सपाकडून डॉ. कफील खान यांना विधान परिषदेचे तिकीट

सपाकडून डॉ. कफील खान यांना विधान परिषदेचे तिकीट

लखनऊः उ. प्रदेश विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीने डॉ. कफील खान यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली आहे. डॉ. कफील खान यांना देवरिया-कुशीनगर येथून पक्षाने तिकिट दिले असून २०१६मध्ये ही जागा समाजवादी पार्टीच्याच रामा अवध यादव यांनी जिंकली होती.

येत्या ९ एप्रिलला उ. प्रदेशात विधान परिषद निवडणूका होत आहेत. या निवडणुका ३६ जागांसाठी होत असून मतमोजणी १२ एप्रिलला होणार आहे.

२०१९मध्ये गोरखपूर येथील बीआरडी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ६० बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणानंतर डॉ. कफील खान चर्चेत आले होते. डॉ. कफील खान हे दुसऱ्या वॉर्डमध्ये कार्यरत होते व त्यांनी अनेक बालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण या दुर्घटनेसंदर्भात उ. प्रदेश सरकारने डॉ. कफील खान यांच्यासह अन्य ९ जणांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना नोकरीतून बरखास्त केले होते. ड़ॉ. कफील खान यांना या प्रकरणी ९ महिने तुरुंगातही ठेवण्यात आले होते. पण चौकशी आयोगाने डॉ. कफील खान यांची २७ सप्टेंबर २०१९ सर्व आरोपातून मुक्तता केली. रुग्णालय प्रशासनानेही त्यांच्यावरचे आरोप मागे घेतले होते. या संपूर्ण घटनाक्रमावर डॉ. कफील खान यांनी ‘द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’ हे पुस्तक शब्दबद्ध केले आहे.

डॉ. कफील खान यांच्यावर सीएए विरोधातील आंदोलनात सहभागी असल्याच्या कारणावरून अटकेची कारवाई झाली होती. त्यांनी १२ डिसेंबर २०१९मध्ये अलिगढ विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भाषण दिले होते, हे भाषण चिथावणीखोर असल्याचा ठपका ठेवत डॉ. कफील खान यांच्यावर रासुका लावण्यात आला होता. ते काही दिवस उ. प्रदेशात तुरुंगात होते. पण सप्टेंबर २०२०मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने ड़ॉ. कफील खान यांची त्वरित सुटका करण्याचे आदेश दिले होते. या आदेशात आपण हस्तक्षेप करू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

मूळ बातमी

COMMENTS