३ मेच्या ईदपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवाः राज ठाकरेंची मुदत

३ मेच्या ईदपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवाः राज ठाकरेंची मुदत

ठाणेः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या ठाण्यातील उत्तर सभेत पुन्हा मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करत येत्या ३ मे पर्यंत- ईदपर्यंत- राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवले जात नसतील तर त्यानंतर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी या मुद्द्याबरोबर देशात समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायदा असावा अशीही मोदींचे नाव घेत अपेक्षा व्यक्त केली. लोकसंख्या आटोक्यात आणली नाही तर हा देश फुटेल असेही ते म्हणाले.

आपल्या सव्वादीड तासाच्या भाषणात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील अशा अन्य नेत्यांवर कडाडून टीका केली.

राज ठाकरे म्हणाले, मशिदीवरील भोंग्या संदर्भातील माझी भूमिका नवी नाही. या अगोदर मी अनेकवेळा हा मुद्दा जाहीर भाषणात बोलून दाखवला आहे. आता या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्ष का हल्ला करताहेत असा त्यांनी सवाल केला. राज ठाकरे यांनी पुरावा म्हणून आपल्या काही चित्रफिती सभेत दाखवल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या १८ जुलै २००५ सालच्या आदेशाचे पालन करायला सांगणे यात गैर काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भोंग्यांचा आवाज बेसूर असतो, २४ तास ३६५ दिवस सर्वांना त्रास सहन करावा लागतो. परदेशातही मशिदीवरील भोंग्यावर बंदी आहे. इतरांची शांती बिघडवून प्रार्थना करा असा कोणताही धर्म सांगत नाही. न्यायालयाच्या निर्णयाचे राज्यातील गृहखात्याने अंमलबजावणी करावी अन्यथा मशिदीपुढे हनुमान चालिसा म्हटली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

राज्य सरकारने १२ एप्रिल ते ३ मे या काळात राज्यातल्या सर्व मौलवींची बैठक घ्यावी, त्यानंतर मशिदींवरील भोंगे खाली आलेच पाहिजेत. त्यानंतर मनसेकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ले

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांवर हल्ले केले. पवारांनी आजपर्यंत किती रंग बदलले हे सर्वांना माहिती आहेत. ते मोदींना भेटून आपल्याच नेत्यांना आत टाकायला सांगतात, असा टोला त्यांनी मारला. शरद पवार यांनीच राज्यात जातीयवादाच्या राजकारणाची सुरूवात केली, इतिहासाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच राजकारणामुळे मराठा आंदोलन, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला हवा देण्यात आली. हे विषय आज कुठे आहेत, असा प्रतिप्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. शरद पवार नास्तिक असून ते कोणत्या तरी देवासमोर हात जोडून असतात का ते शोधा असेही राज ठाकरे म्हणाले. पवार त्यांच्या नास्तिकवादी भूमिकेतून धर्माकडे पाहतात. मशिदीवरील वाजणारे भोंगे हा धार्मिक विषय नसून सामाजिक असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

भाषणाच्या सुरवातीला राज ठाकरे यांनी नुकत्याच शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावर बोचरी टिप्पण्णी केली. मुंबईतून ठाण्याला येताना आपल्या ताफ्याला रस्त्यात काही संघटनांकडून विरोध होणार असे पोलिसांनी सांगितले होते. अशी माहिती पोलिसांना अगोदरच कळते पण याच गुप्तचर यंत्रणांना शरद पवार यांच्या घरावर लोक जाणार आहेत हे कळाले कसे नाही, असा टोला ठाकरे यांनी मारला.

सुप्रिया सुळेंवर हल्ला करताना राज ठाकरे यांनी आपल्या भावावर (अजित पवार) ईडीची रेड पडते पण यांच्या घरावर रेड का पडत नाही, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. ईडीला वगैरे आपण घाबरत नाही, कोहिनूर प्रकरणातून आपण लगेचच हात काढून घेतले त्याची माहिती ईडीने मागितली एवढ्यापुरतेच याचा संबंध असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले.

अजित पवारांवर टीका करताना ते म्हणाले, मशिदींच्या भोंग्याच्या आवाजासंबंधी मी या आधीही आवाज उठवला होता, अजित पवारांना तो ऐकू आला नाही. या मशिदीच्या भोंग्यामुळे देशाला त्रास होतोय, यामध्ये धार्मिक विषय कुठेय असा सवाल त्यांनी केला.

COMMENTS