उद्धव वाकले पण मोडले नाहीत…

उद्धव वाकले पण मोडले नाहीत…

ज्या दिवशी भाजपला आपण मुंबई स्वतःच्या बळावर जिंकू शकतो असा विश्वास वाटेल त्या दिवशी शतप्रतिशत भाजपची नखे बाहेर निघतील आणि ती वाघाचा फडशा पाडतील, हे उद्धव ठाकरेंना चांगले माहिती आहे. ठाकरेंना ते चांगले माहिती असल्याचे भाजपालाही माहिती आहे. जोवर मुंबईतला मतदार स्वतःला मराठीपणाची भूल पाडून घेईल तोवर मराठीच्या हिताची झूल पांघरूण मिरवायचे; ती भूल उतरेल तोवर मुंबईच्या आचळातून पुरेसे दूध काढून झालेले तरी असेल! मग दूध आटलेली ‘भाकड मुंबई’ भाजपला गोशाळेत बांधायची तर खुशाल बांधू देत, असा हिशेब उघड दिसतोच.

युक्रेनमधून भारतीयांना आणणे हे ताकद वाढल्याचे लक्षण – मोदी
नव्या सरकारपुढील सामरिक आव्हाने व संरक्षण अजेंडा
मध्य प्रदेशमधील विजय रा.स्व.संघामुळे
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

बाळासाहेबांच्या कलेचा, वक्तृत्वाचा वारसा राज ठाकरेंकडे आणि यशाचा, सत्तेची गणिते सोडविण्याचा वारसा उद्धव ठाकरेंकडे असे का बरे झाले असावे? कारण उद्धव ठाकरे आहेतच तसे गुणी! आपण काल काय बोललो होतो, आज काय बोलत आहोत. आपण काल काय केले होते, आज काय करत आहोत याचा ते कधी विचार करत नाहीत. त्यांना भाषण करता येत नाही. भाषणात त्यांच्या पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध असतोच असे नाही. सेनेच्या खास पद्धतीने भाषणाला गर्दी जमविली जाते, परंतु ती गर्दी मक्ख चेहऱ्याने भाषण ऐकते आणि खांदे पाडून घरी जाते. जाताना बाळासाहेबांच्या भाषणांच्या आठवणी काढत जाते आणि तरीही उद्धव ठाकरे डाव जिंकतात. वाघाच्या जबड्यात त्याचे दात मोजण्यासाठी एखाद्याने हात घालावा आणि वाघाने त्या हाताचा तुकडा तोडण्याऐवजी नुसतीच डरकाळी मारावी आणि हात प्रेमाने चाटावा असे हे धोरण आहे. म्हणजे ज्याने हात घातला होता, त्याला इशारा कळतो आणि ‘मी कशी सॉलिड डरकाळी मारली’ हे इतरांना सांगण्याची वाघाचीही सोय होते.
अयोध्येत काहीही न करता त्याचे श्रेय घेण्याची मिळालेली संधी मोठ्या साहेबांनी सोडली नव्हती आणि आता उद्धव ठाकरेंनीही तेच केले. मुळात मोदी-शहा या जोडीला किरिट सोमैयांचा पत्ता कट करायचा होता त्यासाठी त्यांनी सेनेचे धनुष्य ताणून बाण सोडला आणि सेनेने जणू सोमैयांची शिकार आपणच केली असा आव आणत नेहमीप्रमाणे फुकाचे श्रेय घेतले. आता तर सेनेचे भाजपप्रेम एवढे वाढले आहे की  मोठमोठ्या होर्डिंग्समध्येही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर कमळाचे फूल फुललेले दिसू लागले आहे. ‘धनुष्यबाणाचा पत्ता नाही आणि कमळ डोईवर वाही’ हे या दोघांचे रूप सैनिकांना नक्कीच रूचले नसणार. ‘परंतु लक्षात कोण ठेवतो?’ या वास्तवाचा मोठाच आधार आहे.
गोष्टी स्मरणात राहणं ही माणसाला मिळालेली सगळयात मोठी देणगी आहे असं सगळे भले म्हणोत, आपण काल काय बोललो होतो, काल काय केले होते ते लक्षात न राहणं हे भारतातील राजकीय नेत्यांना मिळालेलं महत्त्वाचं वरदान आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत तर ही प्रक्रिया बहुधा त्याचं बोलून झाल्यानंतरच्या क्षणी लगेचच सुरू होत असावी.  अमित शहा यांनी गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज भरला तेंव्हा उध्दव ठाकरे तिथे उपस्थित होते. ‘मी इथे कसा असा अनेकांना प्रश्न पडला’ असं ते म्हणाले. खरं तर तसा प्रश्न कोणालाही पडला नव्हता.  पडलाच असेल तर तो बहुधा त्यांच्या सैनिकांनाच पडला असेल. साधारणतः वांद्रयापासून फार लांब न जाणारे आपले साहेब गांधीनगरपर्यंत गेलेच कसे, अशी कुजबूज त्यांच्यातच झाली असेल. परंतु हल्ली हल्ली ठाकरे थोडे बाहेर जाऊ लागले आहेत.
लोकसभेसाठी सेना-भाजप युती झाल्यावर अर्जुनराव खोत आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठीही फडणवीसांसोबत ठाकरे गेले होते. तिथे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘केवळ देव, देश आणि धर्मासाठी आम्ही युती केली आहे. पाच वर्ष आमच्यात ‘हम आपके है कौन’ चालले होते. आता ते विरोधी पक्षात चालले आहे.’ दोन-तीन वर्ष एकमेकांना शिव्या घातल्यावर, एकाच मंत्रिमंडळात राहून, वाईटाचे खापर सतत भाजपवर फोडल्यावर, पुन्हा युती करण्यासाठी आणि ती आम्ही ‘केवळ देव, देश आणि धर्मासाठी आम्ही युती केली आहे’ असे म्हणण्यासाठी जे धाडस लागते, त्याला धाडस म्हणता येते किंवा निगरगट्टपणाही!

उद्धव यांनी ‘वाकेन पण मोडणार नाही आणि वाकल्याचे कबुल मात्र करणार नाही’ असा नवा फंडा अंगिकारला आहे.

उद्धव यांनी ‘वाकेन पण मोडणार नाही आणि वाकल्याचे कबुल मात्र करणार नाही’ असा नवा फंडा अंगिकारला आहे.

रंग बदलण्यासाठी गेली शेकडो वर्षे आपण शॅमेलिआन नामक प्राण्याला उगाचच बदनाम करत आलो आहोत. भारतीय राजकारणात त्याला खूपच मोठी स्पर्धा आहे. ‘तुम मुझे अमूक दो, मै तुम्हे तमूक दुंगा’ हे आपल्या राजकारणाचे अघोषित घोषवाक्य आहे. सेना-भाजपच्या बाबतीत ते सध्या तरी ‘तुम हमे मुंबई दो, हम तुम्हे महाराष्ट्र देंगे.’ असे आहे. ज्या दिवशी भाजपला  आपण मुंबई स्वतःच्या बळावर जिंकू शकतो असा विश्वास वाटेल त्या दिवशी ‘शतप्रतिशत भाजपा’ची नखे बाहेर निघतील आणि ती वाघाचा फडशा पाडतील, हे उद्धव ठाकरेंना चांगले माहिती आहे. ठाकरेंना ते चांगले माहिती असल्याचे भाजपालाही माहिती आहे. जोवर मुंबईतला मतदार स्वतःला मराठीपणाची भूल पाडून घेईल तोवर  मराठीच्या हिताची झूल पांघरूण मिरवायचे; ती भूल उतरेल तोवर मुंबईच्या आचळातून पुरेसे दूध काढून झालेले तरी असेल! मग दूध आटलेली ‘भाकड मुंबई’ भाजपला गोशाळेत बांधायची तर खुशाल बांधू देत, असा हिशेब उघड दिसतोच. त्यासाठी कार्यकर्त्यांचे नेटवर्क निट सांभाळावे लागते, त्या त्या ठिकाणची स्थानिक कमाईकेंद्रे निट चालवावी लागतात!  ‘तुझा तू वाढवी, पण सोबत माझाही वाढवी’ असा खास सेनास्पेशल पवित्रा उद्धव यांनी कसोशीने जपला आहे. एवढं हिशेबी राहण्यासाठी माणसाला एक वेगळीच तर्कबुद्धी आणि सतर्कबुद्धीही लागते जी उद्धव ठाकरेंकडे आहे.
सेनेमध्ये एक खास तडफदार वाघ आहे ज्याचं नाव आहे संजय राऊत! त्याची डरकाळी मारण्याची पध्दत स्वतंत्र आणि वेगळी आहे. तो वाघ ‘सामना’च्या गुहेतून, तर सरसेनापती मातोश्रीमधून अशा दोन वेगळ्या शिवसेना चालवतात. या दोन सेनांची मते कधी जुळतात, कधी जुळत नाहीत, परंतु कोलांटउडी कुठे, कधी आणि कशी खायची याबाबतचे धोरण मात्र नेहमीच संयुक्त असते.

‘सामनाच्या वाघाच्या गेल्या काही महिन्यातल्या डरकाळ्या बघू या
२२ जानेवारी, २०१९ ( मिंट)
‘युती हा शब्दच आता शिवसेनेच्या शब्दकोशातून आम्ही काढून टाकला आहे.’
३ जानेवारी, २०१९ (एनडीटीव्ही)
‘भाजपने लोकांची घोर फसवणूक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी राम मंदिराचे बांधकाम सुरू झालेच पाहिजे.’
२२ डिसेंबर, २०१८ (इ सकाळ)
‘भाजपमध्ये वाचाळवीरांची संख्या अधिक आहे. यापुढे भाजपने राम मंदिराचा मुद्दा घेऊच नये, राम मंदिर बांधण्यासाठी शिवसेना समर्थ आहे.’

आता सरसेनापतींच्या डरकाळ्या पाहू या.
२६ एप्रिल २०१८ (मटा, अहमदनगर)
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचा दावा करून सत्तेवर आलेले भाजप सरकार मोगलाई पोसण्याचे काम करीत आहे. भाजपला गुंडांचा बंदोबस्त करता येत नसेल, तर त्यांनी छत्रपतींचे नावच घेऊ नये.’
२१ ऑक्टोबर २०१८ (इटी)
‘भाजप सरकारच्या योजनांचा खरंच किती लोकांना फायदा झाला ते मी सैनिकांना शोधायला सांगतो.  जिथे जिथे मोदींचे पोस्टर लागेल, तिथे तिथे ही माहितीही लागली पाहिजे.’
२४ डिसेंबर २०१८  (इंडिया टुडे)
एक शेतकरी मला म्हणाला, “कडूनिंबाच्या झाडांना कीड लागल्याचं मी कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं. परंतु आता मात्र कडूनिंबाची झाडं कीड धरत आहेत.” मी त्याला म्हटलं, “कारण आता चौकीदारच चोर झाले आहेत.”
पाच वर्ष या प्रकारची विधाने केल्यावरही युती करताना ती देव, देश आणि धर्मासाठी केली असल्याचं छाती ठोकून सांगण्यासाठी किती धैर्य लागत असेल? ते काही साध्यासुध्या वाघांचे काम नव्हे! एकदा ही युती जाहीर झाल्यावर मात्र राऊतांनीही आपली शस्त्रे म्यान करून आपल्या गुहेत  ठेवून दिली आहेत.
‘माझा विठ्ठल बडव्यांनी घेरलेला आहे’, असं राज ठाकरेंनी सेना सोडताना म्हटलं होतं. विठ्ठल अंतर्धान पावल्यावरही बडवे कायम राखले, हे उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व आहे. बडव्यांची मानसिकता त्यांना बरोबर कळली आहे.  ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा मराठी बाणा असल्याचे आपण ऐकले-वाचले होते.  उद्धव यांनी ‘वाकेन पण मोडणार नाही आणि वाकल्याचे कबुल मात्र करणार नाही’ असा नवा फंडा अंगिकारला आहे. आणि तसेही , वाकल्याचे लक्षात ठेवण्याएवढा वेळ आज कोणाकडे नाही, हे त्यांना माहिती आहे.
‘उद्धव ठाकरेंनी मुंबईतली सत्ता राखली’ एवढेच इतिहास लक्षात ठेवणार आहे; ‘कशी राखली’ याचे इतिहासालाही विस्मरण होणार आहे, कारण सध्याचे दिवसच इतिहास बदलण्याचे आणि विस्मरणाचे आहेत, याची उद्धव यांना कल्पना आहे.

अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0