सोनियाच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा

सोनियाच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असणार्या प्रक्रिया जोपर्यंत अंतिम होत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी याच काम पाहतील, असे पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनुसंघवी यांनी रविवारी सांगितले. काँग्रेस कार्यकारिणी समिती नव्या अध्यक्षपदाच्या प्रक्रियेवर काम करत आहे व त्यासंदर्भातील निर्णय भविष्यात लवकर कळेल, असे मनुसिंघवी म्हणाले. निसर्गाला पोकळी भरावी लागते तसेच राजकारण पोकळी भरल्याशिवाय कार्यरत होऊ शकत नाही, असे मनुसंघवी म्हणाले.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर १० ऑगस्ट २०१९ रोजी सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद आले होते. या पदाचा कालावधी आज, १० ऑगस्टला संपत असून नव्या अध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव पुढे आलेले नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांचे हंगामी अध्यक्षपद पुढे ढकलले जाईल का, यावर राजधानीत रविवारी अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या.

अखेर मनुसंघवी यांनी ऑनलाइन येऊन पत्रकारांना परिस्थिती सांगितली. ते म्हणाले,  हंगामी अध्यक्षपदाची १० ऑगस्टला मुदत संपत असली तरी त्याचा अर्थ हे पद रिकामे राहील असे नाही. सोनिया गांधी पुढेही पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सांभाळतील व नव्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काँग्रेस कार्यकारिणी समितीत चर्चा सुरू आहे, असे मनुसंघवी यांनी स्पष्ट केले.

पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा- थरूर म्हणाले

दरम्यान काँग्रेसचे नेते व खासदार शशी थरूर यांनी काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असे विधान केले आहे. काँग्रेस पक्ष लक्ष्यहीन व दिशाहिन होत असल्याबाबत जनतेच्या मनात धारण होत असताना पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा व तो शोधण्यासाठी वेगाने प्रयत्न करायला हवेत, असे थरूर म्हणाले.

ते म्हणाले, साहस-क्षमता व योग्यतेच्या आधारावर राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाध्यक्ष करावा असा काँग्रेसमध्ये जोर आहे. पण खुद्ध राहुल गांधी यांना हे पद घेण्याची इच्छा नाही. त्यामुळे पक्षाने नवा अध्यक्ष निवडण्यासाठी वेगाने काम करण्याची गरज आहे, असे थरूर म्हणाले.

COMMENTS