हाया सोफियाः ऐक्याकडून दुहीकडे प्रवास

हाया सोफियाः ऐक्याकडून दुहीकडे प्रवास

हाया सोफिया : एक ऐतिहासिक वास्तू जी संघर्षानंतर का होईना दोन मोठे धर्म तसेच दोन राजवटींचा सांकृतिक, धार्मिक, वैचारिक वारसा, मिलाफ आणि इतिहास यांच्या ऐक्याचं प्रतीक होती तीच आता पुन्हा एकदा दुहीचं प्रतीक म्हणून २०२० पासून असणार आहे.

लुकाशेंको आणि हैराण युरोप
स्वीडन, फिनलंडचा नाटोत प्रवेशाचा प्रस्ताव
बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

जगात फार कमी अशा भव्य ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या मोठ्या धर्मांचा तसेच दोन राजवटींचा सांकृतिक, धार्मिक, वैचारिक वारसा, मिलाफ आणि इतिहास सांगत दिमाखात अजूनही उभ्या आहेत. अशा वास्तू ज्यात अनेक अप्रतिम घुमट आहेत, सुंदर भित्तीचित्रे आहेत, भव्य कोरीव खांब आहेत. ज्या एक संमिश्र आणि समृद्ध इतिहासाच्या साक्षीदार आहेत. त्याचबरोबर त्या काही शतकांच्या अंतराने झालेल्या धार्मिक व राजकीय वर्चस्वासाठी झालेल्या रक्तरंजित लढायांच्या देखील ज्या मूक साक्षीदार होत्या. अशा वास्तूंपैकी एक जगप्रसिद्ध वास्तू म्हणजे तुर्कस्तानच्या इस्तंबूलमधील हाया सोफिया (Hagia Sophia).

ही वास्तू २०व्या आणि २१व्या शतकात अगदी २०२० जुलैपर्यंत एक म्युझियम म्हणून ख्रिश्चन आणि मुस्लिम दोन धर्मांच्या तसेच बायझन्टाईन आणि ओटोमन यांच्या समृद्ध सांस्कृतिक, धार्मिक आणि त्यानुषंगिक वैचारिक वारशाची प्रेक्षणीय ओळख करून देणारी एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू होती. जगभरातील विचारवंत, समाज शास्त्रज्ञ, लेखक, निधर्मी आणि नास्तिक विचारांचे अनेक प्रथितयश लोक तसेच जगभरातील पर्यटक यांच्यासाठी ते दोन धर्मांचे आणि राजवटींचे गतवैभव आणि इतिहास सांगणारे, समृद्ध ग्रंथालय असणारे ते अनोखे संग्रहालय होते. ते नुकतेच आता पुन्हा एक मुस्लिम प्रार्थना स्थळ असल्याचे तुर्कस्तानचे सर्वेसर्वा एरद्वान यांनी जाहीर केले. आणि जगभर त्यावर नाराजीच्या तर असंख्य लोकांच्या आनंदाच्याही प्रतिक्रिया उमटल्या.

हाया सोफियाचा रूपांतराचा रंजक इतिहास

सहाव्या शतकातील राजा जस्टिनियन याने काँस्टॅनटिनोपल या राजधानीत त्याचा विजय साजरा करायला या जुन्या बॅसिलिकाचे भव्य नूतनीकरणाचे काम शास्त्रज्ञ, गणिती इसिऑर मिलिसिओसला दिले. बायझन्टाईन वास्तुकला आणि आर्किमिडिजच्या भौमितिय सिद्धांतांचा वापर करून हे मोठे प्रार्थनास्थळ (cathedral) बांधले. हे उभे करतांना जस्टिनियनने सांगितले होते की, पूर्वीची वास्तू लाकडाची असल्याने ती नैसर्गिक आपत्तीत मोडकळीस आली होती. त्यामुळे नवी वास्तू बांधताना लाकडाचा वापर न करता भूकंपामुळे हानी होणार नाही अशी वास्तू बांधावी. त्यानंतर मग धातू तसेच विटांचा वापर या वास्तूत करण्यात आला. तरीही पुढेही या वास्तूला अनेकदा हादरे बसले आणि पडझड झाली.

महत्त्वाचे म्हणजे या वास्तूने कायमच धार्मिक-राजकीय स्थित्यंतरे पाहिली. १२व्या शतकात हे कॅथलिक चर्च झाले. काही वर्षांतच ते पुन्हा पूर्वीचे सनातनी चर्च बनले. १४व्या शतकात काँस्टॅनटिनोपॉल, रोमन साम्राज्याचा पाडाव झाला. ऑटोमनांचा काळ सुरू झाला. दुसर्‍या सुलतान मोहमदने हाया सोफियाचे मशिदीत रूपांतर केले. पुढे त्यात ग्रंथालयाची सुद्धा भर पडली.

२०व्या शतकात १९३५ साली मात्र अतातुर्क यांनी या मशिदीचे एका संग्रहालयात निर्माण केले आणि जगाला तुर्कस्तानची एक उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष तसेच केमल समाजवादी राष्ट्र म्हणून नवीन ओळख करून दिली. त्यांच्या मते हाया सोफिया ही दोन धर्मातील शांतीचं प्रतीक असणारी वास्तू. तुर्कस्तानातील इस्तंबूल हे शहर युरोपचे आशिया खंडासाठीचे प्रवेशद्वार मानले जाते. तिथे जगभरातील कोट्यवधी लोक या संग्रहालयाला आवर्जून भेट देत असतात. कारण ही एक पवित्र ज्ञान सामावणारी ऐतिहासिक वास्तू होती. हाया सोफियाचा अर्थ मुळी पवित्र ज्ञान असा आहे. UNESCO World Cultural Heritage site असल्यामुळे ही वास्तू लाखो पर्यटकांचं आकर्षण असल्यास नवल नाही. राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या आता मात्र या वास्तूचे स्वरूप बदलले नाही तरी संदर्भ तूर्तास पूर्ण बदलला आहे.

रूपांतराची देशांतर्गत राजकीय पार्श्वभूमी

जितकी राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरे या वास्तूने पाहिली त्यावरून हे तर निश्चित होते की तिचा वापर नेहमीच एक राजकीय प्रतीक म्हणून झाला आहे. तसेच त्या त्या वेळेच्या राजांनी किंवा देशाच्या प्रमुखांनी हाया सोफियाचा वापर आपली राजकीय महत्त्वाकांक्षा तसेच हेतू साध्य करण्यासाठी वापर केला आहे.

अतातुर्क केमाल पाशा यांनी मशिदीचे संग्रहालय बनवण्याच्या निर्णयालाच तुर्कस्तानचे अध्यक्ष एरद्वान यांच्या पक्षाने न्यायालयात आव्हान देऊन बदल घडवून आणला आहे. त्यासाठी त्यांनी देशप्रेम आणि देशाचा मुख्य धर्म याकडे सगळ्यांचे लक्ष वळवले आहे. तसेच देशप्रेम आणि धर्म या संबंधीच्या भावना जागृत करून बरीच सहानुभूती मिळवली आहे असे राजकीय विश्लेषक म्हणतात. एरद्वान धोरणी राजकीय नेते असल्याने त्यांनी भाषणात हाया सोफिया ही कशी तुर्कस्तानची वास्तू आहे. तसेच ती पूर्वजांनी तलवारीच्या जोरावर मिळवली असल्याने त्यावर देशाचाच रास्त अधिकार आहे असाही दावा केला होता.

राजकीय विश्लेषक म्हणतात, की स्थानिक निवडणूकात त्यांच्या पक्षाला बरेच अपयश आले. तसेच कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांना फारसे यश आलेले नाही. त्यात अमेरिकेनी निर्बंध लादले. देशात आर्थिक अस्थिरता होतीच. यामुळे एरद्वान यांची लोकप्रियता फारच कमी झाली होती. त्यामुळे ही सगळी परिस्थिती बदलायला हाया सोफियाचे धार्मिक रूपांतरण हा हुकूमी एक्का त्यांना मिळाला आहे. त्यामुळे जरी विविध स्तरातून विरोध दर्शवला गेला असला तरी एरद्वान यांनी हा राष्ट्रीय वास्तू या मुद्द्यावरून एकता आणि अस्मितेचा मुद्दा एका मुरब्बी नेत्यासारखा उचलून धरला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लोक पुन्हा वळले आहेतच. तसेच त्यांना हवा तो राजकीय आधार आणि रेटा मिळाला आहे.

हाया सोफियाच्या रूपांतरणामुळे तुर्कस्तानात अपेक्षेप्रमाणे दुही तयार झालीच आहे. तेथील सनातनी चर्चचे एक प्रमुख म्हणाले की हाया सोफिया ही समग्र मानव जातीची एक महत्त्वाची वास्तू आहे आणि त्यांनी तिचे मशिदीत रूपांतर करायला विरोध दर्शवला आहे. अनेकांचा या वस्तूच्या राजकीय-धार्मिक बदलाला रास्त विरोध आहे. त्यांच्या मते तलवारीच्या ताकदीने जिंकलेल्या वास्तू या देशाचा वारसा असतात, असे राजकीय नेते म्हणतात आणि भावनांना आवाहन देतात हेच मुळी काळजी करण्यासारखे आहे.

रूपांतराची यूरोपियन यूनियनमधील तसेच आंतरराष्ट्रीय राजकीय पार्श्वभूमी

यूरोपियन यूनियनमधील एक राष्ट्र असले तरी तुर्कस्तान या देशाला त्यात महत्त्वाचे स्थान अजिबात नाही. या देशाला आणि तेथील नागरिकांना युनियनने नेहमीच सापत्न भावाने वागवले आहे. त्या देशाचा धर्म, तेथील मानवाधिकारांचे उल्लंघन, एकंदरीत राजकीय हुकुमशाही असणे या सगळ्या गोष्टींमुळे अनेक राष्ट्रांना त्यांच्याबद्दल आकस आहेच.

युरोपियन यूनियन धर्मनिरपेक्ष आहे आणि विचारणी आधुनिक आहे असे भासवत असली तरी त्यांच्यावरील मुख्य प्रभाव हा ख्रिश्चन धर्म आणि त्यातील विचारांचा आहे. त्यामुळे युनियन मधील इतर देशातील मुस्लिम जनतेला देखील अशाचा सापत्न वागणुकीला सामोरे जावे लागते.

हाया सोफियात ख्रिश्चन समाजाला प्रार्थना करण्याचा अधिकार होता. मात्र स्पेनमधील कार्दोबा या मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रार्थना स्थळात मात्र मुस्लिम लोकांना प्रार्थनेचा अधिकार नाकारला गेला. युरोपियन युनियनमध्ये खरे तर अशा प्रकारचा अन्याय करणे हे शिष्टसंमत नाही. मात्र हे नियम अगदी सहजपणे पायदळी तुडवले जातात असे दिसून येते. तसेच इतरत्र मुस्लिमांवरील हल्ले आणि त्यांच्यावर होणारे अन्याय याकडे जगभर एकतर दुर्लक्ष केले जाते तसेच त्यांच्याकडे बघण्याची दृष्टीच मुळी गढूळलेली दिसते.

ही एकंदरीत परिस्थिती आणि युनियनच्या दुट्टपीपणा आणि सापत्न वागणुकीचा राजकीय- सामाजिक विरोध म्हणूनही एरद्वान यांनी हे पाऊल उचलले आहे असे विश्लेषक म्हणतात. असे असले तरी जगभरातील मुस्लिम देशांनी याचे स्वागत केले आहे आणि त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. अभ्यासकांना असे वाटते की यामुळे यूरोपियन यूनियनमध्ये आणि तुर्कस्तान यांच्यातील दरी अधिक वाढणार आहे. त्याचे पडसाद जगभर पडून धार्मिक तेढ अधिकच वाढून तीव्र होणार आहे. धर्मामुळे देशांचं ध्रुवीकरण अधिक गडद आणि पक्के होणार आहे. त्यामुळे संघर्ष आणि क्रौर्य सगळ्या व्यवहारात ठळकपणे दिसणार हे उघड आहे.

या सगळ्यात फक्त एक चांगली गोष्ट नमूद करायलाच हवी. मशीद आहे असे जाहीर केल्यावर आता प्रार्थनेच्या वेळी तेथील ख्रिश्चन भित्तीचित्रे वगैरे ऑप्टिकल तंत्रज्ञान वापरून धूसर केली जातील असे सांगण्यात आले आहे. पूर्वीचा काळ असता तर ती चित्रे फोडणे आणि त्यावर पुन्हा नव्याने काम केले गेले असते. असे होत नाही आहे हे फारच आश्वासक आहे.

असे असले तरी राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर हे तंत्र फार जुने आणि हुकूमीच आहे. मात्र त्याने हजारो युद्ध आणि प्रचंड रक्तपात घडवला आहे हा इतिहास आहे. एकविसाव्या शतकात जिथे प्रचंड क्रांती संप्रेषण आणि तंत्रज्ञानात झाली असली, जीवनमान सुधारले असले, शैक्षणिक दर्जा बराच उंचावला असला तरी मानसिकदृष्ट्या माणूस अजूनही मानवतावादी विचार आणि आचरण, समानता, बंधुता, साहचर्य यापासून तितकेच दूर आहे जितके तो हजारो वर्षांपूर्वी दूर होता.

एक ऐतिहासिक वास्तू जी संघर्षानंतर का होईना दोन मोठे धर्म तसेच दोन राजवटींचा सांकृतिक, धार्मिक, वैचारिक वारसा, मिलाफ आणि इतिहास यांच्या ऐक्याचं प्रतीक होती तीच आता पुन्हा एकदा दुहीचं प्रतीक म्हणून २०२० पासून असणार आहे. त्यामुळे जगातील धार्मिक तेढ, विद्वेष आणि कट्टरता अधिकच तीव्र होणार आहे या सारखा दैवदुर्विलास नाही.

गायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0