श्रमिक रेल्वेचे वेळापत्रक घसरले, प्रवाशांचे कमालीचे हाल

श्रमिक रेल्वेचे वेळापत्रक घसरले, प्रवाशांचे कमालीचे हाल

नवी दिल्ली, मुंबई : लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या हजारो स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या राज्यात घेऊन जाणार्या श्रमिक ट्रेनवरून महाराष्ट्र सरकार व रेल्वे

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत करोनामुळे बंदसदृश परिस्थिती
लॉक डाऊनचा पर्याय अपुरा – जागतिक आरोग्य संघटना
केंद्राचे आर्थिक पॅकेज : अर्थतज्ज्ञांच्या प्रतिक्रिया

नवी दिल्ली, मुंबई : लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या हजारो स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या राज्यात घेऊन जाणार्या श्रमिक ट्रेनवरून महाराष्ट्र सरकार व रेल्वेदरम्यान मंगळवारी आरोप-प्रत्यारोप झाले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अधिक रेल्वेची मागणी केंद्राकडे केली होती पण रेल्वेने सरकारला मंगळवार मध्यरात्री वेळापत्रक पाठवले त्यातील बहुतांश गाड्या दुपारी १२च्या आत सोडण्यात येतील असे नमूद केल्याचा आरोप केला. एवढ्या कमी वेळात अधिक गाड्यांचे नियोजन का केले, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची पोलिसांची आवश्यकता आहे, पोलिस ईदनंतर लगेच ड्युटीला कसे येणार, असे सवाल परब यांनी गोयल यांना उद्देशून केले.

१ मेनंतर महाराष्ट्राने केंद्राकडे रोज ८० गाड्या मागितल्या असताना प्रत्यक्षात ३० गाड्याच मिळत होत्या. २६ मेनंतर १७२ गाड्यांची मागणी केली होती पण ही मागणी ईद संपल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता मंजूर करून वेळापत्रक पाठवले, या वेळापत्रकातल्या बर्याच गाड्या दुपारी १२ वाजता सोडण्यात येण्याचे नमूद करण्यात आले, हा राज्याला अडचणीत आणून बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप परब यांनी केला.

प. बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर तेथे ट्रेन कमी जाणार होत्या पण रेल्वेने अधिक संख्येने तेथे ट्रेन पाठवण्यामागच्या नियोजनाचा अर्थ काय असाही सवाल परब यांनी केला.

रेल्वेमंत्री म्हणतात, ट्रेन उभ्या आहेत प्रवासी कुठेत ?

दरम्यान महाराष्ट्राकडून झालेल्या आरोपाला उत्तर देताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले. मंगळवारी मुंबईतून १४५ ट्रेन सोडण्यात येणार होत्या. पण मंगळवार सकाळपासून ते दुपारी १२.३० पर्यंत एकही प्रवासी विशेष ट्रेनमध्ये चढलेला नव्हता. १४५ ट्रेनपैकी ४१ ट्रेन या पश्चिम बंगालला रवाना होणार होत्या. उरलेल्या ७४ ट्रेन पैकी २४ ट्रेन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रवाना झाल्या. अजूनही ५० ट्रेन महाराष्ट्रात उभ्या असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले.

प. बंगालला हव्या असणार्या ट्रेनबद्दल गोयल म्हणाले, प. बंगाल सरकारने त्यांना मंजूर केलेल्या ४१ ट्रेन स्वीकारण्यास नकार दिला तर महाराष्ट्र प. बंगालला पाठवणार्या ट्रेन रद्द करण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांनी आपसातील मतभेद दूर करावेत, असेही पियुष गोयल म्हणाले.  महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने मजुरांची जबाबदारी घेण्याची गरज आहे, त्यांनी घरी पाठवण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली पाहिजे असेही गोयल म्हणाले.

श्रमिकांचे प्रवासांतही प्रचंड हाल

लॉकडाऊनच्या काळात विविध राज्यात लाखो स्थलांतरित अडकले होते. या श्रमिकांची पुंजी संपल्याने, त्यांचे रोजगार गेल्याने, नोकरीची कोणतीच शाश्वती न उरल्याने हजारो स्थलांतरित श्रमिक मिळेल त्या वाहनाने, पायपीट करत, सायकलवरून शेकडो किमी अंतर पार करत घरी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. सेव्ह लाइफ फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार २५ मार्चला लॉकडाऊन पुकारल्यानंतर १८ मे सकाळी ११ वाजेपर्यत देशभरात १,२३६ रस्ते अपघात होऊन त्यात ४२३ जण ठार तर ८३३ जण जखमी झाले आहेत. यात अपघातात मरण पावलेले बहुसंख्य स्थलांतरित आहेत.

समाजातल्या मोठ्या श्रमिक वर्गाच्या हालअपेष्टांना आता वाली उरलेला नाही. सरकार पातळीवर अनेक अडचणी त्यांना सोसाव्या लागत आहेत. राजकीय पक्ष त्यांची अडवणूक करत आहेत. प्रशासनाचा गोंधळ सुरू आहेच. यात स्थलांतरितांना त्यांच्या घरी जाता यावे यासाठी १ मे पासून भारतीय रेल्वेने श्रमिक रेल्वे सुरू केल्या. पण या रेल्वेंमुळे त्यांच्या समस्या कमी झालेल्याचेही दिसून येत नाही.

रेल्वेतून जाणार्या शेकडो स्थलांतरितांना अन्न, पाणी वगैरे देत असल्याच्या बातम्या दिसत असल्या तरी अशीही अनेक वृत्ते आहेत की जेथे या प्रवाशांना अन्नपाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रचंड उकाड्याने, अतिश्रमाने काही लहान मुलांचाही मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत.

श्रमिकांच्या अनेक ट्रेन उशीरा पोहचत आहेत, काही ट्रेन स्वतःचा मार्ग सोडून भलत्याच ठिकाणी पोहचत आहेत.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये किमान ४० ट्रेननी आपला मार्ग बदलला असल्याचे म्हटले आहे. यावर रेल्वेचे म्हणणे आहे की, काही रेल्वे मार्गावरील वाहतूक वाढल्याने अशा घटना घडल्या आहेत.

२१ मे रोजी महाराष्ट्रातून वसईहून उत्तर प्रदेशातील गोरखपूरकडे १३९९ प्रवाशांना घेऊन गेलेली ट्रेन ओदिशातील राऊरकेला येथे पोहचली व तेथून ती गोरखपूरला पोहचली. वसई-गोरखपूर रेल्वे प्रवास ३० तासांचा होता पण ही ट्रेन महाराष्ट्र, ओदिशा, प. बंगाल, झारखंड अशा राज्यातून जात ६३ तासांनी गोरखपूरला २४ मेला सकाळी १० च्या सुमारास पोहचली.

गेल्या आठवड्यात गुरुवारी गोव्यातून उ. प्रदेशातील बलिया येथे एक श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. ही ट्रेन नागपूरला गेली. तेथून ती रविवारी दुपारी सुमारे ७२ तासांच्या प्रवासानंतर बलियाला पोहचली.

याच गुरुवारी बंगळुरूतून १४५० श्रमिकांना घेऊन जाणारी ट्रेन बस्तीला जाणार होती पण ती गाजियाबादला पोहचली. रेल्वेच्या मते सर्व रेल्वे मार्ग व्यस्त असल्याने या ट्रेनचा रस्ता बदलण्यात आला. या २० तासांच्या प्रवासात प्रवाशांचे खाण्याचे हाल झाले. रेल्वेने श्रमिकांकडून १०२० रु. घेतले होते. त्यात रेल्वेचे भाडे ८७५ रु. तर बसभाडे १४५ रुपये होते.

अशीच घटना महाराष्ट्रात घडली. २१ मेला लोकमान्य टर्मिनसहून पटनाकडे निघालेली ट्रेन ओदिशात पुरुलिया येथे पोहचली. याही ट्रेनमध्ये प्रवाशांना खाण्यास काही मिळाले नाही. प्रवासादरम्यान ट्रेनमधील पाणी संपले, त्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

१६ मेला सूरतहून ६ हजार श्रमिकांना घेऊन जाणार्या दोन ट्रेन बिहारमध्ये सीवानकडे निघाल्या पण एक ट्रेन ओदिशातील राउरकेला तर दुसरी बंगळुरूला पोहचली. राऊरकेला येथे जाणारी ट्रेन रेल्वे अधिकार्यांना सापडत नव्हती. अनेक तासांनी ट्रेनशी संपर्क झाला व ती ओदिशातून वाराणशीकडे पाठवली.

या ट्रेनचा प्रवास तीन दिवसांचा होता पण प्रवासाला लागले ९ दिवस. ट्रेनचा प्रवासच भरकटल्याने छपरा स्थानकात प्रवाशांनी रेल्वेवर जोरदार दगडफेक केली.

सोशल मीडियावर रेल्वेविरोधात संताप व्यक्त

रेल्वेच्या अशा कारभाराविरोधात ट्विटरवर आनंद बख्शी या प्रवाशाचा अनुभव त्यांच्या मित्राने कथन केला आहे. त्यांच्यानुसार आनंद बख्शी सोलापूरहून इटारसीकडे जाणार होते पण त्यांच्या ट्रेनने रस्ता बदलला व ती नागपूरला पोहचली. पण स्टेशनवर त्यांना रेल्वे प्रशासनाने क्वारंटाइनचा काळ पूर्ण केल्यानंतर पुढे जाण्यास परवानगी दिली जाईल असे सांगितले.

बिहारमधील समस्तीपूरकडे जाणार्या एका ट्रेनमधील प्रवाशांना सांगितले – २२ मे रोजी ते पुण्यातून निघाले होते. ३६ तासाचा प्रवास ट्रेनने ७० तासात पूर्ण केला. काही प्रवाशांनी सांगितले की, त्यांची ट्रेन काही स्थानकांवर १-२ तास थांबून असायची. या काळात अन्न-पाण्यावाचून प्रवाशांचे हाल व्हायचे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0