28). रयतवारी महसूल पद्धतीने शेतसारा भरण्याची जबाबदारी त्या त्या शेतकऱ्यावर टाकली. पाटलाची भूमिका त्यातून वजा केली गेली. दुसरी महत्वाची बाब म्हणजे शेतसारा रोखीत भरण्याची सक्ती करण्यात आली. ब्रिटीशांची महसूल गोळा करण्याची यंत्रणा अतिशय कडक आणि कार्यक्षम होती. जर का शेतकरी शेतसारा भरण्यास चुकला तर त्याची जमीन जप्त केली जाई. तसेच त्यास शिक्षेसही सामोरे जावे लागे. त्यामुळे शेतसारा भरण्यास असमर्थ शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेण्यावाचून गत्यंतर नसे. मारवाडी व ब्राह्मण जातीयांचा सावकारांमध्ये भरणा होता. हे सावकार अतिशय निर्दयी असत. ते हिशेबामध्ये गडबडी करत (बगाडे, २०१७: ८-९). त्यामुळे एकदा का सावकाराची पायरी एखाद्या शेतकऱ्याने चढली की तो त्याच्या पाशातून कंगाल वा कर्जबाजारी होईपर्यंत सुटू शकत नसे. अशाप्रकारे एकोणिसाव्या शतकातील शेतकरी वसाहतवादी धोरण चौकट आणि सावकारी शोषणाचा पाश, अशा दुहेरी शोषण यंत्रणामध्ये भरडून निघत होता. या दोन मानवनिर्मित संकटाबरोबरच सततच्या दुष्काळानीही शेतकरी हैराण झाले होते.

घोलेंच्या शेतकऱ्यांविषयक विचारांना वर विवेचीत पार्श्वभूमी आहे. घोलेंचे आर्थिक विचार विश्लेषित करण्याआधी परदेशी ही पार्श्वभूमी कमी शब्दात पण नेमकेपणाने मांडतात. तत्कालीन समयी ८० टक्के लोक शेतीवर निर्भर होते. त्यामुळे शेती व शेतकरी यांना सत्यशोधकांनी आपल्या विचारमंथनामध्ये मध्यवर्ती ठेवले होते. त्या संदर्भातील फुले, भालेकर, मुकुंदराव पाटील यांचे लिखाण सर्वश्रुत आहे. घोलेंनी देखील शेती व शेतकरी यांच्या संदर्भाने विविध मुद्द्यावर सखोल चिंतन केलेले आढळते. त्यातील पहिला मुद्दा हा दुष्काळाचा होता. घोलेंच्या मते दुष्काळाला जबाबदार कारणांमध्ये एक महत्वाचे कारण हे अवर्षण आहे. त्यामुळे दुष्काळाला तोंड द्यावयाचे असेल तर अवर्षणाचा सामना केला पाहिजे असे सांगून ते एका बाजूला अवर्षणाची मीमांसा करतात तर दुसऱ्या बाजूला अवर्षणापासून शेतकऱ्यांना कसे वाचता येईल याच्या उपायांची तपशिलात चर्चा करतात. अवर्षण हा काही दैवी प्रकोप नसून तो रान वा जंगलांची काळजी न घेतल्यामुळे पाऊस पडत नाही. पाऊस पडण्याचा संबंध हा बाष्पीभवनाची प्रक्रिया, वातावरणातील उष्णतामान, थंड हवा यावार असते. ज्याठिकाणी भरपूर झाडे असतात त्याठिकाणी बाष्पीभवन झालेल्या ढगांना थंड हवेच्या स्पर्शाने पावसात परिवर्तीत करण्यासाठी जंगल वा झाडांची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी झाडांची निगा राखावी असा सल्ला घोले देतात. त्याचप्रमाणे ते जमिनीची धूप आणि तिचा अवर्षणाशी असलेला संबंध उकलुन दाखवतात. घोले या दोन्ही प्रक्रियांचे अतिशय शास्त्रीय भाषेत विश्लेषण करतात. लेखिकेने घोलेंचे हे शास्त्रीय विचार वाचकांना बोजड होणार नाहीत याची काळजी घेत मांडले आहेत, हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. पिकांचे रक्षण, जनावरांचे पालन, नांगरणी अशा बहुविध मुद्द्यांवर घोलेंनी आपले विचार मांडले आहेत. प्रतिमा परदेशींनी घोलेंच्या या शेतीविषयक विचारांची वाचकांना सविस्तर ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

घोलेंचे स्त्रीप्रश्नाविषयीचे विचार

एकोणिसाव्या शतकात जो प्रबोधनविचार मांडला गेला किंवा जे प्रयत्न केले गेले (अभिजन आणि सत्यशोधक अशा दोन्ही प्रवाहांकडून) त्यामध्ये स्त्रीप्रश्न आणि शिक्षण अशा दोन प्रमुख मुद्द्यांचा अंतर्भाव राहिला. घोलेंनी देखील त्यांच्या विचारव्युहामध्ये स्त्रीप्रश्नाला स्थान दिलेले आढळते. बेहरामजी मलबारी यांनी १८८४ मध्ये भारतातील बालविवाह आणि संमती वय यासंदर्भातील टिपणे प्रसिद्ध केली. त्यांनी ही टिपणे प्रांतिक सरकारकडे आणि अनेक नामांकित व्यक्तींकडे विचारार्थ पाठविली. मलबारीच्या टिपणावर अनेक मान्यवर व्यक्तींनी आपले अभिप्राय दिले. त्यात अभिजन जातीय नेत्यांचा जसा समावेश होता तसा महात्मा फुले, बापुजी हरी शिंदे यांसारख्या सत्यशोधक व्यक्तींचाही समावेश होता. घोलेंनी देखील मलबारीच्या टिपणासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. ढोबळमानाने त्यांनी मलबारी यांच्याशी असहमती व्यक्त केली. त्यांच्या मते महाराष्ट्रातील कोकण व दख्खनसारख्या प्रदेशात मुळात बालविवाहाचे, बाला-जरठ विवाहाचे प्रमाण फारच कमी आहे. आणि जे काही अल्प प्रमाण आहे ते दूर करण्यासाठी शासकीय हस्तक्षेपाची गरज नाही. नागरी सभ्यता आणि शिक्षण यांच्या प्रसारातून त्यावर मात करता येईल असा विश्वास घोले व्यक्त करतात. स्त्रीप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मलबारीनी सुचविलेल्या उपयांशीही ते असहमती व्यक्त करतात. मलबारीनी सुचविलेल्या उपायांमुळे अनिष्ट परिणाम घडून येतील असे घोले प्रतिपादन करतात. मलबारी यांनी मांडलेले स्त्रीप्रश्न हे सर्व लोकांमध्ये नाहीत तर फक्त ब्राह्मणजातीमध्येच आहेत. ब्राह्मण जात त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रथा धर्माचा भाग बनल्याने त्या झटकन तोडून टाकल्यास त्याचे अनिष्ट परिणाम होतील अशी भीती घोले व्यक्त करतात. घोलेंच्या स्त्रीप्रशांची लेखिका केवळ ओळख करून देत नाहीत, तर त्याची परखड चिकित्सा करतात आणि घोलेंच्या स्त्रीप्रश्नाच्या संदर्भातील मर्यादा स्पष्टपणे वाचकांसमोर ठेवतात.

सत्यशोधक की प्रार्थना समाजी?

आधीच्या लिखाणातून घोलेंच्या सत्यशोधक प्रेरणांवर शंका उपस्थित करून त्यांची प्रेरणा वैदिक धर्माची असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न केला गेला. अप्रत्यक्षपणे असाही प्रयत्न केला गेला की त्यांची नाळ सत्यशोधक समाजापेक्षा अभिजनांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक सभेशी अधिक जुळलेली आहे. परदेशींनी या शंकांचे साधार खंडन करून घोलेंची सत्यशोधक ओळख अधिक ठसठशीतपणे मांडण्यात यश मिळविले आहे. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून घोलेंनी केलेल्या कामाचा तपशील त्या विस्ताराने मांडतात. घोलेंनी सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सत्यशोधक समाज आयोजित कार्यक्रमांमध्ये वाढ घडून आली. ही वाढ केवळ कार्यक्रमांच्या संख्येतच घडून आली नाही तर त्यांचे स्वरूप व वैविध्यता यातही बदल घडून आला. पूरग्रस्तांना मदत, समाजाच्या कार्यकारिणीची आणि सभासदांची संख्या यातही वाढ, सत्यशोधक विवाहांना कायदेशीर मान्यता, प्रबोधन जागर सभा असे अनेक उपक्रम मोठ्या प्रमाणावर घोलेंच्या नेतृत्वाखाली राबविले गेले.

परदेशींनी फुले आणि घोले यांच्यातील मतभेद तसेच घोलेंनी सत्यशोधक समाजाचा दिलेला राजीनामा याच्यावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशींच्या मते सत्यशोधक समाजाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचे जे विषय ठेवले होते, त्यावरून घोलेंचा गैरसमज झाला आणि त्याचे पर्यवसान घोलेंनी सत्यशोधक समाजाचा राजीनामा देण्यात झाले. निबंध स्पर्धेचा विषय ‘हिंदुस्थानात वारंवार दुष्काळ पडून शुद्र लोकच प्रथम का उपाशी मरू लागतात. याची करणे काय व ती कोणते उपाय योजिले असता दूर होतील’, हा होता. घोलेंनी निबंध विषयाविरुद्धचे आपले मत ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात छापले व ज्ञानप्रकाशने त्यास आपली खोचक टिप्पणीही जोडली. या सर्व घटनाक्रमावर परदेशी वास्तुनिष्ठतेने प्रकाश टाकतात. शेवटी त्या म्हणतात, की घोले प्रार्थना समाजीस्टांच्या जवळ गेले पण ते प्रार्थना समाजीस्ट झाले नाहीत.

अब्राह्मणी चरित्रलेखनाच्या दिशेने

परदेशी लिखित घोलेंचे हे चरित्र अब्राह्मणी चरित्र लेखनाच्या दिशेने केलेल्या लिखाणातील एक महत्वाचे लेखन आहे. बऱ्याचवेळेस चरित्रलेखन करताना चरित्र नायकाचे गोडवे गाण्याचा किंवा त्याची महत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. अब्राह्मणी चरित्रलेखनात अशा लिखाणपध्दतीला टाळून चरित्रनायकाचे वा नायिकेचे सम्यक आकलन सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. परदेशींकृत हे चरित्र या प्रयत्नाचा एक भाग होय. त्यांनी घोलेंचे चरित्र लिहिताना आधीच्या लिखाणातून त्यांच्यावर झालेला अन्यायाचे परिमार्जन करून त्यांचे विचार आणि कार्यकर्तृत्वाचा आलेख सारासार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्या प्रत्ययास येतो. त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्टही दिसून येतो. शासकीय अभिलेखागार तसेच अनेक ग्रंथालये धुंडाळून त्यांनी दुर्मिळ लेख व माहिती संकलित करून त्याच्या भक्कम आधारावर हे चरित्र त्यांनी साकारले आहे. परंतु, ह्या सर्व प्रयत्नांच्या मागची प्रेरणा घोलेंचे स्तुतीगायनाची नसून घोलेंच्या विचार-व्यवहाराचे व त्यांच्या काळाचे चिकित्सक चित्र वाचकांपुढे ठेवायचे असल्याने त्यांनी डॉ घोलेंच्या चरित्रातील मर्यादांची मांडणी कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे केलेली आढळून येते. आजही अनेक समाजनायक विशेषतः बहुजन समाजातील समाजनायक-नायिका उपेक्षेच्या काळोखात आहेत. त्यांचे कार्य-कर्तृत्व पुढे आणणे समकालीन परिवर्तनवादी चळवळ आणि कार्यकर्ते यांच्यासाठी प्रेरणादायी ऐवज ठरू शकते. त्यांच्या कार्य-कर्तृत्वाची चरित्रात्मक मांडणी करताना प्रा. प्रतिमा परदेशी यांनी लिहिलेले घोलेंचे चरित्र निश्चितच मार्गदर्शक ठरू शकेल असे वाटते.

संदर्भ

बगाडे, उमेश (२०१०) महात्मा जोतीराव फुले, गंधर्ववेद प्रकाशन, पुणे.

बगाडे, उमेश (२०१७) शेतकरी संघर्षातील समूहभान, हरिती पब्लिकेशन्स, पुण

Kumar, Ravinder (1968) Western India in the Nineteenth Century, Australian National University Press, Canberra.

Rao, Parimala (2020) Beyond Macaulay, Routledge, London.

सत्यशोधक डॉ. विश्राम रामजी घोले : विचार आणि कर्तृत्व

प्रा. प्रतिमा परदेशी

समता प्रतिष्ठान, पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0