लोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे

लोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे

या शतकाच्या अखेर जगाची एकूण लोकसंख्या ११ अब्ज होईल असाही अंदाज आहे.

चीनचाच भारताला खरा धोकाः रावत
चीनकडून १० भारतीय सैनिकांची सुटका
चिनी मालावर बहिष्कार आत्मनिर्भरतेचा मार्ग नव्हे!

संयुक्त राष्ट्रांच्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स २०१९’च्या अहवालानुसार येत्या ८ वर्षांत २०२७ साली भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देश म्हणून गणला जाणार आहे. सोमवारी संयुक्त राष्ट्रांनी ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स २०१९’ अहवाल सादर केला, या अहवालात २०५० पर्यंत भारताच्या लोकसंख्येत २७ कोटी ३० लाखांची भर पडेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जागतिक लोकसंख्येचा हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक विभागाच्या लोकसंख्या शाखेकडून तयार करण्यात येतो. या अहवालात भारताची सध्याची लोकसंख्या एक अब्ज ३७ कोटी तर चीनची १ अब्ज ४३ कोटी आहे, पण २०२७ पर्यंत भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

२०५० पर्यंत जगाच्या लोकसंख्येत अजून २ अब्ज लोकांची भर पडेल म्हणजे येत्या ३० वर्षांत हा आकडा ७ अब्ज ७० लाखापासून ९ अब्ज ७० लाखांपर्यंत जाईल, असे या अहवालात म्हटले आहे.

पण एकीकडे भारतासोबत जगाची लोकसंख्या जरी वाढत असली तरी येत्या ३१ वर्षांत जगातील ५५ देशांमधील लोकसंख्येत एक टक्क्याने घट होणार आहे. २०१०मध्ये २७ देशांच्या लोकसंख्येत एक टक्क्याने घट झाली होती. लोकसंख्येत घट होण्याची दोन कारणे या अहवालात नमूद करण्यात आली आहेत, पहिले कारण, प्रजनन क्षमतेत घट होऊन लोकसंख्या वृद्धी दर कमी होणे व दुसरे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने त्याचा परिणाम लोकसंख्येवर होणे.

१९९९मध्ये प्रजनन दर ३.२ टक्के होता तो २०१९मध्ये २.५ टक्क्यांवर घसरला आहे. हे प्रमाण २०५० मध्ये २.२ वर येईल असे या अहवालात म्हटले आहे.

लोकसंख्येवृद्धीतले एक कारण स्थलांतरण प्रक्रियेचे आहे. बांगला देश, नेपाळ व फिलिपाइन्स या देशातून रोजगारासाठी स्थलांतर अधिक आहे तर म्यानमार, सीरिया व व्हेनेझुएला या देशात यादवीमुळे स्थलांतर अधिक होईल असे या अहवालात म्हटले आहे.

बल्गेरिया, लाटव्हिया, ल्युथूनिया, युक्रेन, वालिस व फुटूना बेटे यांची लोकसंख्या २० टक्क्याहून घटेल असा अंदाज आहे.

ज्या ५५ देशांमधील लोकसंख्या येत्या ३० वर्षांत घटणार आहे, त्या देशांमध्ये चीनचा समावेश असून २०५० पर्यंत चीनच्या लोकसंख्येत २.२ टक्के घट होऊन ती तीन कोटी १४ लाखांनी कमी होणार आहे. तर भारताची लोकसंख्या याच काळात २७ कोटी ३० लाखांनी वाढणार आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या १ अब्ज ५० कोटी, चीनची १ अब्ज १० कोटी, नायजेरियाची ७३ कोटी ३० लाख, अमेरिका ४३ कोटी ४० लाख तर पाकिस्तान ४० कोटी ३० लाख इतकी अंदाजित आहे.  नायजेरियाची लोकसंख्या २० कोटींनी वाढणार आहे.

भारतासोबत नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, इथिओपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका असे नऊ देश आहेत ज्यांची लोकसंख्या २०५० पर्यंत वाढणार आहे.

येत्या ३० वर्षांत लोकसंख्येच्या संरचनेतही बदल होणार आहेत. त्यानुसार जगाच्या एकूण लोकसंख्येत वृद्धांची संख्या वेगाने वाढत जाणार आहे. ६५ वर्ष व त्यापुढील वयोगटातल्या वृद्धांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढणार आहे. जगातील प्रत्येकी सहा माणसापैकी एक माणूस वयोवृद्ध असेल. ६५ व त्यापुढील वयाची लोकसंख्येचे प्रमाण १५ ते २४ वयाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक असणार आहे. तर पाच वर्षाखालील मुलांची एकूण लोकसंख्येतील टक्केवारी ६ टक्के असेल. तर जगातील टक्केवारी ५ असेल.

जगाच्या लोकसंख्येचे आयुष्यमानही २०५० पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. १९९०मध्ये सरासरी आयुष्यमान ६४.२ टक्के होते ते २०५० मध्ये ७७.१ टक्के होईल असा हा अहवाल सांगतो. गरीब देशांमधील परिस्थिती मात्र फारशी बदलेल असे चित्र दिसत नाही. कारण या देशांमध्ये जनन दर अधिक असून मुलांच्या जन्मावेळी मातांचे मृत्यूप्रमाणही या देशांमध्ये अधिक आहे. त्यात सततची युद्धे, असुरक्षितता व एचआयव्ही अशा कारणांमुळे आयुष्यमान वाढण्याची शक्यता कमी आहे.

या शतकाच्या अखेरीस पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक राहील पण हे अंतर कमी होत जाईल

या शतकाच्या अखेर जगाची एकूण लोकसंख्या ११ अब्ज होईल असाही अंदाज आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0