नागेश्वर राव यांचे गलिच्छ ट्विट हटवले

नागेश्वर राव यांचे गलिच्छ ट्विट हटवले

नवी दिल्लीः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्या निधनावर अत्यंत गलिच्छ प्रतिक्रिया देणारे सीबीआयचे माजी हंगामी संचालक व माजी आयपीएस अधिकारी एम. नागेश्वर राव यांचे ट्विट त्यांच्या अकाउंटवरून ट्विटरने हटवले आहे. स्वामी अग्निवेश यांचे निधन झाल्यानंतर राव यांनी ‘बरं झाले सुटलो आम्ही. तुम्ही भगव्या पोशाखातले हिंदूविरोधी संन्यासी होता. तुम्ही हिंदू धर्माचे अतोनात नुकसान केले आहे. तुम्ही तेलुगू ब्राह्मण असल्याची मला शरम वाटते. इतकी वर्षे यमराज का थांबला, अशी माझी यमराजाकडे तक्रार आहे’ असे वादग्रस्त ट्विट केले होते.

या ट्विटमुळे राव यांच्यावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली व त्यांच्यावर टीका झाली. अखेर ट्विटरने राव यांचे वर्तन दुर्दैवी असून दुसर्यांना वेदना देणारे असल्याने ते नियमाचे उल्लंघन करणारे असल्याचे सांगत त्यांच्या अकाउंटमधील काही सेवा बंद केल्याचा निर्णय घेतला.

नागेश्वर राव हे ओदिशा काडरचे १९८६चे आयपीएस असून गेल्या ३१ जुलैला ते होमगार्ड महासंचालक म्हणून निवृत्त झाले होते.

राव यांच्या ट्विटवरून इंडियन पोलिस फाउंडेशन या आयपीएस अधिकार्यांच्या संघटनेने, अशा अभद्र मजकूराने राव यांनी पोलिस वर्दीचा अपमान केला असून सरकारची मानही खाली घातली आहे. राव यांनी पोलिस दल विशेषतः तरुण अधिकार्यांचे मनोबल असे ट्विट करून कमी केले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

नागेश्वर राव यांची कारकीर्द पूर्वी अनेक घटनांनी वादग्रस्त होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर येथील बालिका गृहातील अत्याचार प्रकरणात एका पोलिस अधिकार्याची बदली केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला अवमान झाल्याचे सांगत राव यांना दोषी धरले होते. त्यांना एक दिवस न्यायालयात कोपर्यात उभे राहण्यास सांगितले होते. तसेच दोन लाख रु.चा दंडही भरायला सांगितला होता.

मूळ बातमी

COMMENTS