थप्पड : पितृसत्ताक व्यवस्थेवर

थप्पड : पितृसत्ताक व्यवस्थेवर

थप्पड चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर आम्ही स्त्रीवादी सर्व कार्यकर्त्यांनी तो बघण्याचा निश्चय केला. सिनेमागृहात मोजून ३० ते ४० प्रेक्षक होते. चित्रपट

‘त्रिज्या’ युरोपातल्या ‘ब्लॅक नाइटस्’मध्ये
आखिर शोले ‘क्लासिक’ क्यों है भाई
घरासारखी सुंदर जागा या जगात नाही…

थप्पड चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर आम्ही स्त्रीवादी सर्व कार्यकर्त्यांनी तो बघण्याचा निश्चय केला. सिनेमागृहात मोजून ३० ते ४० प्रेक्षक होते. चित्रपट बघणारे बहुतेक प्रेक्षक हे तरूण व मध्यमवयीन होते; तर काही बोटावर मोजण्या इतक्या पन्नाशीनंतरच्या महिला होत्या. बघणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते. त्यातील पाच-सहा तरुण तर चित्रपट सुरु असताना मध्येच उठून गेले. त्यांना चित्रपट आवडला नसावा. चित्रपटातील मोलकरणीला मारण्याचे दृश्य आले, की बहुतेक तरूण मुली-मुले हसायची. चित्रपटातील नायिकेला मारल्यानतंर चित्रपट बघणाऱ्यांना खूप वाईट वाटले, हे प्रेक्षकांच्या स्तब्धतेतून व प्रतिक्रियेतून कळाले; परंतु चित्रपट संपल्यानतंर सिनेमागृहातून बाहेर पडताना त्यांच्या प्रतिक्रिया होत्या, “चांगला संसार होता, किती प्रेम करायचा तिच्यावर एका फटक्याने काय होते”, “एवढा अकांडतांडव करण्याची काय गरज होती”. काही वयस्क स्त्रिया होत्या त्यांचे म्हणणे होते, “बाई, आम्हीतर किती मार खाल्ला, या आताच्या मुली थोडंही सहन करत नाही.” वगैरे…

प्रेक्षकांच्या  या प्रतिक्रिया स्त्री हिंसा ही किती सामान्यबाब आहे हे वास्तव पुढे आणते, असे मला वाटते. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ हा चित्रपट भारतीय कुटुंबातील स्त्रीहिंसा या वास्तवाचे अनेक पदर उलगडण्याचा प्रयत्न करतो.  हिंसा ही स्त्रियांबाबत सामान्यबाब बनते. चित्रपटात अनुभव सिन्हा यांनी अमृता, मोलकरीण, नेत्रा (अमृताची वकील), अमृताची आई, सासू, तिच्या भावाची मैत्रीण, तिच्या शेजारीण यासर्व स्त्रियांच्या जीवनपटातून स्त्रीहिंसा ही कशी घडते, ती समाजमान्य कशी बनते, हे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

चित्रपटातील नायिकेला मारल्यानंतर चित्रपटातील वेगवेगळ्या पात्रांकडून आलेल्या प्रतिक्रिया, या हिंसेच्या सामान्यीकरणाची साक्ष देतात. उदा. : नवऱ्याची प्रतिक्रिया, अमू घडले, होत असते यातून पुढे चल (Move on)”  नायिकेची सासू – “थोडा बर्दाश्त करना सिखना चाहिए बेटीयों को” “थोडी बहुत मारपीट तो होतीही रहती है, यही तो प्यार होता है ना सर” – ऑफिसमधील सहकारी, “थप्पडही तो मारा है बसं इतनीसी बात है” – वकील, नेत्रा (वकील) कुटुंबातील काही समस्या आहे ? नवऱ्याचे  प्रेमसंबंध आहे ? तुमचे प्रेमसंबंध आहे? मग केवळ थप्पड मारल्यामुळे घर सोडायचे?.

माझ्या नात्यातील कुटुंबात, शेजारील कुटुंबात, चळवळीतील स्त्री कार्यकर्ते यांच्या कुटुंबात जेव्हा डोकावते व चाचपडण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला नवऱ्याने एकही चापट न मारलेली स्त्री सापडणे अवघड बनते. पण स्त्रीवादी म्हणून जेव्हा उलटा विचार करते व स्त्रियांना विचारण्याचा प्रयत्न करते की तुम्ही तुमचा राग, टेंशन कधी नवऱ्याला मारून काढलेले आहे का अथवा नवऱ्याच्या  प्रेमापोटी कधी त्याला मारले आहे का ? अथवा नवऱ्याचे चूकले म्हणून बायकोने नवऱ्याला मारले का ? तेव्हा शोधूनही एक देखील पुरुष सापडत नाही. हिंसेबाबतचे हे स्त्री-पुरुष व्यस्त प्रमाण आहे. म्हणजेच स्त्रियांवरील हिंसा ही सर्वसामान्य बाब असून समाजातून तिला मान्यता दिली जाते.

चित्रपटातील वरील संवाद स्त्री हिंसेसंदर्भात काही निष्कर्षांपर्यंत पोहचतात. १. स्त्रियांनी त्यांच्यावर होणारी हिंसा ही सहन केली पाहिजे, त्यासाठी घर सोडता कामा नये. २. स्त्रीवर होणारी हिंसा ही तिचा स्वाभिमान, अस्तित्व यावरील हल्ला नसून पतीचे पत्नीवरील प्रेम आहे. ३. थप्पड ही तर फारच किरकोळ बाब आहे, ती घर सोडण्याचे प्रभावी कारण बनू शकत नाही.

स्त्रियांवरील हिंसा ही सामान्यबाब आहे, ती व्यवहारात सर्रास घडत असते. ती समाजमान्य कशी बनते याचे राजकारण समजून घेण्यासाठी समाजातील हिंसेचे राजकारण करणारी स्त्री-पुरुष विषमतावादी म्हणजेच जातपितृसत्ता समाजव्यवस्था समजून घ्यावी लागते.

भारतीय जातपितृसत्ताक समाजात स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याच्यातील पितृसत्तेला हिताचा असलेला विवेकवाद जपण्यासाठी अपरिमित अशा हिंसेचा व क्रौर्याचा वापर केला जातो. पाशवी बळाच्या माध्यमातून आणि  विचारप्रणालीच्या सहाय्याने अशा दोन प्रकारे हिंसा केली जाते.

स्त्रियांनी पुरुषांचे प्रभुत्व स्वीकारावे म्हणून विचारप्रणालीच्या सहाय्याने तिच्यावरील हिंसेला अधिमान्यता मिळवून दिली जाते. म्हणून थप्पड चित्रपटातील सासू, नायिकेची आई, वकील, नायिकेचा पती (विक्रम), विक्रमचा सहकारी मित्र, नायिकेचा भाऊ यांना नायकाने (विक्रम) नायिकेला (अमृता) थप्पड मारून काही चूकले असे वाटत नाही. ती कुटुंब नावाची व्यवस्था जेव्हा नाकारते तेव्हा ती एकटी पडते. प्रत्येकाला नायिकेवर झालेली हिंसा ही फार गंभीर बाब वाट नाही, कारण हजारो वर्षांपासून स्त्री-पुरुष विषमतेला मान्यता ही शाळा-महाविद्यालयातील अभ्यासक्रम, कुटुंबातील संस्कार, समाजातील रुढी-परंपरा, सण-उत्सव, धर्मग्रंथ इत्यादीच्या माध्यमातून पोसली गेली. स्त्री हिंसा ही कुटुंबातून आई, सासू, सासरा अथवा वरिष्ठ बुजूर्ग तर शाळा महाविद्यालयातील शिक्षक यांपासून ती संस्कारीत करून एकापिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द  केली गेली.  ही हिंसा केवळ विचारप्रणालीच्या माध्यमातून पोसली जात नाही; तर त्यासाठी वेळप्रसंगी पाशवी बळाचादेखील वापर केला गेला. उदा. : चित्रपटातील नायिकेच्या गालावर पडलेला थप्पड.

चित्रपटातील नायिका अमृता उठल्यापासून ते झोपेपर्यंत नवऱ्याची  सर्व कामे हसत मुखाने करते. उदा. : सकाळी उठल्याबरोबर झाडांना पाणी टाकणे, नास्ता करणे, घरातील सर्व स्वच्छता करणे, सासूची शुगर मोजणे वगैरे ते तिच्या नित्याची  कामे बनतात. स्त्रियांचं गृहिणीकरण झाल्यामुळे पुरुषाने मारण्याची त्यांचावर वेळ येण्यापूर्वीच त्या सगळी कामे रीतसर करत  असतात. विक्रमने सुद्धा अमृताला घरकामांसाठी मारावे, अशी वेळ तिच्यावर किंवा तिच्या सारख्या गृहिणींवर येत नाही. त्या स्वतःहूनच त्यासाठी तयार झालेल्या असतात. त्यांचे असे स्वत:हूनच घरकाम करणे हे वरवर बघता नैसर्गिक / स्वाभाविक आणि स्वयंप्रेरणेतून वाटत असले तरी ते तसे नसते. त्यासाठी कुटुंबातील रोजच्या वर्तनविषयक शिष्टाचारांमधून, पाठ्यपुस्तकांतून, धार्मिक ग्रंथ, करमणुकीची साधने यातून तिच्यावर तसे वर्तन करण्याची संस्कार केले जातात.

जेव्हा केवळ संस्कारातून म्हणजेच विचारप्रणालीतून कोणतीही विषमतावादी व्यवस्था दिर्घकाळ स्वतःचे अस्तित्व टिकवून धरू शकत नाही, तेव्हा वेळप्रसंगी पाशवी बळाचादेखील वापर केला जातो. उदा.: कुटुंबातील पारंपरिक सर्व जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मोलकरणीला नवरा तिला नियंत्रित करण्यासाठी रोज रात्री हिंसेचा वापर करतो. अनेक नवरे छोट्या-छोट्या कारणांवरून बायकांना मारताना दिसतात. बहुतेक व्यसनी वडील, मुले अथवा नवरे कुटुंबातील स्त्रियांवर सर्रास क्रूर अशा हिंसेचा वापर करतात.

सिमोन दि बोव्हुआर ही स्त्रीवादी अभ्यासिका ‘द सेंकड सेक्स’ या पुस्तकात असे मत मांडते की, “ स्त्री ही जन्मत नाही तर ती घडविली जाते”. स्त्रीचे स्त्रीत्व व पुरुषाचे पुरुषत्व घडविणारी ही प्रक्रिया विचारप्रणालीच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पाडली जाते. म्हणून चित्रपटातील नेत्रा, सासू, अमृताची आई, या स्त्री नायिका असल्यातरी त्यांच्यावरील संस्कार हे स्त्री-पुरुष विषमतेला पोषक राहिलेले आहेत. परिणातः या सर्व स्त्री नायिकेला  पुन्हा कुटुंबात परतण्यासाठी प्रयत्नरत असतांना दिसतात. त्यांच्या तोंडून वधविलेले संवाद हे स्त्रीहिंसेचे समर्थन करणारे त्याकडे दुर्लक्ष करणारे ठरतात. जशा स्त्रिया घडतात तसेच पुरुषदेखील घडत असतात म्हणून आपल्या बहिणीवर केलेली हिंसा ही भावासाठी गंभीर बाब, बहिणीच्या आत्मसन्मानाची बाब बनत नाही.

कल्पना कन्नबिरन त्यांच्या The Violence of Normal Times या पुस्तकात म्हणतात, की केवळ मारणे, बलात्कार करणे या अर्थाने हिंसेकडे न पाहता स्त्रियांप्रती समाजामध्ये असलेला विषम व्यवहार हा देखील हिंसेचाच एक प्रकार आहे. हिंसेच्या स्वरूपाकडे व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे. स्त्रियांना त्यांचे हक्क-अधिकार नाकारणे. त्यांना वारंवार दुय्यमत्वाची जाणीव करून देणे, त्यांना निर्णयप्रक्रियेतून वगळणे, तिच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करणे, तिला घालून-पाडून बोलणे ही देखील न दिसणारी मानसिक अशी हिंसाच आहे.

अनुभव सिंहा यांनी नेत्राच्या नवऱ्याने तिचे कर्तृत्व नाकारून तिला केवळ स्वतः व स्वतःचे वडिल यांच्या वर्चस्वखाली ठेवणे, तिची इच्छा नसतांना उपभोग घेणे हीदेखील हिंसा आहे. कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षांना बगल देणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. चित्रपटातील नायिका स्वतःला आवडणाऱ्या  नाच या कलेत गोल्ड मेडल असतांनाही ती कुटुंबासाठी “नाच” या कलेत करियर करू शकलेली नाही. तिची आई गाण्याची आवड असतांना त्यास मूरड घालते. स्वतःच्या इच्छा-आकांक्षाना कुटुंबासाठी सोडून देणे ही देखील एकप्रकारची पितृसत्तेतून सतत घडणारी हिंसा आहे, हे अतिशय अचूकपणे हेरण्याचे काम चित्रपटात केले गेले आहे.

समाजव्यवस्था स्त्री-पुरुष विषमतावादी, जातिव्यवस्थावादी व भांडवली असल्याने हिंसा ही सर्व स्तरात होताना दिसते. ती धर्म, जात, वर्ग, भाषा यासर्व क्षेत्रात राजकारण, शिक्षण, रोजगार, संस्कृती, प्रशासन यामाध्यमातून वावरतांना दिसते. फक्त हिंसेची तीव्रता ही कमी-अधिक राहिलेली दिसते. चित्रपटात दाखविलेली हिंसा ही मोलकरीण या कनिष्ठ जातवर्गात अधिक आहे, तर उच्चमध्यमजातवर्गीय कुटुंबात तिची तीव्रता तुलनेत कमी राहिलेली दिसते. चित्रपटातून स्त्री समस्येचा वेध घेताना जातीचे वास्तव अधोरेखित करण्याचे टाळले जाते.  परंतु भारतीय जातपितृसत्ताक समाजात स्त्रीशोषण हे जातिव्यवस्था व पितृसत्ता यांच्या एकत्रितपणाचा परिपाक आहे. म्हणून या चित्रपटात दोन्ही स्त्रिया ह्या जातपितृसत्तेच्या बळ राहिलेल्या आहेत. दोघींचीही मुक्ती ही जातपितृसत्तेचा वेध घेऊन व तिच्या अंताची व्यूहरचना आखूनच केली जाऊ शकते.

“उसने मुझे मारा; पहिली बार, नही मार सकता इतनीसी बात है और मेरी पिटीशन भी इतनीसी है.” हा नायिकेचा संवाद तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधाची ठिणगी बनतो.  थप्पडच्या अनुशंगाने स्त्रीहिंसेच्या विरोधात सर्व चित्रपट फिरतो. चित्रपटाचा शेवट हा अतिशय चांगला आहे. बहुतेक चित्रपट, कथा, नाटके हे कुटुंब व समाजातील स्त्री-पुरुष विषमतेवर उभ्या असणाऱ्या कुटुंबसंस्थेविरोधात भाष्य करतात; परंतु ते नाकारण्याचे धैर्य ठेवत नाही. यादृष्टीने प्र. के. अत्रे यांचे नाटक बघण्यासारखे आहे. प्र. के. अत्रे यांच्या नाटकातील नायिका (कमल) कुटुंब नावाची शोषणवादी चौकट ओलांडते; परंतु शेवटी ती पुन्हा मुलांसाठी कुटुंबात येते. म्हणजेच स्त्री कितीही क्रांतीकारी असली तरीदेखील ती कुटुंबाचे पाश तोडू शकत नाही, असे भ्रामक वास्तव अत्रेंचे नाटक पुढे आणते. स्त्रीला कुटुंबाशिवाय पर्याय नाही, स्त्रियांच्या मुक्तीच्या राजकारणाच्या दिशेने जाणारे नाटक शेवटी स्त्रियांच्या गृहिणीकरणावर येऊन थांबते. थप्पड हा चित्रपट जातपितृसत्तेच्या पायावर उभ्या असलेल्या शोषणवादी कुटुंबाच्या विरोधात बंड करतो. चित्रपटातील नायिका अमृता व नेत्रा घर सोडून स्वतःचा स्वाभिमान, आत्मसन्मान व ओळख तयार करण्यासाठी नव्याने मुक्तपणे उभ्या रहातात.

हा चित्रपट स्त्रीहिंसेविरोधात एल्गार पुकारून कुटुंबव्यवस्था नाकारलेला असला तरी देखील मला खटकलेली बाब म्हणजे चित्रपट सृष्टीत बनलेल्या स्त्रीप्रश्नावरील बहुतेक चित्रपटात स्त्री शोषणाच्या जाणीवा समजून घेणारा पुरुष हा हिरो केला जातो. लज्जासारखा हुंडा, स्त्रीहिंसा, स्त्रीचे दुय्यमत्व यांचा वेध घेणाऱ्या चित्रपटात मनिषा कोईराला या हिरोईनला वाचविण्यासाठी अजय देवगण नावाचा पुरुष अचानक उपस्थिती होतो. थप्पड चित्रपटातदेखील अमूवर स्त्री म्हणून झालेली हिंसेची जाणीव सदर चित्रपटातील स्त्रिया समजून घेण्यापेक्षा (ज्या स्त्रिया या नवऱ्याच्या रोज मानसिक व शरिरीक हिंसेला सामोरे जातात) एक पुरुष जो अमूच्या वडिलांच्या भूमिकेत आहे, तो अधिक समजून घेताना दाखविला आहे. पुरुष दिग्दर्शकांची ही मर्यादा असावी.

या चित्रपटात अमृताच्या भूमिकेतील तापसी पन्नू, माया सराओ, नायला ग्रेवाल, दिया मिर्झा, तन्वी आजमी, रत्ना पाठक, गितिका वैद्य या अभिनेत्रींच्या चांगल्या अभिनयामुळे स्त्रीहिंसेचा मुद्दा अधिक सविस्तरपणे प्रेक्षकांसमोर ठेवता आला आहे.

सुप्रिया गायकवाड, या स्त्री मुक्ती संघटना, नांदेडच्या अध्यक्षा आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0