इसवी सनाच्या सोळाव्या शतकात युरोपात धर्मसुधारणेच्या विचारांनी खळबळ माजवली होती. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांमध्ये मतमतांतरं होतीच. पण मार्टिन लूथरच्या
इसवी सनाच्या सोळाव्या शतकात युरोपात धर्मसुधारणेच्या विचारांनी खळबळ माजवली होती. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांमध्ये मतमतांतरं होतीच. पण मार्टिन लूथरच्या पाठिराख्यांनी धर्मातील ढोंगीपणावर टीका करत सनातन ख्रिश्चन धर्माला आपल्या चालीरीतींचा पुनर्विचार करायला भाग पाडलं.
हा पुनर्विचार आणि धर्मसुधारणेच्या चळवळीला प्रत्युत्तर देण्यासाठी ट्रेंट या ठिकाणी सनातन ख्रिश्चन धर्माची मोठी संसद भरली होती. अनेक वर्षं तिचं काम चाललं. या संसदेनं धर्माला मोकळं आणि वाहतं करण्याऐवजी अनुयायांच्या वागणुकीवर कडक बंधनं आणायचे प्रयत्न केले. सांस्कृतिक पाळत ठेवण्याचा हा प्रकार काही काळ चालला. पण त्यालाही सव्वाशेर कलाकार मिळालेच. त्यातल्या एकाचं नाव पावलो व्हेरॉनीज.
व्हेरॉनीजनं येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या भोजनाचं एक भव्य चित्र रंगवलं होतं. या चित्रामधले समकालीन संदर्भ सनातनी धर्मसंसदेला पटले नाहीत. त्यामुळे त्यांनी व्हेरॉनीजला चौकशीसाठी बोलावून घेतलं. त्या प्रश्नोत्तरांपैकी काही अशी होती. –
प्रश्न – हा हातावर पोपट घेतलेला विदूषकासारखा दिसणारा कोण आहे? त्याला तू चित्रात का घुसवलंयस?
उत्तर – अहो तो शोभेपुरता आहे तिथे. चित्रांमध्ये रिकाम्या जागेत अशा लोकांना नेहमीच रंगवलं जातं.
प्रश्न – आणि हे जर्मनांसारखे दिसणारे हातात कुऱ्हाडी घेतलेले लोक- त्यांचं काय आहे इथे?
उत्तर – इथे मला चार शब्द बोलावे लागणार आहेत.
प्रश्न – बोल तर.
उत्तर – आम्ही चित्रकार लोक असतो ना, ते कवी किंवा वेड्या लोकांसारखे जरा अघळपघळ असतो. मी रंगवलेत ते हाती कुऱ्हाड घेतलेले जर्मन लोकच पहा ना. एक जण पितोय. एक जण जिन्याच्या पायथ्याशी रेलून खातोय- पण दोघंही आपलं काम पडेल तेव्हा करायला एकदम तयार आहेत. आता ज्या लेव्ही नावाच्या श्रीमंत आणि घरंदाज माणसाच्या घरची ही मेजवानी दाखवलीय ना, त्याच्यासारख्या असामीच्या पदरी असे सेवक असणारच ना. तसंच शोभून दिसणार. म्हणून तर मी तिथे ते तसे दाखवलेत.
प्रश्न– आणि आपल्या प्रेषिताच्या टेबलावर ते कोण आहेत?
उत्तर– त्याचे बारा सत्शिष्य.
प्रश्न – मग पहिला दिसतोय तो सेंट पीटर काय करतोय?
उत्तर – तो मटणाचा तुकडा कापून घेतोय आणि उरलेला टेबलावरच्या बाकीच्यांकडे पाठवणारसं दिसतंय.
प्रश्न– आणि त्याच्या पलीकडे आहे तो काय करतोय?
उत्तर– तो सेंट पीटरकडून आपल्या वाट्याला काय येतंय ते पाहतोय.”
या सगळ्या चौकशीचा परिणाम असा झाला, की व्हेरॉनीजनं साक्षात येशू ख्रिस्त आणि त्याच्या अनुयायांना अगदी मानवी भावभावनांनुसार व्यवहारात वावरताना दाखवल्यामुळे त्यांच्या भोवतालचं सात्त्विक वलय झाकोळलं गेलं असा धर्मसंसदेचा निर्णय झाला. अनादर आणि अशोभनीयतेबाबतच्या गुन्ह्यांबद्दलच्या प्रचलित नियमांनुसार त्यांनी इ.स. १५७३ मध्ये व्हेरॉनीजसाठी आदेश जारी केला, की तीन महिन्यांच्या आत त्यानं या चित्रामध्ये योग्य त्या ‘दुरुस्त्या’ केल्या पाहिजेत.
सांस्कृतिक पाळतखोरीला दाद न देणं हे मनस्वी कलाकारांचं व्यवच्छेदक लक्षण व्हेरॉनीजनं अंगी बाणवलेलं होतं. त्यामुळे त्यानं कसलीही दुरुस्ती न करता एकच बदल केला.
‘लास्ट सपर’ म्हणजे ‘येशू ख्रिस्ताचं अंतिम भोजन’ हे त्या चित्राचं नाव होतं. ते बदलून व्हेरॉनीजनं त्या चित्राला ‘लेव्हीच्या घरची मेजवानी’ असं नाव फक्त दिलं. धर्मसंसद त्यानंतर त्याचं काही वाकडं करू शकली नाही. आजही व्हेनिसच्या गॅलेरिया देल अकादेमियामध्ये ते आपण पाहू शकतो.
श्रद्धा कुंभोजकर, या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख आहेत.
COMMENTS