बेरोजगारी शिखरावर; ६० लाख पदे रिक्त : वरुण गांधी

बेरोजगारी शिखरावर; ६० लाख पदे रिक्त : वरुण गांधी

भाजप खासदार वरुण गांधी म्हणाले, की संपणारी प्रत्येक नोकरी रेल्वेची तयारी करणाऱ्या कोट्यवधी तरुणांच्या आशा संपवत आहे. हे 'आर्थिक व्यवस्थापन' आहे, की 'खाजगीकरणा'कडे वाटचाल? त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नवीन नोकऱ्या देण्यास सक्षम नाही, तर आहे त्या नोकऱ्या हिसकावण्यात सक्षम आहे.

मोदी ‘राष्ट्राध्यक्ष’ असते तर बरे झाले असते…
‘कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करता येत नाही’
सर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता

नवी दिल्ली: बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार वरुण गांधी यांनी शनिवारी सांगितले, की केंद्र आणि राज्य सरकारची ६० लाखांहून अधिक मंजूर पदे विविध क्षेत्रात रिक्त आहेत आणि बेरोजगारी तीन दशकांतील सर्वोच्च पातळीवर आहे.

उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे खासदार असणारे गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक चार्ट प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये क्षेत्रानुसार सरकारी नोकऱ्यांचा उल्लेख आहे.

गांधी म्हणाले, “जेव्हा बेरोजगारी तीन दशकांच्या उच्चांकावर आहे, तेव्हा ही आकडेवारी धक्कादायक आहे. भरतीअभावी कोट्यवधी तरुण निराश असताना, ‘सरकारी आकडेवारी’वर विश्वास ठेवला तर देशात ६० लाख ‘मंजूर पदे’ रिक्त आहेत.

ते म्हणाले, ‘या पदांसाठी दिलेले बजेट गेले कुठे? हे जाणून घेणे हा प्रत्येक तरुणाचा हक्क आहे.

रविवारी केलेल्या दुसर्‍या ट्विटमध्ये ते म्हणाले, “गेल्या सहा वर्षांत वर्ग III-IV मधील ७२ हजार पदे काढून टाकणारी रेल्वे आता एनसीआर झोनमधील १० हजार पदेही काढून टाकणार आहे.”

ते म्हणाले, “संपणारी प्रत्येक नोकरी रेल्वेची तयारी करणाऱ्या कोट्यवधी तरुणांच्या आशा मोडीत काढत आहेत. हे ‘आर्थिक व्यवस्थापन’ आहे की ‘खाजगीकरणा’कडे वाटचाल?”

गांधी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला देखील सरकारी पदांवरील रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित केला होता आणि म्हटले होते, की नोकरी इच्छुक हताश आहेत आणि प्रशासकीय अकार्यक्षमतेची किंमत चुकवत आहेत.

केंद्रातील त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार कायद्यांचा बचाव करत असताना आता रद्द करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांविरुद्धच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ते उघडपणे पाठिंबा देत होते.

वरुण गांधी काही काळापासून लोककेंद्रित मुद्द्यांची बाजू घेत आहेत, जे भाजपच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत नाहीत. तीन वेळा लोकसभेचे खासदार असलेले गांधी उत्तर प्रदेशमधील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा प्रचार करताना दिसले नाहीत.

गांधी घराण्यातील, वरुण हे एकेकाळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि विशेषतः उत्तर प्रदेशच्या राजकारणात विशेषत्वाने भाजपचा प्रमुख तरुण चेहरा म्हणून ओळखला जात असे.

मोदी सरकार नोकऱ्या देण्यास सक्षम नाही, हिसकावण्यास सक्षम आहेः राहुल गांधी

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नवीन नोकऱ्या देत नसून उर्वरित नोकऱ्या हिसकावून घेण्यास सक्षम असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.

भारतीय रेल्वेमध्ये ९१ हजारांहून अधिक पदांवर भविष्यात कधीही भरती होणार नाही, असा दावा करणाऱ्या बातम्यांचा हवाला देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘मोदी सरकार नवीन नोकऱ्या देण्यास सक्षम नाही, परंतु उर्वरित नोकऱ्या हिसकावण्यात ते नक्कीच सक्षम आहे. लक्षात ठेवा ही तरुणाई तुमच्या शक्तीचा गर्व मोडून काढेल. त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणे या सरकारला महागात पडेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0