संरक्षणाच्या विळख्याचा सापळा

संरक्षणाच्या विळख्याचा सापळा

गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील काही साहित्यिकांना-कलाकारांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या सर्जनशील माणसांना कोणापासून धोका आहे ज्यामुळे त्यांना संरक्षणात रहावे लागत आहे? का व्यवस्थेला धोका पोहोचवू शकण्याच्या त्यांच्या विचारांना, प्रतिभेला काबूत ठेवण्यासाठी हा संरक्षणाचा सापळा रचला गेला आहे?

प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी: हिंदू मुस्लिमांच्या पाठीशी कधी उभे राहतील?
रेस्तराँ रात्री १२ तर दुकाने ११ पर्यंत सुरू राहणार
गणेश आगमन- विसर्जन मिरवणूका नकोः राज्य सरकार

“जगण्यातलं खाजगीपण संपून गेले आहे.” प्रवीण बांदेकर सांगत होते.

“एका अदृश्य शत्रूसाठी संरक्षण पुरविण्यात आले आहे. याचा आपल्या हालचालींवर परिणाम होतो.” गणेश विसपुते म्हणाले.

“तुम्हाला सतत कोणीतरी पाहत आहे, असं वाटत राहतं.” संजीव खांडेकर म्हणाले.

“हा लोकांना घाबरवण्याचा, भीती आणि दहशत पसरविण्याचा प्रकार आहे.” आनंद करंदीकर म्हणाले.

सध्या आपण नेमक्या कोणत्या समाजात राहतो आहोत, हे दाखवणारी ही चार प्रातिनिधिक अवतरणे आहेत. तिघेही जण, स्पेशल प्रोटेक्शन युनिट (ग्रुप)च्या संरक्षणाच्या छायेत गेले कित्येक महिने स्वतःचे वाचन-लेखन करतात, चित्र काढतात, भाषणे देतात, लोकांना-नातेवाईकांना भेटतात, प्रवास करतात आणि गप्पाही मारतात.

यांच्यासह अनेक जणांना जुलै-सप्टेंबर २०१८ पासून स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे संरक्षण देण्यात आले आहे. त्याचे स्पष्ट कारण कोणालाही सांगण्यात आलेले नाही. तुमच्या जीवाला धोका आहे असे सांगत पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने या सगळ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना संरक्षण देण्यात आले. यांना संरक्षण पुरविण्याच्या ‘वरून’ सूचना आल्या आहेत. ‘वरून’ म्हणजे नक्की कुठून हे कोणालाही नक्की माहित नाही. एका ओळीचाही लिखित स्वरूपात कोणताही आदेश नाही.

महाराष्ट्रात यांच्याशिवाय लेखक राजन खान, छायाचित्रकार संदेश भंडारे, वकील असीम सरोदे यांना संरक्षण देण्यात आले आहे. भारतात इतरही  राज्यांमध्ये अशा प्रकारचे संरक्षण ब-याच  मंडळींना देण्यात आले आहे का याचे उत्तर मात्र मिळत नाही. ह्या संदर्भात कोणी माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारल्याचेही ऐकिवात नाही.

प्रवीण बांदेकर कोकणातल्या सावंतवाडीत राहतात. ते कवी, कादंबरीकार, संपादक आहेत. आरडीपी महाविद्यालयात ते इंग्रजीचे अध्यापन करतात. माणगाव येथील साने गुरुजी स्मारक संस्थेचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं’ हे कविता संग्रह, ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ह्या कादंब-या, आणि ‘घुंगुरकाठी’ हे ललित लेखन, अशी त्यांची पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. येरू म्हणे’ साठी त्यांना २००१ साली महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता जो त्यांनी देशातील असहिष्णूतेचा निषेध म्हणून २०१५ साली परत केला.

गणेश विसपुते पुण्यात राहतात. ते कवी,  अनुवादक, चित्रकार आणि भाषा, साहित्य व संस्कृतीवर लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत. त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद झाले आहेत. ‘सिनार’, ‘आवाज नष्ट होत नाहीत’, ‘धुवांधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध’, हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. ‘निरिहयात्रा’ हा ललितलेख संग्रह असून, त्यांनी ‘माय नेम इज रेड’ या ओरहान पामुकच्या पुस्तकाचा आणि ‘पिवळ्याधम्मक छत्रीतील मुलगी’ या उदय प्रकाश यांच्या हिंदी पुस्तकाचा अनुवाद केला आहे. त्यांना ‘निरिहयात्रा’ या लेखसंग्रहाला  आणि ‘आवाज नष्ट होत नाहीत’ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते, ते त्यांनी २०१५ साली परत केले.

संजीव खांडेकर मुंबईत राहतात. ते कवी आहेत. लेखक, स्तंभलेखक, चित्रकार आणि कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नावावर ९ पुस्तके आहेत. त्यांनी सुजन, रुची या नियतकालिकांचे संपादन केले आहे. १९६० ते १९८० या दशकांतील डाव्या चळवळीतील तरुणांचा दस्तऐवज त्यांनी शब्दबद्ध केला आहे. ते अनेक स्वयंसेवी संस्थांशी संबधित असून मराठी स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्यांच्या लेखसंग्रहाचे त्यांनी संपादन केले आहे. गिरणी कामगारांच्या बायकांची त्यांनी सहकारी संस्था स्थापन करून, त्याद्वारे मुंबईमध्ये झुणका-भाकरी केंद्रांचा उपक्रम राबविला होता. त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलादालनांमध्ये चित्र प्रदर्शने झाली आहेत. तेल युध्द, हवामान बदल,  नवउदारमतवाद असे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत.

भारतभरातल्या अनेक लेखक-कलावंतांनी ‘दक्षिणायन’च्या निमित्ताने एकत्र येऊन भारताची सशक्त लोकशाही अधिक बळकट व्हावी, वैचारिक मतभेदांना हिंसेने संपवणे थांबवावे, यासाठी यात्रा काढल्या होत्या त्या मधले हे तिघे! लेखकाचे स्वातंत्र्य, लेखकाची भूमिका, स्वातंत्र्याचा संकोच यांविषयी या मंडळींनी आस्थेने आवाज उठवलेला आहे.

कर्नाटक पोलिसांच्या माहितीनंतर, १० ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान महाराष्ट्रातील नालासोपारा येथे दहशतवाद विरोधी पथकाने अनेकजणांना अटक केली होती. या सगळ्यांचे संबंध पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी जुळत असल्याचा आणि त्यांच्याकडे स्फोटके सापडल्याचा आणि एक मोठ्या कटाचे जाळे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्याचवेळी झडतीमध्ये एक डायरी सापडली होती. त्या डायरीमध्ये अनेक नावे होती त्यामध्ये या मंडळींच्या नावाचा समावेश होता असे ऐकण्यात आले. त्यानंतर अनेकजणांना संरक्षण पुरविण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र याला कोणीही दुजोरा दिलेला नाही.

या सगळ्यांचे संरक्षण कसे केले जाते? प्रत्येकाला एक जवान संरक्षणासाठी तैनात करण्यात आला आहे. बांदेकर आणि खांडेकर यांच्यासाठी दोन-तीन जवान आळीपाळीने नेमलेले आहेत तर विसपुते यांच्या सोबत एकच जवान बरेच महिने आहे. ते विशिष्ट गणवेशात नसून साध्या कपड्यांमध्ये असतात. त्यांच्याकडे कायम बंदूक असते. ते या साहित्यिक मंडळींच्या सतत बरोबर असतात; त्यांच्या मुख्यालयाला सतत अहवाल देतात. अनेकदा या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी, सभेसाठी, बाहेर गावी जावे लागते. त्याची पूर्वसूचना या पोलीसजवानामार्फत मुख्यालयाला द्यावी लागते. प्रवास करताना जवान गाडीत, एसटीमध्ये बरोबर असतो. गाडीचा क्रमांक, कुठे जाणार, चालक, कोण बरोबर याची माहिती सतत द्यावी लागते. बाहेरगावी विमानानी जाताना मात्र हे जवान त्यांची सोबत करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे शस्त्र असते. विमानातून उतरण्याआधी तिथले स्थानिक पोलीस लक्ष ठेवण्यासाठी हजर असतात.

सप्टेंबर महिन्यात एक दिवशी सकाळी महाविद्यालयात जात असताना बांदेकर यांना स्पेशल प्रोटेक्शन ब्रांचचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की यापुढे तुम्हाला चोवीस तास संरक्षण देण्यात येणार आहे.

बांदेकर म्हणाले, “माझे गाव नदीच्या पलीकडे आहे. पत्नीला, मुलाला दररोज सोडायला आणायला जावे लागते. आई आजारी आहे. तिला डॉक्टरकडे न्यावे लागते. भाजीपाला किराणा आणायला जावे लागते. मला असे संरक्षण नको. पण पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की तुम्ही रोजची कामे करीत राहा. आमचा माणूस तुमच्या आसपास राहील. तुमच्यावर लक्ष ठेवेल. त्याचा तुम्हाला काही उपद्रव होणार नाही. संरक्षण सुरु झाले. अस्वस्थता, चमत्कारिक खळबळ, सूक्ष्म भय दडपून मुलांना शिकवत राहणे, कुटुंबीय, सहकारी यांना सामोरे जाणे, हे अवघड होते.” आता बांदेकर व्यासपीठावर असले तरी मागे साध्या वेशातील एक  पोलीस उभा असतो. उपरोधाची बाब ही आहे की त्याच्या उपस्थितीतच अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर बांदेकरांना बोलावे लागते!

‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही कादंबरी २०१६ मध्ये प्रसिध्द झाल्यापासून बांदेकरांना धमक्या यायला सुरुवात झाली होती. उजव्या विचारसरणीच्या काही कडव्या धर्मसंस्थांचे कारनामे, देवाधर्माच्या, सनातनी परंपरांच्या, अस्मितांच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली सर्वसामान्य बहुजन समाजाच्या बायका-मुलांची दिशाभूल करून त्यांना आपल्या स्वार्थी हेतूंसाठी नादी लावणे, कालबाह्य रूढी, अवैज्ञानिक कर्मकांडे आणि विचारांची चिकित्सा करू पाहणाऱ्याना पाखंडी, दुर्जन म्हणून त्यांच्याविषयी सामान्य लोकांचे मत कलुषित करणे, अशा गोष्टींविषयी ही कादंबरी टिपणी करते. ही कादंबरी प्रकाशित झाली आणि बांदेकरांकडे काही उजव्या विचारसरणीच्या साधकांकडून जाब विचारणे  सुरु झाले. त्याचे पर्यवसान थेट पोलीस संरक्षणापर्यंत झाले.

बांदेकर म्हणाले, “विवेकी विचार सांगू पाहणाऱ्याला दडपशाहीने वा दहशत निर्माण करून त्याचे काम बंद पडण्याची एक नवी व्यवस्था गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात निर्माण झाली आहे. मी ज्या काळाविषयी, ज्या व्यवस्थांविषयी आणि त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात सुरु केलेल्या उलथापालथीविषयी बोलू पाहतो आहे, त्याच काळाने आणि व्यवस्थांनी मला, मी एक लेखक म्हणून करीत असलेल्या हस्तक्षेपाचे परिणाम माझ्या खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यावर काय आणि कसे होऊ शकतात, याची जाणीव करून द्यायला सुरुवात केली आहे. आपल्या हरएक क्षणांची माहिती सरकारपर्यंत पोहोचतेय, ही जाणीव विलक्षण अस्वस्थ करणारी आहे.”

विसपुते यांनाही जून २०१८ मध्ये त्यांच्या जीवाला कथित धोका असल्याने संरक्षण पुरविण्याच्या ‘वरून’ सूचना आहेत, त्यामुळे स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे संरक्षण घ्यावे लागेल असे सांगण्यात आले. शेवटी २० जुलै पासून संरक्षण घेण्याचे त्यांनी मान्य केले. विसपुते म्हणाले, “सामान्य माणूस म्हणून मुक्त संचाराचं स्वातंत्र्य असलेल्या नागरिकाप्रमाणे जगणेच एकाएकी थांबते. एरवी आपण काही सतत टॅक्सी आणि चारचाकीतून प्रवास करत नाही, शहरात फिरायला दुचाकीच वापरतो. तसं प्रवास करणं कठीण होतं. तुमच्यावर बंधने येतात. एक परका, अनोळखी माणूस सतत तुमच्याबरोबर आहे ही जाणीव सतत सोबत करते.”

विसपुते म्हणाले की “युरोपात दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी असेच घडले होते. जिथे जिथे लोकविरोधी सत्तेला असुरक्षित वाटतं तिथे तिथे मतं मांडणाऱ्यांना असुरक्षित केलं जातं. त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. पाळत ठेवणे हे फासिझमचे हत्यार असते. संरक्षण दिल्याने इतरांसाठी ‘तुम्हीही गप्प बसा, अन्यथा अशा परिणामांना सामोरे जावे लागेल’, असा संदेश द्यायचा असतो. तुम्ही कुठे जाता, काय करता, कुठे प्रवास करता, याची नोंद ठेवली जात असेलच.”

“वस्तुतः प्रबळ सत्तेनं घाबरावं असा लेखक हा खरोखरच इतका भयप्रद प्राणी असतो का?”, असा सवाल करून विसपुते म्हणाले, “प्रजेला, नागरिकांना निर्भयतेत जगता येणं शक्य होते असे शासनच आदर्श असतं! खुन्यांना न पकडता, किंवा आम्हाला ज्यांच्यापासून धोका आहे त्यांना न पकडता, आम्हालाच संरक्षणाच्या सापळ्यात राहावे लागत आहे. मनवर यांच्या कवितेला विरोध झाला, नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन परत मागे घेतले गेले. हे लेखक म्हणून पाहाणे क्लेशदायक आहे.”

संजीव खांडेकर यांनी २००७ मध्ये ‘व्हॉट डू आय लव्ह, व्हेन आय लव्ह यु माय गॉड’, हे चित्र प्रदर्शन मुंबईत लावले होते. त्यानंतर त्यांना धमक्या यायला सुरु झाल्या. देवांची विटंबना केली म्हणून, अर्वाच्च भाषा असणारे, शिव्या देणारे उजव्या विचारसरणीच्या साधकांचे फोन, पहाटे ४ वाजल्यापासून यायचे. त्यानंतर पुढे त्यांची एका वृत्तपत्रात ‘अप्रासंगिक’ नावाची लेखमाला सुरु झाली होती, त्या लेखांमुळे आणि पानसरे यांची हत्या आणि पुरस्कार वापसी नंतर त्यांनी लिहीलेल्या लेखांमुळे त्यांना पुन्हा धमक्या सुरु झाल्या. फोन, ई-मेल, व्हॉटस-अप ग्रुप अशा सगळ्या ठिकाणी त्यांची बदनामी सुरु झाली. जुलै २०१८मध्ये पोलिसांनी संपर्क साधला आणि संरक्षण घ्यायची गरज लादली गेली.

खांडेकर म्हणाले, “गाडीमधून जाताना, चालताना सतत गनमॅन तुमच्याबरोबर असतो, तुम्ही काहीही बोलताना विचार करावा लागतो. हे भयानक आहे. चौरीचौरा येथे हिंसक घटना घडल्या, त्यावेळी गांधीजींनी आंदोलन मागे घेतले आणि उपोषण केले. ही या देशाची संस्कृती आहे. पण आता धमक्या देणाऱ्या लोकांचा सन्मान केला जातो. या देशाचे पंतप्रधान मोदी त्यांना चहाला बोलवतात, त्यांना सोशल मिडीयावर फॉलो करतात. म्हणजेच संरक्षण आणि उत्तेजन देतात. हे सगळे संघाचे लोक आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीतील नरसंहाराबाबत १९६१ मध्ये अडोल्फ इचमन या नाझी अधिकाऱ्यावर ट्रायल सुरु होती. त्यावेळी हनाह अरेन्डट ही ‘न्यूयॉर्कर’साठी हा खटला पत्रकार म्हणून कव्हर करीत होती. त्यावेळी तिच्या असे लक्षात आले, की नरसंहाराबाबत या लोकांच्या मनात कोणताही पश्चाताप नाही. जे केले ते करणे अपेक्षित होते, असा त्यांचा भाव होता. त्या प्रवृत्तीला तिने कौर्याचे सामान्यीकरण (बनालीटी ऑफ इव्हील) हे नाव दिले. म्हणजे पसरत जाणारी विषवल्ली जी आपल्याकडेही पसरत चालली आहे. संपूर्ण समाजामध्ये हा रोग खोलवर गेला आहे. आता परिस्थिती अशी आहे की ज्याला विचार व्यक्त करायचा आहे, त्याला संरक्षण द्यायची गरज आहे. उद्या सगळ्या देशाला संरक्षण देणार का? कारण या राजवटीला केवळ ३१% लोकांनीच मते दिली आहेत.”

विसपुते यांना वाटते की “खुन्यांना अभय आहे. सामान्यांना बंधने आहेत. हे फॅसिस्ट राजवटीतच शक्य असते. हे सगळे लवकर बदलायला हवे. ही परिस्थिती बदलण्यासाठी साहित्यिकांनी बिरादरी म्हणून, समुदाय म्हणून व्यापक प्रमाणावर, काळाच्या या ऐतिहासिक टप्प्यावर आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, बोलले पाहिजे. अन्यथा पुढच्या स्वातंत्र्याकांक्षी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.” खांडेकर म्हणाले, “पूर्वीही अशा घटना घडायच्या पण आता, ही साथ सुरु झाली आहे. व्यवस्था सडू लागली आहे. हे लोकशाहीला घातक आहे.”

बांदेकर म्हणतात, “अडचणीचे ठरू शकणाऱ्यांना संरक्षणाच्या नावाखाली कह्यात ठेवायचा हा डाव असू शकतो. एका बाजूला काही विचारवंत, लेखक बुद्द्धीवाद्यांना अटक करायची आणि दुसऱ्या बाजूला काही जणांना संरक्षण देऊन सांगायचे की तुम्ही नजर कैदेत जगले पाहिजे, हे समकालातले प्रचंड विसंगत वास्तव आहे. हा असा प्रसंग काफ्काच्या एका कादंबरीत आहे, असे वाटू लागले आहे.”

आनंद करंदीकर हे अर्थतज्ज्ञ आहेत. कार्यकर्ते आहेत. प्राध्यापक आहेत आणि विचारवेध संमेलनाचे आयोजक आहेत. त्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांनी जुलैमध्ये ठरविले, पण करंदीकरांनी संरक्षण नाकारले आणि तसे लिहूनही दिले. करंदीकर म्हणाले, “पोलीस असल्याने सुरक्षा होतेच, याच्यावर माझा विश्वास नाही. संरक्षण म्हणजे अडगळ असते. तुमची महिती घेण्याचा उद्देश नाहीच, याची खात्री देता येत नाही. हा लोकांना घाबरविण्याचा प्रकार आहे. काही लोकांना संरक्षण दिल्याचे पाहून, लोकांमध्ये भिती पसरते. या प्रकाराला आपण हातभार का लावावा, असे मला वाटले, म्हणून मी संरक्षण नाकारले.”

मनासारखे वागता येत नाही, नेहमीच्या वागण्यात एक अवघडलेपण येते अशी भावना या चौघांनाही अनुभवायला मिळते. तो माणूस सारखा आपल्याबरोबर यायला नको असे वाटत असले तरी एका मानवी पातळीवर त्याच्याशी भावनिक नाते निर्माण होते असे या तिघांनीही सांगितले. “बाहेरगावी गेलो तर आवर्जून आम्ही जे जेवतो, जिथे जेवतो, तिथेच तो पोलिसही आमच्यासोबत जेवतो. मी स्कूटरवर माझ्या पत्नीला मागे बसवून जात असताना सोबत येऊ शकेल म्हणून माझ्याकडची एक जुनी स्कूटर ही मी त्यांना देऊ करतो.” बांदेकर सांगत होते. “माझ्या वाढदिवसाला विमानतळावर तीघेहीजण सकाळी एक वाजता आवर्जून उपस्थित राहिले होते आणि भेट म्हणून कडकनाथ कोंबडा घरी आणून ठेवला होता. त्यांच्या घरून मला चांगलेचुंगले पदार्थही खायला मिळत असतात. ते माझ्या घरातच माझ्या इतर नोकर मंडळीं बरोबर रहात असल्यामुळे आमच्यातला परकेपणा गेला आहे.” हे सांगत असताना खांडेकरांच्या आवाजातला ओलावा प्रकर्षाने जाणवून येत होता. विसपुतेही त्यांच्यासोबतच्या जवानाला हे वाच, ते वाचून, भाषा शिक, ही कविता ऐक अशा पद्धतीने प्रोत्साहन देत असतात. ज्या माणसाची साथ नको असताना लादली गेली आहे अशा नको असलेल्या माणसाबरोबर एक आपुलकीचे नाते निर्माण होणे, त्याची माणूस म्हणून काळजी करणे सुरू होणे यातला विरोधाभास जाणवत राहतो. ते जवान बोलून दाखवत नसले तरीसुद्धा त्यांना नक्की प्रश्न पडत असेल की पाल सुद्धा मारायला तयार नसलेल्या, या पुस्तकांमध्ये रमणाऱ्या माणसांना कोणापासून धोका असेल बरे ?

अशा रीतीने संरक्षणाच्या छायेत राहताना त्यांच्या सर्जनशीलतेवरही एक परिणाम नक्की होतो. कोणाच्यातरी सततच्या असण्याच्या जाणिवेने माझी एकाग्रता नक्की कमी होते, अशी खंत खांडेकर यांनी बोलून दाखवली.

या सगळ्या परिस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा काही साहित्यिक-कलावंतांना संरक्षण देऊन, पुरस्कार परत करणाऱ्या, लिहिणाऱ्या, सभेत बोलणाऱ्या इतर अनेकांना एक इशारा देण्याचा प्रयत्न झाला आहे का? हा त्यां इतरांवर जरब बसवण्याचा प्रयत्न आहे, का विषवल्ली पेरणाऱ्यांना मोकळे रान देण्याचा? समाजामध्ये एवढे साहित्यिक आणि कलावंत आहेत त्यापैकी फक्त ह्याच लोकांवर पहारा का? या मंडळींकडून अजून काही वैचारिक विद्रोही, पुरोगामी मांडणी होऊ नाही जिच्यामुळे व्यवस्थेला तडा जाण्याची शक्यता निर्माण होईल, हा खरा अंतस्थ हेतू संरक्षण देण्यामागे आहे का? ही बघा धोकादायक मंडळी असे दाखवून देऊन वेगळं पाडण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? व्यवस्थेविरुद्ध चकार शब्द न काढता साहित्य व्यवहारात मशगुल बाकीच्या मान्यवर साहित्यिक, अभिनेते, संमेलनाध्यक्ष आणि कलावंत मंडळींना एक दिलासा देण्याचा प्रयत्न असेल का?  ह्या सा-या जवान मंडळींना त्यांच्या या कामासाठी सरकार पगार देते. करदात्यांच्या पैशातूनच तो पगार दिला जातो. आपल्या पैशांचा हा विनियोग योग्य आहे की अयोग्य?

अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न शेवटी बांदेकरांच्या कवितेतल्या एका ओळी पाशी येऊन थांबतो, “घरातल्या घरात कोंडून ठेव, विसरून स्वतःला…!”

§

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0