नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाबद्दल नियमितपणे ट्विट करणारी अनेक ट्विटर अकाउंट्स ट्विटरने सोमवारी कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून तात्पुरती बंद (विथोल्ड)
नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाबद्दल नियमितपणे ट्विट करणारी अनेक ट्विटर अकाउंट्स ट्विटरने सोमवारी कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून तात्पुरती बंद (विथोल्ड) केली आहेत. यांमध्ये व्यक्ती, समूह आणि माध्यम कंपन्याच्या अकाउंट्सचा समावेश आहे.
शेतकरी आंदोलनाबद्दल नियमितपणे ट्विट करणारी अकाउंट्स ट्विटरने अमित शहा यांच्या अखत्यारीतील केंद्रीय गृहखात्याच्या विनंतीवरून तात्पुरती बंद केली आहेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेच्या बातमीत अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
#ModiPlanningFarmerGenocide हा हॅशटॅग वापरणारी तसेच “३० जानेवारी रोजी पोस्ट झालेली बनावट व प्रक्षोभक स्वरूपाची” सुमारे २५० ट्विट्स ब्लॉक करण्याचे ब्लॉक करण्याचे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला दिल्याचा आरोपही एएनआयच्या बातमीतील स्रोताने केला आहे.
हा हॅशटॅग वापरणारी अनेक अकाउंट्स ट्विटरवर आजही सक्रिय आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने कायदेशीर कारण देऊन हरकत घेतली होती, तर ट्विटरने हा हॅशटॅग पूर्णपणे निलंबित का केला नाही, याची माहिती मिळू शकली नाही.
महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणारे अनेक हॅशटॅग्ज ट्विटरवर अत्यंत आक्रमक पद्धतीने दररोज ट्रेण्ड होत आहेत. त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे की नाही याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेल्या बहुतेक अकाउंट्सच्या फॉलोअर्सची संख्या लाखांमध्ये आहे. यामध्ये कॅराव्हान या मासिकाच्या काही अकाउंट्सचा समावेश आहे. तीन कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाची ताजी माहिती देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली अकाउंट्सही (उदाहरणार्थ @Tractor2twitr आणि किसान एकता मोर्च्याचे) तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.
किसान एकता मोर्च्याचे अकाउंट अचानक काढून टाकल्याप्रकरणी डिसेंबर २०२० मध्ये फेसबुक वादात सापडले होते. त्यानंतर काही तासांतच साइटने हे अकाउंट पुन्हा सुरू केले होते.
कॅराव्हान मासिकाचे कंट्रिब्युटर मनदीप पुनिया यांना ताब्यात घेऊन १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर एकच दिवसात मासिकाचे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद करण्यात आले आहे. ट्विटरने या कारवाईची माहितीही मासिकाला दिली नाही असे समजते. मासिकाने संबंधित हॅशटॅग कधीही वापरला नाही, असेही कार्यकारी संपादक विनोद के. जोस यांनी ‘द वायर’ला सांगितले आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूच्या वार्तांकन प्रकरणात भाजपशासित राज्यांमध्ये फिर्यादी दाखल झालेल्यांमध्ये कॅराव्हान मासिकाच्या संपादकांचाही समावेश आहे.
याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) मोहम्मद सलीम (
@salimdotcomrade), कार्यकर्ते हंसराज मीणा (@HansrajMeena) आपचे नेते जर्नैल सिंग व आरती(@aartic02), पत्रकार संदीप चौधरी (@Sandeepnewsman), लेखिका संयुक्ता बसू (@sanjukta), मोहम्मद आसिफ खान (@imMAK02) आणि अभिनेता सुशांत सिंग (@sushant_says) यांची अकाउंट्स तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.
सरकारी प्रसारण संस्था प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी एस. वेम्पती यांचेही अकाउंट (@sashidigital) ट्विटरने बंद केल्याचे दिसत आहे. वेम्पती यांचे अकाउंट का बंद केले असे प्रसार भारतीने आपल्या अधिकृत अकाउंटमार्फत विचारले आहे. याला उत्तर म्हणून ट्विटरने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सगळीकडील लोकांना सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून जर आम्हाला अधिकृत संस्थेकडून विचारपूर्वक विनंती करण्यात आली, तर विशिष्ट देशांत विशिष्ट काँटेण्ट रोखून धरणे आवश्यक ठरू शकते. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना त्वरित अधिसूचना दिली जाते, असेही ट्विटरने म्हटले आहे.
मूळ बातमी
COMMENTS