अमेरिकेच्या पूर्ण माघारीनंतर तालिबानचा जल्लोष

अमेरिकेच्या पूर्ण माघारीनंतर तालिबानचा जल्लोष

काबूलः गेली २० वर्षे अफगाणिस्तानच्या भूमीत तैनात असलेले अमेरिकेचे सर्व सैन्य मंगळवारी पहाटे आपल्या मायदेशी परतले. अमेरिकी सैन्याला घेऊन जाणार्या शेवटच्या विमानाने धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर तालिबानचे काही बंदुकधारी धावपट्टीवर आले व त्यांनी हवेत आनंदोत्सव साजरा करत हवेत गोळीबार केला. मंगळवारच्या पहाटे काबूल शहरातही अनेक ठिकाणी हवेत गोळीबार व फटाके फोडल्याचे चित्र दिसून आले. काबूलच्या आकाशात चमचमाट दिसत होता.

मंगळवारी सकाळी तालिबानने काबूल विमानतळ आपल्या ताब्यात घेतला. आमचा देश आता स्वतंत्र, मुक्त व सार्वभौम झाला अशी तालिबानच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली. मंगळवारचा दिवस अफगाणिस्तानच्या इतिहासात ऐतिहासिक म्हणून नोंदवला जाईल. हा देश ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’ म्हणून या पुढे ओळखला जाईल. अफगाणिस्तानातल्या प्रत्येक नागरिकाचे स्वातंत्र्य, त्याची मुक्तता व इस्लामी मुल्यांची पाठराखण केली जाईल. अमेरिकेचा पराभव झाला. आम्हाला आता सर्व देशांशी सौहार्दाचे व मैत्रीचे संबंध हवे आहेत, अशी प्रतिक्रिया तालिबान प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहिद यांनी दिली.

या अगोदर अमेरिकेचे मरिन जनरल फ्रँक मँकेझी यांनी एका व्हीडिओद्वारे अफगाणिस्तानातील सर्व अमेरिकी सैनिक मायदेशी निघाले असल्याचे सांगितले. अमेरिकेच्या २० वर्षांच्या अफगाणिस्तानातील वास्तव्यात अनेक हृदयद्रावक प्रसंग पाहावयास मिळाले. या संघर्षाच्या काळात सर्वांची सुटका करण्याचे आमचे प्रयत्न होते पण प्रत्येकाची आम्ही सुटका करू शकलो नाही. आताही थांबलो असतो तरी शक्य नव्हते, असे मॅकेंझी म्हणाले.

पेटॅगॉनने काबूलमधून मायदेशी निघणारा अखेरचा सैनिक म्हणून अमेरिकेच्या लष्करातील मेजर जनरल क्रिस डोनाह्यू यांचे नाइट व्हिजन कॅमेर्याने टिपलेले छायाचित्र प्रसिद्ध केले.

काबूलमधून निघताना अमेरिकेने आपल्या ७० विमानांची मोडतोड केली. अनेक लष्करी गाड्या, शस्त्रास्त्रे निकामी केल्याचे दिसून आले. मंगळवारी तालिबान विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर अनेक तालिबानी विमानाच्या कॉकपीट व हेलिकॉप्टरमध्ये बसून मोबाइलद्वारे सेल्फी काढत होते.

तालिबानने अफगाणिस्तानाची सूत्रे घेतल्यानंतर दोन आठवड्यात अमेरिका व दोस्त राष्ट्रांनी त्यांच्या सुमारे १ लाख २३ हजार नागरिक, सैनिकांची सुटका केली.

काबूलहून निघालेल्या अखेरच्या विमानात अमेरिकेचे अफगाणिस्तानातील राजदूत रॉस विल्सन हेही होते.

अमेरिकेचा दारुण पराभव

११ सप्टेंबर २००१मध्ये न्यू य़ॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा सूड म्हणून अल-काइदाची अफगाणिस्तानातील सर्व पाळेमुळे उखडून काढण्यासाठी व या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार व संघटनेचा संस्थापक ओसामा बिन लादेन याला जिवंत पकडण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात २० वर्षांपूर्वी आपल्या फौजा उतरवल्या होत्या. त्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात अमेरिकेचे स्वतःचे २,५०० हून अधिक सैनिक व अफगाणिस्तानचे सुमारे अडीच लाख नागरिक ठार झाले. लाखो नागरिक शरीराने कायमचे जायबंदी झाले. लाखो मुले अनाथ झाली होती. अमेरिकेने या संघर्षात २ दशलक्ष कोटी डॉलर इतकी रक्कम खर्च केली होती. पण दोन दशकानंतर ज्या तालिबानला उखडवण्यात अमेरिकेला यश आले होते, त्याच तालिबानला सत्तेवर बसवून अत्यंत मानहानीकारक स्थितीत अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले.

भारताची अधिकृतपणे तालिबानशी चर्चा

अफगाणिस्तानवर तालिबानचे अधिकृतपणे नियंत्रण आल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदा भारताने दोहा येथे तालिबानशी चर्चा केली. भारताचे दूत दीपक मित्तल यांनी तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टॅनिकजई यांच्याशी दोहा येथील भारतीय दूतावासात बैठक घेतली. या बैठकीत अफगाणिस्तानातील अडकेलेले भारतीय नागरिक, अफगाण नागरिक, अल्पसंख्याक अफगाण नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेस आला. अफगाणिस्तानची भूमिका दहशतवाद्यांकडून वापरली जात असल्याबद्दल भारताने चिंता प्रकट केली.

मूळ बातमी

COMMENTS