एच-1बी व्हिसावरचे निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले

एच-1बी व्हिसावरचे निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले

वॉशिंग्टनः अमेरिकी कामगारांच्या हिताचा मुद्दा पुढे करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी व्हिसा व अन्य वर्क व्हिसावर लावलेले निर्बंध आणखी ३ महिन्यांसाठी वाढवले आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारतीय आयटी कर्मचारी व अनेक अमेरिकी-भारतीय कंपन्यांवर परिणाम होणार आहे. अमेरिकेत जाणारे बहुसंख्य आयटी कर्मचारी हे एच वन बी व्हिसावर काम करत असतात.

गेल्या वर्षी २२ एप्रिल व २२ जूनला ट्रम्प प्रशासनाने विभिन्न श्रेणींसाठी व्हिसाचे नवे नियम लावले होते, त्यामुळे परदेशी कर्मचार्यांना अमेरिकेत काम करण्यावर अडचणी आल्या होत्या.

३१ डिसेंबर २०२० रोजी एच वन बी व्हिसावरच्या निर्बंधांचा अखेरचा दिवस होता. आता हे निर्बंध ३१ मार्चपर्यंत राहतील.

आपला निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी अमेरिकेची बाजारपेठ व अमेरिकेची जनता अजूनही कोविड-१९ महासाथीशी संघर्ष करत असून हा विषय राष्ट्राच्या दृष्टीने चिंतेचा व गंभीर असल्याचे सांगितले. कोरोनाने अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली असून नोव्हेंबरमध्ये बेरोजगारीची टक्केवारी ६.७ टक्के इतकी होती, असे सांगितले.

ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल केवळ २० दिवस बाकी असून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे डेमोक्रेटचे पक्षाचे जो बायडन घेणार आहेत. बायडन यांची भूमिका स्थलांतरितांच्या हिताची आहे व एच वन बी व्हिसा संदर्भात मवाळ आहे. बायडन हे २१ जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतील व त्यानंतर काही दिवसांत ते आपली धोरणे जाहीर करतील.

अमेरिकेचे प्रशासन दरवर्षी ८५ हजार एच वन वी व्हिसा देत असते. गेल्या वर्षी या व्हिसासाठी २ लाख २५ हजार अर्ज आले होते.

मूळ बातमी

COMMENTS