बायडन यांचा प्रवास मांडणारे पुस्तक

बायडन यांचा प्रवास मांडणारे पुस्तक

इव्हान ऑसनॉस पत्रकार आहेत, न्यू यॉर्कर या साप्ताहिकात काम करतात. अमेरिका आणि चीन या दोन देशातलं राजकारण हा त्यांचा विषय आहे. काही काळ ते चीनमधे न्यू

महाराष्ट्रातील पर्यावरणीय वृत्तांकनाचा व्यापक वेध
अस्वस्थ करणारी कोरोनाकथा
वंशवाद आणि वंशद्वेष

इव्हान ऑसनॉस पत्रकार आहेत, न्यू यॉर्कर या साप्ताहिकात काम करतात. अमेरिका आणि चीन या दोन देशातलं राजकारण हा त्यांचा विषय आहे. काही काळ ते चीनमधे न्यू यॉर्ककचे प्रतिनिधी म्हणून वास्तव्याला होते. तिथं त्यांनी ओ येवान असं चिनी नाव घेतलं होतं.एज ऑफ अँबिशन या त्यांच्या चीनवरच्या पुस्तकाला अमेरिकेत राष्ट्रीय पारितोषिक मिळालंय.

ऑसनॉस यांचा जन्म लंडनमधे झाला, वडील वॉशिंग्टन पोस्टचे प्रतिनिधी म्हणून मॉस्कोमधे काम करत होते, कामासाठी ते पत्नीसह लंडनला गेले असताना तिथं त्यांचा जन्म झाला.

ऑसनॉस यांचे आजोबा, ज्यू, छळापासून सुटका करण्यासाठी पोलंडमधून भारत मार्गे अमेरिकेला निघाले असताना त्यांनी ऑसनॉसच्या वडिलांना भारतात जन्म दिला.

भारतात जन्मलेले वडील, लंडनमधे जन्मलेला मुलगा. काम करतो अमेरिकेत.

बायडन, बराक ओबामा आणि डेमॉक्रॅटिक पक्षातले अनेक कार्यकर्ते यांच्या मुलाखतींवर पुस्तक आधारलेलं आहे. न्यू यॉर्कर या साप्ताहिकात अमेरिकेतल्या राजकारणावरच लिखाण करत असल्यानं  त्याना मुलाखती मिळवणं सोपं गेलं. पुस्तक लिहिण्याआधी ऑसनॉस यांचे बायडन आणि त्यांचा मुलगा हंटर बायडन यांच्यावरचे  लेख प्रसिद्ध झाले आहेत.

बायडन यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना, त्यांचं व्यक्तिमत्व घडवणाऱ्या जवळपास सर्व घटना लेखकानं पुस्तकात गुंफलेल्या आहेत. लेखक पत्रकार असल्यानं शैली वेगवान आहे, तपशील भरपूर आहेत पण पाल्हाळ नाही.

खाचखळगे, अपघात, आघात सहन करत, त्यातून शिकत शिकत बायडन तयार झाले आहेत. लहानपणी त्यांच्यात तोतरेपण होतं. सवंगडी हसत, टिंगल करत. ती टिंगल, ती अवहेलना बायडन यांच्या मनात आजही सलते. पण अवहेलना दूर ढकलून पुढं जायला बायडन शिकले. प्रयत्नपूर्वक त्यांनी चाचरणं आटोक्यात आणलं, पण आजही कित्येक वेळा ते अडखळतात. पण त्यामुळं ते निराश होत नाहीत, क्षणभरानंतर नीट बोलू लागतात.

बायडन यांचं व्यक्तिगत जीव अनेक दुर्घटनानी व्यापलं आहे. त्यांची पत्नी आणि मुलगी मोटार अपघातात ठार झाली. त्या वेळी ब्यू आणि हंटर हे दोन मुलगेही गाडीत होते, ते जबर जखमी झाले पण वाचले.

इव्हान ऑसनॉस

इव्हान ऑसनॉस

ब्यू हा मुलगा इराकच्या लढाईत भाग घेऊन परतला आणि त्याला ब्रेन ट्यूमर झाला, त्यात तो गेला.

या घरच्या अपघातांमुळं म्हणा किंवा इतर गोष्टींमुळं म्हणा हंटर व्यसनी झाला. बायडननी त्याला कष्टानं व्यससनातून बाहेर काढलं. नंतर बायडन व्हाईस प्रेसिडेंट असतानाच हंटर एका युक्रेनियन कंपनीत संचालक झाला. ती घटना वादग्रस्त ठरली,आजही ट्रंप इत्यादी विरोधक या घटनेचा उपयोग त्यांच्यावर टीका करण्यासाठी करतात.

१९७२ साली बायडन मोठ्या कष्टानं सेनेटर झाले. नंतर १९८८ साली त्यानी अध्यक्षपदाची निवडणुक लढवली. हरले. पुन्हा २००८ साली अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत ओबामा अध्यक्ष झाले. पण ओबामानी नंतर त्यांना उपाध्यक्ष केलं. नंतर २०१२ मधे ते पुन्हा उपाध्यक्ष झाले. त्यानंतर २०१६ साली त्यानी तिकीट मिळालं नाही आणि आता २०२० साली ते अध्यक्ष होताहेत.

ऑसनॉस सांगतात की बायडन बोलतांना, विचार करताना घोटाळे करतात पण नंतर सावरून घेतात. त्यांच्या मनात काही एक असतं पण नंतर अमलबजावणी करताना इतरांचं ऐकतात, इतरांशी जुळवून घेतात. त्यांना लोकांबरोबर काम करता येत असल्यानं प्रतिस्पर्धी पक्षातही त्याना मित्र असतात.

तिखट मिरचीचा प्रवास 

माओ म्हणत असे की ज्याला तिखट मिरची खाता येत नाही तो काय क्रांती करणार? शौर्य आणि लाल मिरची यांची सांगड माओनं घातली असली तरी लाल मिरची हा पदार्थ चिनी पदार्थ नाही आणि तसा तो प्राचीनही नाही. १७५० च्या सुमाराला लाल मिरची अमेरिकेतून स्पेनमधे गेली आणि स्पेनमधून बोटीनं चीनमधे पोचली.

बोटीवरचे लोक लाल मिरची पदार्थाला झणझणीतपणा आणण्यासाठी लाल मिरची वापरत असतं. त्यांच्या संपर्कात असलेल्या चिनी लोकांना तिखटपणा आवडला.

चीनमधे तिखटपणा ही तामसी सवय आहे असं मानलं जात असे. ऊच्चभ्रू, श्रीमंत, खानदानी लोक मुळमुळीत जेवत असत. अगदीच चव हवी असेल तर काळी मिरी वापरत असत. काळी मिरी देशी होती.

काळी मिरी महाग होती. ती परदेशातूनही येत असे. सामान्य माणसाला ती परवडत नसे. त्या मानानं मिरची परवडे कारण एकाद दोन मिरच्या घातल्या की पातेलीभर पदार्थ झणझणीत होत असे. बोटीवरच्या लोकांकडून मिरचीची लागवड चिनी शिकले. मिरची पिकवणं किफायतशीर होतं. त्यामुळ मिरचीचा प्रसार अमेरिकेत वाढत गेला.

ब्रायन डॉट

ब्रायन डॉट

जसजसा मिरचीचा वापर वाढत गेला आणि वैद्य लोकानी मिरचीत औषधी गुण शोधले. मिरचीची पूड स्वयंपाकात वापरली तर फुफ्फुसातलं पाणी नाहीसं होतं, फुफ्फुसं कोरडी होतात आणि बाष्पामुळं होणारे रोग नाहिसे होतात असं वैद्य सांगू लागले. चीनच्या पूर्व किनाऱ्यावरची राज्यं, आणि दक्षिणेच्या राज्यात हवेत बाष्प असतं, तिथं फुफ्फुसाचे आजार खूप होतात. त्यामुळं तिथं लाल मिरचीचा वापर वाढत गेला. तुलनेनं उत्तर चीनमधे हवा कोरडी असल्यानं तिथं फुफ्पुसाचे रोग होत नाहीत. त्यामुळं तिथं लाल मिरचीचा वापर झाला नाही, मंगोलियन सौम्य मसाल्यांचा वापर तिथं करतात. हुआनमधे होणारी काळी मिरी तिथं पदार्थांत वापरली जाते.

ही सारी रंजक माहिती ब्रायन डॉट यांच्या पुस्तकात आहे. त्यानी चीनमधल्या मिरचीचा सविस्तर इतिहास आणि भूगोल पुस्तकात मांडला आहे.

वाचताना मजा यावी असं म्हटलं तर रंजक आणि म्हटलं तर ज्ञान वर्धक पुस्तक आहे.

निळू दामले, हे लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0