भारतात जलदगतीने पसरलेल्या कोरोना विषाणूच्या स्ट्रेनशी झगडण्यासाठी लशीच्या एकेरी व दुहेरी शॉट्सबाबत ब्रिटनमधून आलेल्या नवीन माहितीमुळे दुसरा डोस पहिल्या डोसनंतर १६ आठवड्यांपर्यंत पुढे ढकलण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
भारतात जलदगतीने पसरलेल्या कोरोना विषाणूच्या स्ट्रेनशी झगडण्यासाठी लशीच्या एकेरी व दुहेरी शॉट्सबाबत ब्रिटनमधून आलेल्या नवीन माहितीमुळे दुसरा डोस पहिल्या डोसनंतर १६ आठवड्यांपर्यंत पुढे ढकलण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
“दुसऱ्या डोसनंतर लस लक्षणात्मक आजारापासून संरक्षण देण्यात खूप अधिक परिणामकारक ठरत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे,” असे पब्लिक हेल्थ इंग्लंडद्वारे झालेल्या अभ्यासअहवालाच्या प्रमुख लेखकांनी नमूद केले आहे. “अधिक तीव्र आजारांच्या विरोधात लशीचा प्रभाव अधिक असेल अशी शक्यताही आहे. B.1.617.2 या व्हरायंटची लागण होण्याची शक्यता अधिक असलेल्या लोकांना लशीचे किमान दोन डोस देण्याचे आम्ही समर्थन करतो,” असेही अहवालात म्हटले आहे.
भारतात कोविशील्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या अॅस्ट्राझेनेका लशीचा एक शॉट, प्रथम भारतात आढळलेल्या अतिसंसर्गजन्य B.1.617.2 व्हरायंटपासून, केवळ ३३ टक्के संरक्षण देऊ शकतो हे प्रस्थापित झाले आहे. मात्र या लशीचे दोन डोस घेतल्यास तिची परिणामकारकता ६० टक्क्यांपर्यंत जाते. फायझर लशीची परिणामकारकता दुसऱ्या डोसनंतर ८८ टक्क्यांपर्यंत जाते पण ही लस भारतात उपलब्ध नसल्यामुळे तिचा भारतीयांना काही उपयोग नाही.
कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर जास्तीतजास्त आठ आठवड्यांमध्ये दुसरा डोस घ्यावा अशी शिफारस भारतात सुरुवातीला केली जात होती. मात्र, मेच्या सुरुवातीला दोन डोसमधील अंतर वाढवून १२-१६ आठवडे करण्यात आले. हा निर्णय प्रामुख्याने डोसेसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळेच कऱण्यात आला असावा असे दिसत आहे. याचा अर्थ लशीचा एक डोस घेतलेल्या लोकांना देशात वेगाने पसरणाऱ्या व्हरायंटपासून फारसे संरक्षण मिळणार नाही.
पब्लिक हेल्थ इंग्लंडने (पीएचई) आपल्या वेबसाइटवर या अहवालाचा सारांश प्रसिद्ध केला आहे:
– फायझर-बायोएनटेक लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी B.1.617.2 या व्हरायंटमुळे होणाऱ्या लक्षणात्मक आजाराविरोधात ८८ टक्के प्रतिकारक्षमता तयार होते, याच लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर, B.1.1.7 या व्हरायंटविरोधात ९३ टक्क्यांपर्यंत प्रतिकारक्षमता निर्माण होत होती.
– अॅस्ट्राझेनेका लशीचे दोन डोस B.1.617.2 व्हरायंटविरोधात ६० टक्के प्रतिकारक्षमता तयार करतात, B.1.1.7 या व्हरायंटविरोधात लशीची परिणामकारकता ६६ टक्के होती.
– दोन्ही लशींचा पहिला डोस घेतल्यानंतर ३ आठवड्यांनी B.1.617.2 व्हरायंटमुळे होणाऱ्या लक्षणात्मक आजारापासून ३३ टक्के संरक्षण मिळते, B.1.1.7 व्हरायंटविरोधात पहिल्या डोसनंतर ५० टक्के प्रतिकारक्षमता तयार होत होती.
या अभ्यासामध्ये लशीचे दोन्ही डोस घेण्याच्या आवश्यकतेवर पुन्हापुन्हा भर देण्यात आला आहे, कारण, एका डोसमुळे निर्माण होणारी प्रतिकारक्षमता खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: B.1.617.2 या भारतात प्रथम आढळलेल्या आणि वेगाने पसरणाऱ्या व्हरायंटबाबत ही प्रतिकारक्षमता खूपच कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
B.1.1.7 व्हरायंट प्रथम यूकेमध्ये आढळला आणि तो देशात सर्वाधिक आढळणारा व्हरायंटही ठरला आहे. अलीकडेच पीएचईने B.1.617.2 या व्हरायंटला ‘निरीक्षणाखालील व्हरायंट’ वर्गातून ‘चिंताजनक व्हरायंट’च्या विभागात हलवले आहे.
अहवालाचे प्रकाशन करण्यापूर्वी पीएचईच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार संशोधकांनी दोन पद्धतींचा वापर करून निष्कर्ष काढला आहे.
प्रथम टेस्ट निगेटिव केस कंट्रोल अर्थात टीएनसीसी डिझाइन वापरून लशीची B.1.617.2 व्हरायंटबाबतची लक्षणात्मक आजाराविरोधातील परिणामकारकता जोखण्यात आली. ही परिणामकारता तपासताना तुलनेसाठी याच कालखंडातील B.1.1.7 या व्हरायंटविरोधातील प्रतिकारक्षमता घेण्यात आली. थोडक्यात लक्षणात्मक केसेसमधील लसीकरणाची स्थिती (स्टेटस) लक्षणांची तक्रार करणाऱ्या पण चाचणी निगेटिव आलेल्या केसेसच्या तुलनेत बघितली गेली. आरोग्यविषयक मदत मागण्याबाबतचे वर्तन (हेल्थ सीकिंग बिहेविअर), चाचण्यांची उपलब्धता आणि केस निश्चिती यांबाबतचे पूर्वग्रह नियंत्रित करण्यात ही पद्धत उपयुक्त ठरते. दुसऱ्या पद्धतीत, लसीकरणाच्या स्थितीद्वारे, B.1.617.2 व्हरायंटचे अस्तित्व असलेल्या केसेसच्या प्रमाणाचा अंदाज मुख्य प्रसृत विषाणूच्या ( B.1.1.7 व्हरायंट) तुलनेत लावण्यात आला. यामध्ये असे गृहितक होते की, जर लस प्रत्येक व्हरायटंबाबत समान परिणामकारक असेल, तर लसीकरण न झालेल्या व्यक्तींमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत कोणताही व्हरायंट आढळण्याचे प्रमाणही समान असेल अशी अपेक्षा करता येईल. याउलट लस B.1.617.2 व्हरायंटबाबत कमी परिणामकारक असेल तर लसीकरणानंतर ३ आठवड्यांच्या काळात लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये या व्हरायंटची लागण होण्याचे प्रमाण लसीकरण न झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक असेल अशी अपेक्षा करता येईल.
या अभ्यासात असे आढळून आले की, फायझर बायोएनटेक लस दुसऱ्या डोसनंतर, B.1.617.2 व्हरायंटमुळे झालेल्या लक्षणात्मक आजारावर, ८८ टक्के परिणामकारक होती, तर हीच लस B.1.1.7 व्हरायंटमुळे झालेल्या लक्षणात्मक आजारावर ९३ टक्के परिणामकारक होती.
दुसरे म्हणजे अस्ट्राझेनेका लशीचे दोन डोस झाल्यानंतर ती B.1.1.7 व्हरायंटमुळे झालेल्या लक्षणात्मक आजारावर ६० टक्के परिणामकारक होती, तर B.1.1.7 व्हरायंटमुळे झालेल्या लक्षणात्मक आजारावर ६६ टक्के परिणामकारक होती.
जगाच्या काही भागात भीषण स्वरूप धारण केलेल्या साथीचा उद्रेक रोखण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या लशी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात अशी आशा या निष्कर्षांमुळे निर्माण झाली आहे. ब्रिटनने युरोपमध्ये सर्वांत जलदगतीने लसीकरण अभियान राबवले आहे पण भारतात प्रथम आढळलेल्या नवीन व्हरायंटचा प्रसार होत असल्याने देशात नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. भारतातही B.1.617.2 व्हरायंटचे प्राबल्य वाढत आहे आणि पीएचईच्या संशोधनातून भारतासाठी आशादायी व निराशाजनक अशा दोन्ही बाबी पुढे येत आहेत. याचे एक कारण म्हणजे या अभ्यासातील निष्कर्षानुसार, लशीचा केवळ एक डोस घेतल्यास B.1.617.2 व्हरायंटमुळे होणाऱ्या लक्षणात्मक आजाराविरोधात ३३ टक्केच प्रतिकारक्षमता तयार होत आहे, हे प्रमाण B.1.1.7 व्हरायंटमुळे होणाऱ्या लक्षणात्मक आजाराबाबत ५० टक्के आहे. दोन्ही परिस्थितींत प्रतिकारक्षमता तयार होण्यास शॉट घेतल्यानंतर तीन आठवड्यांचा काळ लागत आहे. भारताने अलीकडेच अॅस्ट्राझेनेकाच्या (या लशीला देशात कोविशील्ड म्हणतात) दोन डोसेसमधील कमाल स्वीकारार्ह अंतर वाढवून पूर्ण १६ आठवडे केले आहे. हा निर्णय उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यावरून घेण्यात आला असा भारत सरकारचा दावा आहे. मात्र, देशात लशींचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे आणि दोन डोसेसमधील अंतर वाढवणे हा अतिरिक्त पुरवण्यासाठी अवधी मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो.
२३ मे, २०२१ रोजी दुपारी दोनच्या सुमाराला सरकारच्या को-विन डॅशबोर्डवर उपलब्ध माहितीनुसार, कोविशील्डचे १७.०८ कोटी, तर कोवॅक्सिनचे २.०६ डोसेस पुरवण्यात आले आहेत. याचा अर्थ एकूण दिल्या गेलेल्या लशींमध्ये कोविशील्डचे प्रमाण ८९ टक्के आहे. आत्तापर्यंत १०.७ टक्के भारतीयांना किमान एक डोस मिळाला आहे, तर केवळ ३ टक्क्यांना दोन्ही डोस मिळाले आहेत. याचा अर्थ एक डोस मिळालेल्या ९.५४ टक्के भारतीयांना कोविशील्ड देण्यात आली आहे आणि B.1.617.2 व्हरायंटमुळे होणाऱ्या लक्षणात्मक संसर्गापासून त्यांना केवळ ३३ टक्के संरक्षण प्राप्त झालेले आहे. शिवाय, भारत सरकारने दोन डोसेसमधील अंतर वाढवून १६ आठवडे केल्यामुळे पुढील चार महिने तरी त्यांना B.1.617.2 व्हरायंटमुळे होणाऱ्या लक्षणात्मक संसर्गापासून याहून अधिक संरक्षण मिळू शकत नाही.
भारतात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरूच आहे. राष्ट्रीय स्तरावरील दैनंदिन रुग्णसंख्येचे आकडे काहीसे खाली येत असले, तरी यामध्ये आकडे लपवण्याचे प्रकारही बरेच आहेत. कोविड-१९ आजाराने दगावणाऱ्यांचा देशभरातील आकडा दररोज चार हजारांच्या आसपास आहेच.
पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवा व फ्रण्टलाइन कर्मचाऱ्यांना देण्यासाठी भारताकडे लशींचा पुरेसा साठा आहे, असे विधान नीती आयोगाचे सदस्य व भारतातील लस प्रशासन समूहाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी ४ जानेवारी रोजी केले होते. को-विनवरील डेटा मात्र काही वेगळेच सांगत आहे. त्यानुसार आत्तापर्यंत १९१.५ दशलक्ष डोसेस देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात फ्रण्टलाइन आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुक्रमे ६०० दशलक्ष व ३०० दशलक्ष या आकड्याच्या जवळपासही हा आकडा पोहोचत नाही.
मिनेसोटा येथील मायो क्लिनिकच्या डॉ. प्रिया संपतकुमार यांनी २२ मे रोजी सांगितल्यानुसार, भारताला तातडीने लागणाऱ्या लशी आयात करण्याखेरीज पर्याय नाही. कारण, स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी केल्या गेलेल्या गुंतवणुकीचे फळ मिळण्यास अद्याप वेळ आहे.
COMMENTS