उन्नाव प्रकरण : ९० टक्के भाजलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू

उन्नाव प्रकरण : ९० टक्के भाजलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू

नवी दिल्ली : ९० टक्क्याहून अधिक भाजलेल्या उन्नावमधील बलात्कार पीडित तरुणीचे शुक्रवारी रात्री ११.४० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. दोन दिवसांपूर्वी ही तरुणी तिच्यावर झालेल्या बलात्कार खटल्याच्या सुनावणीसाठी उन्नावहून रायबरेलीकडे रवाना होत असताना तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पण जामीनावर सुटलेल्या पाच तरुणांनी रॉकेल ओतले व तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर सुमारे ९० टक्क्याहून अधिक भाजलेल्या या तरुणीला लखनौतील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ट्रॉमा सेंटरमध्ये तातडीने हलवण्यात आले होते. पण गुरुवारी डॉक्टरांनी तिला दिल्लीत हलवण्यास सांगितले. त्यानंतर रात्री तातडीने तिला दिल्लीमध्ये विमानाने आणण्यात आले होते. तिच्यासाठी वेगळा अतिदक्षता विभाग तयार केला होता. डॉक्टरांची एक टीम तिच्यावर लक्ष ठेवून होती. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दिवसभर तिला वाचवण्याचे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न होते पण शुक्रवारी रात्री ११.१० च्या सुमारास तिची प्रकृती खालावली व ११.४० मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.

COMMENTS