वानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..

वानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..

होंडूरास या मध्य अमेरिकेतील देशातल्या रेनफॉरेस्टमध्ये लुप्त शहराच्या गूढकथा स्पेनमधून अमेरिका खंडामध्ये वसाहती स्थापन करणाऱ्या अनेकांनी एकून लिहून ठेवल्या होत्या. पण हे शहर काही वर्षांपूर्वी प्रत्यक्ष शोधले गेले. या शहराच्या शोधकथेवरचे व थरारक अनुभवाचे ‘द लॉस्ट सिटी ऑफ मंकी गॉड’ या पुस्तकाचा परिचय..

गांधी, थोरो आणि सविनय प्रतिकार
कापुस्किनस्की यांचं नवं पुस्तक
व्यक्ती, नागरिक आणि नागरीकत्व

आपण माणसं विचित्र प्राणी आहोत. आजच्या काळात राहात असताना एकाच वेळी आपण मानवजातीच्या भूतकाळाचा, वर्तमानकाळाचा आणि भविष्याचाही शोध घेत असतो. ज्ञाताचा शोध घेत असतो पण अज्ञाताचा आणि आपल्या अज्ञानाचाही शोध घेत असतो. लढाया करून मारण्यासाठी नानाविध अस्त्रे-शस्त्रे शोधत असतो आणि दुसरीकडे जीव वाचविण्यासाठी अथक संशोधन करीत असतो. एका विषयाचे संशोधन सुरू केले तर त्याचा विस्तार किती आणि कसा वाढेल हे सांगताही येत नाही.

शहरविकास शास्त्राचा अभ्यास, त्याची पाळेमुळे जमिनीत किती खोल, जगाच्या आणि काळाच्या उदरात किती मागे गेली आहेत यांचा शोध गेली दीड-दोन शतके अखंडपणे चालू आहे. पुरातत्व संशोधकांना जगभर सापडलेल्या शहरांच्या अद्भुतकथा वाचायला मला फार आवडतात. त्यातून अशी ठिकाणे बघायला मिळणे म्हणजे मोठे भाग्य असते.

१५ वर्षांपूर्वी आम्ही पेरू देशात गेलो होतो. तेथील माचू-पिचू ह्या डोंगराच्या पठारावर आणि उतारावर इनका संस्कृतीच्या लोकांनी वसवलेल्या आणि नंतर काही शतके हरवलेल्या शहराचा शोध गेल्या शतकात बिंगम ह्या अमेरिकेतील पुरातत्व शास्त्रज्ञाने जगापुढे आणला. ते अद्भुत शहर बघण्याचा अद्भुत आणि अविस्मरणीय होता. तेथील नाचका रेषा म्हणून एका विस्तृत पठारावर कोरलेल्या असंख्य चित्रांचे दर्शन विमानात बसून घेणे हे सुद्धा एक साकार झालेले स्वप्न होते. शिवाय तेथील इंका संस्कृतीमध्ये वासवलेली कुस्को, पिसाका अशी अनेक पुरातन शहरे बघायला, अनुभवायला मिळाली. या वर्षी मेक्सिको देशातील पिरमिड बघायची इच्छा पूर्ण झाली. अर्थात अशी इच्छापूर्ती म्हणजे नवीन आकांक्षाचा जन्म असतो. अशा आकांक्षा कधीच पूर्ण होत नसतात. आजच्या काळात प्रत्यक्ष भेटीची तहान पुस्तकांच्या आणि इंटरनेट सारख्या साधनांमुळे सहज भागवता येते.  त्यातून हा मार्च २०२० पासून सुरू झालेला करोंना विषाणूने जागांवर लादलेला घरचा तुरुंगवासाचा काळ म्हणजे वाचायची, बघायची आणि लिहायची मोठीच संधी.

मेक्सिकोला जाण्यापूर्वी त्याच नावाची जेम्स मिचनर ह्या लेखकाची एक मोठी कादंबरी विकत घेतली होती. तेथून परत आल्यावर या घराच्या तुरुंगवासात ती वाचून संपली. त्याचवेळी ‘द लॉस्ट सिटी ऑफ मकी गॉड’ नावाचे, डगल्स प्रेसटन ह्या लेखकाचे अमेरिकेत घेतलेले पुस्तक वाचायला घेतले.

होंडूरास ह्या मध्य अमेरिकेतील लहानसा देश. तेथील रेनफॉरेस्टमध्ये असलेल्या लुप्त शहराच्या गूढकथा स्पेनमधून अमेरिका खंडामध्ये वसाहती स्थापन करणाऱ्या अनेकांनी एकून लिहून ठेवल्या होत्या. पाचशे वर्षांपूर्वी कोरटेस ह्या स्पेनमधील सरदाराने मेक्सिको शहराच्या राजाला मारून १५२० साली तेथे कब्जा केला तेव्हा त्याने दक्षिणेला असलेल्या होंडूरासमधील लाल मातीच्या शहराच्या अस्तित्वाची नोंद केली होती. त्या आधी कोलंबसने काही नोंदी केल्या होत्या. मात्र नंतरच्या पाचशे वर्षात तेथे कोणी जाऊ शकलेले नव्हते. त्या बद्दलच्या अनेक दंतकथा, वावड्या कायम चर्चेत होत्या. त्या शहराला स्थानिक लोक ‘सफेद शहर’ किंवा ‘द लॉस्ट सिटी ऑफ मंकी गॉड’ असे म्हणत. ती शापित नागरी आहे असेही सांगत. ह्या लुप्त शहरात मोठे गुप्त धन असल्याच्या कथा प्रचलित असल्याने १९२० सालापासून अमेरिकेतील काही धाडसी लोकांनी त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न केले होते. दोघांनी तर पुरातत्व संशोधनात रस असणाऱ्या एका अब्जाधीश माणसाकडून पैसे घेऊन प्रत्यक्षात नदीच्या वाळूमधून सोन्याचे कण जमा केले होते; पुरातत्व संशोधन केल्याचे पुरावे म्हणून काही पुरातन दगडी कलावस्तू होंडूरास मध्ये विकत घेऊन अमेरिकेत नेल्या होत्या. शिवाय आपल्या धाडसी प्रवासाच्या खऱ्या-खोट्या नोंदी प्रसार माध्यमांना सादर करून सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धी मिळवली होती. घनदाट रेनफॉरेस्टमध्ये, डोंगर, दऱ्या, नद्या, जंगली जनावरे, साप, धुवाँधार पाऊस यांना तोंड देत, चिखल तुडवत, खऱ्या-खोट्या सफेद शहराचा शोध घेण्याचे धाडस सोपे नव्हते. तरीही ते धाडस करण्याची मनीषा आणि तेथील पुरातन वैभवाचा शोध घेण्याची उर्मी अनेकांच्या मनात होती.

नव्वद वर्षांनी धाडस करण्यासाठी लागणारी अनेक साधने, पैसे, अमेरिकेतील ‘नासा’ सारख्या संस्थेचे अतिशय आधुनिक असे लायडर तंत्र, विमाने, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, फोटोग्राफर, लेखक आणि होंडूरासचे सैनिक यांना एकत्र करून शोध मोहीम २०१५ साली प्रत्यक्ष जंगलांमध्ये हेलिकॉप्टरमधून सुरू झाली. त्यासाठी होंडूरासमधील अस्वस्थ राजकीय परिस्थितीमध्ये, तेथील भ्रष्ट नोकरशाहीला वश करून परवानगी मिळवण्यासाठी ड्रग माफियांचीही मदत घेतली.

अमेरिकेने अवकाशातून शत्रूचा वेध घेण्यासाठी निर्माण केलेले लायडरचे (LiDAR- Light Detection And Ranging) अत्याधुनिक तंत्र चंद्राच्या पृष्ठभागाचे नकाशे तयार करण्यासाठी वापरले होते. पेरू देशांमधील कोको बेटाचे गूढ उकलण्यासाठी ह्यूस्टन विद्यापीठातील संशोधकांनी यशस्वीपणे वापरले होते. तसेच मध्य अमेरिकेतील कारकोल येथील पुरातन शहरातील पिरमिडचे नकाशे करण्यासाठीही साली वापरले होते. त्या अगोदर जमिनीवरील जंगल साफ करून, सर्वेक्षण करून नकाशे करण्याचे काम २५ वर्षे चालले असूनही निम्मे शहरही नकाशावर आलेले नव्हते. पण २००९साली  विमानात बसवलेल्या लायडर यंत्राच्या आणि तंत्रज्ञांच्या मदतीने केवळ ५ दिवसांमध्ये ८० चौरस मैलांचे सर्वेक्षण करून जमिनीचे चढ-उतार, पुरातन वास्तू, नद्यांवरचे पूल, शेतीसाठी तयार केलेली पठारे, डोंगर, दऱ्या, गुहा, थंडगी, इमारती आशा हजारो गोष्टी तपशीलवार दाखविणारे नकाशे बनविले होते. त्या संशोधनाबद्दल वाचून अनेक वर्ष मनात असलेली सफेद शहर शोधण्याची इच्छा स्टीव्ह एलकिन्स ह्याच्या मनात जागृत झाली आणि त्याच्या खटपटी लटपटी सुरू झाल्या. पैसे देणारी, संशोधनाला मदत करणारी अनेक माणसे त्याने जमा केली. त्यात डग्लस प्रेस्तन ह्या लेखकही सामील होता. अमेरिकेत पैसे आणि धाडसी माणसांची काही कमी नव्हती. लायडर नकाशे बनवून घेणे ही सर्वात महत्त्वाचे काम हाती घेण्यात तो यशस्वी झाला.

लायडर नकाशे आणि जमिनीवरील शोध मोहीम

NCALM (National Centre for Airborne Laser Mapping) त्यांची मदत घेऊन सफेद शहराचा शोध घेण्यासाठी विमान, तंत्रज्ञ, नकाशाकार, पुरातत्व शास्त्रज्ञ आणि ह्या सर्व मोहिमेचे चित्रण करणारे फोटोग्राफर, अनुभवाच्या तपशीलवार नोंदी करण्यासाठी नॅशनल जिओग्राफी मासिकाचा लेखक डग्लस प्रेस्टन असे सर्वजण होंडूरास जवळील रॉतन ह्या बेटावर दाखल झाले. ह्या बेटावर मौजमजेसाठी येणाऱ्या श्रीमंत पर्यटकांचाच आणि त्यांच्या बरोबरीनेच ड्रग माफियांचा वावर असल्यामुळे तेथे विमानतळ असला तरी त्यात विमानात इंधन भरण्याची सोय मुदाम ठेवलेली नव्हती. त्यासाठी देशाच्या मुख्य किनाऱ्यावर एका विमानतळावर जावे लागे. लायडर नकाशे करण्यासाठी तीन दिवस विमानाने उड्डाण करून दूर डोंगराच्या कुशीत दडलेल्या दरीची भौगोलिक रचना सर्वेक्षण डिजिटल स्वरूपात जमा केली. रोजच्या रोज ती नासाच्या मुख्यालयात पाठवली. तेथे त्या माहितीचे रूपांतर प्रत्यक्ष नकाशात करून हे नकाशे परत उपग्रहांच्या माध्यमातून रॉतन बेटावरचे तंत्रज्ञ त्यांचे बारकाईने निरीक्षण करीत. सरळ रेषा, चौकोन, त्रिकोण, वर्तुळे असे आकार मानवाच्या वस्तीचे निदर्शक असतात. संगणकावर नकाशा झूम करून भूमितीय आकार शोधणे ही मोठे कौशल्याचे काम.

दुसऱ्या दिवशीचे नकाशे मिळाले आणि रात्रभर निरीक्षण करणाऱ्या तंत्रज्ञाला दाट जंगलात दोन मोठे चौकोनी जमिनीचे तुकडे दिसले. हा तर युरेका क्षण होता. ही अद्भुत चित्रं बघायला इतर सर्व धावले. तिसऱ्या दिवशी ह्या भागाचे कॅमेराने फोटो काढण्यासाठी डगल्स पोटाशी पाय घेऊन विमानात बसला. मोडक्या- तोडक्या जुन्या, लष्कराने वापरलेल्या लहान विमानातला हा लायडर यंत्राच्या बरोबरचा प्रवास अत्यंत खडतर होता. ठरल्याप्रमाणे तीन दिवस सर्वेक्षण मोहीम पार पडली.

जमा केलेल्या माहितीवर अधिक काम अमेरिकेत सुरू झाले. रंगीत नकाशे तयार झाले. चौकोनी भूभागाचे अधिक झूम करून नकाशे केल्यावर ते आकार मानवी आहेत याची खात्री पटली. माध्यमात त्यावर लेख आणि बातमी झळकली. मात्र पुरातत्व संशोधन क्षेत्रातील दिग्गजांनी प्रत्यक्ष जमिनीवरून संशोधन केल्याशिवाय, मानवी वस्तीचे प्रत्यक्ष पुरावे मिळविल्याशिवाय या नकाशातून पुरातन वस्तीचे अस्तित्व सिद्ध होत नाही असे अभिप्राय दिले. त्यामुळे त्या कठीण डोंगराळ भागात जाऊन शोध घेणे क्रमप्राप्त झाले. त्यासाठी पैसे, साहित्य, विमाने, माणसे आणि संशोधक, विविध विषयांचे तज्ज्ञ आणि जंगलात जाऊन शोध घेणारे धाडसी लोक एकत्र करणे हे काम सोपे नव्हते. शिवाय होंडूरास देशातील संशोधन परवाने, शासनाची आणि तेथील सैन्याची मदत जमा करण्यात काही वर्षे गेली. शेवटी २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात संशोधक ७ दिवसांच्या खडतर मोहिमेसाठी निघाले. जंगलांमध्ये हेलिकॉप्टरने माणसे उतरवण्याच्या जागांचा शोध दोन तीन दिवस चालला. हवेत तरंगणाऱ्या हेलिकॉप्टरमधून आपले सामान पाठीवर घेऊन उड्या मारण्यासाठी प्रत्येकाचे प्रशिक्षण सैन्याने केले. साप, जंगली जनावरे, विषारी किडे, झाडे, विषारी वनस्पती यापासून संरक्षण करण्याचे प्रशिक्षण सर्वांनी घेतले. जंगलामध्ये राहण्यासाठी तंबू, झाडांना बांधायचे झुले, जेवणाचे सामान, औषधे, डिझेल जनरेटर, संगणक, फोन, अशा वस्तूंची बांधाबांध करून चमूतील लोक जंगलात उतरले. त्यात दोन महिला होत्या. एक पुरातत्व संशोधक आणि दुसरी मानव वंश शास्त्रज्ञ. जवळच सैनिकांनी त्यांचा तळ उभारला. एक मोठा सहा फुट लांबीचा, अत्यंत विषारी साप अचानक दिसला. एकाने त्यांचे तोंड पकडून त्याला मारले. डबाबंद अन्न खाल्ले. सर्वांनी अंधारी रात्र, झाडांच्या खोडांना बांधलेल्या झोळ्यांमध्ये जागूनच काढली. रात्रीच्या वेळी घनदाट जंगलातील चित्रविचित्र, लहान मोठे आवाज, वाऱ्यामुळे होणारी झाडांच्या पानांची सळसळ, प्राण्यांचे चित्कार, जंगलातील किटकांचे आवाज अशा गोंगाटात औषधालाही शांतता नव्हती. मध्यरात्री विजेरीच्या उजेडात दाट धुके तेवढे दिसत होते. सर्व जंगल दवाच्या पाण्यात चिंब भिजून गेले होते. त्यांच्या जंगलात आक्रमण करणाऱ्या माणसांचे बघून सकाळी सकाळी चित्कारणाऱ्या माकडांची धाड झाडांवर आली.

खोदकाम करताना सापडलेले अवशेष.

खोदकाम करताना सापडलेले अवशेष.

दुसऱ्या दिवशी धुक्याची चादर विरळ होईपर्यंत सकाळ संपत आली होती. हेलिकॉप्टरमधून संशोधकांचा दुसरा गट उतरला. नकाशात दिसलेल्या चौकोनी जमिनीकडे कूच करायला सगळेच उत्सुक होते. दुपारी सर्व लुप्त शहर शोधायच्या मोहिमेवर निघाले. हातात जीपीएस मुळे जागा शोध कोठे घ्यायचा, कोणत्या दिशेने, किती अंतर जायचे हे समजत होते. परंतु प्रत्यक्षात २०० मी. अंतर कापणे सोपे नव्हते. अंधार पडायच्या आत परत कॅम्पवर परतायचे होते. घनदाट जंगल, उंच-बुटकी झाडे, झुडुपे, गवत त्यावर चढलेले जाडजूड खोड असलेले वेल, सर्वांवर असलेले पानांचे थर ! या सगळ्यांवर सपासप तीक्ष्ण तलवारीचे वार करत मार्ग काढणे, एक पाठोपाठ रांगेत चालणे, चढणे, उतरणे, घसरणे ही कसरत जिकिरीचे काम होते. दोन नद्यांच्या बेचक्यात असलेली जागा. निसर्गावर आक्रमण करत असल्याची बोच आणि तरीही लक्ष्य गाठण्याची धडपड ह्या सर्वांचे लेखकाने केलेले अप्रतिम वर्णन हे  पुस्तकाचे खास वैशिष्ट्य. लेखक निसर्ग-साहित्य लिखाणात माहिर होता म्हणूनच त्यांचा ह्या मोहिमेत सहभाग होता. जोडीला धाडसी स्वभाव, वेळप्रसंगी कोणतेही काम करण्याची, अडचणी सहन करण्याची ताकद ह्याशिवाय ते जमलेही नसते.

नदी आणि तिचा उंच किनारा पार करून नकाशातील पिरमिड असण्याची शक्यता असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी तीन-चार जण पोचले आणि त्यावर चढले. उंचावरून आजूबाजूच्या जमिनीवरील गोष्टींचा अंदाज येत होता. पिरमिडच्या दुसऱ्या बाजूला एक विस्तीर्ण मोठा चौक होता. तेथले झुडपे साफ केल्यावर माणसांच्या हाताने रचलेल्या दगडांची मोठी रांग दिसू लागली. पुरातत्व शास्त्रज्ञ फिशर उत्साहात. पुढे पुढे जात दिसेनासा झाला. सर्वांना तो हरवण्याची चिंता. पण जीपीएस हातात घेऊन तो झाडीतून अवतरला. सर्वजण कॅम्पवर सुखरूप परतले. प्रत्यक्षात पुरातन शहराचे अवशेष सापडल्याचा आनंद दाट जंगलात मावणारा नव्हता. रात्री सर्व जेवत असताना अचानक सोसाट्याचा वारा आणि धुवाँधार पाऊस सुरू झाला.

कॅम्पचे तंबू जमिनीपासून काही अंतर ठेऊन उभे राहिले होते. सर्वांनी त्यात झोपण्याचे प्रयत्न सुरू केले. पहाटे पांचला जोराजोरात वानरगजर सुरू झाला. सर्वजण स्वयंपाक-जेवण तंबूत जमले. अनेकांनी रात्री वाघाच्या डरकाळ्या ऐकल्या होत्या. पुरातत्व अवशेष शोधण्याची घाई सर्वांनाच होती. कालच्या जागेच्या पुढे अजून चार विस्तीर्ण चौक शोधायचे होते. पाऊस तर धुवाँधार होता, सर्वत्र पाण्याचे-चिखलाचे पाट वाहत होते. रेनकोटचा उपयोगच नव्हता. चिखल तुडवत भिजत सर्व संशोधक पिरमिडकडे निघाले. गवत-झुडपे कापलेली असल्याने कालच्या जागेपर्यंत सर्व पोचले. फिशर पुढेपुढे जातच होता. नकाशातले अनेक ढीग मानवनिर्मित आहेत ह्याची खात्री पटत होती. धुवाँधार पावसात नदीला पूर आला तर परतणे अवघड झाले असते त्यामुळे दुपारी परतीची वाट धरली. एकापाठोपाठ एक, आजूबाजूला बघत सर्व निघाले आणि अचानक शेवटचा माणूस मोठ्याने ओरडला..

सर्वजण त्याच्या जवळ पोचले आणि त्यांना एक दगड दिसला. पावसामध्येही चिखल आणि पालापाचोळा तुडवत हत्याराने त्यावरचे गवत साफ केले आणि एका दगडावर कोरलेले वाघाच्या तोंडाचे शिल्प अचानक गवतातून बाहेर दिसू लागले. जमिनीवर हारीने रचलेल्या, मानवी हातांनी घडविलेल्या दगडी वस्तूंचा एक मोठा खजिनाच तेथे दिसू लागला. त्यात एक गिधाडाचे कोरलेले शिल्प असलेले दगडी भांडे दिसायला लागले. हे सर्वच आश्चर्यकारक होते. शेकडो वर्षे कोणाचाही स्पर्श न झालेल्या ह्या दगडी वस्तू संशोधकांच्या दृष्टीस पडल्या. अदृश्य शक्तीनेच त्यांना तेथे खेचून आणले असावे असे त्यांना वाटले. फिशर काही क्षण दिगमूढ झाला. शहर शोधायला निघालेल्या त्याला असा शिल्प खजिना हाताला लागेल असे अपेक्षित नव्हते. त्यांच्यातला पुरातत्व संशोधकाने त्याचा अर्थ इतरांना सांगायला सुरवात केली. ह्या सर्व वस्तू म्हणजे कोणत्या तरी लोकांनी अज्ञात शक्तीला किंवा देवाला अर्पण करण्याच्या भावनेने निर्माण केलेला खजिना असावा किंवा माया लोकांच्या चेंडू खेळाशी त्याचा संबंध असावा असे त्याला वाटले. अर्थात हे सर्व अंदाज होते. शिवाय ह्या जागी जमिनीमध्ये अजून खूप काही पुरलेले असावे असेही त्याला जाणवले. त्या सर्व खजिन्यांचा तपशीलवार अभ्यास केल्याशिवाय कोणतेही निष्कर्ष काढता येणार नाही हेही त्याला माहीत होते. जागेच्या भोवती दोरी बांधून मंडळी वेगळ्याच मूडमध्ये कॅम्पला आली. अजून काही संशोधक, खाद्यपदार्थ, पाणी अशा अनेक गोष्टी हेलिकॉप्टरने यायच्या होत्या. तरी फिशरने मोठ्या उत्साहाने पुढच्या कामाची आखणी सुरू केली.

जवळच होंडूरास सैनिकांच्या तळ होता. त्यांनी हरणाची शिकार करून शेकोटीवर भाजून त्यांच्या जेवणाची तजवीज केली होती. त्यांच्या तळामागे मोठा चढ होता त्यावर चढल्यावर चारी बाजूने उंचवटे असलेला एक मोठा खड्डा दिसला. पावसाचे पाणी साठवायला आणि कोरड्या ऋतूमध्ये शेतीसाठी वापरायला लोकांनी तो केला असावा असे फिशरला वाटले. त्याही पलीकडे रास्ता असावा असे वाटत होते. तेथे बहुधा कोकोबियांची बागायती झाडे असावीत असे दिसत होते. रात्री जेवण करून आपल्या तंबूमध्ये झोपण्याच्या बॅगमध्ये डगल्स शिरला तेव्हा त्याच्या अंगावर असंख्य मुंगा धावू लागल्या! पिशवीतून बाहेर पडून मुंग्या मारण्यात रात्र गेली. अंगावर त्या कधी चढल्या होत्या हेच त्याला समजले नव्हते! काही ठिकाणी माशा चावल्या होत्या. पुढे ह्या माशांच्या चाव्याच्या महाभारताची गोष्ट पुढे येणार आहे.

जवळ जवळ ५०० वस्तू नंतरच्या उत्खनात सापडल्या. अॅना ही पुरातत्व संशोधक होती. तिने सैनिकांना मदतीला घेऊन पुरातत्व खजिन्याच्या पद्धतशीर नोंदी केल्या. त्यात मध्येच एका मोठ्या सापाने दर्शन देऊन घाबरवून सोडले. अलिसिया हिने स्थानिक सैनिकांच्या मुलाखती घेऊन माहिती घेण्याचे काम सुरू केले. एकदा चालता चालता ती चिखलाच्या खड्ड्यात पडली. गमबुटामध्ये चिखल गेला आणि ती खालीखाली रुतू लागली. इतरांनी तिला हात धरून खेचून बाहेर काढले. घनदाट जंगलातले संशोधन म्हणजे काही मौजमजेची पिकनिक नव्हती. गूढ, दाट गवतामधून अचानक फुत्कारत येणारे सांप, माणसाने केलेल्या घुसखोरीने चिडलेली माकडे आणि जंगली प्राण्यांच्या हल्ल्याची धास्ती, त्यात जंगलातला सूर्यप्रकाशही अडवणारा झाडांचा पर्णसंभार, त्यांच्या आधाराने वाढलेल्या वेली, रंगी-बेरंगी विषारी फुले, फळे, त्यांचा संमिश्र वास आणि ह्या सगळ्याला साथ देणारा धुवाँधार पाऊस, वाऱ्याचे संगीत, सूर्यप्रकाशाचे अधूनमधून चमकणारे तुकडे. हे संशोधन म्हणजे भीती आणि अत्यानंदाचा अनोखा खेळ होता. त्यात लुप्त झालेल्या संस्कृतीच्या सापडलेल्या खजिन्यांमुळे आलेला उत्साह. अधिकाधिक शोध घेण्याची तयार होणारी उर्मी. तो एक अनोखा दिलखेचक अनुभव आणि न संपणारी बौद्धिक तहान होती. अनेक उंचवटे मानवाचे अस्तित्व दाखवून देत होते. कोण असावेत ते लोक? किती काळ तेथे वस्ती करून राहिले होते? काय खात होते? कोणत्या वस्तू-हत्यारे वापरत होते? जंगलाबद्दल, निसर्गातल्या घटनांबद्दल कोणता विचार करीत होते? कसे जगत होते आणि कशाने मरत होते? आजूबाजूला कोणाशी देवाण-घेवाण करीत होते का? त्यांची भाषा काय होती? आणि मुख्य म्हणजे ते असे एकदम लुप्त का आणि कसे झाले? कोणाच्या हल्ल्याने की काही रोगराईने? दुष्काळाने की हवामान बदलामुळे? की अजून काही कारणाने ही संस्कृति नष्ट झाली? स्वत:ची ही वस्ती सोडून जीव जगविण्यासाठी ते इतरत्र निघून गेले असावेत का? असे अगणित प्रश्न आणि हाताशी असलेला जेमतेम पांच-सहा दिवसांचा वेळ. नाना प्रश्न घेऊन जड झालेला मेंदू आणि मन, कॅमेराने नोंदलेली चित्रे, व्हीडिओमध्ये पकडलेले अद्भुत जंगल असे अनुभव घेऊन सर्व मंडळी परत आली.

संशोधन मोहीम संपवून सर्व धाडसी संशोधक मंडळी परत आपआपल्या देशात, गावात परतले. जमवलेल्या माहितीचे संकलन, नोंदीकरण अशी असंख्य कामे होती. संशोधन जगापुढे आणण्याची धडपड होती. नॅशनल जिओग्राफी मासिकात मोठा लेख आणि फोटो छापून आले. इतर मासिके, वर्तमानपत्रांनी संशोधनाला प्रसिद्धी देण्यास सुरुवात केली. मुलाखती प्रसिद्ध झाल्या. पुरातत्वशास्त्र संशोधन क्षेत्राची खात्री पटली पण पर्यावरणवाद्यांची मोठी टीका सुरू झाली. या संशोधनामुळे रेनफॉरेस्ट नष्ट होण्याची भीती वाटू लागली. संशोधनातून जमा केलेल्या माहितीचे वेगवेगळे अर्थ लावण्याची, विश्लेषण करण्याची स्पर्धा सुरू झाली. होंडूरासमध्ये राजकीय श्रेयवाद सुरू झाले. पण ह्या संशोधनातून होंडूरास-निकारागुवा देशांत पसरलेल्या मोस्कवेशिया प्रदेशाबद्दल, कोलंबस पूर्व काळातील एका मोठ्या संस्कृतीबद्दल जगाला माहिती होऊ लागली. पुढल्या वर्षी परत अधिक नियोजन करून मोहीम काढली. होंडूरासचे अध्यक्ष स्वत: तेथे आले, त्यांनी खजिन्यातल्या प्रतीकात्मक दोन वस्तू घेऊन राजधानीत आणल्या. होंडूरासच्या लुप्त संस्कृतीचा शोध सुरू आहे मात्र रेनफॉरेस्टला धक्का पोचू नये म्हणून अधिक संशोधन सध्या तरी थांबवले आहे.

माशीच्या चाव्यांचे महाभारत

मोहिमेवरून परत आलेल्या काही लोकांना जंगलातील किडे-माशा चावलेल्या होत्या. त्यांचे व्रण हळूहळू बरे होत होते. मात्र काही जणाच्या अंगावर अचानक मोठे गळू दिसू लागले. साध्या डॉक्टरी उपायांनी बरे होईना. रोम, लंडन, अमेरिकेतील संशोधकांमध्ये समान लक्षणे दिसल्यावर जंगलातील संस्कृतीचे कूळ शोधायला गेलेले संशोधक आपल्या आजाराचे मूळ शोधू लागले. लेखक डगल्सच्या दंडावर असेच एक बरे न होणारे गळू होते. सूक्ष्मदर्शकांतून गळवाच्या कातडीच्या तुकड्यांचे निरीक्षण करता त्यात आधी माहीत नसलेल्या जिवांचे विचित्र आकार दिसू लागले. नमुने वॉशिंग्टन मधील रोगजंतू संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले तेव्हा सर्वांच्या अंगावरील गळवे एकाच प्रकारच्या, लिशमानियासिस- (संक्षिप्त रूप लिश) नावाच्या दुर्मिळ, दक्षिण अमेरिकेत सापडणाऱ्या पॅरासाइटमुळे झाल्याचे निदान झाले. सँड फ्लायची मादीच्या चाव्यातून पॅरसाइटने त्यांच्या शरीरात प्रवेश केला होता.

लिशमानियासिसची कुळकथा

ब्रह्मदेशात अंबर (एक प्रकारचा स्फटिक) मध्ये लाखो वर्षांपूर्वी अडकलेली एक सँड फ्लाय सापडली होती. तिच्या नांगीमध्ये लिश सापडला तेव्हा त्याच्याबरोबर सरपटणाऱ्या सस्तन प्राण्याच्या रक्तातील काही पेशी सापडल्या. त्या बहुधा डायनासोअरच्या असाव्यात. म्हणजे डायनासोअरलाही लिश रोग होत असावा का? हा पॅरासाइट खूप म्हणजे किती पुरातन असावा? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमिनीचे तुकडे विलग होण्याच्या आधीपासून त्यांचे अस्तित्व असावे आणि खंडांचे विलगीकरण झाल्यापासून तो जगातील सर्व खंडात वेगवेगळ्या पर्यावरणात उत्क्रांत झाला असावा, असा शास्त्रज्ञांचा कयास होता. इजिप्त आणि पेरूमधील ममीच्या शरीरात त्यांचे अस्तित्व सापडले होते. म्हणजे लिश हा जागतिक पॅरासाइट आहे. त्यासाठी लिशच्या डीएनएमधील गुणसुत्रांचा शोध घेतला गेला. त्यातून लिशचे तीन प्रकार लक्षात आले.

पहिल्या प्रकारात माशी चावलेल्या ठिकाणी फोड येतो, तो फुटून त्यातील पाणी बाहेर येते. मात्र त्यावर साधे इलाज केले की तो बरा होतो. दुसरा प्रकारचे लिश ज्याला आपण सामान्यपणे जंत म्हणतो, ते माणसाच्या पोटात वस्ती करतात. तिसऱ्या प्रकारचे लिश शरीरातील द्रव स्त्रवते तेथे, म्हणजे नाका-तोंडाच्या सानिध्यात वस्ती करून वाढतात. ह्या प्रकारच्या लिशमुळे दक्षिण अमेरिकेतील अनेक लोकांची नाके आणि ओठ खाल्ले गेल्याच्या नोंदी कोलंबसकालीन दर्यावर्दी लोकांनी करून ठेवल्या होत्या. त्याला त्यांनी सफेद महारोग असे नाव दिले होते. त्यावर मात्र अजून उपचार सापडलेले नव्हते.

लिशमानिया हा जगातला मलेरियानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा जीवघेणा आजार आहे. दरवर्षी १०-१२ लाख लोकांना त्यांची लागण होते. जगात एक कोटीच्या वर लिशचे रोगी आहेत आणि ६० हजार लोक त्याला दरवर्षी बळी पडतात. ही सर्व माहिती गुगलवर वाचल्यावर होंडूरास मोहिमेतील चारी संशोधक काळजीत पडले नसते तरच नवल. ते लिशच्या मागावर निघाले. शोध घेत घेत त्यांना डॉ. रवी दुरवासुला ह्या लिश विशेषज्ञ असलेल्या अमेरिकेतील मिलिटरी डॉक्टरचे नाव कळले. पण तेथील कडक नियम आणि नोकरशाही यातून सामान्य नागरिकाला त्यांच्यापर्यंत फोनद्वारे पोचणे अशक्य झाले. तेव्हा डग्लसने  सरळ त्यांना ईमेल पाठविली. त्याला लगेच प्रतिसाद मिळाला. फोन नंबर मिळाला. त्यांनी दुखऱ्या जागेचे फोटो पाठवायला सांगितले आणि त्यावरून तिसऱ्या प्रकारचा लिश असावा असे निदान त्यांनी केले. मात्र ह्या लिशची आणि त्यावरील उपचारांची त्यानं काहीच माहिती नव्हती, त्यांनी इराकमध्ये पहिल्या-दुसऱ्या प्रकारच्या लिशमुळे आजारी झालेल्या सैनिकांवर उपचार केले होते. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ह्या वॉशिंग्टन जवळच्या संशोधन संस्थेशी संपर्क करून खात्री करून घ्यायला सांगितले. तोपर्यंत रोममध्ये असलेल्या डेव्ह ह्या लिशभाऊलाही ह्याच संस्थेशी संपर्क करावा म्हणून तेथे सल्ला मिळाला. त्याने डॉ. थॉमस नटमन यांच्याशी संपर्क केला. डॉ. नटमनना पुरातत्व संशोधकांची कथा एकून कुतूहल वाटले.

निसर्गातील सजीव, त्यांच्या जीवनव्यवस्था आणि वर्तणूकीसंबंधी मूलभूत ज्ञानाचा शोध घेणे हे ह्या संस्थेचे मुख्य काम. होंडूरासमधील लिशचा हा प्रकार कोणता आहे ह्याची खातरजमा करणे आवश्यक होते. केवळ लक्षणे आणि वर्णन यावरून तिसऱ्या प्रकारचा घातक लिश असावा असे वाटले तरी सूक्ष्मदर्शकांतून प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आणि त्याच्या डीएनएचा अभ्यास अत्यावश्यक होता.

ही संस्था मूलभूत संशोधन करणारी असली तरी बाधित व्यक्तीने संशोधनासाठी सहकार्य केले तर उपचाराचा प्रयोग आणि खर्च संस्था करू शकते. चौघेजण लिश संशोधनात सामील झाले. डेव्ह रोमहून वॉशिंग्टनला आला. मलमे लाऊन या लिशमधून सुटका होईल अशी त्याला आशा वाटली. पण तसे होणे नव्हते. पॅरासाइट विशेषज्ञ डॉ. निश यांच्यावर उपचार करण्याची जाबबदारी सोपवली गेली. डेव्हच्या गळवाच छेद घेतला. सूक्ष्मदर्शकाखाली लिशचे गोल पॅरासाइट दिसू लागले. त्यांची जात ठरविण्याचे काम प्रयोगशाळेत सुरू झाले.

माणसाला त्रास देणाऱ्या ह्या पॅरासाइटच्या इतिहासांतील नोंदी आणि शोधप्रवास माणूस जातीसारखाच पुरातन आहे. भारतामधील एका ब्रिटिश डॉक्टरला प्रथम लिश सापडला होता. त्या रोगाची स्थानिक नावे दुष्ट अलेप्पो, जेरिको गुंडी, दिल्ली गळू, पूर्वेचा रोग अशी होती. पण कातडीचा फोड आणि पोटातील जंत यांचा नातेसंबंध आहे ही गोष्ट ब्रिटिश आर्मीमधील डॉ. विल्यम लिशमन यांना १९०१साली कलकत्ताजवळ एका मृत सैनिकांच्या प्लीहा ग्रंथीचा छेद घेऊन, त्यावर गाळण प्रक्रिया करून सूक्ष्मदर्शकाखाली बघितल्यावर त्यांना पॅरासाईटच्या सूक्ष्म गोल पेशी दिसल्या. संशोधकाच्या नावावरून त्यांना लिशमेनिया असे नाव मिळाले. परंतु तेव्हा ह्या डॉक्टरने या रोगाला डमडम ताप असे नाव दिले आणि त्यावर संशोधन निबंध लिहिला. त्या सुमारास भारतात असलेल्या चार्ल्स डोनोव्हन ह्या डॉक्टरलाही तसाच शोध लागला. पुढे लिशमानिया डोनोवानी ह्या दोघांच्या नावे तो ओळखला जाऊ लागला. १९११ साली सँड फ्लायच्या माध्यमातून हा रोग फैलावतो असे लक्षात आले. कुत्री, मांजरे, उंदीर, कोल्हे आणि माणूस आशा अनेक सस्तन प्राण्यांच्या शरीरात लिशमानिया पॅरासाइट वास्तव्य करून असतात. इतक्या साऱ्या प्राण्यांमध्ये या पॅरासाइटचा साठा असल्यामुळेच पृथ्वीवरचा तो एक यशस्वी जीव मानला जातो.

दक्षिण अमेरिकेतील त्यांच्या तिसऱ्या जातबंधवाला लिशमानिया ब्राझिलीयानिस हे नाव आहे. पुरातत्व शोधायला गेलेल्या चौघांच्या शरीरात या घातक पॅरासाइटने प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. त्यावर अन्फोटेरीसीन नावाचे औषध शरीरात सावकाशपणे सोडण्याचा उपाय करायचे ठरले. मात्र त्याचे शरीराच्या इतर अवयवांवर आणि मेंदूवर होणारे दुष्परिणामही खूप असल्याने चिंता होती. यथावकाश चौघांवर उपचार झाले. काहीना त्याचा भयंकर त्रास झाला, औषध बंद किंवा कमी प्रमाणात द्यावे लागले. चौघांनी संशोधन संस्थेमध्ये उपचार घेतले. चौघेजण रोगमुक्त झाले तेव्हा काही महिन्यांनी ते परत होंडूरासमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या संशोधनात सामील झाले तेव्हा औषधे आणि स्वत:ची खूप काळजी घ्यावी लागली.

होंडूरासमधील मोहिमेत सामील झालेल्या काही सैनिकांमध्येही ह्या रोगाचा फैलाव झाला होता. आज दक्षिण अमेरिकेत ह्या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. परंतु त्यावरचे उपलब्ध औषध आणि उपचार अतिशय महाग आहेत आणि तेथे ते कोणालाही परवडत नाहीत. तेथे त्यावर एक जुने, स्वस्त औषध देतात, पण त्यांचे दुष्परिणाम तर अन्फोटेरीसीनपेक्षाही तीव्र आहेत. त्यांच्याच मोहिमेतील होंडूरासच्या एकाला ते औषध तेथे देण्यात आले तेव्हा जवळजवळ त्याचा जीव जाण्याची वेळ आली होती. अनेक दिवस त्याला मेक्सिकोमध्ये दवाखान्यात काढावे लागले होते.

माणसांच्या रोगाचे मूळ..

१५-२० हजार वर्षांपूर्वी जेव्हा केव्हा आणि ज्या कोणत्या मार्गाने माणूस अमेरिका खंडात पोचला असेल तेव्हा त्याची थोडीच असणार. अन्न गोळा करून आणि शिकार करून तो जगत होता. ना गावे होती ना शहरे, ना शेती होती ना पशुपालन. सतत भटकणाऱ्या टोळ्या क्वचित एकमेकांना भेटत. तेव्हाही पॅरासाइट आणि जंतूमुळे माणसे आजारी होत होतेच. परंतु माणसांना त्रास देणारे अलिकडचे म्हणजे गोवर, कांजिण्या, सर्दी, फ्ल्यू, देवी, क्षय, पीतज्वर आणि प्लेग अशासारखे रोग विरळ आणि कमी लोकसंख्या असल्यामुळे माणसांना माहितीही नव्हते.

गेल्या १० हजार वर्षात हे चित्र बदलले. शेती, शहरे आणि देवाणघेवाण वाढली तशी लोकसंख्या वाढली. शहरात माणसांची गर्दी वाढू लागली आणि त्यानंतरच माणसांना साथीचे रोग सतवायला लागले. महामारीने तर माणसांच्या इतिहासाला वळणे दिली. आपण आज मोठी तांत्रिक प्रगती केली असली तरी जुने-नवे रोग देणारे जीव-जंतू आजही त्रास देतात. जेरेड डायमंड यांनी त्यांच्या गन्स, जर्मस अँड स्टील ह्या पुस्तकात जुन्या जगाने (युरोप, आफ्रिका आणि आशिया) नवीन जगाची, म्हणजेच अमेरिका खंडातील समाजांची जी अपरिमित हानी केली त्यांची कारणे काय होती असा प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तर दिले आहे. जगाच्या जुन्या आणि नव्या भागात विभागणी झाल्यानंतर माणसांचे उत्क्रांतीमार्ग वेगळे झाले हे त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे असे त्यांचे निष्कर्ष आहेत.

खोदकाम करताना सापडलेले अवशेष.

खोदकाम करताना सापडलेले अवशेष.

दोन्ही विभागात माणसाने शेतीची कला स्वतंत्रपणे विकसित केली. त्यामुळे गावे आणि शहरे वसविण्याची प्रक्रिया दोन्हीकडे झाली. मुख्य फरक पडला तो पशुपालनाच्या संस्कृतीमुळे. जुन्या जगात अनेक प्रकारचे प्राणी माणसाने पाळायला सुरुवात केली. सुरुवातीला गुरे आणि नंतर डुकरे, कोंबड्या, बदके, शेळ्या, मेंढ्या,कुत्री-मांजरे असे अनेक प्राणी माणसांनी स्वत:बरोबर वस्त्यांमध्ये आणले. तर अमेरिकेत लामा, गिनीपिग, कुत्री, टर्की असे प्राणी तेथील लोकांनी पाळले. परंतु आशिया आणि युरोपमध्ये प्राण्यांची जोपासना आणि उपज करण्याचे काम मानवी व्यवहारांच्या केंद्रस्थानी होते तसे अमेरिकेमध्ये झाले नाही. जुन्या जगात माणसे आणि त्यांचे पाळीव प्राणी वस्तीमध्ये एकत्र राहात. जवळजवळ प्रत्येक घरांमध्ये प्राण्यांची काळजी घेतली जाई आणि प्राण्यांमधील अनेक जंतूशी माणसांचा संपर्क येत असे आणि त्यामधून रोगांच्या प्रादुर्भाव होत असे आणि कालांतराने त्या रोगजंतूनशी सामना करणे माणसांना शक्य होत असे. अमेरिकेमध्ये प्राणी आणि माणसांचा असा जवळचा संबंध नव्हता कारण तेथे जमीन मुबलक होती.

माणसांना सहसा प्राण्यांच्यापासून जंतूंची लागण होते. जंतू सहसा एकाच प्रकारच्या प्राण्यांमध्ये वस्ती करतात.(लिशमानिया त्याला अपवाद आहे) पण रोग जंतूमध्ये सतत बदल होत असतात. प्राण्यांमधील एखाद्या जंतूमध्ये अचानक बदल होतो आणि त्यामुळे माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो. पूर्वेकडे (भारतामध्ये?) गाईच्या शरीरात असलेल्या जंतूंमध्ये असाच बदल झाला आणि त्यातून देवीचा रोग माणसांमध्ये पसरला. तसेच दुसरे जंतू (rinderpest) पशूकडून माणसात संक्रमित झाले आणि त्यामुळे माणसांना गोवर होऊ लागला. क्षय रोगाचे जंतूही पाळीव प्राण्यांतून माणसात, फ्लूचे जंतू पक्ष्यांमधून  तर डांग्या खोकल्याचे जंतू कुत्री किंवा डुकरांकडून आणि मलेरियाचे जंतू कोंबड्या आणि बदकांमधून माणसांमध्ये आले.

हे होत असतानाच माणसे गांव-शहरात, दाटीवाटीने वस्ती करून राहायला लागली. शहरांमध्ये माणसांची-प्राण्यांची गर्दी, व्यापार, घाण यांची वाढ झाली आणि माणसांची शरीरे रोगजंतूच्या वाढीला घर म्हणून उपलब्ध झाली. तेथूनच संसर्गजन्य रोगांचा फैलाव सुरू झाला. माणसांबरोबर साथीचे रोगजंतूही जगभर संचार करायला लागले. गर्दीमुळे म्हणजेच साथ-संगतीमुळे होणारे म्हणजेच साथीचे रोग म्हणून त्यांची ओळख झाली.

युरोपमध्ये अनेक शहरांमध्ये अनेक साथीच्या रोगांच्या लाटा येत. त्यात असंख्य माणसे प्राणाला मुकत. विशेषत: अशक्त माणसे आणि लहान मुले त्याला बळी पडत. अशक्त माणसांची गुणसुत्रे त्यांच्याबरोबर नष्ट होत तर वाचणाऱ्या सशक्त लोकांची गुणसुत्रे पुढील पिढीत संक्रमित होत. हजारो वर्षे आणि लाखों माणसांचे बळी घेऊन जुन्या जगातील लोकांमध्ये घातक रोगांशी सामना करण्याची रोगप्रतिबंधक शक्ती वाढत राहिली.

अमेरिका खंडामध्ये मात्र हे झाले नाही. तेथे प्राण्यांकडून माणसांमध्ये रोगजंतू संक्रमित झाले नाहीत. त्यामुळे संसर्गाच्या रोगामुळे मोठ्या संख्येने माणसे दगावली नव्हती. १५ व्या शतकात स्पेनमधून दर्यावर्दी आणि सैनिक अमेरिकेत जाण्यापूर्वी युरोप प्रमाणेच अमेरिकेत मोठीं मोठीं शहरे वसलेली होती. मात्र ती तुलनेने नवीन होती. तेथे शहरातील लोकवस्ती वाढून जास्त काळ झालेला नव्हता त्यामुळे संसर्गाचे रोग तेथे माणसाने अनुभवलेले नव्हते, आणि त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नव्हती. जेव्हा तेथे युरोपचे लोक आणि त्यांच्याबरोबर रोगजंतू पोचले तेव्हा १४९४ ते १६५० ह्या १५० वर्षांमध्ये त्यांनी तेथील दाट लोकवस्तीच्या शहरातील लाखों लोकांचे प्राण घेतले. ह्या सर्व दुर्देवी लोकांचे आवाज कोणाही पर्यंत पोचले नाहीत. एकेकाळी युरोपमध्ये काळ्या आजाराने ३० ते ६० टक्के लोक मेले होते. तर अमेरिकेत ९० टक्के लोकसंख्या १५० वर्षात आजाराला बळी पडली. साहजिकच तेथील धर्म, समाज, इतिहास, संस्कृती, भाषा, ज्ञान अशी सर्व संपत्ती त्यांच्यासोबत नष्ट झाली आणि मागे उरले ते फक्त भग्नावशेष. शिवाय युरोपमधील लोकांनी स्थानिक लोकांच्या अनेक टोळ्या मारून टाकल्या इतकेच नाही तर जंतूनी भरलेली पांघरूणे जैविक हत्यारे म्हणूनही वापरली. दुर्बळ झालेले समाज स्वत:चे रक्षण करू शकेल नाहीत.

गेली काही वर्षे अमेरिकेतील आणि इतर देशातील समाजाना अनेक जुन्या जगातील म्हणजेच आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील देशांमधील रोगांची लागण झाली आहे. एचआयव्ही, इबोला, सार्स आणि (आता करोंना) असे अनेक साथीचे रोग अलीकडे जगभर वाढले आहेत. त्यात लिश सारख्या पॅरासाईटची भर पडून हे रोग अधिकच घातक आणि जीवघेणे होत आहेत. त्यात जगाचे वाढते तापमान, हवामान बदल यांची भर पडते आहे. जग जवळ आले आहे आणि सर्वच देशातील समाजांचे भवितव्य जोडले गेले आहे.

आधुनिक विज्ञान आणि तंत्रे वापरून पुरातत्व शास्त्र विकसित झाले आहे. ते माणसांसमोर एक आरसा धरते. त्यात इतिहासाचे आणि जीवघेण्या रोगांना बळी पडलेल्या अनेक संस्कृतींचे पुरावे आहेत. त्यातून मानवाला घेण्याजोगे अनेक धडे आहेत. पर्यावरण हानी कोणालाच माफ करत नाही, कोणतीच संस्कृती अमरपट्टा घेऊन आलेली नाही. आपलीही नाही. लेखकाच्या पुस्तकातील हे शेवटचे शब्द आज मी करोना काळात घरात बंदिस्त असताना लिहीत आहे. आज जगातील श्रीमंत आणि गरीब देशांसमोर एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. करोंना नंतरचे जग कसे असेल?

सुलक्षणा महाजन, या नगररचनाकार व लेखिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0