कामस्वातंत्र्य : मुक्काम नव्हे, प्रवास…

कामस्वातंत्र्य : मुक्काम नव्हे, प्रवास…

आपल्या अवतीभवती जे घडतं आहे त्याच्याकडे सजगपणे बघणारे, त्याच्याविषयी विचार करत आपलं म्हणणं मांडणारे, आपली अशी एक निश्चित भूमिका असणारे जे मोजके 'विचारी सेलिब्रिटीज' आहेत त्यातलं एक आघाडीचं नाव म्हणजे अतुल कुलकर्णी. शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभागही आहे. स्त्री-पुरूष संबंध, लिंगभाव समता, लैंगिक स्वातंत्र्य आणि या मुद्द्यांचं सामाजिक गतिशास्त्र हेदेखील त्यांच्या आस्थेचे विषय आहेत. याबाबत लेखक उत्पल व. बा. यांनी त्यांच्याशी केलेली ही मनमोकळी बातचीत. काही मूलभूत बोलणारी आणि मार्ग सुचवणारी.

है कली कली के लबपर…….
गली बॉयचे संगीत स्ट्रीट रॅपिंगचे श्रेय हिरावून घेत नाही!
पाब्लो नेरूदा आणि इल पोस्तिनो

उत्पल : लैंगिक स्वातंत्र्य ही संकल्पना तत्त्वतः मान्य केली तरी समाजाची लैंगिक व्यवहारांच्या अनुषंगाने जी मानसिक घडण झालेली असते ती पाहता ही संकल्पना सहजपणे समाजमान्य होणं अवघड दिसतं. भारतात याचा प्रत्यय आपल्याला येत असतो. पाश्चिमात्त्य संस्कृतीचा विचार करता तिथे ही संकल्पना काही अंशी तरी मान्य झाली आहे. लग्नाचं पावित्र्य तिथेही टिकून आहे, पण लग्नपूर्व लैंगिक संबंध मान्य आहेत असं दिसतं. लैंगिक स्वातंत्र्य ही संकल्पना जर प्रत्यक्षात आणायची असेल तर लग्नव्यवस्थेला मिळालेली नैतिक मान्यता, लग्नसंस्थेचं पावित्र्य हे सगळं टिकवून ते होऊ शकेल का असा प्रश्न पडतो. त्यामुळे मुळात लग्नव्यवस्था या ओझ्यापासून स्वतंत्र झाली तरच लैंगिक स्वातंत्र्य अस्तित्वात येऊ शकेल असं दिसतं. यावर काय वाटतं?

अतुल : लैंगिक स्वातंत्र्याबाबत आपण जसे ‘प्रवासात’ आहोत तसेच पाश्चिमात्त्यही ‘प्रवासातच’ आहेत. परंतु तिथल्या स्वातंत्र्य-समतेच्या कल्पनांमुळे म्हणा किंवा विकसित अर्थव्यवस्थेमुळे म्हणा – ते या विषयाबाबत आपल्यापेक्षा थोडेसे पुढे आहेत हे खरं. उदा. तिथे घटस्फोट, घटस्फोटितांचं पुन्हा लग्न होणं वा रिलेशनशिपमध्ये असणं या विषयांवर आपलाइतक्या भुवया उंचावल्या जात नसतील. पण हे असतानाही लग्न अजूनही पवित्र आहे याचं कारण मला असं दिसतं की हा एक टप्पा (फेज) आहे. त्यात अगदी संथपणे बदलही होतोय. युरोपात आता अशी उदाहरणं दिसतात की घटस्फोट न घेता आहे ती व्यवस्था मुलांसाठीची सोय म्हणून आणि आर्थिकदृष्ट्या टिकाऊ आहे म्हणून ‘तू तुझं – मी माझं’ अशा पद्धतीने जोडपी राहतात. त्यांचा असा विचार दिसतो की लग्नामुळे निर्माण झालेली आणि कार्यरत असलेली घराची व्यवस्था बदलायला नको, पण आपण आपलं स्वातंत्र्य घेऊ. पाश्चिमात्त्य समाजाविषयी बोलताना हे नेहमी म्हटलं जातं की तिथे स्त्री-पुरूष संबंध पुढारलेले असूनही तिथे लैंगिक गुन्हे घडतातच, कौंटुंबिक प्रश्न आहेतच, मग कशाला हवंय स्वातंत्र्य? आता इथे गफलत अशी होते की काही नकारात्मक गोष्टींचा ‘डिफेन्स’ म्हणून वापर केला जातो. पण मुळातून काही वैचारिक बदल होतायत हे लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळे असा बचावात्मक प्रतिवाद मला चुकीचा वाटतो.

आता लैंगिक स्वातंत्र्याबाबत बोलताना मला असं वाटतं की आपण याबाबत मुळाकडे जायचा प्रयत्न करायला हवा. लग्न, लग्नातून लैंगिक संबंध ही सुरूवात कशी झाली? तर खासगी मालमत्तेच्या निर्मितीनंतर या मालमत्तेचं हस्तांतरण ‘माझ्या स्वतःच्या मुलाकडे’ होणं गरजेचं होतं म्हणून. आपण हे लक्षात घ्यायला हवं की हे अजूनही बदललेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत खासगी मालमत्ता आहे, त्यात आपली मानसिक गुंतवणूक आहे आणि माझ्या रक्ताच्या व्यक्तीलाच माझी मालमत्ता जावी हा विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत, हे सगळं बाजूला ठेवून लैंगिक स्वातंत्र्याचा विचार स्वतंत्रपणे नाही करता येणार. कारण खासगी मालमत्तेपाशी येऊन घोडं अडणार आहे. माझं मूल कुठलं हे पुरूषाला कळावं यासाठी पिढ्यानपिढ्या लग्न, लग्नांतर्गतच लैंगिक संबंध याभोवतो जी नैतिकता तयार झाली आहे, त्यासाठी स्त्रियांना जे नियंत्रित केलं गेलं आहे त्याची आज हळूहळू पुटं जातायत असं मी म्हणेन. पण ते अर्थातच सहजासहजी  संपणार नाही कारण या नैतिकतेची मुळं खोलवर गेली आहेत, गुंतागुंतीची झाली आहेत. आणि मुख्य म्हणजे यातून ज्या भावना निर्माण झाल्या – पझेसिव्हनेस, जेलसी – त्या आपल्या मनात घट्ट रूजल्या आहेत. आपण त्यांचं उदात्तीकरण केलं आहे. मला जर पुरेसं जेलस वाटत नसेल माझ्या पार्टनरबद्दल तर माझं प्रेमच नाहीये असं आपल्याला वाटतं. ही एक गुंतागुंत झालीय आपल्या भावनिकतेमध्ये. जेलसी, पझेसिव्हनेस या भावना नैसर्गिक आहेत, पण आपण निर्माण केलेली या भावनांची अतिरिक्त तीव्रता आणि उदात्तीकरण नैसर्गिक नाही.  ते संस्कारांनी आलेलं आहे.

मी आधी म्हटलं तसं काही पुटं अगदी संथ गतीने नाहीशी होतायत, पण दुसऱ्या बाजूला आपल्याला ‘वारस’ ह्या कायदेशीर पैलूकडेही लक्ष द्यायला लागणार आहे. तिथे आपल्याला काहीतरी उपाय करावा लागणार आहे. सर्वमान्य होईल असा, कायद्याच्या चौकटीत बसेल असा. हे दोन्ही समांतरपणे व्हायला हवं असं मी म्हणतोय कारण आपल्याकडे मूल हा जेवढा भावनिक विषय आहे तेवढाच तो कायदेशीर विषयही आहे. त्यामुळे फक्त भावनिक किंवा फक्त कायदेशीर उपाय शोधून चालणार नाही. दोघांवर उपाय शोधावे लागतील.

लैंगिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर वैयक्तिक पातळीवर काही व्यवस्था लावता येईल, पण सामाजिक पातळीवर, जर ही व्यवस्था सार्वत्रिक करायची असेल, त्याला सामाजिक स्वीकार मिळवायचा असेल तर निव्वळ तात्त्विक/भावनिक बाजू लक्षात घेऊन चालणार नाही. व्यक्तींना लैंगिक स्वातंत्र्य असावं हे तत्त्वतः मान्य करणारे बरेच लोक असू शकतील. पण प्रत्यक्षात त्यात बरेच अडथळे येतील. अगदी ज्यांना हा विचार मान्य आहे त्यांनाही. कारण अखेरीस तेही या व्यवस्थेचा भाग आहेत. त्यामुळे जोवर एक नवीन प्रारूप तयार होत नाही तोवर हा प्रश्न सुटणार नाही.   

उत्पल : एकूणात विचार करताना असं जाणवतं की लैंगिक स्वातंत्र्य ही संकल्पना व्यापक करणं ही अवघड गोष्ट आहे. त्याकरता पुष्कळ काळ जावा लागेल.  

अतुल : हो. अवघड आहे हे खरंच .पण यासंदर्भातली आणखी एक महत्त्वाची बाजू आहे ती अर्थव्यवस्थेची. आणि तिथे मला काही वेगळ्या शक्यता दिसतात. समाजरचना, राजकारण, विचारधारा यांच्या नाड्या अंतिमतः अर्थव्यवस्थेच्या हातात असतात. आणि अर्थव्यवस्थेच्या नाड्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीच्या हातात असतात. नांगराच्या शोधापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतच्या  (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) प्रवासात आपल्याला हेच दिसतं. तंत्रज्ञान अर्थव्यवस्थेला गती देतं आणि अर्थव्यवस्थेच्या रचनेमुळे आपली सामाजिक रचना ठरते. आजचं चित्र असं आहे की ज्या प्रचंड वेगाने तंत्रज्ञान बदलतंय त्या वेगामुळे अर्थव्यवस्था स्थिर होऊ शकत नाहीये. तुझी आजची जॉब प्रोफाइल चार वर्षांनी तशी राहीलच याची आज शाश्वती देता येत नाही. प्रगत देशांमध्ये आज असं म्हटलं जातंय की काही वर्षांनी खासगी कार ही संकल्पनाच शिल्लक राहणार नाही. शिवाय एआयने चालणारी गाडी असेल तर तिला ड्रायव्हरची गरज नसेल. आज ओला आणि उबरने एक सुरूवात केली आहे. ते अजून वाढत जाईल. एअरबीएनबीचं मॉडेल काय आहे? त्यांच्या मालकीचं एकही हॉटेल नाही, रूम नाही. ते फक्त मध्यस्थाचं काम करतात. इंटरनेटमुळे आपल्या वस्तू आणि सेवा वापरण्याच्या पद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. तंत्रज्ञानाचा परिणाम आपल्याला इतरही क्षेत्रांमध्ये दिसेल. नोकऱ्यांवर, नोकऱ्यांच्या स्वरूपावर तंत्रज्ञानाने लक्षणीय प्रभाव टाकला आहे.

लैंगिक स्वातंत्र्याच्या भावनिक आणि कायदेशीर बाजूंबद्दल बोलत असताना मला असं वाटतं की या सगळ्यावर अर्थव्यवस्था परिणाम करणार आहे. अर्थव्यवस्था ही निव्वळ व्यवस्था म्हणून राहत नाही. ती आपल्या जगण्यावर, मानसिकतेवर परिणाम करते. उदा. वस्तूंचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होणं, मग ती उत्पादनं विकण्यासाठी युक्त्या शोधल्या जाणं, अधिकाधिक उत्पादनं वापरण्याची लोकांना सवय लागणं, त्यातून ज्याला ‘चंगळवादी’ मानसिकता म्हटलं जातं ती तयार होणं हे आजच्या अर्थव्यवस्थेचे सामाजिक परिणाम आहेत.  मी  मघाशी म्हटलं तसं अर्थव्यवस्थेच्या मुळाशी तंत्रज्ञानात्मक बदल आहेत. आजचा तंत्रज्ञान वाढीचा वेग न भूतो आहे (‘न भविष्यती’ आहे की नाही माहीत नाही, पण ‘न भूतो’ नक्की आहे!). त्यातून समाजजीवन इतक्या झपाट्याने बदलतंय की लग्नव्यवस्थेत, स्त्री-पुरूष व अन्य नातेसंबंधांत, लैंगिक संबंधांमध्ये जे बदल होऊ घातलेत ते कदाचित अपेक्षेपेक्षा फार लवकर होतील. कारण कदाचित खासगी मालमत्ता ही संकल्पनाच बदलून जाण्याची शक्यता आहे. माझं घर, माझा पैसा, माझं कुटुंब, माझी गुंतवणूक यात जर काही बदल झाले तर त्याचे पडसाद लैंगिक जीवनावरही पडणार आहेत. आणि मुख्य म्हणजे जर असे बदल झाले तर नियंत्रण माणसांच्या हातात नसेल, ते तंत्रज्ञानाच्या हातात असेल. कदाचित तुम्ही आज ज्याला ‘गरज’ म्हणताय तेच बदलून जाईल.  

उत्पल : खासगी मालमत्तेची संकल्पना जर भविष्यात खरंच खूप बदलली तरी ‘माणूस’ म्हणून आपली जी आदिम रचना आहे ती कशा स्वरूपात बदलेल? स्त्री म्हणून, पुरूष म्हणून किंवा अन्य कुणी म्हणून जे आपण घडलो आहोत ते बदलेल का?  

अतुल : आजची आपली जी लिंगभावी ओळख आहे ती नक्की बदलेल असं मला वाटतं. हे बदल हळूहळू झालेच आहेत, होत आहेत. माझे आजोबा स्वयंपाकघरात पाऊलही ठेवत नसत. माझ्या वडिलांनी भाजी आणण्यापर्यंत मजल मारली होती. मी स्वयंपाकही करतो. आपल्याला कदाचित काही बदल वरवरचे वाटतील, पण एका टप्प्यावर ते अगदी मूलगामी बदल होते. उदा. बायकांनी नवऱ्यांना नावाने एकेरी हाक मारणं. बायका कमवायला बाहेर पडल्यावर पुरूषाचं वर्चस्व काही अंशी कमी झालंच ना? आज घटस्फोटांचं प्रमाण का वाढलंय? स्त्रीला स्वातंत्र्य मिळालंय म्हणून हे प्रमाण वाढलंय. स्त्रियांचे प्रश्न आजही आहेत, पण परित्यक्ता म्हणून जे जिणं बाईला जगायला लागायचं त्यात थोडा तरी फरक नक्कीच पडलाय आज. हे सगळं एका विशिष्ट वर्गापुरतं आहे हे मात्र खरं. महानगरांमधलं, एका विशिष्ट वर्गामधलं आणि तेही थोड्या प्रमाणातलं बदललेलं चित्र आणि एखाद्या खेड्यातलं चित्र यात फरक आहेच. त्यामुळे तो जाणीव आपण जागी ठेवूचया. पण एका वर्गापुरता असला तरी पूर्वीपेक्षा बदल झालेला आहे. त्यामुळे आपल्या ज्या लिंगाधारित भूमिका आहेत त्यांच्यात बदल झाले आहेत, होत आहेत आणि होतील.

उत्पल : हे मान्य आहे. पण हे बदल लैंगिक क्षेत्राच्या बाहेरचे बदल होते. आपण जेव्हा पूर्णपणे लैंगिक व्यवहारांबाबत बोलतो तेव्हा काय दिसतं? तिथे आपली जी इन्स्टिंक्टस कार्यरत आहेत त्यांना ओलांडणं अवघड आहे असं वाटत नाही का?        

अतुल : आपण उलट्या बाजूने, पहिल्यापासून विचार करू. आपल्याला आज स्त्री आणि पुरूष या दोघांमध्ये जे असंतुलन दिसतंय – पुरूष हा शोषक आणि स्त्री ही शोषित या अर्थी – ते मुळात आलं कुठून? आपण आधी बोललो तसं जेव्हा खासगी मालमत्तेमुळे पुरूषाची ही गरज झाली की माझं मूल कोणतं हे मला कळायला हवं आणि त्याच्यानंतर पुरूष जे जे काही करत गेला त्याच्यातून हे असंतुलन निर्माण झालेलं आहे. आता आपण समतेविषयी बोलतोय, त्यासाठी प्रयत्न करतोय, पण मुळात हे त्या अवस्थेला गेलं का? पुरूष स्त्रीवर वर्चस्व गाजवत राहिला कारण मी निवडलेली स्त्री दुसऱ्या कुणाकडे जाता काम नये हा त्याचा हट्ट होता. माझं मूल हे माझंच मूल आहे ही खात्री त्याला त्यातून मिळत होती. इथून संघर्षाला सुरूवात झालेली आहे. आता बदललेल्या अर्थव्यवस्थेमुळे जर हे चक्र उलटं फिरलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपण लग्न हे ‘नैसर्गिक’ आहे असं जे आज म्हणतोय ते तितकंसं खरं नाहीये, आजची आपली लैंगिक मानसिकता (पझेसिव्हनेस, मत्सर इ.) ही कदाचित आपली मूळची – आदिम मानसिकता नाहीये. मुळात आपण लैंगिक स्वातंत्र्य मानणारे, समता मानणारे प्राणी आहोत असं कदाचित आपल्या लक्षात येईल.

मला असं म्हणायचंय की आजची आपली सामाजिक रचना कृत्रिम आहे. केवळ लग्नच अनैसर्गिक नाहीये तर ती व्यवस्था टिकवण्यासाठी आपण नातेसंबंधांचं, स्वभावांचं, नैतिकतेचं, प्रेमाचं जे काही करून ठेवलंय ते सगळंच कृत्रिम आहे.

उत्पल : अगदी बरोबर. आपले स्वभाव, आपली प्रेमानुभूती, आपली नाती हे सगळं खासगी मालमत्तेच्या चौकटीतच फिरतंय. ही चौकट नसतानाचं प्रेम आणि लैंगिक संबंध पुन्हा अनुभवता आले तर तो एक विलक्षण अनुभव असेल.  

अतुल : हो. मी मघाशी म्हटलं तसं थोडीशी सुरूवात झाली आहे. काही पुटं गळून पडतायत. आता आर्थिक आणि म्हणून सामाजिक घुसळण तीव्र झाली आणि सगळीच पुटं गळून पडली तर जे उरेल, जे आपण अनुभवू ते नक्की वेगळं असेल. एक मात्र खरं की आपण काही पुन्हा मूळच्या शिकारी अवस्थेत जाणार नाही. पण आत्ता आहे त्याहून वेगळी अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था निर्माण होईल. त्याची काहीएक संरचना असेल आणि त्यानुसार आपले नातेसंबंध, प्रेम, लैंगिक संबंध हे सगळं आकार घेईल. ते कसं असेल हे आत्ता सांगता येणार नाही कारण तंत्रज्ञान आपल्याला कुठे नेऊन ठेवणार आहे हे आपल्याला आज सांगता येत नाहीये.

उत्पल : समलैंगिक आणि इतर लैंगिक अल्पसंख्यांकांबाबत न्यायालयाने जो स्वागतार्ह निर्णय दिला आहे त्यानंतर आता अशा संबंधांमधून नवीन मॉडेल्स उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण इथे पारंपरिक स्त्री-पुरूष संबंध नसणार आहेत. स्त्री आणि स्त्री, पुरूष आणि पुरूष असे संबंध असणार आहेत. ‘आपलंच मूल हवं’ हा विचारच इथे नसेल.    

अतुल : बरोबर. या बाबतीत अनेक प्रकार होतील असं मला वाटतं. समजा दोन लेस्बियन स्त्रिया एकत्र राहू लागल्या तर त्यापैकी एकीचं जैविक मूल असूच शकतं (स्पर्म बँकेतून स्पर्म घेऊन). हेच दोन पुरूषांबाबत घडेल. पण यासंदर्भात मला एक जाणवतं ते असं की समलैंगिक संबंध असले तरी पुन्हा लग्न आहेच. याचं कारण असं की बहुसंख्यांचा जो प्रभाव आहे, जे सांस्कृतिक-सामाजिक वर्चस्व आहे ते पटकन संपणारं नाही. भिन्नलिंगी असोत किंवा समलिंगी – प्रेम, परस्परसंबंध याबाबत त्यांची वाढ सारखीच केली गेली आहे. प्रेम म्हणजे पझेसिव्हनेस, एकनिष्ठता हे समीकरण रूजलेलंच आहे. समलैंगिक संबंधातही ते अद्याप झुगारून दिलं गेलेलं नाही. लैंगिक निवडीचं स्वातंत्र्य मिळालं आहे, पण एकत्र राहण्याचे जे नैतिक बंध आहेत ते कितपत सैल झाले आहेत हे तपासावं लागेल. त्यामुळे तंत्रज्ञानात्मक क्रांतीमुळे जर आर्थिक क्रांती झाली तर मला वाटतं सगळं बदलेल. आपलं राजकारण, तत्वज्ञान, आपण आज ज्याला ज्याला ‘इझम’ म्हणतो ते जाऊन नवीन ‘इझम’ येतील. याच प्रक्रियेत सहजीवन, नातेसंबंध, त्याच्याशी जोडलेली मूल्यव्यवस्था हेही बदलेल. जे नवीन निर्माण होईल ते कसं असेल हे आत्ता सांगता येणार नाही. पण आजचं बदलेल हे नक्की. सध्या आपण ‘नो इझम काळाचे रहिवासी’ आहोत असं माझं मत आहे.

उत्पल : भविष्याचं स्वरूप कसं असेल हा कुतूहलाचा मुद्दा आहे हे खरंच. पण कामस्वातंत्र्याबाबत विचार करताना आज काय वाटतं? उदा. मला असं वाटतं की ओपन मॅरेजसारखी व्यवस्था आजच्या घडीला चांगली वाटते… 

अतुल : ‘जर मूल हवं असेल तर’ अशी जोड देईन मी इथे. जर मूल हवं असेल तरच तुम्ही लग्न करावं. मग ते ओपन असो किंवा पारंपरिक. मूल नको असेल तर लग्नाची आवश्यकता नाही.

उत्पल : एक उदाहरण घेऊ. मूल दोघांनाही हवं आहे, त्यामुळे लग्न करायचं आहे. आता लग्नाच्या या व्यवस्थेअंतर्गतच कामस्वातंत्र्य असू शकतं का? त्याकरता काय तयारी करावी लागेल?

अतुल : मला असं वाटतं की नवीन पिढीने बौद्धिकदृष्ट्या हे समजून घेतलं पाहिजे की मुळात लग्न ही व्यवस्था आलीच का आणि कशी? कारण होतं असं की आपण जन्मल्यापासून फार वेगळ्या पद्धतीने वाढवले जातो. मी जन्माला येताना एक जात, धर्म, परंपरा, देव घेऊनच जन्माला येतो. मला चॉइसच दिलेला नाहीये. त्यामुळे मोठं होताना मी नास्तिकतेकडे झुकू लागलो तर मला जे लहानपणापासून शिकवलं गेलं आहे त्याला प्रश्न करणं ही माझी पहिली पायरी ठरते. हे बौद्धिक दृष्टीकोन ठेवल्यानेच होऊ शकतं. लग्नाच्या बाबतीतही तसंच व्हावं लागेल. त्यासंदर्भात मला लहानपणापासून विशिष्ट प्रकारे शिकवलं गेलं आहे. लग्न हा जणू काही मनुष्यजीवनाचा नैसर्गिक भाग आहे असं सांगितलं गेलं आहे. तर तो नैसर्गिक भाग नाही हे मला आधी बौद्धिकदृष्ट्या समजून घ्यावं लागेल. ते जर मी समजून घेतलं तर मला माझ्या ‘करप्ट’ झालेल्या भावनांवर, समजुतींवर काम करता येईल. माझी प्रेमाची व्याख्या लहानपणापासून जर पझेसिव्हनेस, जेलसी अशी घडली असेल, एकावरच प्रेम करता येतं असं मी समजत असेन तर यात काहीतरी गडबड आहे आणि ती का आहे हा शोध मला मानववंशशास्त्र, जीवशास्त्र, मेंदूविज्ञान अशा व्हिव्हिडंड अंगांनी घ्यावा लागेल. मग माझ्या लक्षात येईल की आपण खरं तर पॉलीगॅमस आहोत आणि मोनोगॅमीमध्ये या या कारणांनी आलो आहोत. हे समजून घेणं ही आजच्या पिढीसाठी पहिली पायरी आहे.

दुसरी पायरी म्हणजे सकारात्मक बंडखोरीची मानसिक तयारी करणं आणि आपली भावनिक ताकद वाढवणं. कारण आपल्याला पटलेली नवी व्यवस्था प्रत्यक्ष अंमलात आणताना आपल्याला मित्र, आप्तेष्टांना, त्यांच्या पारंपरिकतेला प्रेमानं, पण अत्यंत खंबीरपणे सामोरं जावं लागेल. तेही वारंवार आणि सातत्यानं.

तिसरी पायरी म्हणजे आपल्याला जे कळलं आहे त्याचं उपयोजन करणं. यात काही गोष्टी गुंतलेल्या आहेत. मी जर नास्तिक असेन तर मी माझ्यापुरता नास्तिक राहू शकतो. मी एकटा नास्तिक असू शकतो. मला समूहाची गरज नसते. पण स्त्री-पुरूष संबंध, लग्न, मूल या गोष्टींबाबत असं आहे की मी एकट्याने काही ठरवून चालत नाही. त्यामुळे मग मला काही गोष्टींची नव्याने जाणीव झाल्यावर माझा हा शोध असायला हवा की बौद्धिकदृष्ट्या मला जे पटलंय ते पटलेले आणखी कोण कोण आहेत? इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानामुळे हा शोध सोपा झाला आहे. अशा लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण हा विषयच तसा आहे. केवळ लैंगिक संबंध म्हटले तरी तिथे दोन माणसं लागतातच. त्यात जर मूलही हवं असेल तर मग गोतावळा आणखी वाढतो कारण मग तुम्ही दोघे आणि मूल एवढंच न राहता त्या मुलाचा सामाजिक स्वीकार हाही मुद्दा येतो. शिवाय त्या मुलाचाही काही विचार असणारच. त्याला मोठेपणी असं वाटू शकतं की तुम्हाला रीतसर लग्न करायला काय झालं होतं? त्यामुळे मुलाचा मुद्दा आला की गुंतागुंत वाढते.

स्त्री-पुरूष संबंध, लैंगिक संबंध या गोष्टी अशा आहेत की जिथे तुम्हाला समूहाची – कम्युनिटीची – गरज भासते. त्यामुळे याबाबत काही नवीन व्यवस्था आणू बघताना एक किमान सुरक्षित संख्याबळ निर्माण होणं, तुम्ही बौद्धिकदृष्ट्या जे समजून घेतलं आहे ते प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्याला काही प्रमाणात तरी सामाजिक मान्यता मिळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आज लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्याने मान्य केली आहे. पण हे कधी घडलं? जेव्हा पुरेसं संख्याबळ निर्माण झालं तेव्हा. त्यामुळे नवीन व्यवस्थेचा विचार आधी स्वतः समजून घेणं, सकारात्मक बंडखोरीची मानसिक तयारी करणं, मग समविचारी लोक शोधणं आणि नंतर त्यासाठी व्यापक सामाजिक-कायदेशीर पातळीवर प्रयत्न करणं या टप्प्यांमधूनच आपल्याला जावं लागेल. उपयोजनाच्या पातळीवर प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार फरक पडू शकतो, पण स्त्री-पुरूष संबंध, प्रेम, लैंगिकता या गोष्टींचं खरं स्वरूप बौद्धिकदृष्ट्या समजून घेणं हे प्रत्येक तरूण-तरूणीचं कर्तव्य आहे असं मला वाटतं.

उत्पल : शेवट एका तात्त्विक स्वरूपाच्या  प्रश्नाने करू. ‘लैंगिक स्वातंत्र्य’ या संज्ञेची व्याख्या आपण कशी करू शकतो?

अतुल : ही व्याख्या व्यक्तीनुसार ठरणार आहे. आपलं सगळ्यांचंच एक कंडिशनिंग झालेलं आहे. शिवाय आपली सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक परिस्थिती वेगळ्या आहेत. या सगळ्या चौकटीत आपल्याला लैंगिक स्वातंत्र्य ही संकल्पना मान्य होतेय का, तिचं उपयोजन जमणार आहे का हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. पण एक मात्र आहे. समाज म्हणून आपण लैंगिकतेबाबतची, लैंगिक स्वातंत्र्याबाबतची आपण सोडून इतर प्रत्येक व्यक्तीची तिची म्हणून जी काही व्याख्या असेल ती स्वीकारू शकतो. मग ती प्रस्थापित नीतिनियमांच्या, संकेतांच्या विरूद्ध असली तरी. कायद्यानी आज समलैंगिक संबंध मान्य केलेच. त्यामुळे विविध व्यक्तींची लैंगिक संबंधांबाबतची जी धारणा असेल – मग एखाद्याची मोनोगॅमी असेल तर दुसऱ्याची पॉलीगॅमी – ती प्रोटेक्ट करायचं काम समाज म्हणून आपण करायला हवं. पण धारणा काय असावी , लैंगिक स्वातंत्र्याचा अनुभव घेण्याची पद्धत काय असावी हा व्यक्तीच्या कक्षेतील प्रश्न आहे. एकाच व्यक्तीशी लैंगिकदृष्ट्या एकनिष्ठ राहू इच्छिणाऱ्या व्यक्तीवर पॉलीगॅमी लादणं अयोग्य ठरेल आणि अनेक व्यक्तींशी संबंध ठेवू इच्छिणाऱ्यावर मोनोगॅमी लादणं अयोग्य ठरेल. समाज म्हणून हे वैविध्य सुरक्षित ठेवण्याचं काम आपण नक्कीच करू शकतो. त्याबाबतीतली जनजागृती व्हायलाच हवी. युवल हरारी असं म्हणतो की जीवन जगण्यातली गुंतागुंत जेव्हा एखादा समाज नाकारतो आणि जगण्याचं, मूल्यांचं ‘सपाटीकरण’ करू पाहतो तेव्हा तो समाज फॅसिझमकडे वळतो. असं होऊ न देणं ही समाज म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. विशेषतः आजच्या तरूण वर्गाची.

atul@atulkulkarni.com 

मुलाखत शब्दांकन : उत्पल व. बा. 

मूळ लेख ‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी २०१९ च्या अंकामध्ये छापून आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0