आपल्याला आणि आपल्यामुळे कोणाला, काय फायदा होतो, होऊ शकतो याचे आडाखे प्रकाशरावांनी नीट बांधले. परंतु संधीसाधूपणाच्या वृक्षाखाली बसल्यावर माणसाला जे ज्ञान प्राप्त होते, त्या ज्ञानाला ‘जरा जास्तच हुषारी’ असं म्हणतात.
गावोगावच्या जत्रांमध्ये एकेकाळी गंमतीदार आरशांचे दालन असे. आपण या आरशांमध्ये स्वतःला पाहिले की उंच, आडवे, लांबुळके, लठ्ठ अशी वेगवेगळी प्रतिबिंबे दिसंत. साधी फिल्म सिनेमास्कोपमध्ये पाहिल्यावर त्यातली माणसे जशी खालून-वरुन दाबून कशीबशी फ्रेममध्ये बसवलेली दिसतात, तसे आपले रुप आरशांत दिसत असे. समजा अशा आरशांमध्ये स्वतःला पाहून एखाद्या बारक्या व्यक्तीने आपण फारच बलदंड झालो आहोत, अशी स्वतःची समजूत करून घेऊन बेटकुळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला, तर? तर त्या व्यक्तीचे नाव ‘प्रकाशराव आंबेडकर’ ठेवले पाहिजे! खरा आरसा त्यांच्यासमोर धरला जाईल तेंव्हा बेटकुळ्या दाखवता दाखवता दंडाला सूज आल्याचे त्यांच्या लक्षात येईल. किंवा बेटकुळ्या दाखवून स्वतःचे हसे करुन घेतल्याबद्दल कदाचित त्यांना बक्षिसही मिळेल. कारण साध्यासुध्या, नॉर्मल आरशात पाहून राजकारण कधी कळत नाही. जागोजागी फसवणारे आरसेच बसवलेले असतात, कधी ते नेत्यांना फसवत असतात, तर कधी अनुयायांना!
अशाच आरशात स्वतःला पाहून, स्वतःच्या राजकीय ताकदीविषयी भ्रम होऊन, प्रकाशराव आंबेडकर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होण्याआधीच ओवेसीच्या हातात गुंफलेला हात उंचावून मंचावर उभे राहिले. आधीच हलाखीच्या स्थितीत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या छातीत त्यामुळे धस्स झालं होतं. परंतु ‘आधी बसू, मग बोलू’च्या पातळीवर चर्चा आली तेव्हा काँग्रेसला कळलं, प्रकाशराव अजूनही जत्रेतल्या त्या आरशातच हरवलेले आहेत.
वयाच्या सत्तरीकडे वाटचाल करत असलेल्या प्रकाशरावांना आपल्या कार्यकर्त्यांचा बेस कधी फार विस्तारता आला नव्हता. कारण त्यांची ती प्रकृतीच नव्हती. रामदास आठवलेंनी बरीच वर्षे कार्यकर्त्यांची गर्दी आपल्या आजूबाजूला धरुन ठेवली होती. पण पुढे पुढे ते स्वतःला सत्तापद मिळवण्याच्या एककलमी कार्यक्रमात एवढे रमले की आपण कोणाचा हात धरतो आहोत, कोणाच्या शेजारी बसतो आहोत याचे भान हरवून बसले. त्यांचे राजकारण आणि त्यांच्या कविता एकाच पातळीवर आल्या – हास्यास्पद! आठवलेंच्या भोवती जमलेले कार्यकर्ते अस्वस्थपणे दुसऱ्या नेतृत्वाच्या शोधात होते. प्रकाश आंबेडकरांचा वातानुकुलीत राजकारणाचा इतिहास लक्षात घेता ते कार्यकर्ते त्यांच्याकडे अपेक्षेने पाहात नव्हते. परंतु आठवलेंची गाडी उताराला लागलेली असताना अचानक प्रकाशरावांच्या हाती भीमा कोरेगावची संधी सापडली.
हे निमित्त करून मासबेस आपल्याकडे वळतो का याची चाचपणी प्रकाशरावांनी केली आणि एका झटक्यात ते ‘मासबेस्ड’ नेते झाले, याचे त्यांना स्वतःलाही आश्चर्य वाटले असेल. अनेकदा, अमूक व्यक्ती गेली म्हणून पोकळी निर्माण झाली वगैरे आपण म्हणतो. परंतु आठवले भाजप-सेनेच्या नादी लागल्यावर दलित नेतृत्वाची पोकळी खरोखरचं निर्माण झाली होती आणि त्या पोकळीत आपण फिट्ट बसू शकतो याची खात्री प्रकाशरावांना भीमा कोरेगाव प्रकरणामुळे झाली. आपल्याला आणि आपल्यामुळे कोणाला, काय फायदा होतो, होऊ शकतो याचे आडाखे प्रकाशरावांनी नीट बांधले. परंतु संधीसाधूपणाच्या वृक्षाखाली बसल्यावर माणसाला जे काही प्राप्त होते, त्याला ज्ञान म्हणत नाहीत, त्याला ‘जरा जास्तच हुषारी’ असं म्हणतात.
आंबेडकर हे नैसर्गिकरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत असायला हवे होते, जसे आठवलेही नैसर्गिकरित्या एवढी वर्षे पवारांच्या घड्याळाला चावी भरत होते. आता आठवले सेना-भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणात दलितांचे भविष्य शोधण्यात रमले आहेत म्हटल्यावर तर प्रकाशरावांना काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये हक्काचे स्थान प्राप्त होणार होते. परंतु प्रकाशरांवांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भविष्यात अंधार दिसला असावा आणि त्यांनी ओवेसीला बरोबर घेऊन ** दलित-मुस्लिम ऐक्याचा वापरुन वापरुन जीर्ण झालेला आणि आजवर कधीही कुणाना निट न बसलेला सदरा घातला. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.
ओवेसींचे राजकारणातले स्थान काय, तर ते जेवढी जास्त जहाल भाषणे करतील तेवढी भाजपची मते वाढतील. कारण आपले राजकारण आणि समाजकारण प्रतिक्रियावादीच आहे. पाकिस्तानचे नेते भारताला जेवढ्या शिव्या घालतील तेवढा भारतात देशभक्तीचा महापूर अधिक येतो तसेच हे आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानची ताकद ती काय, पाकिस्तानचे अस्तित्व ते काय याचा अशावेळी विचार होत नाही. ओवेसीची ताकद आणि प्रभाव याबाबतही तसेच आहे. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, श्रेष्ठत्वाचा भाव, याचे समर्थन करणारा, स्त्रीला तिचे स्थान दाखवून दिले पाहिजे, असे वक्तव्य करणारा योगींसारखा मुख्यमंत्री ज्यात आहे, अशा भाजपला ‘कडवे मतदार’ वाढवण्यास मदत होईल असे राजकारण करणाऱ्या ओवेसीच्या मांडीला मांडी लावून प्रकाशराव बसले, तेंव्हाच त्यांचा हेतू बरा किंवा खरा नसल्याचे लक्षात आले. पुढे जागावाटपाच्या चर्चेच्या वेळी प्रकाशरावांनी ते दाखवूनच दिले.‘त्यांना आघाडीकडून जागा हव्या आहेत की ते आघाडीला जागा देऊ करत आहेत’ असा संभ्रम निर्माण झाला. प्रकाशराव स्वभावाने एवढे विनोदी असतील असे त्यांच्याकडे पाहून वाटत नाही.
महाराष्ट्रातील दलितांच्या दोन महत्वाच्या नेत्यांची आजची अवस्था काय? एक नेता थेट सत्तेच्या उबेत तर दुसरा त्या शेकोटीपासून काही अंतरावर उभा राहून हात शेकून घेत आहे. काँग्रेससाररख्या राष्ट्रीय पक्षाकडे महाराष्ट्रात निवडून येतील, लढत देऊ शकतील असे ४८ उमेदवार नाहीत, राष्ट्रवादीलाही आपली ताकद ४८ मतदारसंघात नाही हे मान्य आहे, परंतु प्रकाशरावांनी ३७ मतदार संघात आपले उमेदवार उभे केले आहेत. समाजातून जात नष्ट करणे हा ज्यांचा प्रमुख अजेंडा आहे त्या प्रकाशरावांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना मात्र प्रत्येकाच्या नावापुढे कंसात त्या त्या उमेदवारांच्या जातीचा आवर्जून उल्लेख केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप हे तर स्वार्थाच्या राजकारणात मूरलेले, जातींचे कार्ड व्यवस्थित चालवण्याची एकही संधी न सोडणारे राजकीय पक्ष आहे. परंतु खुद्द प्रकाशरांवांनीही तेच करावे?
दलित ऐक्याच्या आजवर हजारो वेळा मारून झालेल्या आणि हवेत विरलेल्या हाका आठवले पुन्हा एकदा मारत आहेत. परंतु वास्तव काय आहे? राज्यातल्या दलितांच्या चळवळी संपल्या, दलित साहित्य संपले, विद्रोही संमेलने थंडावली, गटा-तटात विभागलेले दलित नेतृत्व उरले होते आणि त्यातून आठवले-आंबेडकरांना मानणारा वर्ग त्यातल्या त्यात मोठा होता. या दोन नेत्यांनी केवळ स्वतःच्या स्वार्थाचे राजकारण केले. भाजपच्या विरोधी गटांत आठवलेंच्या अनुपस्थितीत तयार झालेली जागा भरण्याची संधी प्रकाशरावांनी गमावली. आता जशी शक्यता दिसते आहे, त्यानुसार लोकसभेत भारतीय जनता पक्ष २००च्या आत राहिला आणि पुन्हा काँग्रेसला, राष्ट्रवादीला बरे दिवस आले तर आठवले, ‘माझी चूक झाली होती, मी भरकटलो होतो’ असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात परत येतील (आणि ते घेतीलही), तेव्हा मात्र प्रकाशराव हळहळतील. भाजपने पुन्हा सत्ता मिळवली तर मात्र मतविभाजनाला हातभार लावल्याबद्दल प्रकाशरावांना बक्षिसाची अपेक्षा करता येईल. भविष्याच्या आरशात काय दिसते ते अजून तरी पुरेसे स्पष्ट नाही.
**काही लोकांनी ‘दाढीला कुरवाळणे’ या शब्द समूहाला, त्यामध्ये मुस्लिम द्वेष दिसून येतो या कारणामुळे हरकत घेतली आहे. ‘वायर मराठी’चा अर्थातच असा विचार नाही. मराठीमध्ये सर्रास वापरला जाणारा हा शब्दप्रयोग असून कोणत्याही प्रकारे अल्पसंख्यांकां विषयी अनादर त्यातून व्यक्त होणे अपेक्षित नाही. तरीदेखील लेखकाला विनंती करून त्यामध्ये उचित बदल केला आहे.
अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.
COMMENTS