नऊ वर्षे उलटूनही  शाहीद आझमी खून खटल्याचा निकाल नाहीच!

नऊ वर्षे उलटूनही शाहीद आझमी खून खटल्याचा निकाल नाहीच!

सरकारी वकील वैभव बगडे यांच्या मते फिर्यादी पक्षाकडे ठोस पुरावे आहेत व निकाल त्यांच्या बाजूने लागेल असा आत्मविश्वास त्यांना वाटतो.

३,२८८ तबलिगींना ४० दिवसांचे क्वारंटाइन – कोर्टात याचिका
निर्भया प्रकरण – ४ दोषींना २० मार्चला पहाटे फाशी
स्वरा, हर्ष मंदेर प्रकरणात केंद्र, दिल्ली पोलिसांना नोटीस

मुंबईतील मानवाधिकारांसाठी लढणारे वकील शहीद आझमी यांच्या हत्येला एक दशक होत आले आहे. तरीही  या प्रकरणामध्ये कोणालाही शिक्षा झालेली नाही. सरकारी वकील वैभव बगडे यांचे म्हणणे आहे की हा खटला अतिशय धीम्या गतीने पुढे सरकतो आहे व अजूनही तो प्राथमिक टप्प्यामध्येच आहे. खटल्याचा निकाल कधी लागेल हे इतक्या लवकर सांगता येणार नाही असेही ते म्हणाले. परंतु त्यांनी अशी हमी दिली की फिर्यादी पक्षाची बाजू मजबूत आहे. द वायरशी बोलताना बगडे म्हणाले, “आमच्याकडे खटल्याशी संबंधित बरेच पुरावे आहेत व निकाल आमच्या बाजूने लागेल याची मला खात्री आहे.”

निकालाला लागणाऱ्या उशिराबद्दल विचारले असता बगडे म्हणाले की सरकारच्या बाजूने कुठलाही विलंब झालेला नाही. खटल्याच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देताना ते म्हणाले, “फिर्यादी पक्षाच्या युक्तिवादाची तपासणी झाली आहे व बचाव पक्षाद्वारे उलटतपासणी अजून शिल्लक आहे.” त्यांनी असा दावा केला की (काही दिवसांपूर्वी झालेल्या) शेवटच्या सुनावणीमध्ये बचाव पक्षाचे वकील आले नाहीत व (त्यामुळे) साक्षीदारांची तपासणी होऊ शकली नाही. “बचाव पक्षाचे वकील मागच्या सुनावणीसाठी हजर नव्हते. परंतु चांगली गोष्ट ही आहे की या प्रकरणी आणखी स्थगिती दिली जाणार नाही, अशी तंबी न्यायालयाने त्यांना दिली आहे.”

११ फेब्रुवारी २०१० रोजी, शाहीद आझमी यांची कुर्ल्यातील टॅक्सीमेन्स कॉलनीतील त्यांच्या कार्यालयामध्ये हत्या करण्यात होती. त्यांचा खून झाला त्यावेळी आझमी दहशतवादाचा आरोप असलेल्या अनेक मुसलमान तरुणांच्या बाजूने खटले लढत होते. विशेष म्हणजे, केवळ सात वर्षांच्या छोट्याशा कारकि‍र्दीत त्यांनी दहशतवादाचा आरोप असणाऱ्या १७ तरुणांची निर्दोष मुक्तता होण्यास मदत केली होती. त्यांच्या हत्येनंतरही अशा अनेक तरुणांची निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणामध्ये, सुरुवातीला ५ जणांवर ठपका ठेवण्यात आला होता. गँगस्टर संतोष शेट्टी याची ऑक्टोबर २०१४ मध्ये सुटका झाली. उर्वरित चौघांवर ऑगस्ट २०१७ मध्ये कारस्थान रचल्याचा व खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींपैकी पिंटूडगळे व विनोद विचारे यांना सध्या जामीन मिळाला आहे, तर देवेंद्र जगताप व हसमुख सोळंकी तुरुंगामध्ये आहेत. जगताप याने आझमी यांच्यावर गोळी चालविली असा आरोप आहे. विशेष म्हणजे, जगताप यानेसुद्धा खटला सुरु होण्यास विलंब होत असल्याच्या कारणाने जामिनासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

आझमी यांचे कनिष्ठ भाऊ अॅड. खालिद आझमी हे या खटल्यामध्ये मध्यस्थ आहेत. खालिद आझमी यांनी त्यांच्या भावाच्या खुनानंतर वकील म्हणून काम सुरु केले आहे. द वायरशी बोलताना ते म्हणाले, “खटल्याच्या निकालाला उशीर होत असला, तरी सरकारी वकिलांच्या कामाबद्दल ते समाधानी आहेत. १०८ साक्षीदारांपैकी, खटला अजूनही एकमेव प्रत्यक्ष साक्षीदाराच्या उलटतपासणीच्या टप्प्यावर आहे. मला आशा आहे की या प्रकरणामध्ये सत्याच्या विजय होईल व न्याय मिळेल.”

एप्रिल २०११ मध्ये शाहीद आझमी यांच्या खुनातील आरोपींच्या सहकाऱ्यांनी खालिद आझमी यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आहे. न्यायालयाच्या परिसरामध्ये तीन जणांना बंदुकीसकट अटक झाली होती.

११ फेब्रुवारी रोजी खालिद आझमी यांनी शाहीद आझमी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई पत्रकार संघ येथे उपस्थितांना संबोधित केले होते. यावेळी निवृत्त न्यायाधीश एस. एस. पारकर व इतर बऱ्याच विभूती त्यांच्याबरोबर होत्या. मुंबई व्यतिरिक्त, दिल्ली व लखनौ येथेही शाहीद आझमी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सभा व भाषणे ठेवण्यात आली.

(सदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे – https://thewire.in/law/shahid-azmi-murder-case-trial )

अनुवाद: प्रवीण लुलेकर

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0