पंजाब भाजप आमदाराला मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल

पंजाब भाजप आमदाराला मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल

चंदीगढः  पंजाबातील मुक्तसर जिल्ह्यातल्या अबोहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अरुण नारंग यांना शनिवारी झालेल्या मारहाणीप्रकरणात पोलिसांनी २५० हून

मुस्लिमांना का वगळले – सुभाषबाबूंच्या नातवाचा सवाल
काश्मीर दडपशाही : आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा
मला चीड आली आहे – नसिरुद्दीन शाह

चंदीगढः  पंजाबातील मुक्तसर जिल्ह्यातल्या अबोहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अरुण नारंग यांना शनिवारी झालेल्या मारहाणीप्रकरणात पोलिसांनी २५० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले असून यात शेतकरी संघटनेच्या सिधुपूरचे अध्यक्ष सुखदेव सिंह बडाबुजर व सदस्य निर्मल सिंह जसीना या शेतकरी नेत्यांचा समावेश आहे.

गेल्या चार महिन्यांपासून मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांवर पंजाबात शेतकर्यांमध्ये असंतोष असून राज्यातल्या भाजप आमदारांवर शेतकर्यांचा राग आहे. यातून शनिवारी भाजपचे आमदार अरुण नारंग यांना मुक्तसर जिल्ह्यातील मलोट येथे काही शेतकरी आंदोलकांच्या संतापाचा फटका बसला.

अरुण नारंग स्थानिक नेत्यांसोबत एका पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी आले असता संतप्त शेतकरी आंदोलकांनी त्यांना घेराव घातला व त्यांच्या वर काळी शाई फेकली. नारंग यांनी पत्रकार परिषद घेऊ नये, असा आंदोलकांचा आग्रह होता.

आंदोलकांचा वाढता विरोध पाहून नारंग यांच्या समर्थकांनी त्यांना एका दुकानात नेले. पण आंदोलकांनी त्यांना दुकानातून बाहेर काढले व त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. काहींनी नारंग यांचे कपडे फाडले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी व काही कार्यकर्त्यांनी नारंग यांना एका सुरक्षित स्थळी हलवले.

या मारहाणीसंदर्भात अरुण नारंग म्हणाले, की काही आंदोलक माझ्यावर धावून आले व त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काहींनी माझे कपडेही फाडले. हे प्रकरण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत आपण नेणार आहोत व पक्ष नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवणार आहोत.

मारहाणीचा सर्व थरातून निषेध

अरुण नारंग यांना झालेल्या मारहाणीचा सर्वच थरातून निषेध होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या हल्ल्याचा निषेध करत राज्यात शांतता बिघडवणार्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. शेतकरी संघटनांमधील कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी अशा हिंसेमध्ये सामील होऊ नये असे आवाहन करत दोषींच्याविरोधात सक्त कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंजाब विधानसभा अध्यक्ष राणा केपी सिंह यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. असे प्रकार अत्यंत निंदनीय असून कोणावरही हल्ला हा लोकशाहीविरोधी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनीही लोकप्रतिनिधींविरोधातले असे वर्तन अत्यंत अयोग्य व निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली. दर्शन पाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचे आवाहन करत कायदा पाळून आंदोलन चालू ठेवावे अशी विनंती केली आहे.

शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. लोकप्रतिनिधीचे संरक्षण करण्यात पोलिस अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेची त्वरित निष्पक्षपणे चौकशीची त्यांनी मागणी केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0