आठशे वर्षांच्या संवादाची पार्श्वभूमी

आठशे वर्षांच्या संवादाची पार्श्वभूमी

हिंदू-मुस्लीम संवाद - माणूस म्हणून जगताना जगण्यातील उर्वरित गोष्टी समान असताना हिंदू आणि मुसलमान या दोन ओळखी मात्र वादग्रस्त म्हणून परंपरेने जपलेल्या आहेत.

‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य’
‘तुम्ही सेक्युलर नाही?’
मुसलमान परके हा लोकप्रिय समज

वाद, विवाद, संवाद, विसंवाद असे शब्द आपण वैचारिक फरक दाखविण्यासाठी सातत्याने वापरतो. भारतातल्या कला आणि विज्ञानांच्या चर्चांमधून सतत हे शब्द वापरलेले आढळतात. अगदी संगीतातही वादी आणि संवादी सूर असतात. संवाद हा दोन व्यक्ती, दोन गट, दोन समाज, दोन विचारधारा यामध्ये होत असतो. तो समवाद असतो. ग्रीकोरोमन संस्कृतीमध्ये संवाद म्हणजे डायलॉग. हिंदू आणि मुसलमान अशा वास्तव मिश्र समाजात वावरल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली. ती म्हणजे हिंदू आणि मुसलमान हे नेहमी वाद असणारी माणसे म्हणून दाखवली जात असली तर वास्तविक ही सर्व माणसे भारतापुरती संवादी आहेत.

भारतात जन्माला आलेला कुणीही माणूस जन्मतः हिंदू किंवा मुस्लिम असतो. त्याला त्याची जात, मातृभाषा, प्रांतीय संस्कृती या इतरही गोष्टी जन्मतः आपोआप मिळतात. असे असताना माणूस म्हणून जगताना जगण्यातील उर्वरित गोष्टी समान असताना हिंदू आणि मुसलमान या दोन ओळखी मात्र वादग्रस्त म्हणून परंपरेने जपलेल्या आहेत. भारतात अक्षरशः सगळीकडे हे दोन्ही समाज अस्तित्वात आहेत. खेडी, गावे, तालुक्याची गावे, शहरे या सर्व ठिकाणी हे दोन्ही समाज आहेत. जर आपल्याला शिकवले जाते तसे हिंदू आणि मुसलमान हे दोन परस्परविरोधी, एकमेकांचे शत्रू असणारे समाज असतील तर मग हे दोन्ही समाज पिढ्यानपिढ्या भारतात सर्वत्र एकत्र कसे राहत असतील? या प्रश्नाचे उत्तर शोधताना असे लक्षात येते की, हिंदू आणि मुसलमान यांच्यात धार्मिक वाद जसा आहे तसाच धार्मिक आणि इतरही बाबतीत संवाद असल्याशिवाय हे शक्य असणार नाही.

अरबस्तान, इराक, इराण आणि मध्य आशियातील लोकांना ऐतिहासिक काळापासून जर भारतात यायचे तर अफगाणिस्तानातील दुर्गम पर्वतीय प्रदेश आणि हिमालयाची विस्तीर्ण रांग यांचा सगळ्यात मोठा अडथळा होता. इस्लामच्या जन्माच्याही आधी भारताचा पश्चिम आशिया आणि युरोपातील रोमन साम्राज्याशी जो व्यापार होता तो समुद्रमार्गे होत असे. जमिनीवरून म्हणजे खुश्कीच्या मार्गाने नव्हे! थोडक्यात समुद्रमार्गे अरबस्तानातून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कितीतरी जास्त लवकर पोहोचता येत असे. भारतातली भडोच, सूरत, नालासोपारा, कल्याण, गोवा, कारवार, मंगळूर, मलबार या परिसरातली अनेक बंदरे पश्चिम आशियातल्या लाल समुद्राजवळच्या बंदरांना समुद्रमार्गे जोडलेली होती. या सागरी व्यापारात दोन्हीकडून खूप मोठ्या प्रमाणावर मालाची ने-आण केली जात असे. नंतर हा सगळा माल अरबस्तानातल्या जमिनीवरून पूर्व युरोपात आणि भूमध्य समुद्राजवळच्या बंदरांमध्ये आणि शहरांमध्ये पोहोचवला जात असे. या मालामध्ये एक महत्त्वाचा माल हा जिवंत माणसे हा सुद्धा असे. माणसांनाही विक्रेय वस्तू समजण्याचा तो काळ होता. गुलामगिरीला माणुसकीवरील कलंक मानून त्या विरोधातले कायदे आणि निर्बंध यांचा इतिहास संपूर्ण जगातच मागील जास्तीतजास्त दोनशे वर्षांचा. हा माणसांच्या खरेदीविक्रीचा उल्लेख मुद्दाम अशासाठी केला की, परस्परविरोधी इतिहास लेखनासाठी याचा उपयोग प्रत्येकाने केलेला आढळतो. अशा उल्लेखांचा परामर्श घेताना इस्लामपूर्व इतिहासातही इतर व्यापारी मालाप्रमाणे माणसांची खरेदी-विक्री पूर्वापार सुरू आहे हे आपल्याला ठाऊक असलेले बरे.

भारताच्या मुख्य भूमीवर खूप मोठा भूप्रदेश व्यापून मुसलमानी राज्य स्थापन करून समृद्ध साम्राज्याची स्थापना करणारे इतिहासातले पहिले राज्य मुघलांचे. मुहम्मद बिन कासीमच्या पहिल्या मुघल राज्यापर्यंत एकूण आठशे वर्षे उलटून गेली होती. इस्लामची भाषा ही अरबी. ही अगदीच भिन्नकुळातली भाषा. आज हिब्रू, अरेमिक आणि अरबी या तीन प्रमुख भाषा सेमिटिक कुळातल्या भाषा म्हणून ओळखल्या जातात. या सेमिटिक कुळातल्या भाषा जगभर आज सुमारे ५० कोटी लोक बोलतात. ज्यामध्ये अर्थातच अरबी हीच सगळ्यात प्रमुख भाषा आहे. मंगोलांनी बगदादचा जेव्हा सर्वनाश केला त्या नंतर राजकीय व्यवहारांमधून अरबीला उतरती कळा सुरू झाली.

आज भारतात प्रामुख्याने दोन भाषाकुळांमधल्या भाषा बोलल्या जातात. भारोपीय (इंडो-युरोपियन) आणि द्रवीड. भारोपीय भाषांना शंभर वर्षांपूर्वीपर्यंत इंडो-आर्यन भाषा म्हणले जात असे. आधुनिक वर्गीकरणाप्रमाणे या सगळ्या भाषा भारोपीय भाषा समजल्या जातात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या उत्तरेचा संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या भागात भारोपीय भाषा बोलल्या जातात. भारताच्या दक्षिणेतल्या चार राज्यांमधून द्रवीड कुळातल्या भाषा बोलल्या जातात. जुन्या अखंड भारताचा विचार करताना प्रामुख्याने एक बाब लक्षात ठेवायची, तर ती म्हणजे भारतातल्या आधुनिक भाषा या भारोपीय भाषा आणि द्रवीड भाषा यांच्या मागील सुमारे तीन हजार वर्षांच्या परस्पर साहचर्यातून आणि संवादातून निर्माण झाल्या आहेत.

मुसलमानांचे आक्रमक ज्या आठशे वर्षांमध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे होत होते, त्या काळात ऐतिहासिक क्रम बघितला तर असे लक्षात येईल की, अरबांच्या इराणवरील आक्रमणानंतर इराणमधील तत्कालीन पर्शियन भाषा आणि अरबी असा दोन भिन्न भाषाकुळांमधल्या भाषांमध्ये पहिला संवाद घडून आला. अरबांना इराणमधील पर्शियन भाषा राज्य कारभारासाठी आणि राजव्यवहारांसाठी शिकाव्या लागल्या. इराणचे संपूर्ण इस्लामीकरण अरबस्तानातून आलेल्या अरबांनी केले. असे असूनही त्यांना स्वतःची अरबी भाषा इराणवर लादता आली नाही! इराणमध्ये मुसलमान यायच्या अगोदर दीड दोन हजार वर्षांपासून भारोपीय भाषा बोलल्या जात होत्या. आधुनिक पर्शियन ही निर्विवादपणे भारोपीय भाषा आहे.

हिंदू आणि मुसलमानांमधला संवाद समजण्यासाठी पहिला घटक हा भाषा म्हणून आपण समजून घेणार आहोत. यासाठी अखंड भारताच्या आजच्या नकाशात मुसलमानी आक्रमणे ज्या क्रमाने आली तो क्रम बघता सर्वप्रथम आजच्या पाकिस्तानमधील भाषा आपण बघूयात.

पाकिस्तानातल्या आजच्या भाषांचा अधिकृत आकडा जरी ७७ असला तरी आज पाकिस्तानात एकूण चार भाषा सर्वात जास्त बोलल्या जातात. या चारही भाषांना प्रांतीय भाषा म्हणून मान्यता आहे. पंजाबी, पुश्तू, सिंधी आणि बलुची या त्या चार भाषा होत. जरी पाकिस्तानची अधिकृत राष्ट्रभाषा उर्दू असली तरी वास्तवात उर्दूचा मातृभाषा म्हणून जनगणनेत उल्लेख करणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकांची एकूण संख्या आहे फक्त आठ टक्के. आजही पाकिस्तानात जास्त बोलली जाणारी भाषा ही पंजाबी आहे. जी सुमारे ४५ टक्के लोक बोलतात.

सगळ्यात गंमतीचा भाग म्हणजे बलुचिस्तानातील मध्यभागात ब्राहुई (‌Brahui) ही बोली बोलली जाते. ब्राहुई ही आधुनिक भाषाशास्त्रातील वर्गीकरणाप्रमाणे द्रविड कुळातील भाषा आहे. ब्राहुई भाषेतील शब्दसंपत्ती जरी आधुनिक भाषाकुळातील असली तरी ही भाषा पाकिस्तानातील उर्वरित भाषांच्या वर्गीकरणात न बसणारी आणि भारतीय द्रवीड भाषा कुळातील एकमेव भाषा आहे.

आधुनिक भारताचा इतिहास आणि वर्तमान समजून घेत असताना परके मुसलमान इथे आक्रमण करून आले. त्यांनी तलवारीच्या बळावर क्रूरतेने इथल्या हिंदूंना बाटवले आणि जबरदस्तीने मुसलमान केले असल्या स्थूल आणि भ्रामक समजांना हादरे देणाऱ्या अनेक गोष्टी अखंड भारतातल्या प्रत्येक प्रांतात आढळतात. सध्या आपण मुसलमानांच्या आक्रमण काळात भारताच्या पश्चिम व वायव्य सरहद्दीवरच्या प्रांतामधील मागील दीड हजार वर्षांमधला भाषिक संवाद बघणार आहोत.

राजन साने, हिंदू-मुस्लीम संबंधांचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 2