मुंबई : शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय राज्य सरकारने केला असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली. सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणाच्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
आपल्या भाषणात शिंदे यांनी रायगड पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून हिरकणी गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी इंधनावरील कपात केली त्याच धर्तीवर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे सांगितले.
आगामी कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारत असलेल्या समृद्धी महामार्गातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होवून राज्याच्या विकासाला चालना मिळेल. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचे प्राधान्य असेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांच्या कामांना गती देणार आहेत. तसेच शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे एकांगी निर्णय न घेता सर्वांच्या हितासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
राज्य शासन सर्वांना बरोबर घेवून सर्व धर्मियांना समन्यायाने वागणूक देणार असून सर्वांच्या विकासासाठी हे शासन काम करेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही शिंदे यांनी दिली.
COMMENTS