वयवर्षे जवळजवळ ७० असणारे गौतम नवलखा अनेक आजारांनी त्रस्त आहेत. २७ नोव्हेंबरला नव्या मुंबईतील तळोजा तुरुंगातून त्यांचा चष्मा चोरीला गेला. चष्मा न लावता
वयवर्षे जवळजवळ ७० असणारे गौतम नवलखा अनेक आजारांनी त्रस्त आहेत. २७ नोव्हेंबरला नव्या मुंबईतील तळोजा तुरुंगातून त्यांचा चष्मा चोरीला गेला. चष्मा न लावता जवळपास अंध असलेल्या नवलखा यांना नवा चष्मा मिळावा यासाठी तीन दिवसांनंतर घरी बोलण्याची परवानगी मिळाली. नवा चष्मा आलाही मात्र तुरुंग प्रशासनाने, हा चष्मा न स्विकारल्याने परत गेला.
गौतम नवलखा यांच्या जोडीदार साहबा हुसेन यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की त्यांनी तळोजा तुरूंगात चष्माची एक नवीन जोडी पाठविली होती. “तुरूंगातील अधिकाऱ्यांना कळविले होते, की गौतमला चष्मा नसेल, तर दिसत नाही. त्यामुळे चष्मा पार्सलने पाठविण्यात आला असून, ते पार्सल स्विकारावे आणि परत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. असे सांगूनही हे पार्सल जेव्हा पोस्टद्वारे आले तेव्हा ते स्वीकारण्यास तुरूंग अधिकाऱ्यांनी नकार दिला.”
भीमा-कोरेगाव प्रकरणात मानवाधिकार कार्यकर्ते नवलखा यांना एप्रिलमध्ये अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुरवणी आरोपपत्रात पाकिस्तानची गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) शी नवलखा यांचे संबंध असल्याचा आरोप केला होता.
फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव, आनंद तेलतुंबडे, हनी बाबू, सागर गोरखे यांच्यासह नवलखा यांच्यावर एनआयएने गुन्हेगारी कट, देशद्रोह आणि बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
हुसेन यांच्या म्हणण्यानुसार नवलखा गंभीर ताणामध्ये आहेत आणि आजूबाजूच्या गोष्टी पाहू शकत नाहीत. परिणामी, त्यांचा रक्तदाब वाढला आहे.
तळोजा कारागृहात असलेले फादर स्टॅन स्वामी (८३) यांनी स्ट्रॉ व सीपर द्यावे अशी मागणी तळोजा कारागृह प्रशासनाला गेल्या महिन्यात केली होती. पण तो त्यांना मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. अनेक आजार असल्याने फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती बरी नसते. त्यांना जेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्याकडील सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. या वस्तूंमध्ये स्ट्रॉ व सीपर यांचा समावेश होता. तो आपल्याला द्यावा अशी मागणी स्वामी यांनी अनेकवेळा केली होती. पण राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्वामी यांच्या सर्व वस्तू जप्त केल्याने त्या वस्तू देता येत नाही, असे न्यायालयाला सांगितले होते. त्यावर स्वामी यांनी कारागृह प्रशासनाला एक पत्र लिहून आपल्याला या दोन वस्तू व थंडीचे कपडे द्यावेत अशी विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवारी ४ डिसेंबरला स्वामी यांना त्यांनी मागितलेल्या वस्तू दिल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.
दुसर्या एका घटनेत तेलगू कवी वरवरा राव यांची प्रकृती इतकी गंभीर होती, की मुंबई उच्च न्यायालयाने राव यांना नानावटी रुग्णालयात हलविण्याचे निर्देश दिले. राव यांना एल्गार परिषद प्रकरणात २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती आणि तळोजा तुरूंगात दाखल करण्यात आले होते.
COMMENTS