कोरोना से कुछ नया सिखोना

कोरोना से कुछ नया सिखोना

कोरोनामुळे सक्तीचा लॉकडाऊन सर्वांनाच भोगावा लागतोय. पण या लॉकडाऊनने सर्व कुटुंब एकत्र आले आहे. एकमेकांशी संवादाची नवे दारे उघडली गेली आहेत. पण मोठ्या लॉकडाऊनमुळे घरात एकसुरीपणा देखील आला आहे. अशा परिस्थितीत जगण्यात गंमत व घरात खेळीमेळीचे वातावरण कसे तयार करता येईल यावर सांगताहेत प्रख्यात बालशिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर.

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे
राज्यात नवे निर्बंध लागू
ओमायक्रॉनचे आव्हान चिंता वाढवणारेः मुख्यमंत्री

कोरोनाचं आणि माझं कसं काय चाललंय हे विचारण्यासाठी परवाच विजयाताई मेहता यांचा फोन आला होता. वर्षातून एकदा वगैरे त्या मला फोन करतात. त्यांच्या पुस्तकांची आणि इतर लिखाणांची कामे ठप्प झाल्यामुळे त्या कंटाळल्या होत्या. मी म्हणाले, “बाकी कंटाळा आला तरी पतीराजांशी भरपूर गप्पा मारायला, पोटभर प्रेमकूजन करायला भरपूर वेळ मिळत असेल ना?” “कसलं काय ग?” त्या जरा उसळून म्हणाल्या, फारूक आणि मी सारखं भांडतच असतो बघ. बराच वेळ जातो म्हणा भांडणात; पण प्रेमाबिमाचं आता काय बोलणार?” हे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध नटरंगी प्रेमी जोडपं! लटकं का होईना, ते सारखे भांडत असतात असं म्हटल्यावर इतरेजनांची काय कथा!

मला भीती अशी की तुमच्यासारख्या तरुण किंवा किंचित प्रौढ आईबाबांनी सतत भांडणे उकरून काढली तर मुलाचं काय होईल? पण तरुण वयात तुम्ही इतके भांडत नसाल म्हणा मुलांसमोर! या गृहितकावर आधारित तर पुढचे लिहिते आहे.

*         *         *         *         *         *         *           *         *         *         *         *

शामला आणि शशिकांत चाळीशीतलं जोडपं. शशिकांतचे आई-बाबा (आजी-आजोबा) १४, ११, ६ वयाची तीन मुले – शशांक, शौनक आणि शेंडेफळ शीतल [मुलगी] असे सात जणांचे गोड कुटुंब. देशभर लॉकडाऊन झाल्यावर बाबाने सगळ्यांसाठी एक प्रेमळ फतवा काढला. प्रत्येकाने आपल्याला हवी तशी मजा करावी. सगळीकडे आनंदीआनंद! मज्जाच मज्जा! पण तीन दिवसातच सगळ्यांना प्रचंड कंटाळा यायला लागला. आजोबांचा हास्य-क्लब बंद, आजीचे सीनिअर सखीमंडळ बंद, पोरांच्या शाळा तर आधीच बंद आणि आई नि बाबांची ऑफिसं पण बंद.

मग बाबानेच एक मार्ग काढायचं ठरवून एक लोकशाही बैठक ठरवली. विषय –  कोरोना कंटाळा.

आजोबा – आपण रोज रोज त्याच त्याच गोष्टी केल्या की खरं म्हणजे कंटाळा

यायला हवा. पण तसं नसतं. रोज काही ठराविक गोष्टी करून आपल्याला मानसिक स्थैर्य येतं आणि त्यामुळे आपली जीवनेच्छा मजबूत होते. मग……..

शीतल – आजोबा, ते स्थ – स्थ – स्थेर म्हणजे काय? आणि दुसरं म्हणालात ते

म्हणजे काय?

शशांक – गप ग शितू, तुला ते कळायचे नाही.

आई – समजावून सांगितले की सगळं कळतं. शीतल, मी सांगीन हं तुला.

शौनक – नाहीतर मी सांगेन तुला; आईला वेळ नसेल तर.

शशांक – तुला तरी काय कळणार आहे? इंग्रजी शाळेत जातोस ना?

बाबा – माझी एक सूचना आहे. अशी बैठक म्हणजे मिटिंग दिवसातून दोनदा

घ्यावी.

शशांक – दोनदा म्हणजे अतीच होईल. दिवसाआड घ्यावी.

शौनक – दादा, रोज एकदा चालेल.

शीतल –  दोनदा- दोनदा- दोनदा!

शशांक – गप ग तू चोंबडे.

बाबा – आल्या सभेत वाईट शब्द वापरायचे नाहीत हा पहिला नियम.

शौनक – आयला, हा कसला नियम?

बाबा – तूही वाईट शब्द वापरलास शौनक. पुन्हा नको वापरूस.

शौनक – बाबा, आयला हा शब्द वाईट राहिलेला नाही आता.

तुमच्यासाठी असेल, पण आता सगळे वापरतात तो.

बाबा –  त्यावर आपण नंतर चर्चा करू आणि ठरवू.

आई – आता माझं कोणी ऐकणार आहे कां? ऑफिसचं काम घरी आणलंय. धुण्याभांड्याची शारदा येत नाही. झाडूपोछावाली नाही आणि स्वयंपाकाच्या मावशीही येत नाहीत. इतका सगळा स्वैपाक आणि इतर कामं झेपत नाहीत आता माझ्यानं. तुम्हा सगळ्यांना कोरोना कंटाळा येतो, तसे माझं नाही. कारण कंटाळा यायला वेळच नाही माझ्याकडे!

बाबा – आजच्या विषयावर आलीस तू. तुमच्या आईचे फारच हाल होतायत पोरांनो! आपण सगळेजण तिला जास्तीतजास्त मदत करू. हे आपल्या आधीच लक्षात यायला हवं होते.

शशांक – आई, आम्ही सगळे मिळून तुलाही कोरोना कंटाळा यायला लावू. तुझी कामं तर करूच, पण पत्ते, बुद्धिबळ, ल्युडो, कॅरम खेळताना तुलाही त्यात घेऊ. शितू सापशिडी आणि पाच-तीन-दोन खेळेल आईबाबांबरोबर. मी आणि शौनक भांडणार नाही. आजी-आजोबांचे हरवलेले चष्मे आणि औषधं सापडून देवू. सगळे खूप खेळू, मदत करू आणि मजाही करू.

सगळेजण – वा वा! छान, मस्तच वगैरे म्हणतात आणि बैठक संपते.

*         *         *         *         *         *         *           *         *         *         *         *         *

मी आधीच म्हटलं होतं ना की ही एका “गोड” कुटुंबाची गोष्ट आहे. सर्वानुमते मिटिंग वगैरे घेऊन फैसला करणारी कुटुंबे पहिली आहेत का कोणी? सीरियलमध्ये सुद्धा नसतात. तरीसुद्धा मी त्यांच्यातल्या एकाबद्दल लिहिलंय याचं एकमेव कारण असं की माझ्या ४० वर्षाच्या शालेय आयुष्यात असे खूपच लोकं पाहिलेले आहेत, त्यांना सलाम म्हणून त्यांना अग्रस्थान दिलंय. सुखी, स्वानंदी आणि अप्रसंगांशी एकीने लढणारी अनेक कुटुंब मी पाहिलेली आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकलेली आहे. शिक्षण हे सदैव परस्परावलंबीच असतं. असो!

धान्य, दूध, औषधं भाजी, सोडून सगळी दुकानं बंद, हे लक्षात ठेवूनच मी पुढचं लिहिते आहे. आणि माझे सर्वात प्रेमाचे विषय, पुस्तकं आणि संगीत हे पुढच्या वेळेसाठी राखून ठेवते आहे.

मुलांनी चित्रं काढावीत असं आईबाबा, शिक्षक आणि ड्राइंग सरही सांगतात. पण मोठ्यांनी का काढू नयेत चित्रं? डोक्यात खूप कल्पना असतात. पाण्यात मासे जसे सुळकन इकडून तिकडे सळसळत जातात, तशा असतात या कल्पना. हव्या त्या कल्पनेला पकडून, मनात रुजत घालण्याचं कौशल्य किंवा “स्किल” लागतं; ते मोठ्या माणसात सहसा नसतं आणि मुलांमध्ये बहुशः असतं, कारण मुलं क्रिएटीव असतात. त्यामुळे घरातील सर्वांनी चित्रं काढावीत, मुलांचा सल्ला घ्यावा आणि त्यातला आनंद घ्यावा. मुलांना मात्र आपण सल्ले बिलकुल देऊ नयेत.

एखादे दिवशी बाबाने पुढाकार घेऊन, वर्तमानपत्राची दोन पाने एकमेकांना फेविकॉल/खळ वापरून मधल्या कडांवर चिकटवावी. २७ x ४२ इंचाचा [६९ x१०७ सेमी] एवढा मोठा कागद होईल. त्या कागदावर ड्राइंगच्या वह्यांमधले कोरे ताव काळजीपूर्वक चिकटवावेत. मोठा शुभ्र कागद मिळेल. तो फरशीवर ठेवून प्रत्येकाने शक्यतो एकाच वेळी किंवा वाटेल तेव्हा चित्रं; पेन्सिलने, ब्रशने, टूथ ब्रशने किंवा काडीने किंवा दात कोरायच्या काडीने काढावीत. रंगवावीत. जलरंग ब्रश, तेली-खडू [क्रेयॉन], फळ्यावरचे खडू [जरा बेतानं, कागद न फडता], रंगीत पेन्सिली काहीही वापरावेत. मधेच ताई येऊन चित्रात जलरंगाचे सपकारे मारून कलाकुसर निर्माण करेल, ते पाहून छोटा बबडू “ताई – छान – छान” असं म्हणत नाचू लागेल. कदाचित कला रसग्रहणाचे त्याचं हे पहिलं पाऊल असेल! आजी त्यावर चंद्रसूर्य आणि गोपद्म रंगवेल आणि आई कॉलेजमधे असताना खेळायला न मिळालेल्या बॅडमिंटनची चित्रे काढेल. बबडू तर अक्षरशः हवं ते काढेल.

सगळ्या कुटुंबाने मिळून काढलेलं ते चित्र अपरिमित सुंदर असेल आणि कोरोनाला पळवल्यानंतर तुम्हा सर्वाना ते भिंतीवर लावावं असं वाटेल. “कोरोना आणि आम्ही” किंवा “कोरोनाचे दिवस” असं काहीतरी रम्य [!] नावं देऊन.

कधी कधी बबडूला फाडण्यासाठी/कात्रीने कापण्यासाठी वर्तमानपत्रांचे कागद द्यावेत. “बबडूचे फाडण्यासाठी/कात्रीने कापण्यासाठी कागद” असं एका पिशवीवर लिहून ती पिशवी बबडूकडे द्यावी. हे फाडायला, नंतर कापायलाही मिळणार यामुळे बबडू भयंकर खूष होतो. त्यावेळी तुमच्या कोणत्याही अटी तो ताबडतोब मान्य करतो. दिसलेला कोणताही कागद फाडायचा नाही, मोठ्या माणसांना विचारल्याशिवाय नाहीच नाही, अशी त्याची यावेळी बौद्धिकं घावी.

मग तुम्ही त्याला कागद फाडायला, त्याचे बोळे करायला, त्या कागदी बोळ्याचे [अनुस्वार x ] हार करायला शिकवा. नंतर त्यात तऱ्हा तऱ्हा करता येतात. फुलांचे-पानांचे, घरात मणी असले तर त्याचे हार, फुलांचे गजरे करता येतात. अशा खेळातून बबडू खूप कौशल्ये शिकतो आणि मुख्य म्हणजे आनंदी आणि क्रिएटीव बनतो.

कागदाबरोबर पुढची आवृत्ती म्हणजे घडीकाम. वर्तमानपत्रांच्या कागदांनी कुत्र्याचं पिल्लू, घर, मांजरीचा चेहरा, साधी बोट, बंबी बोट, जहाज, डबा वगैरे वस्तू शिकवा. शिकवताना मात्र सगळेच डॉ. अनिल अवचट नसतात हे ध्यानात ठेवा.

घडीकामाची पुढची पायरी म्हणजे, चार-साडेचार वयाच्या मुलांना कातरकाम द्यावे. शिकवल्यानंतर! मुलाला सहज हातात धरता येईल, असा एक वर्तमानपत्राचा कागद द्यावा. त्यावर तेली-खडूने [क्रेयॉन] चारपाच इंच लांबीची जरा जाडसर रेघ काढावी. बबडूच्या जवळ बसून, कात्री त्याच्या हातात, पण कंट्रोल तुमच्याकडे, अशी धरून त्या जाडसर रेषेवरून कापावं. चार-पाच  वर्तमानपत्रात बबडू कापायला शिकतो. मग जाड रेघ जरा बारीक करावी. या सगळ्या प्रयोगात बडबड अजिबात बंद! नंतर कागदाची साधी डबल घडी करून छोटे गोल, त्रिकोण, चौकोन कापायला सांगावेत. कागद उलगडल्यानंतर जे डिझाइन दिसतं त्यानं बबडू आणि आपणही थक्क होतो.

सध्याच्या गरम दिवसात बबडूला छोटी बादली, पाणी आणि फरशी पुसायला स्वच्छ फडकं द्यावं. त्यात बबडू खूपच रमतो. त्या शांततेत आपली कामं उरकून घ्यावीत.

तुम्ही स्वयंपाक करताना बबडूला सोलण्याची, किसायची, लाटण्याची कामं द्यावीत. छोटी भांडी खेळायला द्यावीत.

रंगीत लाकडी ठोकळे ही बालवयातील एक जादूभरी गोष्ट आहे. सर्वांच्या घरी ते असतातच असं नाही पण असल्यास ते नुसते खेळायला द्यावेत. त्याबरोबर सूचना आणि उपसूचना देऊ नयेत. एकच सूचना मात्र अवश्य द्यावी. बाजूला कोणी ठोकळ्यांशी खेळत असेल, तर काही झालं तरी त्याच्या ठोकळ्यांना हात सुद्धा लावायचा नाही, आणि त्याची रचना पाडून टाकायची नाही.

या आणि अशा बऱ्याच मुक्त खेळामधून मुलांना भारी आनंद मिळतो. आत्ता मला आठवलं मुलांचं एक अतिप्रिय खेळणं म्हणजे चेंडू. सगळ्याच मुक्त खेळात मुलांना हवं तसं खेळू द्यावं; पण एक नियम आहे. खेळ म्हटलं नियम येतोच. एक किंवा अनेक! आपल्या खेळण्याने किंवा खेळानं दुसऱ्या कोणालाही इजा होता कामा नये. हा मुख्य नियम!

मुक्त खेळांनी मुलांच्या व्यक्तिमत्वात आश्चर्यजनक उत्तम बदल होतात; व्यक्तिमत्व विकासाला स्थिर पाया मिळतो.

अशा मुलांना कोरोनाच काय, इतर कशाचाही कंटाळा येणारच नाही. जाऊ तेथे खेळू आणि आनंद पसरवू अशीच त्यांची वृत्ती असेल.

मीना चंदावरकर या बालशिक्षणतज्ज्ञ असून, पुण्यातील अभिनव विद्यालय (इंग्रजी माध्यम) व न्यू इंडिया स्कूलमार्फत त्यांनी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी गेली ४० वर्षे विविध उपक्रम चालवले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0