‘लॉकडाऊन की ब्रेकडाऊन’

‘लॉकडाऊन की ब्रेकडाऊन’

‘लॉकडाऊन डायरी’ हे पुस्तक कोविड-१९ महासाथीचा फटका बसलेल्या एकल महिला, बेघर महिला, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका, मजूर वर्ग, वेश्या, तृतीयपंथी, मुंबईतील डबेवाला, मुस्लिम समाजाचे वास्तववादी प्रश्न मांडते.

मोदी सरकारची १० लाख रोजगार देणारी अग्निपथ योजना
रजनीकांत यांचा करिष्मा राजकारणात चालेल का?
अमेरिकेत हिंसाचाराचा आगडोंब, ट्रम्प पोलिसांवर भडकले

विकास अध्ययन केंद्र ,मुंबई या समाजसेवी संस्थेने लॉकडाऊनच्या काळात विविध समाज घटकांवर झालेल्या परिणामांची मांडणी करणारे पुस्तक ‘लॉकडाऊन डायरी’ प्रकाशित केले आहे.

‘विकास अध्ययन केंद्र’ ही धर्मनिरपेक्ष संस्था १९८२ पासून समकालीन मानवधिकारांच्या प्रश्नावर फक्त वैचारिक भूमिका मांडत नसून प्रत्येक प्रश्नावर ‘संशोधन’ व कृतीशील आराखडे आखून प्रत्यक्ष या वंचित घटकांचे प्रश्न सोडविण्याचे काम सातत्याने करत आहे. महिला, मुले, कामगार, तृतीयपंथी समाज, शेतकरी, मच्छिमार समाज हे प्रामुख्याने संस्थेच्या कामाचे मुख्य घटक आहेत. या दुर्बल घटकांवर, त्यांच्या प्रश्नांवर रेणुका कड व सुरेश शेळके गेल्या अनेक वर्षापासून सतत क्रियाशील भूमिका घेत आहेत. ‘प्रत्यक्ष मदत करणे ‘ हा संस्थेचा मूळ हेतू जिवंत ठेवण्याचे काम रेणुका मॅडम प्रभावीपणे करत आहेत.

फेब्रुवारी २०२० पासून संपूर्ण जग महासाथीच्या विळख्यात अलगद अडकले आणि संपूर्ण जगाच्या वेगाला अचानक ‘ब्रेक’ लागला. तेव्हापासून दोनच शब्द सगळीकडे थैमान घालू लागले. पहिला: कोविड १९ व दुसरा लॉकडाऊन. या दोन्हीमुळे संपूर्ण जगाची आर्थिक व सामाजिक कोंडी झाली. या कोंडीचे बळी अर्थातच समाजातील दुर्बल घटक फार मोठ्या प्रमाणात बनले व मुळातच निम्न आर्थिक स्तरावर जगणार्‍या या दुर्बल घटकांना उपासमारीची वेळ आली. यावर ठोस उपाय आखणे आजपर्यंत जमले नाही. म्हणून पहिल्या लॉकडाऊनपासूनच संस्थेने या वंचित घटकाच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. फक्त लिखाण, चळवळ न करता प्रत्यक्ष मदत गरजूंना पोहचण्यासाठी संस्थेने अनेक कार्यक्रम राबवले. सोबतच सातत्याने हे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे कामही सुरू ठेवले.

आज सुखवस्तू समाज दुसर्‍यांनी केलेल्या समाजकार्यावर ‘लाईक’ व ‘कमेंट’ करण्याएवढाच संवेनदशील उरला आहे. यांचे महत्त्वाचे कारण लॉकडाऊन व कोविड १९ या दोन्हीमुळे भाकरीचा प्रश्न उच्च मध्यमवर्गाकडे नव्हता त्यामुळे त्रयस्थ भावनेने दुसर्‍यांच्या मदत कार्यावर पसंती दर्शविण्यापलीकडे फारसे काही या घटकाने केले नाही. कारण कोविड १९ हा संसर्गजन्य रोग म्हणून त्याची प्रचंड दहशत घेऊन घरी आरामशीर जीवन जगणे या घटकाने पसंत केले.

अशा या महासाथीच्या काळात एकल महिला, बेघर महिला, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूर वर्ग, वेश्या व्यवसायातील स्त्रिया, तृतीयपंथी समाज, मुंबईतील डबेवाला, मुस्लिम समाज या सर्वाच्या प्रश्नावर प्रत्यक्ष काम करताना विकास अध्ययन केंद्राने सातत्याने या दुर्लक्षित घटकाला समाजासमोर आणण्यासाठी अतिशय वास्तवदर्शी लेख ‘द वायर मराठी, मॅक्स महाराष्ट्रच्या मॅक्स वुमन’ या वेबपोर्टेलवर मांडले. या सर्व लेखांची येणार्‍या काळाला अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी म्हणून फार उपयुक्तता होईल. याचसाठी या सर्व लेखांचे एकत्रीकरण करून संस्थेने ‘लॉकडाऊन डायरी’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक अभ्यासकांपुढे एक ‘आव्हान’ म्हणून ठेवले आहे. शब्द बरेचवेळा माणसाच्या विचारांवर वर्चस्व गाजवतात. याच हेतूने या पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे स्वतंत्र संशोधनाचा विषय होईल.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारीसह या लेखात विशेषत: दुर्लक्षित झालेल्या अनेक बाबींवर पूर्वग्रह न ठेवता प्रकाश टाकला आहे. सहसा जिथे सवंग प्रसिद्धी आहे तेथेच मीडिया सर्वांचे लक्ष केंद्रित करते. ‘लॉकडाऊन डायरी’ या पुस्तकाच्या माध्यमातून हा दृष्टिकोन लक्षात घेऊनच महामारीच्या काळातील नगण्य समजल्या जाणार्‍या महिला व श्रमिक यांना प्रामुख्याने मदत तर केलीच पण टेक्नॉलाजीचा आधार घेऊन ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातूनही या सगळ्या प्रश्नांवर प्रभावीपणे मांडणी करण्याचे काम रेणुका कड यांनी फार चिकाटीने केले. हे पुस्तक वाचून त्यावर काही मदत, सूचना वाचकांनी कराव्यात, त्या अमलात आणण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.

लॉकडाऊनच्या काळात वंचित घटकांना मोठ्या प्रमाणात मदत मिळू शकली ती सामाजिक संस्थाच्या योगदानामुळे. प्रत्यक्ष वंचित घटकांचे प्रश्न, समस्या व संस्थेने आपल्या परीने केलेली या प्रश्नांची उकल या लॉकडाऊन डायरीमध्ये विस्ताराने आहे. सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत येणार्‍या चर्चांवर विश्वास ठेवणार्‍या सर्वांनी या वास्तवदर्शी पुस्तकाचे वाचन करावे. या पुस्तकाच्या वाचनाने तरी समाजाच्या बोथट झालेल्या संवेदना काहीशा जागृत होतील अशी मला अाशा आहे.

अजून एका गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटतो. ही महासाथ पसरण्यावरून विशिष्ट जाती, धर्माला लक्ष्य केले गेले. यावर प्रकाश टाकणारा प्रा. बेन्नुर सरांचा लेखही तेवढाच महत्त्वाचा आहे. एकूणच ‘लॉकडाऊन’ या शब्दाचे प्रत्यक्ष बळी पडलेल्या समाजाचे भयावह पण वास्तव चित्रण समजून घेण्यासाठी, वाचनातून अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे.

या पुस्तकाचे लेखक रेणुका कड आणि सुरेश शेळके यांनी लॉकडाऊनमध्ये प्रत्यक्ष जे पाहिलं त्यांचे वास्तव चित्रण या पुस्तकातून केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0