धर्माची चेष्टा करावी की नाही?

धर्माची चेष्टा करावी की नाही?

भारतात आजूबाजूला पाहिले तर लक्षात येते, की इस्लाममध्ये काहीतरी मूलभूत दोष आहे अशी टीका करणारे लोक चार्ली हेब्दोने हिंदू देवदेवतांवर टीका केली असती तर मात्र वेगळे वागले असते.

धर्मांतरः विहिंपच्या तक्रारीनंतर ६ दलित-ख्रिश्चन महिलांना अटक
कर्नाटक सरकारचा धर्मांतरविरोधी अध्यादेश
इराकमध्ये मुस्लिम-ख्रिश्चनांनी सलोखा ठेवावाः पोप फ्रान्सिस

फ्रान्समध्ये अलिकडेच दोन खुनी हल्ले झाले. एक नीस येथे चर्चमध्ये झालेला हल्ला आणि दुसरा पॅरिसच्या ईशान्येकडील उपनगरात शिक्षकाचा झालेला खून. या दोन्ही हल्ल्यांबाबत जगभरात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला, जे योग्यच होते.

मात्र, अपेक्षेप्रमाणे #NiceTerrorAttack आणि #FranceTerrorAttack हे ट्विटरवर ट्रेंड होत आहेत आणि यासाठी इस्लामला दोष देणाऱ्या आणि त्याचा उपहास करणाऱ्या अनेक पोस्ट, मीम आणि कार्टून यांचा पूर आला आहे. भारतामध्ये नेहमीच मुस्लिम आणि इस्लामची निंदानालस्ती करणाऱ्यांना या घटनांमधून नव्या जोमाने तसे करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. मला या लेखामधून कोणत्याही धर्माबद्दल प्रबंध लिहायचा नाही, पण पक्के दुराग्रही लोक वगळता कुणालाही हे सहजपणे सिद्ध करता येऊ शकते की कोणत्याही धर्माला हत्या अमान्यच आहेत.

सर्व हत्या तितक्याच निंदनीय आहेत

सर्व हत्या निंदनीय आहेत; मात्र, अगदी काटेकोर नैतिक दृष्टिकोनातून पाहिले तर धर्माच्या नावे केला जाणारा खून कामवासना, धनलालसा किंवा अगदी देशप्रेमाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या खुनापेक्षा जास्त निंदनीय नाही.

एखाद्याने कामतृप्ती करून घेण्यासाठी खून केला तर कामवासनेची निंदा केली जात नाही. आपल्याला माहीतच आहे, की कामवासनाच नसेल तर मानवजातच टिकून राहणार नाही. संपत्तीच्या मोहाने खून झाला तर संपत्ती मिळवणेच अयोग्य असे कोणी म्हणत नाही. लोक संपत्ती मिळवत नसते तर मानवी समाज आजच्या सुखसोयी निर्माण करूच शकला नसता. आणि राष्ट्रप्रेम ही तर उदात्त भावना आहे, पण तरीही राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली केलेला खून तितकाच वाईट आहे आणि त्याचे विध्वंसक परिणाम होऊ शकतात. एका सर्बियन देशभक्ताने आर्चड्यूक फर्दिनांद याचा केलेला खून विध्वंसक अशा पहिल्या महायुद्धाचे एक निमित्त ठरला.

धर्माच्या अनुयायांच्या कृत्यांसाठी धर्माला जबाबदार मानता येणार नाही

त्याच प्रमाणे, इतर धर्माच्या लोकांच्या हत्या केल्यामुळे आपली धार्मिक पत वाढेल असे जरी एखाद्या व्यक्तीला वाटले, तरी त्यामुळे सरसकट त्याचा धर्म नालस्ती करण्यालायक ठरत नाही. कोणताही गुन्हा हा गुन्हेगाराची वैयक्तिक जबाबदारी असते. जरी हा गुन्हा धर्माच्या नावाने एका मोठ्या गटाने, एखाद्या लष्कर किंवा देशाने केला तरीही तो धर्माने केलेला गुन्हा ठरत नाही.

म्हणून, व्यक्तींनी केलेल्या गुन्ह्यांवरून इस्लाममध्येच मूलभूत दोष आहे असा दावा करण्याचे व त्याला दोषी ठरवण्याचे काही कारण नाही. कुणालाही धर्माचा एकमेव प्रतिनिधी बनण्याचा अधिकार नाही.

म्हणूनच, काटेकोरपणे बोलायचे तर, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी इस्लाम धर्माबाबत बोलणे, मूलतत्त्ववाद, धार्मिक प्रकल्प आणि राजकारणी यांच्यातील ताणतणावांचा उल्लेख करत जगभरात इस्लाम संकटात असल्याचे म्हणणे हे अविचारीपणाचे होते. मॅक्रॉन यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना धर्मनिरपेक्षतेचे फ्रेंच तत्त्व सर्वांना आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देते याचा पुनरुच्चार केला. असे करताना त्यांनी सर्व मुस्लिमांवर दोषारोप केले नाहीत व धर्मातिरेक्यांच्या सापळ्यात अडकले नाहीत. त्यांच्या भाषणातून त्यांना इस्लामची निंदा करायची नव्हती हेही स्पष्ट दिसून आले.

मात्र, ते हे विसरले की सर्वसामान्य मुस्लिम व्यक्ती, राजकारणी, मुस्लिम धार्मिक संस्था आणि मुस्लिम धर्मातिरेकी हे सर्व वेगवेगळे आहेत, ते एकमेकांवर अवलंबून नाहीत आणि त्यांच्यातील सामायिक घटक म्हणजेच इस्लामला त्यांच्या वैयक्तिक कृत्यांसाठी जबाबदार धरता येणार नाही.

तसेच, जवळजवळ सर्वच धर्मांमध्ये विविध गट-तट आणि विभाजन असल्यामुळे त्यांच्या वक्तव्यातील चूक सहज दिसून येते. त्यांच्या वक्तव्याची व्याप्ती वाढवून पाहिले तर सर्वच धर्म आज संकटात आहेत असे म्हणता येईल. सर्व अनुयायी अगदी एकाच पद्धतीने धर्माचे अनुसरण करत आहेत अशा एकसाची धर्माची आपण कदाचित कल्पनाही करू शकणार नाही.

ज्याला धर्माशी संबंधित कोणत्याही गोष्टींना मान्यता देण्याचा वा ती नाकारण्याचा आणि त्यानुसार कारवाईचा अधिकार आहे, असे इस्लामचे कोणतेही जगभरात सर्वमान्य पीठ नाही. पाकिस्तानने फ्रेंच अध्यक्ष मॅकरॉन यांच्यावर ते ‘इस्लामोफोबिया’ला प्रोत्साहन देत असल्याची टीका केली आहे. फ्रेंच साप्ताहिक चार्ली हेब्दोवर टीका करतानाच तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांनी मॅकरॉन यांच्यावरही टीका करत त्यांना त्यांच्या इस्लामप्रती असलेल्या दृष्टिकोनासाठी मानसिक तपासणी करून घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

त्यांना ही टीका करण्याचा अधिकार आहे, पण केवळ त्यांच्या देशाचे, एका राजकीय एककाचे प्रतिनिधी म्हणून. ते इस्लामचे सर्वमान्य नेते नाहीत आणि संपूर्ण इस्लामच्या वतीने बोलू शकत नाहीत. मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी केलेल्या १३ ट्वीटपैकी १२ व्या ट्वीटमध्ये त्यांनी “मुस्लिमांना भूतकाळातील हत्याकांडांना उत्तर म्हणून लाखो फ्रेंचांना ठार करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले, तेव्हा त्यांनाही संपूर्ण मुस्लिम जगताच्या वतीने बोलण्याचा काहीही अधिकार नव्हता.

खरे तर ते केवळ स्वतःपुरते बोलू शकत होते, जगातील १.८ अब्ज मुस्लिमांच्या वतीने नाही.

तुम्ही धर्माची चेष्टा करू शकता, पण इतरांच्या प्रतिक्रिया रोखू शकत नाही

या आणि अशाच घटनांमधील गुन्हेगार त्यांना त्यांच्या धर्माचा अपमान झाला असे वाटल्यामुळे व्यक्तिगतरित्या प्रचंड दुखावले गेले होते.

इथे आपण या लेखातील मुख्य नैतिक आणि कायदेशीर मुद्द्याकडे येत आहोत. जर एखाद्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतरांची चेष्टा करण्याचा, नालस्ती करण्याचा अधिकार मिळत असेल – मग ते त्यांचा धर्म, संस्कृती, वर्ण, रंगरूप, बुद्धिमत्ता, शरीर, पोशाख, आई, वडील, बहिण कशाबद्दलही असेल – तर मग इतरांना दुखावले जाण्याचा किंवा चिडण्याचाही अधिकार आहे. आता ते कसा प्रतिसाद देतात तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी गुन्हा केला तर त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा होईल. 

गुन्हा करणे हा त्यांचा अधिकार नाही, पण राग येणे किंवा दुखावले जाणे हा नक्कीच त्यांचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, सैद्धांतिक पातळीवर, कुणीही विश्वातील कोणत्याही बाबीची चेष्टा करू शकतो. मात्र, ज्याची चेष्टा केली तो जोपर्यंत त्याच्या कृत्याबाबत कायदेशीर परिणामांना तोंड द्यायला तयार आहे, तोपर्यंत त्यालाही त्याला हवे ते करण्याचा अधिकार आहे.

भारतामध्ये, आयपीसीचे कलम २९५ अ ‘धर्म किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून एखाद्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक केलेल्या द्वेषपूर्ण कृत्यांविषयी’ आहे. कलम १५३ अ हे ‘धर्म, वंश, जन्मस्थळ, रहिवास, भाषा इ.च्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे आणि एकोपा नष्ट होईल अशी पूर्वग्रहदूषित कृत्ये करणे’ याबाबत आहे.

याचाच अर्थ असा की त्यांच्या धर्माची चेष्टा केली गेली तर लोक दुखावले जाणे ‘स्वाभाविक’ आहे हे आपण मान्य केले आहे.   

अशा कायद्यांमध्ये एक मूलभूत संकल्पनात्मक दोष आहे, कारण विविध कायदेशीर घोषणा काहीही असल्या तरीही, धार्मिक भावना ही काही भौतिक गोष्ट नव्हे, आणि त्यामुळे त्यांचा विचार करताना नेहमीच काही प्रमाणात मनोगतता असणारच. उदाहरणार्थ मानवी शरीराच्या विरोधातील सर्व गुन्हे, उदाहरणार्थ ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीराची एकसंधता किंवा सार्वभौमत्व भंग झाले असेल, तर इजा वगैरेच्या स्वरूपात त्याची पडताळणी करता येते. मात्र, व्यक्तीची मानसिक एकसंधता किंवा सार्वभौमत्वाची कोणतीही शास्त्रीय संकल्पना नाही.

विविध वंशाचे आणि प्रदेशांचे लोक त्यांचे विनोद किंवा साहित्यातून ‘इतरांची’ नेहमीच चेष्टा करत आले आहेत. त्यातून काही कुणाच्या हत्या होत नाहीत. याचे कारण म्हणजे लोक काही गोष्टी सहन करतात, मात्र काहींमुळे संतापतात. ही पूर्णपणे मनोगत वर्तणूक आहे. कोण कोणत्या गोष्टीमुळे दुखावेल याचे भाकीत करता येत नाही.

हाच युक्तिवाद वापरला, तर अमुक सीमा उल्लंघली जाईपर्यंत लोकांनी आपल्या भावना दुखावून घेऊ नयेत किंवा राग येऊ देऊ नये असे सांगता येत नाही. ती सीमा काय असायला हवी हा नेहमीच वादाचा मुद्दा असेल. शास्त्रीयदृष्ट्या बोलायचे तर विवेकी मनुष्या’च्या काल्पनिक संकल्पनेचा विचार केल्याशिवाय अशी सीमा व्याख्यित करताच येणार नाही, कारण शब्द, चित्रे किंवा इतर संप्रेषण पद्धतींचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा होतो. दुर्दैवाने, ‘अविवेकी मनुष्य’ असणे हा काही गुन्हा नाही. त्या व्यक्तीला तिच्या कृत्यांबद्दल शिक्षा होऊ शकते, पण अविवेकी असल्याबद्दल नाही.

त्यामुळे मग प्रश्न निर्माण होतो, की अशाने लोक एकत्र कसे राहू शकतील?

माझा मुद्दा हा आहे, की एकमेकांबद्दलची समज, सहिष्णुता आणि आदर हे परस्परसंबंधांतून उत्क्रांत होत गेले पाहिजे. मनुष्यप्राण्यामध्ये ही समज उत्क्रांत होईपर्यंत असे गुन्हे घडतच राहणार आहेत.

काही लोक असा युक्तिवाद करतात, की चार्ली हेब्दोने ख्रिश्चन धर्माचीही चेष्टा केली आहे आणि कॅथलिक संस्थांनी १३ वेळा त्यांच्यावर खटला दाखल करून त्याला उत्तर दिले आहे. मात्र त्यांनी कुणाचे खून केलेले नाहीत. हे चांगलेच आहे, पण सगळेच तसे वागतील असे नाही. प्रत्येकजण न्यायालयात धाव घेऊही शकत नाही. आपण लोकांना गुन्हा केल्याबद्दल शिक्षा करू शकतो, फ्रान्समध्ये केले तसे त्यांना गोळी घालू शकतो; मात्र दुखावले जाण्यापासून आपण त्यांना रोखू शकत नाही.

थोडे आत झाकून पाहिले तर लक्षात येते, की इस्लाममध्ये काहीतरी मूलभूत दोष आहे अशी टीका करणारे लोक चार्ली हेब्दोने हिंदू देवदेवतांवर किंवा धार्मिक प्रतिकांवर टीका केली असती तर मात्र वेगळे वागले असते. फ्रेंच मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली असती किंवा अलायन्स फ्रॉन्सेजसमोर निदर्शने केली असती. फ्रेंच फ्राईज देणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटनाही कदाचित लोकांच्या रागाचा सामना करावा लागला असता आणि काही अतीउत्साही लोकांनी राफेल परत करा अशीही मागणी केली असती.

भूतकाळात हिंदूंनी अशा घटनांना कशी प्रतिक्रिया दिली आहे ते आठवून पहा. मग ते एम. एफ. हुसेन यांच्या तथाकथित अश्लील चित्रांबाबत असेल किंवा जावेद हबीब या हेअर स्टायलिस्टच्या जाहिरातींबाबत, ज्यामध्ये ‘देवसुद्धा जेएच सलूनला भेट देतात’ असे म्हटले होते, किंवा  देवतांची चित्रे असलेल्या डिझायनर शूजबाबत.

भारतीयांना आधी धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात हे मान्य करणारे इंडियन पीनल कोडच्या २९५ अ आणि १५३ अ सारखे कायदे रद्द करावे लागतील. जोपर्यंत हे कायदे आहेत, तोपर्यंत कोणा ना कोणाला तरी भावना दुखवून घेऊन गुन्हे करण्यासाठी निमित्ते मिळतच राहतील. हे कायदे रद्द केल्यानंतर आपण किमान गुन्ह्यांमधून हा ‘धार्मिक पैलू’ तरी बाजूला करू शकू.

डॉ. एन. सी. अस्थाना ,हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. लेखात मांडलेली मते वैयक्तिक आहेत. ट्विटर @NcAsthana.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0