नवी दिल्लीः ११ वर्षे पूर्वीच्या न्यायालयाच्या अवमानाप्रकरणात खुलासा द्यावा किंवा माफी मागावी असे सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यां
नवी दिल्लीः ११ वर्षे पूर्वीच्या न्यायालयाच्या अवमानाप्रकरणात खुलासा द्यावा किंवा माफी मागावी असे सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना मंगळवारी सांगितले. पण भूषण यांनी आपण माफी मागणार नाही पण स्पष्टीकरण देऊ असे न्यायालयापुढे स्पष्ट केल्याचे वृत्त ‘लाइव्ह वायर’ने दिले आहे.
२००९मध्ये प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयातील अर्धेअधिक न्यायाधीश भ्रष्टाचारी असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून मंगळवारी न्यायालयाने भूषण यांनी माफी मागावी किंवा खुलासा द्यावा अशी अट ठेवली. मंगळवारी या खटल्याची सुनावणी न्या. अरुण मिश्रा, न्या. बी. आर. गवई व न्या. कृष्णा मुरारी यांच्या पीठापुढे झाली. या खटल्यात दुसरे पक्षकार तेहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल होते. त्यांनी त्यांचे वकील कपिल सिबल यांच्यामार्फत माफी मागितली. ही सुनावणी इन-कॅमेरा झाली.
सुनावणी सुरू होताच न्या. मिश्रा यांनी भूषण यांचे वकील राजीव धवन यांना सांगितले की, घटनेने दिलेले मतस्वातंत्र्य व अवमानना यात एक सूक्ष्म रेषा असते. ही रेषा भूषण यांनी ओलांडली असे वाटते. त्यावर धवन यांनी या संदर्भात त्यावेळी आपल्या अशीलाने न्यायालयाला आपले म्हणणे मांडू असे सांगितल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या उत्तरानंतर मायक्रोफोनचा आवाज बंद करण्यात आला होता.
प्रशांत भूषण यांच्याविरोधात सध्या न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी दोन खटल्यांची सुनावणी केली जात असून एका प्रकरणात भूषण यांनी ट्विटच्या माध्यमातून सरन्यायाधीशांवर टीका केल्याचा आरोप आहे. दुसरा खटला ११ वर्षांपूर्वी तहलका या मासिकाला भूषण यांनी दिलेल्या मुलाखतीचा आहे. या मुलाखतीत भूषण यांनी सध्याच्या सर्वोच्च न्यायालयातील अर्धेअधिक न्यायाधीश भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. या मुलाखतीतील विधानावरून ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
मूळ बातमी
COMMENTS