घरासारखी सुंदर जागा या जगात नाही…

घरासारखी सुंदर जागा या जगात नाही…

एल फ्रँक बौम यांच्या पुस्तकावर आधारलेल्या ‘द विझार्ड ऑफ ओझ' या चित्रपटाने ४०च्या दशकातील अमेरिकेतील विस्कळीत कुटुंब व्यवस्थेला व भरकटलेल्या तरुणाईला घराचे महत्त्व सांगून जे आपल्याकडे आहे, ते इतरत्र शोधण्याची गरज नाही, आपल्याकडे सहृदयता, हिंमत, बुद्धी याचा योग्य वापर केला तर आनंदी, सुखसमाधानाने जगता येते, असा मूलगामी संदेश दिला.

१९३९ ला प्रदर्शित झालेल्या ‘The Wizard of Oz’ मधील ‘There’s no place like home’ या वाक्याने अमेरिकेत त्याकाळी एखाद्या प्रभावी मंत्रासारखी जादू केली होती. उध्वस्त समाजव्यवस्था, विस्कळीत कुटुंब, भरकटलेली तरुणाई…यामुळे एका विचित्र अवस्थेतून अमेरिका जात होती.
लेखक एल फ्रँक ब्राऊन यांच्या ‘द वंडरफुल लँड ऑफ विझार्ड ऑफ ओझ’ या लोकप्रिय पुस्तकावर आधारित हा सिनेमा, खरं तर बालचित्रपट

एक अद्भुत रंगीबेरंगी दुनिया, नाट्यमय घडामोडी, मनोवेधक अभिनय, संवेदनशील संवाद, भव्यदिव्य प्रेक्षणीय सेट, सुश्राव्य संगीत या गोष्टींमुळे सर्व वयोगटांतील लोकांना भुरळ घातली. समीक्षकांनी वरकरणी बालकांसाठी भासणाऱ्या कथानकाला छुप्पे राजकीय व सामाजिक पदर आहेत, असा दावा केला पण या सर्वाच्या पलीकडे जाऊन या फॅन्टसी सिनेमाने लोकांच्या जगण्याला नवी टवटवी आणली. एक चांगल्या समुपदेशकाची भूमिका या सिनेमाने बजावली,हे निर्विवाद सत्य.
‘Somewhere over the rainbow, way up high’ हे गाणं मनाला उभारी देणार ठरलं.
आपल्या प्रेमळ आँटीसोबत राहणाऱ्या अनाथ डोरोथी आणि तिचा छोटा लाडका कुत्रा टोटो यांच्या जादुई सफरीचे मनोरंजक कथानक..

एकदा टोटो गावातल्या एका कटकट्या बाईला चावतो, ती बाई टोटोला पकडून न्यायची ऑर्डर घेऊन येते, तिच्या तावडीतून टोटो परत घरी येतो. टोटोला वाचवण्यासाठी डोरोथी त्याला घेऊन घर सोडून पळते. रस्त्याने जात असताना तिला भविष्य सांगणारा प्रोफेसर भेटतो. तिची मनोवस्था लक्षात घेऊन, मोठ्या हुशारीने तिला घरी जाण्यास प्रवृत्त करतो. डोरोथी घरी येते, तेव्हा वादळाला सुरवात झालेली असते. बचावासाठी आँटी आणि इतर लोकं तळघराचा आश्रय घेतात. तेव्हा डोरोथी घरात पळालेल्या टोटोला घ्यायला जाते, तोच मोठी वावटळ घरासकट आकाशात उडते व दूर, दूर घेऊन जाते. जेव्हा ते घर जमिनीवर येत, तेव्हा ते बुटक्या लोकांच्या ‘मांचिनलँड’ नामक एका अद्भुत नगरीत उतरलेलं असते. जमिनीवर घर उतरत असताना, त्याच्याखाली सापडून एका दुष्ट चेटकीणचा नाश झालेला असतो. त्यामुळे तेथील नागरिक स्वतंत्र होतात. ते डोरोथीचे आभार मानतात, तिथे एक प्रेमळ परी पण असते. ती डोरोथीला मेलेल्या चेटकिणीचे जादूचे बूट बक्षीस म्हणून देते. सर्वजण मिळून आनंद उत्सव करतात. डोरोथीला ते राज्य चालवण्याची विनंती करतात पण डोरोथीला आपल्या घरी जायचे असते. पण त्यासाठी तिला ‘एमराल्ड’ नगरीच्या जादूगाराची मदत घ्यावी लागणार असते. ती आणि टोटो ‘एमराल्ड’च्या दिशेने निघतात. या प्रवासात तिला भेटतो एक scarecrow (बुजगावणे) त्याला मेंदू नसतो. म्हणून त्याला मेंदू हवा असतो एक Tin man .(पत्र्याचा माणूस)

त्याच्याकडे हृदय नसते, आणि एक सिंह, त्याच्याकडे हिंमत नसते. आपल्याकडे जे नाही, ते जादूगाराकडे मिळेल या आशेने ते तिघे डोरोथीचे सहप्रवासी बनतात. नंतर जादूगाराची अट, दुष्ट चेटकिणीच्या अतिदुष्ट बहिणीचा नाश अशी वेगवेगळी वळण कथेत येतात.

सगळ्या कसोट्या पार करून जेव्हा जादूगाराकडे येतात तेव्हा कळतं, त्या जादूगाराकडे कोणतीच जादू नसते. तो एक सामान्य माणूसच असतो. फक्त तो चतुर आणि विज्ञान दृष्टिकोन असलेला भला माणूस असतो. माणसांच्या मधील सुप्त गुणांना जागृत करण्याची खुबी त्याच्याकडे असते. तो सिंहाला धैर्य दाखवल्याबद्दल शौर्यपदाने गौरवतो, टिन मॅनला हृदयाच्या आकाराचे घड्याळ बहाल करतो, जे हृदयासारखं टिक टिक वाजत असते. बुजगावण्याला पीएचडीच्या डिग्रीने सन्मानित करतो.
त्याच्या या छोट्याशा कृतीने तिघांच्या व्यक्तिमत्वात लगेच बदल होतो.

तो पटवून देतो की जे तुमच्यात नाही असं तुम्हांला वाटत, ज्याचा शोध तुम्ही घेत आहात, ते इतरत्र कुठे नसून, आधीपासून तुमच्या आत आहे. तो जादूगार डोरोथीला मोठ्या बलूनमधून घरी सोडणार असतो पण ऐनवेळी टोटो बलून मधून उडी घेतो. आणि बलून वर उडून जातो. परत घरी जाण्याचा प्रश्न निर्माण होतो.

प्रेमळ परीकडे डोरोथी मदत मागते. तेव्हा परी म्हणते, तुला मदतीची गरज नाही, घरी जाण्यासाठी तू स्वतःच इतकी सक्षम आहेस की तुझी इच्छा असेल तेव्हा तू परत जाऊ शकते. जे जादूचे बूट तू घातले आहेस, फक्त ते तीन वेळा एकमेकांवर आपटून म्हणायचं, ‘There’s no place like Home.’

तेव्हा टिन मॅन विचारतो, “हे तू आधी पण सांगू शकली असती?’

त्यावर परी म्हणते, “डोरोथी केलेल्या प्रवासातून खूप काही शिकली.. ते शहाणपण तिचं तिला उमजलं आहे.

टोटोला कवेत घेऊन डोरोथी सर्वाचा निरोप घेते, ती हवेत उडायला लागते. डोळे उघडल्यावर स्वतःच्या घरी बेडवर असते. तिच्या आजूबाजूला तिचे अंकल आँटी, शेजारी, प्रोफेसर असतात. तिला आलेल्या तापामुळे सगळे तिची काळजी करत असतात. ती टोटोला जवळ घेऊन म्हणते, ‘There’s no place like home.’

या सिनेमाचे दिग्दर्शन व्हिक्टर फ्लेमिंग या प्रतिभावान व्यक्तीने केले आहे. ‘मॅजिकल रिअ‍ॅलिझम’चा अप्रतिम वापर करत त्यांनी काही अफलातून प्रयोग केले आहेत. डोरोथी जादुई नगरीत जाईपर्यंतचा भाग हा ‘सेपिया’ रंगात ठेवला तर जादुई नगरीत प्रवेश केल्यानंतरचा भाग विविध रंगानी नटवला आहे. यात काही पात्रांचे डबलरोल आहेत. या कल्पक योजनेबद्दल व्हिक्टर फ्लेमिंगला सलाम करायला हवा.

ज्या बाईला टोटो चावतो, ती बाई आणि दुष्ट चेटकिणीच्या बहिणीचा चेहरा एकच आहे. भविष्य सांगणारा प्रोफेसर आणि ‘एमराल्ड’ नगरीचा जादूगार हे सारख्या चेहऱ्याचे आहेत. बुजगावणे, टिन मॅन आणि सिंह हे शेजारी राहणाऱ्या तिघांसारखे दिसत असतात. सिनेमाच्या सुरवातीला या तीन शेजाऱ्यांच्या स्वभावाची झलक एक घाबरट, एक वेंधळा, एक रुक्ष अशी दाखवली आहे. पुढे तीच झलक बुजगावणे, टिन मॅन, सिंह यांच्या व्यक्तिरेखेचा महत्त्वाचा भाग बनते. या बुद्धिमान दिग्दर्शकाने फॅन्टसीला तार्किकतेची जोड देऊन मुलांच्या भावविश्वाची व्याप्ती आणि मनोव्यापाराची चुणूक दाखवली आहे.

या कथानकातील काही प्रसंग खूप बोलके व जगण्यावरची निष्ठा वाढवणारे आहेत. अनाथ डोरोथीचे आँटी-अंकल हे प्रेमळ दाखवले आहेत. त्यामुळे जादुई नगरीत असून देखील डोरोथीला घरी जायची ओढ लागलेली असते. सुरवातीला तिला भेटलेला भविष्य सांगणारा कनवाळू प्रोफेसर, ती इकडेतिकडे भरकटू नये म्हणून ज्या पद्धतीने तो भविष्य सांगण्याचा अविर्भाव आणून तिला घरी जाण्यासाठी प्रवृत्त करतो. तो सीन तर तरुणाईची मनोवस्था कशा पद्धतीने
हाताळायची याचा अप्रतिम नमुना आहे.
अनेक प्रलोभने दिसत असून डोरोथीला घराचं म्हणजेच कुटुंब व्यवस्थेचे समजलेलं महत्त्व. घरातून पळून जाणे हे उत्तर नाही. हे आतून तिला पटलेलं असतं. जे आपल्याकडे आहे, ते इतरत्र शोधण्याची गरज नाही. आपल्याकडे सहृदयता, हिंमत, बुद्धी याचा योग्य वापर केला तर आनंदी, सुखसमाधानाने जगता येते.
शेवटी तिच्या अवतीभवती शेजारी, नातेवाईक दाखवून पालकत्वाची व्यापक भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने दाखवली आहे. ते बघून आपल्याला ही म्हणावसं वाटत की ‘There’s no place like a home!’

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शक आहेत.

COMMENTS