तेजस्वी सूर्यांकडून ‘हिंदू धर्म वापसी’चे आवाहन मागे

तेजस्वी सूर्यांकडून ‘हिंदू धर्म वापसी’चे आवाहन मागे

नवी दिल्लीः हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना हिंदू धर्मात परत येण्याचे आवाहन करत हिंदु पुनरुत्थानाची भाषा करणारे भाजपचे लोकसभेचे खासदार तेजस्वी सूर्या यांना आपले वक्तव्य मागे घ्यावे लागले. आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाला, त्यामुळे आपण आपले विधान विनाशर्त मागे घेत असल्याचे ट्विट त्यांनी सोमवारी केले.

२५ डिसेंबरला उडुपी येथे श्री कृष्ण मठात एका भाषणात तेजस्वी सूर्या यांनी भारतात हिंदू पुनरुत्थानाची गरज असून हिंदू धर्म सोडून गेलेल्यांनी हिंदू धर्मात पुन्हा यावे असे आवाहन केले. त्यांनी देशातील मंदिरे व मठांना हिंदू धर्मात येणाऱ्यांना सामावून घ्यावे असे आवाहन केले. या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियात वेगाने पसरल्याने त्यांच्यावर सर्वच थरातून टीका झाली. हा व्हीडिओ यू ट्यूबवर उपलब्ध आहे. आपल्या २० मिनिटाच्या भाषणांत तेजस्वी सूर्या यांची भाषा आक्रमक होती. हिंदू धर्मात परत येण्याचा कार्यक्रम टिपू जयंतीला व्हावा व हिंदूंची ‘घर वापसी’ हिंदूंची जबाबदारी असल्याचे त्यांचे वक्तव्य होते. आम्ही या देशात राम मंदिर बनवले. आम्ही जम्मू-काश्मीरचे ३७० कलम हटवले. पाकिस्तानमधील मुसलमानांना हिंदू धर्मात घेणे गरजेचे आहे. त्यासाठी घर वापसीला प्राधान्य देणे महत्त्वाचे असून पाकिस्तान हा अखंड भारताच्या विचारधारेतला घटक असल्याची विधाने त्यांनी केली होती.

काही दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभेत धर्मांतरण रोखणारे विधेयक संमत झाले होते. त्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यात गेल्या काही दिवसांत ख्रिसमस सणाच्या काळात राज्यातल्या काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी चर्चमधील प्रार्थनांना अटकाव केला होता. अशा परिस्थितीत तेजस्वी सूर्या यांचे हे वादग्रस्त भाषण आले आहे.

तेजस्वी सूर्या यांनी या पूर्वीही मुस्लिमविरोधी वक्तव्ये केली आहेत.

COMMENTS