अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चार वर्षांतील सर्वात कमी आहे, बी. ई. व बी. टेक साठीच्या विद्यार्थ्यांमध्ये ११% घट झाली आहे.

माध्यान्ह भोजनासोबत नाश्त्याची सोय
‘राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी उपाययोजना’
शिक्षणावरील खर्चाची तरतूद वाढवली

नवी दिल्ली: २१ सप्टेंबर रोजी मानव संसाधन विकास मंत्रालयाने उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार मागच्या पाच वर्षांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या २०१४-१५ मध्ये ३.४२ कोटींपासून २०१८-१९ मध्ये ३.७३ कोटी इतकी वाढली.

२०१८-१९ चे सर्वेक्षण ९४४ विद्यापीठे, ३६,३०८ महाविद्यालये आणि ८,३५४ संस्थांच्या प्रतिसादांवर आधारित आहे. २०११ मध्ये पहिल्यांदा असे सर्वेक्षण करण्यात आले होते, आणि देशातील उच्च शिक्षणाची परिस्थिती समजून घेणे हा त्याचा उद्देश आहे.

एकंदरित उच्च शिक्षणाचे चित्र असे आहे: ७९.८% विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत आहेत, मात्र केवळ १०.८% पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ८०% विद्यार्थी हे एकूण १८७ पैकी केवळ १० अभ्यासक्रमांमध्येच शिकत आहेत. सर्वेक्षणामध्ये हेसुद्धा नमूद केले आहे की ६०.५३% महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत आणि ११.०४% केवळ महिलांसाठी आहेत.

सर्वेक्षण केलेल्या ३६,३०८ महाविद्यालयांपैकी १६.३% मध्ये १०० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, तर केवळ ४% मध्ये ३,००० पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी मोठा – १०.६२% – भाग हा दूरस्थ शिक्षण घेणाऱ्यांचा आहे, त्यापैकी ४४.१५% महिला आहेत.

१८-२३ वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर (Gross enrolment ratio) २०१४-१५ मध्ये २४.३% होते, ते २०१८-१९ मध्ये २६.३% इतके वाढले. उच्च शिक्षणामध्ये महिलांचे पुरुष विद्यार्थ्यांशी असणारे गुणोत्तर, लिंगभाव समानता निर्देशकही वाढला आहे. ३.७४ कोटी विद्यार्थ्यांपैकी १.९२ कोटी पुरुष तर १.८२ कोटी महिला आहेत.

सर्वेक्षणानुसार अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांची संख्या १४.९% आहे तर अनुसूचित जमातींचे विद्यार्थी ५.५% आहेत. इतर मागासवर्गीयांची संख्या एकूण संख्येच्या ३६.३% आहे. याशिवाय, ५.२% विद्यार्थी मुस्लिम आणि २.३% इतर अल्पसंख्यांक समुदायांचे आहेत.

डेटावरून असेही दिसते, की व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चार वर्षांतील सर्वात कमी आहे. विशेषतः बी.टेक आणि एम.टेक. अभ्यासक्रमांमध्ये ही संख्या लक्षणीय कमी झाली आहे. बी.टेक आणि बी.ई. अभ्यासक्रमांमधील संख्या २०१४-१५ मध्ये ४२.५४ लाखांपासून २०१८-१९ मध्ये ३७.७० लाख अशी ११.३% ने घटली आहे.

याच कालावधीत मास्टर्स पदवी घेणाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त घटली – २.८९ लाखांपासून १.३५ लाखांपर्यंत. मात्र शिक्षणशास्त्र, वैद्यकशास्त्र, व्यवस्थापन आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली.

कला अभ्यासक्रमात सर्वाधिक म्हणजे ९३.४९ लाख विद्यार्थी आहेत, ज्यापैकी ४६.९६% पुरुष तर ५३.०३% महिला आहेत. विज्ञान दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये ४७.१३ लाख विद्यार्थी शिकतात व त्यापैकी ४९% पुरुष आहेत. वाणिज्य शाखेत ४०.३ लाख विद्यार्थी असून ५१.२% पुरुष आहेत.

एकूण १६४ देशांमधील ४७,४२७ परदेशी विद्यार्थी भारतामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. ही संख्या २०१६ मधील ४७,७५५ पेक्षा कमी झाली आहे. द वायरच्या पूर्वीच्या लेखात नमूद केल्यानुसार, या क्षेत्राचा प्रचंड   आकार लक्षात घेता ही संख्या खूपच कमी आहे. मात्र भारतातून परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याच्या ११ पट आहे हे लक्षात घेता, मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या ‘स्टडी इन इंडिया’ उपक्रमाचे हे अपयशच म्हणावे लागेल.

यामध्ये नेपाळमधील सर्वाधिक म्हणजे २६.८८% विद्यार्थी आहेत तर त्यापाठोपाठ अफगाणिस्तान (९.८%), बांग्लादेश (४.३८%), सुदान (४.०२%), भूतान (३.८२%) आणि नायजेरिया (३.४%) आहेत.

अंतिमतः, देशातील संशोधनक्षेत्राचे मात्र अत्यंत विदारक चित्रही या सर्वेक्षणातून समोर येते. केवळ २.५% महाविद्यालयांमध्ये पीएचडी अभ्यासक्रम आहे आणि पीएचडी करणाऱ्यांची संख्या एकूण संख्येच्या ०.५% पेक्षा कमी आहे. विद्यार्थ्यांची एकूण संख्या मात्र २०१४-१५ मधील १.१७ पासून २०१८-१९ मध्ये १.६९ इतकी वाढली आहे. पीएचडी करणाऱ्यांची संख्या विज्ञान शाखेमध्ये सर्वाधिक असून त्यापाठोपाठ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामधील विद्यार्थी आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: