विरोधकांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवणं. २९ सप्टेंबर २०१९ रोजी 'मेल'नं बॅनर हेडलाईन दिली - युरोपियन युनियनमधे रहा म्हणणाऱ्या खासदारांची १
विरोधकांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवणं.
२९ सप्टेंबर २०१९ रोजी ‘मेल’नं बॅनर हेडलाईन दिली – युरोपियन युनियनमधे रहा म्हणणाऱ्या खासदारांची १० डाऊनिंग स्ट्रीट चौकशी करणार.
संदर्भ होता बेन अॅक्टचा. कोणताही करार न होता ब्रेक्झिट होऊ नये, कराराला वेळ मिळावा यासाठी वाटाघाटींची मुदत वाढवून देणारी तरतूद करणारा कायदा पार्लमेंटनं मंजूर केला होता. हा कायदा करण्यासाठी तो करणारे खासदार हिलरी बेन आणि त्यांचे सहकारी लेबर पक्षाचे खासदार यांनी परदेशांकडून पैसे घेतले या आरोपाची चौकशी १० डाऊनिंग स्ट्रीट म्हणजे पंतप्रधान कार्यालय करणार आहे अशी ही बातमी होती.
१० डाउनिंग स्ट्रीटवरच्या दोन स्त्रोतांचा हवाला बातमीत देण्यात आला होता.
लेखकानं १० डाऊनिंग स्ट्रीटला फोन करून चौकशी केली. तिथं उत्तर मिळालं की अशी कोणतीही चौकशी होत नाहीये.
मग ही बातमी पेपरात आली कशी?
लेखकानं खोलात जाऊन चौकशी केली.
सरकारनं चौकशी करण्याचं ठरवलंच नव्हतं. पंतप्रधान बोरीस जॉन्सन ब्रेक्झिटमधे कोणताही करार न करता बाहेर पडण्याच्या मताचे होते. युरोपियन युनियनमधून बाहेर पडू नये, बाहेर पडायचं झाल्यास एक चांगला करार करून बाहेर पडावा या मताचे खूप खासदार होते, त्यांचा पाठिंबा घेऊन वरील बेन कायदा करण्यात आला होता. त्यांना बदनाम करण्याचा हा जॉन्सन यांचा डाव होता.
१० डाऊनिंग स्ट्रीटची एक रचना आहे, कार्यपद्धती आहे. १० डाऊनिंग स्ट्रीटमधे सनदी नोकर असतात, ते कोणत्याही पक्षाला बांधिल नसतात. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशी चौकशी होत नाहीये.
१० डाऊनिंग स्ट्रीटमधे पंतप्रधानांचं खाजगी कार्यालय असतं. तिथं पंतप्रधानांचे सहाय्यक असतात, ते पंतप्रधानांचंच ऐकत असतात. परंतू शेवटी पंतप्रधान पक्षाला बांधिल असतो, पक्षाच्या विविध समित्या असतात, सल्लागार मंडळं असतात, तिथं महत्वाच्या गोष्टीची चर्चा होते व नंतरच पंतप्रधान त्यावर कारवाई करतो.
वरील दोन्ही स्त्रोतांनी सांगितलं की चौकशी होत नाहीये.
मग १० डाऊनिंग स्ट्रीटवरून बातमी कोणी दिली?
वरील बातमीचा जनक होता डॉमिनिक कमिंग्ज. हा माणूस बोरीस जॉन्सन यांचा ज्येष्ठ सल्लागार म्हणून नेमला गेला होता. हा माणूस टोरी पक्षाचा नव्हता आणि सनदी नोकरही नव्हता. त्यामुळं तो ना पक्षाला बांधिल होता ना सरकारी यंत्रणेला. पण पंतप्रधानाचा सल्लागार असल्यानं तो म्हणतो ते पंतप्रधान आणि सरकारला म्हणायचं असतं असं लोकांना भासतं.
हा लबाड मार्ग बोरिस जॉन्सन यांनी शोधून काढला.
लेखकानं या प्रकरणावर दीर्घ बातमी तयार केली. लेखक जिथं काम करत होता त्याही पेपरनं लेखकाची बातमी छापली नाही. ब्रिटनमधल्या कोणत्याही मोठ्या पेपरनं ही बातमी छापायला नकार दिला. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी गार्डियन आणि मिरर यांनी या बातमीतले काही तुकडे प्रसिद्ध केले पण जॉन्सन यांची लबाडी आणि खोटंपणा उघड करायचं टाळलं.
लेखकाचा आरोप आहे की पत्रकार जॉन्सन यांचे समर्थक तरी आहेत किवा जाणून बुजून ते जॉन्सन यांचा खोटेपणा नोंदवायचं टाळतात.
#
बोरीस जॉन्सन स्पेक्टेटरचे संपादक होते, लेखक पीटर ओबोर्न यांना त्यांनी पेपरात घेतलं. काळ होता वॉर ऑन टेररचा. टोनी ब्लेअर यांच्याकडं कोणतीही विश्वासार्ह माहिती नसतांना सद्दाम हुसेन महासंहारक शस्त्र तयार करत आहेत असं पार्लमेंटला आणि जनतेला सांगत होते. बोरीस जॉन्सननी त्या वेळी ब्लेअरना सोलून काढलं. त्यांनी लिहिलं “ब्लेअर गृहीतकाचं रुपांतर वस्तुस्थितीत करताहेत..लोकांना पटवण्यासाठी असे अप्रामाणिक मार्ग वापरणं योग्य नाही.. ते जनता आणि संसदेला तिरस्कारानं वागवतात..ब्लेअरची इंपीचमेंट झाली पाहिजे…”
#
१९७९ ते १९९७ ब्रिटनमधे हुजूर पक्ष (थॅचर, मेजर) सत्तेत होता. या काळात लेबर पक्षाची समजूत झाली की नोकरशाही आणि माध्यमं लेबरविरोधी झालीत आणि त्यांनी कट करून जनमत लेबरविरोधी केलं आहे, त्याचमुळं निवडणुकांत लेबर पक्ष हरतो.
टोनी ब्लेअरनी ठरवलं की सतत काही ना काही तरी बातम्या पेरून माध्यमांत चमकत रहायचं. बातम्या पिकवण्याचा धंदा त्यांनी सुरु केला. प्रधान मंत्र्याचं कार्यालय बातम्या पिकवणाऱ्या लोकांनी त्यांनी भरून टाकलं.
रॉबिन कुक या परदेश मंत्र्यानं एक बाई ठेवली होती. ते प्रकरण पेपरात छापून आलं, पार्लमेंटात गाजू लागलं. बदनामी होऊ लागली. ती चर्चा दाबून टाकायची कशी?
ब्रिटानिया नावाची एक शाही बोट जुनी झाली होती.ती मोडीत काढावी लागणार होती. पण तिला एवढी प्रतिष्ठा आणि इतिहास होता की ब्रिटीश जनता त्या बोटीबाबत हळवी होती. ब्लेअरच्या बातमीशेतकऱ्यांनी बातमी पिकवली की सरकार खूप खर्च करून त्या बोटीचा जीर्णोद्धार करणार आहे. दोन दिवस बातमी गाजली. लोक रॉबिन कुक प्रकरण विसरले.
तिसऱ्या दिवशी बातमीदार जीर्णोद्धाराचा तपशील मागू लागले. खासदारही विचारू लागले की तसा निर्णय केव्हां झाला.
बोंबलायला काय सांगणार. कारण तसा निर्णय झालाच नव्हता. पत्रकार छळू लागले.
मग ब्लेअरनी पंतप्रधान कार्यालयातल्या बातमीशेतकऱ्यांना सांगून एक नवी बातमी पिकवली. हाँगकाँगचे गव्हर्नर म्हणून निवृत्त झालेल्या क्रिस पॅटन यांची चौकशी सरकार करत आहे. त्यांनी काही गुप्त माहिती आपल्या चरित्रकाराला देऊन गुप्तता कायद्याचा भंग केला आहे, या आरोपाची चौकशी ‘एमआय-५’ ही संस्था करत आहे असं पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आल्याचं पेपरांनी छापलं.
क्रिस पॅटन वाट पहात होते की कधी पोलिस चौकशीसाठी त्यांच्याकडं पोचतायत. खासदार, पेपरवाले चौकशी करू लागले. डिंबलबी या चरित्रकाराला बातमीदारांनी फोन केले. ते म्हणाले की त्यांच्या पुस्तकात अशी बेकायदेशीर माहिती अजिबातच नाहीये, त्यांनी पुस्तकाचा आराखडा कायदा विभागाकडून मंजूर करून घेतला आहे.
आठवडाभरात ब्लेअर उघडे पडले.
मग ते नवी बातमी पिकवण्यामागं लागले…
#
पीटर ओबोर्न ब्रिटीश पत्रकार आहेत. ब्रिटनमधल्या प्रमुख पेपरात त्यांनी त्यांनी बातमीदारी केलीय. १० डाऊनिंग स्ट्रीट आणि व्हाईट हॉल या बीटवर ते राजकीय बातम्या गोळा करत असत.
ब्लेअर यांच्या कारकीर्दीत त्यांची पत्रकारीता सुरु झाली. माध्यम हा लोकशाहीचा चौथा खांब आहे, वाचकांना सत्य सांगितलं पाहिजे या सिद्ध तत्वाला अनुसरून त्यानी पत्रकारीता सुरु केली.
त्यांचे पत्रकारीतेतले पहिले सहकारी आणि काहीसे गुरु म्हणजे बोरीस जॉन्सन. जॉन्सन यांच्या व्यक्तिमत्वानं आणि पत्रकारीतेनं ते प्रभावित झाले होते. जॉन्सन यांच्या संपादकत्वाखाली स्पेक्टेटर या पेपरात ओबोर्न यांची पत्रकारीता सुरु झाली. आणि त्यांचं ताजं पुस्तक जॉन्सन हे कसे खोटारडे पंतप्रधान आहेत या विषयावर आहे. या आधी त्यांचं The Rise of Political Lying हे पु्स्तक प्रसिद्ध झालंय आणि त्या पुस्तकात त्यांनी टोनी ब्लेअर हे कसे कायम खोटं बोलत असत ते तपशीलवार मांडलं आहे.
लेखक म्हणतो “जॉन्सन आणि ट्रंप यांना वाटतं की सत्य हे एक हत्यार आहे, त्याचा आकार कसाही बदलता येतो, ते रद्द करता येतं, ते गरज पडेल तेव्हा कसंही वापरता येतं…माहिती (इन्फर्मेशन)चं मूल्यमापन पुरावा या कसोटीवर किंवा लोकांना काय समजतं यावरून होत नाही, माहिती आपल्या बाजूची असली की ते सत्य असतं..”
सर्रास खोटे आकडे देऊन जॉन्सन लोकांची दिशाभूल करतात आणि उघडे पडतो याची पर्वा करत नाहीत.
ब्रिटीश राजकारण, राज्यव्यवहार यांना असलेली परंपरा लेखक पुस्तकात सांगतात. मंत्र्यांनी लोकसभेसमोर सत्य मांडलं पाहिजे आणि ते न मांडणं हा गुन्हा आहे हे ते इतिहासातले दाखले देऊन सांगतात. युद्ध प्रसंगी माहिती लपवावी लागत असते, काही वेळा लोकांचं हित लक्षात घेऊन सत्य सांगणं टाळावं लागतं. परंतू ते प्रसंग अपवाद असतात, तो नियम होत नाही.
लेखक म्हणतो की आता अशी परिस्थिती आहे की पंतप्रधान खरं बोलूच शकत नाहीत.
लेखकाचं लक्ष खोटारडेपणावर असल्यानं राजकारणात खोटं कां बोललं जातं याची समाजशास्त्रीय चर्चा लेखकानं केलेली नाही. परंतू एव्हाना हे लक्षात आलं आहे की निवडून येण्याची प्रक्रियाच अशी झाली आहे की प्रामाणिक माणूस निवडून येऊ शकत नाही. निवडणुक खर्चिक झाली आहे निवडणुकीला फार पैसा लागतो आणि तो ज्यांच्याकडून येतो त्या माणसांचे हितसंबंध जपताना बेकायदेशीर व्यवहार करावे लागतात आणि अर्थातच ते व्यवहार लपवतांना खोटेपणा करावाच लागतो.
#
ब्लेअर पत्नी आणि मुलांसह इजिप्तमधे शर्म अल शेख या ठिकाणी गेले आणि एका आलिशान बंगल्यात राहिले. पत्रकार आणि पार्लमेंटला त्यांनी सांगितलं की ती त्यांची खाजगी सहल होती, त्याचा खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून केला होता. काही दिवसांनंतर सरकारी नोंदींतून सिद्द झालं की त्यांचा सारा खर्च इजिप्शियन सरकारनं केला होता.
लक्ष्मी नारायण मित्तल यांना रोमानियातला एक पोलाद कारखाना विकत घ्यायचा होता. ब्लेअर यांनी रोमानियाच्या पंतप्रधानाला एक पत्र लिहून तो कारखाना मित्तल यांना द्यावा असं सुचवलं. पंतप्रधानानं असं पत्र लिहिणं योग्य नाही अशी टीका झाली. आपण ते पत्र खाजगीरीत्या लिहिलं, पंतप्रधान म्हणून नव्हे असा खुलासा ब्लेअर यांनी केला.
मित्तल यांनी लेबर पार्टीला १.२५ लाख पाऊंडांची देणगी दिल्यानंतर आठवड्याभरानं ब्लेअर यांनी रोमानियाच्या पंतप्रधानाला पत्र लिहिलं होतं.
#
ब्लेअर सतत, एका मागोमाग एक, खोटं बोलत रहातात, इतकं की लोकांची डोकी बधीर झाली.
The Assault on Truth.
The Rise of Political Lying
Peter Oborne
COMMENTS