महाकाय जहाज हलले, ‘सुएझ’मधील कोंडी सुटली

महाकाय जहाज हलले, ‘सुएझ’मधील कोंडी सुटली

सुएझ कालव्यात गेल्या मंगळवारपासून रेतीत अडकून पडलेले एव्हर गिव्हन हे महाकाय जहाज सोमवारी मोकळे करण्यात आले व तरंगायला लागल्याची माहिती सुएझ कॅनल अथॉरिटीने दिली आहे. या माहितीमुळे वाहतुकीसाठी अत्यंत गजबज असलेला हा जलमार्ग सुरू झाला आहे.

मोदीच शहांना खोडून काढत आहेत – विरोधकांची टीका
अदानी समूह एनडीटीव्ही खरेदी करण्याच्या तयारीत
जितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा?

कैरोः सुएझ कालव्यात गेल्या मंगळवारपासून रेतीत अडकून पडलेले एव्हर गिव्हन हे महाकाय जहाज सोमवारी मोकळे करण्यात आले व तरंगायला लागल्याची माहिती सुएझ कॅनल अथॉरिटीने दिली आहे. या माहितीमुळे वाहतुकीसाठी अत्यंत गजबज असलेला हा जलमार्ग सुरू झाला आहे.

सुमारे 2 लाख 20 हजार टन वजनाचे व 400 मीटर लांबीचे एव्हर गिव्हन हे जहाज वादळी वार्याने सुएझ कालव्यात अडकून पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडली होती पण अनेक जहाजांची कोंडी झाली होती. त्यामुळे युरोप व आशियादरम्यान मालवाहतुकीवर मोठे संकट आले होते.

हे जहाज कालव्यात आडवे अडकल्याने व ते रेती रुतल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कामाला लावण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांत जहाजाच्या तोंडानजीकची रेती मोठ्या प्रमाणात खणून काढण्यात आली. यासाठी स्मिट साल्व्हेज या डच कंपनीचे तंत्रज्ञ बोलावण्यात आले होते. सोमवारी टग बोटीच्या साहाय्याने एव्हर गिव्हनला ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मोठी भरती आल्यानंतर हे जहाज वर उचलले गेले आणि पाण्यात ते वर येऊन तरंगायला लागले. हे जहाज पाण्यात वर आल्याचे पाहून अभियंते व तंत्रज्ञ एकमेकांचे अभिनंदन करत असल्याचे व बोटींचे भोंगे वाजवले जात असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर आले होते.

सुएझ कॅनल अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार सुएझ कालव्यात 369 जहाजे खोळंबली असून त्यात डझनभर कंटेनर शीप, मालवाहतूक जहाजे, तेल वाहतूक करणारी जहाजे, नैसर्गिक वायूंची वाहतूक करणारी जहाजे यांची संख्या अधिक होती.

तेलाच्या किंमतीवर परिणाम

सुएझ कालव्यातील वाहतूक ठप्प झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय तेलबाजारातल्या कच्च्या तेलाच्या प्रतीबॅरल किंमती वाढू लागल्या आहेत. सोमवारी प्रती बॅरल किंमती एक डॉलरने वाढून दर 63.67 डॉलर इतका स्थिर झाला. तर एव्हर गिव्हन हे जहाज ज्या एव्हरग्रीन मरिन कॉर्पोरेशनचे आहे त्याचे शेअर 3.3 टक्क्याने वधारले आहेत. ही कंपनी तैवानची आहे.

गेले अनेक दिवस एव्हर गिव्हन जहाज सुएझ कालव्यात अडकून पडल्याने सुमारे 14 ते 15 कोटी डॉलर इतके नुकसान इजिप्त सरकारला सोसावे लागत आहे. सुएझ कालव्यातील मालवाहतूकीतून इजिप्तला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. या कालव्यातून जगातला सुमारे 15 टक्के जलव्यापार चालतो.

नेमके काय घडले होते

सुएझ कालवा हा रेड सी आणि मेडिटेरेनियन सी (भूमध्य समुद्र) यांना जोडणारा एक अरुंद जलमार्ग आहे. या कालव्यामुळे आशिया व पूर्व आफ्रिकेतील जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा न घालता अटलांटिकमध्ये प्रवेश करता येतो.

सुएझ कालव्यात अडकलेले तैवानी कंपनीच्या मालकीचे एव्हर गिव्हन हे जगातील सर्वांत मोठ्या मालवाहू जहाजांपैकी एक असून, एका वेळी २०,००० कंटेनर्स वाहून नेण्याची त्या जहाजाची क्षमता आहे. हे जहाज अडकल्यामुळे सुएझ कालव्यात वाहतूक कोंडी झाली होती. कालव्यात वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे जहाज मोकळे करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे येत होते. जहाजाच्या आजूबाजूला किमान सहा टगबोट्स असून, त्यांच्याद्वारे जहाज सोडवण्याचा प्रयत्न केला जात होता.

एव्हर गिव्हन कालव्यात अडकल्याने शंभरेक जहाजे सुएझ कालव्यात प्रवेश करण्याच्या प्रतिक्षेत मंगळवार पासून होती. त्यावेळी नऊ जहाजांनी पूर्वीच कालव्यात प्रवेश केला होता.

सुएझ कालवा इजिप्तद्वारे चालवला जातो. हा कालवा १८५९ मध्ये बांधण्यात आला आणि १८६९ सालापासून याद्वारे वाहतूक सुरू आहे. २०१० साली विस्तार व अद्ययावतीकरणाचे मोठे काम पूर्ण झाल्यानंतर आता कालवा १९३.३ किलोमीटर लांब, २४ मीटर खोल आणि २०१५ मीटर रुंद झाला आहे. यामधून जाणाऱ्या जहाजांना कमाल ७७.५ मीटर्सची रुंदी मिळू शकते. २०१० सालापासून उपलब्ध आकडेवारीनुसार, कालव्यातून दररोज ४७ जहाजे जातात. २०२० या एका वर्षांत इजिप्त सरकारने या कालव्याद्वारे ५ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न कमावल्याचे समजते.

एव्हर गिव्हन जहाजावरील यंत्रे अचानक बंद पडल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजू कालव्याच्या काठांवर आदळल्या व ते अडकून बसले होते. प्रशासनाने क्रेन्सद्वारे जहाज जेथे अडकले आहे, तेथील माती काढण्याचे काम सुरू केले होते. पण हे प्रयत्न पुरेसे ठरले नसल्याने जहाजावरील भार कमी केला जात होता.

एव्हर गिव्हन चीनमधून निघून २३ मार्च रोजी तेवफिक बंदरावर पोहोचले. हे जहाज ३१ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता नेदरलॅण्ड्समधील रोटरडॅममध्ये पोहोचणे अपेक्षित होते.

सुएझ कालवा हा कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने व एलएनजी शिपमेंट्ससाठी मोक्याचा मार्ग आहे आणि समुद्रमार्गे होणाऱ्या एकूण तेलव्यापारापैकी १० टक्के, तर जागतिक एलएनजी व्यापारापैकी ८ टक्के या कालव्यामार्फत होतो. गेल्या आठवड्यात एव्हर गिव्हन बंद पडल्यामुळे न्यूयॉर्कमधील ऑइल फ्युचर्सच्या किमती १.३ टक्के वाढल्या होत्या. अर्थात हा परिणाम तात्पुरत्या स्वरूपाचा असेल, असे तज्ज्ञांचे मत होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0