मुंबईः राज्याच्या मुख्यमंत्री गुरुवारी अनपेक्षित रित्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याची घोषणा झाली आणि त्यानंतर तासाभरात उपमुख्य
मुंबईः राज्याच्या मुख्यमंत्री गुरुवारी अनपेक्षित रित्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याची घोषणा झाली आणि त्यानंतर तासाभरात उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आनंदाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही, त्यांचा चेहरा तसं सांगत असल्याचे सूचक विधान केले. त्याच बरोबर आपल्याला २००४, २००९, २०१४ व २०२० या काळात लढवलेल्या लोकसभा व राज्यसभा निवडणुकांच्या संदर्भात प्राप्तीकर खात्याचे ‘प्रेम पत्र’ आल्याचाही खुलासा पवार यांनी केला. या नोटीसा आल्या असल्या तरी आपण त्या त्या वेळी सर्व माहिती पूर्णपणे दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
सुमारे तासभराच्या पत्रकार परिषदेत पवारांनी एकनाथ शिंदे सरकारला शुभेच्छा दिल्या. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील याची कल्पना कोणालाही नव्हती असेही स्पष्ट केले.
पण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या इच्छेविरुद्ध उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचं वाटतंय असे विधान करत पवार यांनी दिल्लीचे अदृश्य हात काम करतात. फडणवीस हे नागपूरचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, त्यामुळे एकदा आदेश आल्यानंतर त्यांना तो स्वीकारणे भाग होते, हे संस्कार आहेत, असे सांगितले.
पवार यांनी शिवसेनेत झालेल्या बंडाबाबतही आपली प्रतिक्रिया दिली. सेनेचे ४० आमदार फुटले, पण असे बंड सेनेने पूर्वीही पाहिलेले आहे. उद्धव ठाकरे लोकांमध्ये गेल्यास ते पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करू शकतात. १९७८ साली माझ्या नेतृत्वाखाली ६७ आमदार निवडून आले होते व नंतर केवळ सहा आमदार माझ्यासोबत राहिले, पुढच्या निवडणुकीत मला सोडून गेलेले सर्व आमदार पराभूत झाले या इतिहासाची पवारांनी यावेळी आठवण करून दिली.
एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार लगेच वेगळे होतील असे वाटत नाही, त्यांच्यात जी मोठी देवाणघेवाण झाली ती मोठी आहे. महाराष्ट्रात हे आमदार असते तर आपण काही करू शकलो असतो, असे पवार म्हणाले. राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी अनेक काळ तयार सुरू होती. त्या शिवाय सूरत, गुवाहाटी घडत नाही. राज्यात २ हजार सीआरपीएफचे जवान मागवले जातात. आपल्या पुलोद प्रयोगात असे काही झाले नव्हते, असेही पवारांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी द्यायची, अशा स्वभावाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी संघटनेची, विधिमंडळाची जबाबदारी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर दिली होती, त्याचा हा परिणाम आहे, असे पवार म्हणाले.
पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर मत व्यक्त करताना राज्यपालांबद्दल सहसा बोलू नये, पण १९६६ पासून आपण सगळे राज्यपाल पाहिले आहेत, प्रत्येक राज्यपालाने महाराष्ट्राच्या परंपरेत भर घातली आहे, या राज्यपालांनी किती भर घातली हे पाहावे लागेल असा टोला हाणला.
COMMENTS