धोनीच्या निवृत्तीमागचे रहस्य काय?

धोनीच्या निवृत्तीमागचे रहस्य काय?

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्ती निर्णयालाही अनेक शंकाकुशंकांचे कंगोरे आहेत. कारकिर्दीतील काही महत्त्वाचे निर्णय त्याने आपल्या सहकार्यांसोबतही शेअर केले नाहीत. त्याच्या मते वैयक्तिक गोष्टी या पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि असाव्यात.

महेंद्रसिंग धोनी हा विस्मयकारी क्रिकेटपटू आहे. त्याच्या खेळातील करिश्म्याइतकातच त्याचा अनाकलनीय स्वभाव त्याच्या कारकिर्दीचा विषय ठरला होता. मैदानावरील त्याच्या कृतीचा जसा अंदाज यायचा नाही तसेच त्याने क्रिकेटबाबत कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयाबाबतही बोलता येईल. त्याने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयालाही असेच शंकाकुशंकांचे कंगोरे आहेत. कारकिर्दीतील काही महत्त्वाचे निर्णय त्याने आपल्या सहकार्यांसोबतही शेअर केले नाहीत. त्याच्या मते वैयक्तिक गोष्टी या पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि असाव्यात.

मात्र क्रिकेटशी संबंधित असणार्याही गोष्टी ज्या सहकार्यांच्या सोबत ऐन उमेदीच्या काळात ‘व्यथित’ केल्या त्याबाबतही एवढी गुप्तता बाळगावी याचे आश्चर्य वाटते. त्याचबरोबर जगातील फारच क्रिकेट दिग्गजांनाही न जमलेली क्रिकेट आणि वैयक्तिक जीवन यातील तफावतीची कसरत त्याला जमली याचे कौतुक वाटते.

त्याच्या या स्वभावाचे कौतुक करावे का अतिसावध आणि गूढ स्वभावाबाबत मत व्यक्त करावे? ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना संपल्यानंतर पत्रकार परिषद संपवून हॉटेलवर पोहोचल्यावर धोनीने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोडत असल्याचे वृत्त ‘ट्विट’ केले. सामन्यांच्या वृत्तांकनात गर्क असलेल्या पत्रकारांना त्याने पुरता श्वासही घेऊ दिला नाही.

आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपरकिंग्जच्या सरावासाठी तो चेन्नईत दाखल झाला. नंतरच्या ४ दिवसांत असे काय घडले की ज्यामुळे त्याने क्रिकेटमधूनच निवृत्त होत असल्याची घोषणा केली? त्याच्या अचानक आणि अनपेक्षित निवृत्तीमुळे अनेक शंकाकुशंका निर्माण झाल्या. अफवांचे पेव फुटले. निवृत्तीच्या घोषणनेही स्वतःभोवती गूढ वलय निर्माण केले.

रांचीतल्या एका छोट्या कुटुंबातील मुलगा भल्याभल्यांनाही लाजविणारे निर्णय घेतो याचे अखेरपर्यंत आश्चर्य वाटत राहील. २००७च्या ट्वेन्टी-20 क्रिकेटचे विश्वविजेतेपद त्याला पैसा आणि मानमरातब यापेक्षाही अधिक काही देऊन गेले. आयपीएल स्पर्धेचा उदय त्याच्या पथ्यावर पडला. एन. श्रीनिवासन यांच्यासारख्या कर्मठ उद्योजकाच्या चेन्नई सुपर किंग्ज या फ्रंचायझीसोबत जुळलेली नाळ त्याला अनेक अर्थांनी बळ देणारी ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रचंड ताकद असलेले मग्रुर आणि कर्मठ श्रीनिवासन यांचा वरदहस्त लाभताच त्याच्यातील स्वभावाने उचल खाल्ली ती अखेरपर्यंत.

सट्टेबाजीच्या चिखलात रुतलेल्या त्यांच्या फ्रंचायझीवर बंदी आली पण धोनीवर ओरखडाही उमटला गेला नाही. सट्टेबाजीशी संबंधित संशयित असणार्या १३ क्रिकेटपटूंच्या नावाचा बंद लखोटा अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहीला.

असं म्हणतात, त्यामुळे धोनीने कसोटी संघाचे नेतृत्त्व सोडले नाही ना?

अशीच शंका आता त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत घेतली जात आहे. त्याबाबतचे अनेक तर्क-वितर्क आहेत. खरं तर २०१९च्या विश्वचषक स्पर्धेनंतर धोनीच्या निवृत्तीची अपेक्षा करण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध सामन्यात अखेरच्या ४ षटकांमधील त्याची अनाकलनीय संथ फलंदाजी आणि त्यानंतर त्या डावातील चेंडू पंचाकडून घेण्याच्या त्याच्या कृतीमुळे निवृत्तीच्या घोषणेची अपेक्षा केली जात होती.

अशा अपेक्षांची पूर्तता केली तर तो धोनी कसला? त्याने ‘मीडिया’ला चक्क गुंडाळले. आपल्या गोलंदाजांना अशा खेळपट्टीवर कसा चेंडू टाकावा याचा अभ्यास करता यावा यासाठी त्याने हे सारे केले होते. दरम्यानच्या काळातील क्रिकेटमध्ये प्रत्येकी वेळी काहीतरी घडेल असे अपेक्षित केले जात होते. पण सारे बार फुसके ठरले.

धोनी स्थानिक क्रिकेट सामने खेळला नाही. क्रिकेट सराव तुटला. तरीही निवृत्तीची घोषणा काही पुढे आली नाही. २०२०चा ऑस्ट्रेलियातील विश्वचषक खेळूनच तो निवृत्त होणार इथवर बातम्या येऊ पोहोचल्या. बीसीसीआयने त्याच्याशी वर्षांचा मध्यवर्ती करारही केला नाही. तरीही धोनी विचलित झाला नाही. आयसीसीने ऑस्ट्रेलियातील यंदाची विश्वचषक स्पर्धाच पुढे ढकलली. तरीही धोनीचा बांध फुटला नाही. अखेर तो आपल्या ‘गॉडफादर’ श्रीनिवासन यांच्या चेन्नईत दाखल झाला. निमित्त होते फ्रंचायझीच्या आयपीएल पूर्व तयारीचे.

सराव सुरू झाला आणि अवघ्या चारच दिवसांत कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, इन्स्टाग्रामवर धोनीने निवृत्तीची बातमी जाहीर केली.

आजच्या युगात या गोष्टीचेही मार्केटिंग केले जाते. अनेक क्रिकेटपटू किंवा अन्य खेळांमधील खेळाडू निवृत्तीची बातमी किंवा गौप्यस्फोट चक्क चढ्या भावात विकतात. धोनीही तसे काही केलेले दिसत नाही. पुढील वर्षी भारतात होणार्या विश्वचषक स्पर्धेतील सहभागाबाबतची खात्री नसल्यामुळे कदाचित त्याने निर्णय घेतला असावा.

सर्वेसर्वा श्रीनिवासन यांच्याशी सल्लामसलत करूनच त्याने आपल्या उर्वरित क्रिकेटची दिशा ठरवली.

धोनीच्या या निर्णय़ापाठी काही गोष्टी आहेत. शास्त्री-विराट यांच्या भविष्यातील भारतीय संघात तो बसलाही नसता. त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या राष्ट्रीय संघात अडकून अनेक आंतरराष्ट्रीय लीगवर पाणी सोडण्याची त्याची तयारी नव्हती. अलिकडेच बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीने निवृत्त भारतीय क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआय अन्य देशांच्या क्रिकेट लीगचे दरवाजे उघडण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते.

धोनीच्या निर्णयामुळे त्या शक्यतेला बळकटी येते. शिवाय धोनीच्या जवळचा सहकारी सुरेश रैना यानेही तत्काळ निवृत्ती स्वीकारण्यात ‘अर्थ’ आहे.

नुकत्याच निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंना बिग बॅश, किंवा तत्सम परदेशी लीगमध्ये मागणी आहे. भारतीय क्रिकेटपटूंसाठी त्या सर्व स्पर्धांची दारे आतापर्यंत बंद होती. त्या सर्व लीग क्रिकेट स्पर्धांनाही भारतीय क्रिकेटपटूंची प्रतिक्षा आहे. क्रिकेटच्या गुणवत्तेपेक्षाही या लीग आसुसल्या आहेत, करोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीमध्ये आपल्या ‘लीग’ना आर्थिक रसद मिळवण्यासाठी. धोनीसारखा भारतीय क्रिकेटपटू अशा लीगमध्ये खेळणे म्हणजे वरवर दिसते तसे नाही. पाठोपाठ हे खेळाडू आपले प्रमुख पुरस्कर्तेही घेऊन येतील या अपेक्षा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या भारतीय बाजारपेठांमधील उत्पादन असणार्या कंपन्यांची स्पर्धा पुरस्कृत करण्याची क्षमता आणि इच्छा आहे. धोनीसारखे अनेक खेळाडू प्रेक्षकांच्या पाठीराख्यांबरोबरच पुरस्कर्त्यांचे बळही सोबत घेऊन येणार आहेत.

धोनीच्या निवृत्तीचा निर्णय त्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे. श्रीनिवासन यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यामागे धूर्तपणा आहे. धोनीने आपले निवृत्तीनंतरचे क्रिकेट व्यवस्थापन आणि धोरण निश्चित केले आहे. आर्थिक स्थैर्यापेक्षाही अन्य गोष्टींबाबतचे निर्णयही त्याने घेतले आहेत. अन्य लीगमधील सहभाग हा त्यापैकी एक भाग आहे.

क्रिकेट प्रशिक्षणातील नवे अभिनव प्रयोग धोनीला करायचे आहेत. श्रीनिवासन सारखा उद्योजक आणि त्याची टिमसोबत घेण्यातही त्याचा स्वार्थ आहेच. शिवाय श्रीनिवासन यांची चेन्नई सुपरकिंग्ज ही फ्रॅन्चायझी आहेच. नजीकच्या काळात तेथेही तो विविध भूमिका वटवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

धोनीच्या राजकारणातील प्रवेशाबाबतही बिहार-झारखंडमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वावड्या उठल्या होत्या. भाजपला बिहारमध्ये धोनीसारखा चेहरा निवडणूक प्रचार धुमाळीत निश्चितच हवाहवासा वाटेल. मात्र दस्तुरखुद्द धोनीला सक्रीय राजकारणात रमण्याबाबत बिलकुल रस नाही. शिवाय त्याची निष्ठा भाजपपेक्षा अन्य राजकीय पक्षांशी किंवा त्या पक्षांच्या ज्येष्ठांशी असू शकते.

तूर्तास, तो राजकारणात शिरेल असे दिसत नाही. त्याचा तो पिंडही नाही. स्वच्छंदी व मनाला पटेल, रुचेल तेच करण्यासाठी ते क्षेत्र निश्चितच नाही.

विनायक दळवी ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.

COMMENTS