उ. प्रदेशात गुंडांच्या गोळीबारात ८ पोलिस ठार

उ. प्रदेशात गुंडांच्या गोळीबारात ८ पोलिस ठार

लखनौः कुख्यात गुंड विकास दुबे व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी गेलेल्या उ. प्रदेशच्या पोलिसांच्या पथकावर या गुंडांनीच तुफान गोळीबार केल्याने एका पोल

उ. प्रदेशात भाजपच्या निम्म्या आमदारांना तीनहून अधिक अपत्ये
योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये होत असलेल्या खोट्या चकमकी ‘‘अत्यंत चिंताजनक” – संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार समिती
सोनभद्र हत्याकांड : आदित्यनाथ सरकार कोंडीत

लखनौः कुख्यात गुंड विकास दुबे व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी गेलेल्या उ. प्रदेशच्या पोलिसांच्या पथकावर या गुंडांनीच तुफान गोळीबार केल्याने एका पोलिस उपअधीक्षकासह ८ पोलिस ठार झाल्याची घटना २ व ३ जुलैच्या मध्यरात्री कानपूर येथे घडली. या घटनेने उ. प्रदेश पोलिस दलाला मोठा हादरा बसला असून या चकमकीत दोन गुंड ठार झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

विकास दुबे याच्या नावावर पूर्वीच अत्यंत गंभीर स्वरुपाचे ६० गुन्हे असून तो अनेक वर्षे बेपत्ता होता.

२ व ३ जुलैच्या मध्यरात्री विकास दुबे व त्याची काही साथीदार कानपूरनजीकच्या दिकरू गावात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी पोहचले. हे पथक पोहचताच त्यांच्यावर एका इमारतीच्या गच्चीवरून तुफान गोळीबार करण्यात आला. यात पोलिस उपअधिक्षक देवेंद्र मिश्रा, तीन पोलिस उपनिरीक्षक व ४ हवालदार ठार झाले.

आपल्याला पोलिस पकडण्यासाठी येत असल्याची माहिती विकास दुबे याला मिळाली होती, असे उ. प्रदेशचे पोलिस महानिरीक्षक एससी अवस्थी यांनी सांगितले. आपल्यापर्यंत पोलिस पोहचू नयेत म्हणून दुबे व त्याच्या साथीदारांनी रस्त्यात जेसीबी लावून रस्ता रोखला होता पण पोलिसांनी याची माहिती नव्हती. रस्त्यावर जेसीबी दिसल्याने पोलिसांचे हे पथक खाली उतरले, त्या दरम्यान एका इमारतीच्या गच्चीवर दबा धरून बसलेल्या गुंडांनी पोलिसांवर बेछुट गोळीबार केला.

या घटनेत ७ अन्य जखमी झाले असून काही पोलिस बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, त्यात पोलिस सामील असतील तरीही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पोलिस उपमहानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार या गुंडांनी पोलिसांची शस्त्रेही आपल्यासोबत पळवून नेली. या घटनेत दुबेच्या दोन साथीदारांना ठार मारल्याचेही पोलिस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एक ट्विट करून कानपूरच्या कर्तव्य बजावणार्या शहीद पोलिसांना आदरांजली वाहिली आहे. या पोलिसांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे ते म्हणाले.

विकास दुबे गेली अनेक वर्षे पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याच्यावर ६० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याला ३१ ऑक्टोबर २०१७मध्ये लखनौतील कृष्णानगर भागात ताब्यात घेतले होते. पण नंतर त्याची सुटका झाली होती. त्याच्यावर २५ हजार रु.चे इनामही लावण्यात आले होते.

२००१मध्ये विकास दुबे याने एका पोलिस ठाण्यात शिरून भाजपचा एक नेता व राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. या चकमकीत अन्य काही जणही ठार झाले होते.

विकास दुबे याने काही काळ सरपंचपद व जिल्हा परिषद सदस्यत्वही सांभाळले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0