तिच्या पदकाचा रंग बदलला… पण!

तिच्या पदकाचा रंग बदलला… पण!

तिला आपल्या ऑलिम्पिक पदकाचा यंदा रंग बदलायचा होता. नियतीने तिचे ऐकले. मात्र कोणता रंग ते तिने स्पष्ट करायला हवे होते. रिओ ऑलिम्पिकला तिच्या गळ्यात कांस्य पदक असेल. पदकाचा रंग सोनेरी (सुवर्ण) हवा हे मागायला ती विसरली.

मात्र रविवारी तिने भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एक नवी नोंद केली. आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला दोन सलग ऑलिम्पिकमध्ये पदके पटकाविता आली नव्हती. तिने तो पराक्रम केला. महिलांच्या बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक पटकावणारी ती पहिली महिला ठरली. रविवारी टोकियोमध्ये कांस्यपदक मिळवून महिलांच्या बॅडमिंटनमध्ये दोन पदके मिळविणारी पहिली भारतीय ठरली.

शनिवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला सूर गवसला नव्हता. रविवारी कांस्य पदकाच्या लढतीत मात्र तिने गतसामन्यातील पराभवाची कसर भरून काढली. चीनच्या हे बिंग जिआओचा अवघ्या ५३ मिनिटात फडशा पाडला. तिची सर्व्हिसही चांगली होत होती. पहिल्या गेममध्ये स्वत:च्या सर्व्हिसवर १२ तर दुसऱ्या गेममध्ये ११ असे गुण पटकाविले. जिआओला तिने आपली सर्व्हिस भेदण्याची संधीच दिली नाही. पहिल्या गेममध्ये ८ तर दुसऱ्या गेममध्ये ६ गुणांची मोठी आघाडी आणि वर्चस्व राखत तिने कांस्य पदकाचा सामना जिंकला. प्रतिस्पर्धी खेळाडूला तिने सहज गुण दिले नाही. दोघींमधील रॅली ४०-४० मिनिटांपर्यंत रंगत गेल्या.

शनिवारचा दिवस तिचा नव्हता. रविवारी मात्र तिचं कोर्टवर राज्य होतं. सायना नेहवालच्या छायेत ती सतत वावरली. तिचे वडील पी. व्ही. रामण्णा भारताच्या १९८६च्या सेऊल एशियाडच्या कांस्य पदक विजेत्या संघांचे सदस्य होते. आई. पी. विजया भारताच्या राष्ट्रीय संघांपर्यंत पोहोचली होती. सिकंदराबादच्या रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये ती दोघं सरावासाठी जायची. जाताना छोट्या सिंधूला घेऊन जायची. तेथे व्हॉलीबॉल कोर्ट शेजारी बॅडमिंटन कोर्ट होतं. सिंधूला एकटे बसून कंटाळा यायचा. मग ती त्या कोर्टवर जाऊन बॅडमिंटन रॅकेट हाती घेऊन शटल कॉक मारत राहायची. तिचं वय जेमतेम ८ वर्षांचे होते. पण नंतर तेथे तिच्यासोबत खेळायला इतरही खेळाडू यायला लागले. तिला त्यामुळे बॅडमिंटनची गोडी लागली.

मात्र वडील पी. रामण्णा, ती मोठी झाल्यानंतर तिच्यासोबत यायचे ते तिला आवडायचे नाही. आपल्या खेळात आपल्यावर मानसिक दडपण आणणारे कुणी नको असं तिला वाटायचं. एक दिवस तिने स्वत:‌‌हून वडिलांना सांगितले. माझ्या मोठ्या स्पर्धा असताना माझ्या सोबत येऊ नका! लंडन ऑलिम्पिकनंतर तिच्या वडिलांनी तिच्या सोबत जाण्याचे बंद केले. ती मुक्तपणे खेळायला लागली. रिओ ऑलिम्पिकला ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. टोकियोला कांस्यपदकापर्यंत.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडापत्रकार असून त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन केले आहे.

COMMENTS