दिल्ली : राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतो. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रे
दिल्ली : राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतो. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अडीच वर्ष सरकार योग्य चालत असल्याने हे षडयंत्र आखण्यात आले असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे.
राष्ट्रपती पदाच्या संदर्भात शरद पवार आज विरोधी पक्षांच्या बैठकीला दिल्लीमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, “एकनाथ शिंदेंचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्याकडून आमच्याशी संपर्क साधला गेल्यास आम्ही चर्चा करु. आज सायंकाळी मी मुंबईला रवाना होणार आहे. सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होईल.”
शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी अशाप्रकारची बंडाळी झाली होती याची आठवण करुन दिली. यामधून काही नाही काही मार्ग निघेल याची खात्री आहे, असे सांगितले.
एकनाथ शिंदें यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे पत्रकारांनी विचारताच, पवार म्हणाले, “ते हे बोललेत हे मला माहिती नाही. तुमच्याकडूनच मला हे समजत आहे. या सरकारमधील मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि इतर पदं काँग्रेसकडे आहेत. सध्या राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही.”
विधान परिषदेमध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगसंदर्भात बोलताना शरद पवारांनी, क्रॉस व्होटिंग होऊनही सरकार चालते, हा ५० वर्षांचा अनुभव आहे, असे सांगितले. उमेदवार पराभूत झाल्यासंबंधी आम्ही चर्चा करु असे ते म्हणाले.
दरम्यान शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी पोलिसांकडे केली आहे. मतदानानंतर संध्याकाळी मुंबईहून अकोल्याला येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले होते मात्र, त्यांचा फोन बंद असून, कोणताही संपर्क नाही. त्यामुळे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलीस सूरतकडे रवाना झाल्याचे समजते.
COMMENTS