सैन्य मागे घेण्याबाबत सरकारद्वारे जनतेची दिशाभूल: कर्नल शुक्ल

सैन्य मागे घेण्याबाबत सरकारद्वारे जनतेची दिशाभूल: कर्नल शुक्ल

नवी दिल्लीः भारत व चीनद्वारे लदाख सीमेवरून सैन्य मागे घेतले जाण्याच्या कृतीबद्दल मोदी सरकारने भारतीय जनतेला पूर्णसत्य कळू दिलेले नाही आणि ही जनतेची दिशाभूल आहे, असा आरोप बिझनेस स्टॅण्डर्सच्या स्ट्रॅटेजिक अफेअर्स विभागाचे संपादक तसेच यासंदर्भातील सखोल माहिती असलेले ज्येष्ठ पत्रकार कर्नल अजय शुक्ल यांनी केला आहे.

एप्रिल २०२०पासून चार वेळा भारताने लष्कर मागे घेतले आहे. गलवान, पँगाँग सरोवर, गोग्रा व हॉट स्प्रिंग्ज या चारही ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याच्या कृती भारतासाठी तोट्याच्या होत्या. या चारही ठिकाणी जे बफर झोन अस्तित्वात आले आहेत, त्यावर भारताचा दावा होता आणि यापूर्वी भारतीय सैन्य या भागांत गस्त घालत होते पण आता भारताला या भागात गस्त घालण्याचा हक्क उरलेला नाही.

चीनची परिस्थिती वेगळी आहे, कारण, आता बफर झोन म्हणून अस्तित्वात आलेल्या भूभागावर चीनचा दावाही नव्हता व चीनचे सैन्य या भागात गस्तही घालत नव्हते. त्यामुळे चीनचे सैन्य पूर्वी ज्या रेषेपर्यंत गस्त घालत होते, तेथपर्यंत अद्याप गस्त घालतच आहे, असे शुक्ल यांनी स्पष्ट केले.

हॉट स्प्रिंग येथून सैन्य मागे घेण्याची कृती भारतासाठी तोट्याची आहे अशी माहिती नुकतीच पुढे आली आहे आणि ही माहिती आधीच्या माहितीशी अगदी जुळणारी आहे, असे शुक्ल यांनी, करण थापर यांना ‘द वायर’साठी दिलेल्या ३० मिनिटांच्या मुलाखतीत, सांगितले. विशेषत: हॉट स्प्रिंग भागात तयार करण्यात आलेल्या बफर झोनबद्दल ते म्हणाले, “हा बफर झोन भारताच्यात भूभागावर आहे. त्यामुळे चीनचे सैनिक आता पूर्वीच्या तुलनेत बरेच आत येऊ शकत आहेत. भारतीय सैनिकांसाठी परिस्थिती उलट झाली आहे. ते पूर्वी ज्या भूभागात जाऊ शकत होते, तेथे आता त्यांना प्रवेश उरलेला नाही.”

गलवान, पँगाँग सरोवर व गोग्रा येथून सैन्य मागे घेण्याच्या यापूर्वीच्या कृतींबद्दलही कर्नल शुक्ल यांनी सविस्तर माहिती दिली. या भागांची परिस्थितीही तीच आहे. भारतीय सैनिक ज्या भूभागावर यापूर्वी गस्त घालत होते, तेथे ते आता प्रवेश करू शकणार नाहीत, अशा पद्धतीनेच बफर झोन्स तयार करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

बफर झोन्सच्या निर्मितीमुळे भारताने किती भूभागावरील अधिकार गमावला आहे याचे तपशीलही कर्नल शुक्ल यांनी दिले. गलवानमध्ये १ ते १.५ किलोमीटर, गोग्रामध्ये चीनचे सैन्य भारताच्या भूभागावर ४ किलोमीटर आत घुसले होते व ते तेथून २ किलोमीटर मागे गेले आणि उर्वरित २ किलोमीटर बफर झोन करण्यात आला. याचा अर्थ संपूर्ण बफर झोन प्रत्यक्षात भारताच्यात भूभागावर आहे. पँगाँग सरोवर भागात भारतीय सैनिक पूर्वी फिंगर्स थ्री आणि एट यांदरम्यान गस्त घालू शकत होते पण आता ते या भागात प्रवेश करू शकत नाहीत. याउलट चीनचे सैन्य ज्या भागापर्यंत येऊ शकत होते, तेथपर्यंत ते अद्याप येऊ शकत आहे, असे त्यांनी सांगितले.

कर्नल शुक्ल यांनी डेपसांग व डेमचॉक भागाबद्दलही सांगितले. भारत डेपसांगमध्ये यापूर्वी ज्या भागावर दावा सांगत होता, त्यापैकी सुमारे १५ किलोमीटर भागात गस्त घालण्याचा अधिकार भारतीय सैन्य गमावून बसले आहे. डेमचोक भागातील सुमारे ५ किलोमीटर भूभाग भारताने गमावला आहे.

भारतीय भूभागावर चीनचे सैन्य आलेले नाही आणि कधीही आले नव्हते या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली केलेल्या विधानाचे खूपच घातक परिणाम झाले आहेत, कारण, चीननेही नेमका हाच दावा केला होता, असे मत कर्नल शुक्ल यांनी व्यक्त केले. पंतप्रधानांचे विधान चीनच्या दाव्याला पुष्टी देणारे होते. यामुळे चीनला प्रचंड आनंद झाला असणार, असे कर्नल शुक्ल म्हणाले.

डेमचॉक व डेसपांग येथून सैन्य मागे घेतले जाण्याच्या तसेच एप्रिल २०२० रोजी होती ती परिस्थिती स्वीकारण्यास चीन तयार होण्याच्या शक्यतेबद्दलही शुक्ल बोलले. सध्या तरी या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत असे चीन सरकारने स्पष्ट सांगितले आहे. चीनच्या मते डेमचॉक व डेपसांगच्या स्वामीत्वाचा मुद्दा २०२० सालाच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे. भारतातर्फे प्रत्यक्ष ताबारेषेचे बेकायदारित्या उल्लंघन झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे, असा चीनचा दावा आहे.

COMMENTS